फेब्रुवारी २४ - नाम

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.


' आमच्या हातून वारंवार चुका होतात ' असे तुम्ही म्हणता. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो, किंवा बोलताना बोबडे बोलतो, त्याचे आईबापांना कौतुकच वाट्ते, त्याप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते. चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही तसेच कौतुक वाटते. म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही. गुरुने एकदा सांगितले की, ' तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस, ' तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे. आपल्या हातून होणार्‍या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंबथेंब पोटात गेले पाहिजे. ऑफिसमध्ये ते आपण बरोबर घेऊन जावे. विद्वान्, अडाणी, श्रीमंत, गरीब, सर्वांना हे औषध सारखेच आहे. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला लवकर गुण येईल.

एखादा मुलगा ' मी विहिरीत उडी घेणार ' म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हा हट्ट पुरवायचा, का त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे? त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत. खरा भक्त कधीही दुःखी-कष्टी असत नाही, आपल्या समाधानात असतो; मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधिग्रस्त असेना! अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते. भक्ताला कसलीही आस नसते,त्यामुळे त्याला दुःख नसते. तो आणि परमात्मा एकरूपच असतात. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला ' मी ' चा विसर पडत जातो. ' मी नसून तूच आहेस ' ही भावना दृढ होत जाते. शेवटी ' मी ' नाहीसा झाला की राम, कृष्ण, वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक राहतो.

आजारातून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे, त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुणभक्तीने तरून जावे. देहबुद्धी असणार्‍या माणसाला सगुणावाचून भक्तीच करता येणार नाही. भगवंताला आपण सांगावे की, " भगवंता, तुझी कृपा मजवर असू दे; आणि कृपा म्हणजे, तुझे अखंड स्मरण मला अखंड राहू दे. " यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल. भगवंतावाचून कशातही समाधान नाही. त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही. जो भगवंताचा झाला, त्याच्या नामात राहिला, त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही.

N/A

References : N/A
Last Updated : May 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP