फेब्रुवारी २६ - नाम

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.


मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे. आपल्या सर्व धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही; आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे, असे सर्वजण सांगतात. पण खरोखरच परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे. परिस्थितीसंबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी आंतर-स्थिती यांचा विचार करावा लागेल. बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीरप्रकृती आड येते. ही प्रकृती कशीही असली तरी भगवंताचे स्मरण आपल्याला करता येईल की नाही? प्रकृतीला कितीहे क्षीणत्व आले, देहाला कितीही विकलता आली, तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते, असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. देहाची अवस्था कोणतीही असली, तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही. तेव्हा, प्रकृती आड येते, असे म्हणणे कितपत सयुक्तिक ठरेल?

पुष्कळ लोक आर्थिक अडचणींसंबंधी कुरकुर करतात. पैसा नसल्याकारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन, भगवंताकडे लक्ष द्यायला सवडच मिळत नाही असे बरेचजण सांगतात. पण खरोखर तुम्ही मला सांगा, जगात भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले कितीजण नामस्मरण करतात? आजपर्यंत किती राजेलोक आपले राजवैभव लाथाडून भगवंताच्या प्राप्तीसाठी बैरागी झाले? आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते, हे म्हणणे बरोबर नाही. उलट, पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. पैसा असला की एक आधार आहे असे वाटते. म्हातारपणी अपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा, तर मी म्हातारपणापर्यंत जगेन याची खात्री कोणी द्यावी? सुख, समाधान हे पैशावर अवलंबून नाही. प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे. वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाच्चे निघायचीच; आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया,क्षमा आणि जिकडेतिकडे आनंदी वृत्ती ही असायचीच. त्याचप्रमाणे पैसा आला की त्याबरोबर तळमळ, लोभ, असमाधान ही यायचीच. परस्त्री एखादे वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही, पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो. बाप-मुलगा, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण, मित्र-मित्र, यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण काही असेल तर पैसाच होय. 

N/A

References : N/A
Last Updated : May 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP