समर्थहंसाख्यान - ब्रह्मादेवास बोध

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रोतीं असावें असावध । तरी म्यां ह्माणावें लागे सावध । परि हा बाळमतीचा छंद । जे सावध सावध ह्मणे ॥१॥

सृष्टिपूर्वी सदोदित । एकरस ब्रह्मा अद्वैत । जीवशिवमायादि द्वैत । निःशेष नाहीं ॥२॥

निजारों गुरुरुप असोन । स्पर्शलें नाहीं गुरुशिष्यपण । हंसहंसदासत्वपण । नसे किमपि ॥३॥

तेथें मी ब्रह्मा स्फुरण उठलें । उगेचि आपाअपणा आठविलें । तेथेंचि गुरुशिष्यत्व उमटलें । स्वसुखग्रहणा ॥४॥

सुखसुखीं स्वसुखा घेतां । या त्रिपुटीची नसे वार्ता । यास्तव त्रिपुटिरूप द्वैता । वाउगेम उभें केलें ॥५॥

जरी हें द्वैत उभारलें । परी अद्वैत नाहीं हलवलें । जैसें आरसिया मुख दिसलें । परि असे मुखीं मुख ॥६॥

असो ऐसें ब्रह्मास्फुरण । तोचि आदिगुरु नारायण । परि तो अव्यक्त व्यक्तिविहीन । स्फुर्तिमात्रें ॥७॥

चंचल तेचि प्रकृति । जाणता पुरुष स्वयंज्योति । जेवी शर्करा गोडी न निवडिती । परी जाणती अनुभवी ॥८॥

जाड्यांश तेंचि शिष्यपण । गुरुत्व तेंचि केवल ज्ञान । परी गुरुत्व असे प्रगट पूर्ण । शिष्यत्व गुप्त ॥९॥

परी तेथें व्यक्ति नसतां । कोण सुख कोण असे घेता । तेव्हां शिष्यरूप जाला धर्ता । गुरुचि आपण ॥१०॥

स्फुरणीं जाड्यांश होतां लीन । तोचि हेतु आला देह धरून । तयासीच नांव चतुरानन । स्वतां जन्में स्वयंभु ॥११॥

जाड्यांशांचें अधिकपण । उणें जालें स्फुर्तिज्ञान । तेव्हा तया वाटे मी कोण । एकटाचि येथें ॥१२॥

तेव्हां अंतूरीं जे स्फूर्ति होती । ते स्वतांचि जाली उद्भवती । तप तप अक्षरें द्वय उमटती । सोहं सोहं ऐसें ॥१३॥

हाचि आदिगुरुचा उपदेश । चतुरानन पावला अवश्य । मी ब्रह्मा हें कळलें निःशेष । तेव्हा सुखी जाला ॥१४॥

नेणपण शिष्यत्व निमालें । गुरुरुपेंक ज्ञानचि उरलें । परी देहाकारत्वें परिणमलें । शिष्यत्वरूप ॥१५॥

जरी देहाकारत्व आलें । परी देहस्फूर्तीसी त्यागिलें । अहं ब्रह्माचि स्फुरूं लागलें । यास्तव गुरुत्वचि तें ॥१६॥

तपरूपें सोहं अक्षरें । तोचि प्रणव जाणिजे विचारें । त्रिमात्रात्मक अ उ प्रकारें ॥ अर्ध मात्रास बिंदु ॥१७॥

पंचाशत प्रकार तयांचे । राहणें असे चारी वाचे । पुढें मागें करितां शब्दांचे । अनंत भेद होती ॥१८॥

हाचि स्फुर्तिपासून उठे नाद । यास्तव अपौरुषी वेद । तो नादति विस्तारला विशद । मातृक क्षरीं ॥१९॥

चतुर्मुखापासून गळाला । पुढें शब्दाब्रह्मा निघाला । नंतर अतिशये विस्तारला । व्यासादिकामुखें ॥२०॥

असो वेद तोचि ॐकार । तोचि मुख्य दोनी अक्षर । आदिगुरुपासून सावित्रीवर । पावला उपदेश ॥२१॥

त्याचा विचार स्वतां करितां । समाधिश्थ जाला विधाता । शतवर्षे निर्विकल्प असतां । सविकल्पता पातली ॥२२॥

उप्तत्तीची व्यवस्था पुढें । स्वतांचि करितां जाला कोडें । प्रजापति मन्वादि कर्माकडे । प्रजोत्पादना योजिले ॥२३॥

विधातियास मानसपुत्र । चौघे प्रगटले सनत्कुमार । त्यासी ह्मणे सावित्रीवर । प्रजोत्पादन करा ॥२४॥

येरु विनविती पितयासी । कर्मबंधन नको आम्हांसी । ब्रह्मानंदें तृप्त मानसीं । संचार करूं ॥२५॥

परी एक विनंति अवधारा । चित्तामाजीं विषयाचा थारा । आणि चित्त विषयामाझारा । हें वेगळें कैसें निवाडिती ॥२६॥

ऐसा प्रश्न हा कुमारांचा । विचार अंतरीं करी त्याचा । परि कर्मीं व्याप्त मति प्रश्नाचा । परिहार नेणे ॥२७॥

अंतरीं आदिनारायणासी । आठविता जाला निजगुरूसी । तंव तो नारायण व्यापक सर्वांसी । हंसरूपें प्रगटला ॥२८॥

दिव्य दर्शन ज्याचें अद्‌भुत । प्रवेशला ब्रह्मासभे आंत । तो कुमारें देखोनि हर्षभरित । तूं कोण ऐसें पुसिलें ॥२९॥

नंतर हसोन हंस बोले । तुह्मी कोण ऐसें जें पुसिलें । विप्रहो मज वाटताती फोले । शब्द हे तुमचे ॥३०॥

देह तरी पंचभूतिक । आत्मा निर्विकार देही एक । येथें फोण पुसणें निरर्थक । वाचारंभण ॥३१॥

तथापि मी आदिगुरु नारायणु । व्यपकत्वें मज बोलती विष्णु । फेडावया तुमचा प्रश्नु । पातलों हंसरूपें ॥३२॥

चित्तीं विषय विषयीं चित्त । परस्परा झाले एकीभूत । हे निवडती कैसे प्रश्न संकेत । असे तुमचा ॥३३॥

तरी ऐका एकाग्र होऊन । प्रत्यगात्मा ब्रह्मा अभिन्न । तेथें स्फूर्तिरूप जालें मायाभान । पुढें निर्माण चित्त विषय ॥३४॥

भूतापासुनि दोनी जाले । यास्तव भौतिकत्व या स्पष्ट बोलिलें । भोग्य भोक्ता मात्र विभागले । गुणभेदें कडोनी ॥३५॥

भूतसत्वांश हें चित्तं । ज्ञानशक्ति तेथें वर्तत । यास्तव भोक्तृत्व आलें विख्यात । चांगलें वाईट निवडणें ॥३६॥

भूततमांश विषय । द्रव्यशक्तीचा समुदाय । हें भोग्य जालें परी भुतकार्य । विषय चित्त दोनीही ॥३७॥

तस्मात् मायाजनित हें चित्त । आणी विषयही शबल मायानिर्मित । मायेते माया असतां भोगित । येथें काय आत्मयाचें ॥३८॥

मायिक हें जरी उद्धवलें । तरी आत्मया काय प्राप्त जालें । अथवा प्रलयी लया गेलें । तरी हानी कोणती आत्मयाची ॥३९॥

मृगजळ पडलें जये स्थानीं । तेथें भिजली नाहीं धरणी । जेथें न पडे तेथें कोरडेपणीं । असें हें बोलणें नको ॥४०॥

तस्मात् कुमार हो अवधारा । आपण आत्मा हा निर्धार करा । चित्त आणि पंचतन्मात्रा । त्यागा दोनीहीं ॥४१॥

यासी मिथ्यत्वें पहावें । मग राहोत जावोत आघवे । आपुलें सत्यत्व दृढ करावें । तिहीही काळीं ॥४२॥

इतुकें बोलुन मौनें राहिला । मग ब्रह्मासहित कुमारें पूजिला । प्रार्थून ह्मणती प्रश्न फेडिला । आमुचा गुरुवर्या ॥४३॥

नंतर हंस पावला अंतर्धान । कुमारही पावले समाधान । संशयी होता चतुरानन । तोही निःसंशय जाला ॥४४॥

एवं ब्रह्मायाचा श्रीगुरु । आदिनारायण मुख्य निर्विकारु । परि व्यक्तिरूपें हंस साकारु । उपदेशगुरु जाहला ॥४५॥

नंतर ब्रह्मा कवणेही काळीं । स्वस्वरुपाचें पडला सुकाळीं । अज्ञान निपटून गेलें समूळी । तेव्हां सुखरूप झाला ॥४६॥

असो हंस गुरु आदि सर्वांसी । यास्तव हंसपद्धति बोलिजे इजसी । पुढें ओघ चालिला परंपरेसी । तो श्रवण करा श्रोते ॥४७॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । ब्रह्मोपाख्यान हंसगीतख्याति । तृतीय प्रकरणीं ॥३॥


References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP