समर्थहंसाख्यान - कृष्णातीरीं गमन

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीमत्सद्रुरु समर्थ सज्जन । चालिले ज्नस्थानापासुन । एकाकी दक्षिणाभिगमन । अति सुंदर काया ॥१॥

मस्तकीं जटा अति शोभती । वर्तुलत्वेआं मुखचंद्राकृति । भाळी अवाळूं नेत्रपाति । त्रिपुंड्रही रेखिला ॥२॥

कंबूचे परी शोभे गळा । वरी दिव्य हुर्सुजी मेखळा । जानुपर्यंत रुळे सोज्वळा । तिणें अंगकांति आच्छादिली ॥३॥

कटिबंदासहित कौपीन । करकमळी कुबडी सलक्षण । मागीं चालतां होतसे दर्शन । विश्वजनांप्रति ॥४॥

जेथें जेथें चरण लागती । तेथील धन्य होतसे जगती । धन्य जे जे अवलोकिती । सेविती वंदिता ते धन्य ॥५॥

कृष्णावेणीचा संगम जेथें । स्नान करुनी बैसतीं तेथें । मनीं विचारिलें समर्थें । कीं आज सहचारी भेटेल ॥६॥

मग तैसेचि उत्तर तीरानें चालिले । करवीरा क्षेत्रालागीं आले । सर्व सदनीं प्रवशते जाले । भिक्षेचें मिषें ॥७॥

तेथें एक कथा अद्‌भूत । जाली ते ऐका स्वास्थचित्त । कुळकर्णीं नामें विठ्ठलपंत । भोगल गांवींचें ॥८॥

रुक्माई नामें तयाची पत्‍नी । तेणेंसी युक्त असतां आपुलें सदनीं । तेणें निज ग्राम त्यागुनी राहिले येवोनी करवीर क्षेत्रीं ॥९॥

तेथें रुक्मिणी जाली गरोदर । नव मास होतां प्रसवली पुत्र । परी तो न रडेची अणुमात्र । तेणें आश्चर्य मातापित्या ॥१०॥

पुढें अष्ट वर्षाचा जरी जाहला । परी तो हसेना ना कधीं बोलिला । पितरें म्हणती हा कोण जन्मला । प्रपंचाचे उपयोगा न ये ॥११॥

व्रतबंध ब्राह्मणा केला पाहिजे । यास्तव करिती मेळवून द्विजें । कर्णीं सांगितलीं गायत्रीबीजें । परी जो नुच्चारी कदा ॥१२॥

व्रतबंधाहि जालियावरी । तीन वर्षे जालीं सदनांतरीं । तेथें अकस्मात् आली फेरी । हंस समर्थाची ॥१३॥

तेथें ओसरीवरी तें जड बाळ बैसलें । जें कां कधीं नाहीं बोलिलें । जय रघुवीर मुखीं उच्चारिलें । अंगणीं सज्जन समर्थे ॥१४॥

समर्थासी पाहूतां क्षणें । बाळ हसिन्नलें खदखदोनी । त्वरें उठोनि नमस्कारी चरणीं । समर्थें उचलोनि आलिंगले ॥१५॥

बाळें नेत्र भरोनि आणिले । जी जी वाट पाहतां नेत्र शिणले । बापा तुजसाठींच येणें केलें । समर्थ बोलती ॥१६॥

हें आश्चर्ये मातापिता पाहती । अरे हें मुकें बाळ बोलिलें म्हणती । नमस्कारुनी समर्थां विनविती । कीं बोलिला तुम्हां कैसा ॥१७॥

समर्थ म्हणती हा प्रवृत्तीचा वेडा । न ये प्रपंचाचिये चाडा । तरी हा दान द्यावा रोकडा । आम्हांलागोनी ॥१८॥

तुम्हांसी पुत्र होईल दुसरा । म्हणतां आनंद जाला पितरां । हा अंबादास नामें वेडा त्वरा । समर्था देते जाले ॥१९॥

त्याच क्षणीं झोळी कुबडी । समर्थ देते जाले तांतडी । घेऊन निघाले अति आवडी । म्हणती हें आत्मलिंग माझें ॥२०॥

एके दिनीं कृष्णातीरी । बैसले असतां संतोष थोरीं । फांटीं देखिली डोहाउपरी । तेव्हां बोलती अंबादासा ॥२१॥

हे कुठोर घेऊन जाय वृक्षावर । शेंडिया उभा राहून बूड तोडी सत्वर । येरें घालुन नमस्कार । तैसाचि करितां जाहला ॥२२॥

तोडितां तोडितां फांटी तुटली । कडकडोनि डोहामाजीक रिचवली । अंब्यासाहिस अथावीं बुडाली । देखोनि पळाले समर्थ ॥२३॥

मग ती दिवसांतेथें आले । अंबा अंबा हांफ मारू लागले । कल्याण कीं अकल्याण सांगे वहिलें । मज पुढे येवोनी ॥२४॥

ऐसी समर्थाची पडतां वाणी । फांटी कुर्‍हाडासहित निघोनि । मी कल्याण असें प्रसादेंकडुनी । बोलोनि चरणी लागला ॥२५॥

समर्थ म्हणती तुझें नाम कल्याण । बंधमोक्षातीत तूं परिपुर्ण । ऐसा उपदेशें करितीं संशयहीन । दिनानिशीं तयावनी ॥२६॥

तितुका उपदेशप्रकार सांगतां । ग्रंथ विस्तारेल तत्वतां । यास्तव बोलिलें अल्पसंकेता । कीं ज्ञान उपदेशिलें ॥२७॥

वनमाजी उभयतां राहती । दिननिशीं चर्चा प्रश्न प्रश्नोत्तर करिती । असो कल्याण पावला निजतृप्ति । समर्थ प्रसादें ॥२८॥

एके दिनीं एका ग्रामाआंत । भिक्षेलागीं उभयतां जात । तेथें वेणी नामें भिक्षा वाढित । तेव्हा वयं वर्ष तिसरें ॥२९॥

समर्थाचें चरणीं लागोनी । हात जोडुन करी विनवणी । मज समागमें जावें घेवोनी । मी प्रपंच सर्वथा न करी ॥३०॥

समर्थ म्हणती तुझें लग्न होतां । मृत्यु पावेलं मंडपी भर्ता । ते समयी मी येऊन तत्वतां । तुजला घेउना जाईन ॥३१॥

इतुकें बोलोनि समर्थ गेले । वेणी दिवस मोजीत अमुक गेलें । तो पितयानें लग्नही केलें । वस सुंदर पाहोनी ॥३२॥

लग्न लागतां तिसरे दिनीं । वर मडपीं गेला मरोनी । हें देखोनीक हर्षली वेणी । कीं समर्थ सत्य केलें ॥३३॥

परी मज घेऊन केव्हां जाती । हेचि तळमळ लागली चित्तीं । तंव दशेची होतां समाप्ति । समर्थ भेटती येवोनी ॥३४॥

वेणी म्हणे मातापित्यांसी । हा स्वामी माझा गुरु तापसी । सेवा करून राहीन त्यापाशी । मज पाश नाहीं कोणता ॥३५॥

इतुकें बोलोनि उठाउठी । समर्थ जातांचि गेली पाठी । तिसी उपदेश कृष्णेच्या कांठी । रामामंत्राचा केला ॥३६॥

समर्थ म्हणती गा कल्याणा । आपणासी तरी संचार वना । हे जाति हिंडतां पावेल शिणा । तरी कैसें करावें ॥३७॥

तंव एक विधवा कामिनी । आका गाम्नी आली समर्थसदनीं । ते म्हणे मज नाहीं कोणी । तरी सेवा करून राहीन ॥३८॥

तिसीहि उपदेश देवोनी । समर्थ बोलती तिजलागुनी । तूं या वेणीची जननी । इचें रक्षण करी ॥३९॥

ऐसेंच कांहीं काळ लोटले । एके दिनी समर्थे काय केलें । कृष्णेंत बुडी मारुनई काढिते जाले । प्रतिमामूर्ती दोन ॥४०॥

अंगलाईची मुर्ती गडावरी । स्थापियेली असे निजकरीं । दुजीं जाऊन चाफळखोरीं । रघुपतीची स्थापिली ॥४१॥

आक्का आणि वेणीप्रति । पूजा करित जा समर्थ सांगती । आणि करावी रामजयंती । भिक्षा मागोनिया ॥४२॥

आम्ही असों याच वनीं । येत जावें दर्शन घेउनी । महाप्रसाद जी म्हणोनी । आज्ञ शिरीं वंदिती ॥४३॥

एके दिनीं एके खेडियांत । समर्थ निजांगें भिक्षेसि जात । श्रीरघुवीर एक्या गृहीं म्हणत । तंव ते शिव्या देत बाई ॥४४॥

हें नांव मरणकाळीं घ्यावें । आजी तूं कैसा म्हणसी स्वभावें । माझे भ्रतार लेंकुरें सुखी असावे । लागती बापा ॥४५॥

आधींच माझिया पतिप्रति । बेदरीं कैद ठेवी भूपति । तयासी द्वादश वर्पे लोटती । भेटोही नाहीं ॥४६॥

समर्थ ह्मणती वो बाई ऐकावें । माझ्या रामाचें भजन करावें । तरी मी पतीसी भेटवीन स्वभावें आठवड्यामाजी ॥४७॥

इतुकें बोलून वेदरास गेले । बादशक्कस जाऊन भेटले । हिशोब देऊन फजल काढिलें । गुमास्ता होउनी ॥४८॥

असो कृष्णाजीपतंसी सोडविले । साता दिवसांत ग्रामासी आणिलें । मग ते उभयंतां भजन करुं लागले । राम राम ह्मणोनी ॥४९॥

मग एकाचें एक पाहून । भजन करिती ग्रामस्थ जन । हें पाहतां हर्षलें सज्जन । एका ग्रामीं राम बोलती ॥५०॥

ऐसें रामाचें नाम पावन । असतां वाळिती अवघे जन । असों आतां मी राम राम ह्मणवीन । तरिच मी रामदास ॥५१॥

विजापुरचे बादशाहापाशीआं । एका मराठा चाकरी कित्येक घोडियांशी । शिवजीनामें पुत्र तयासी । असता जाला ॥५२॥

तयाचिये स्वप्नीं जाउनी । उपदेशिलें रामनामें कडोनी । आणि सांगितलें तयालागोनी । कीं माझें भेटीस यावें ॥५३॥

माझें नाम रामदास । चाफळखोरा माझा वास । इतुकें बोलतां शिवाजीस । जागृती आली ॥५४॥

ह्मणे मज गुरुसमर्थ सांगितलें । तरी चाफळखोरा पाहिजे गेले । सेवाधार न घेतां एकट चरणीं चाले । आला तैसा कृष्णातीरा ॥५५॥

चाफळखोरियांत जाउनी । हुडकितसे समर्थालागुनी । व्यक्ति देखिली जे स्वनीं । कोणी भेटतां न्याहाळित ॥५६॥

तंव साकरविहिरी समीप । बैसलेति उभयतां सुखरुपक । आवाळुसहित न्याहाळिलें रूप । तो तेंचि स्वप्नींचें खरें ॥५७॥

शिवजी ह्मणे नाम काय जी । समर्थ ह्मणती तूंचि कीं शिवाजी । मीचि रामदास असे सहजी । तरी तुझा काय हेतु ॥५८॥

येरु ह्मणे स्वप्नी केलें पावन । तरी प्रत्यक्ष उपदेशावें मजलागून । समर्थ ह्मणती करुनि येई स्नान । तेव्हा शिवाजी स्नान करी ॥५९॥

वनांतील पुष्पें विहिरीचें जीवन । भावें करी श्रीगुरुपूजन । समर्थें राममंत्र उपदेशून । लिद प्रसाद दिधला ॥६०॥

तुझें अटकेसी लागतील झेंडे । शिवाजी तूं राज्य करिसील कोडें । तरी सैन्य ठेवीं गा वीर घोडे । येरू कोठें ह्मणे द्रव्य ॥६१॥

अगा तूं द्रव्य इच्छुनी भूमी चालसी । कांटी आडकेल तुझे पदरासी । तुज पाहिजे तितकी निघेल द्रव्यराशी तया स्थळीं खांदितां ॥६२॥

आज्ञा वंदोनि भूमि जों चाले । कांटि लागतां तेथेंचि खांदिलें । तों द्रव्य उदंड निघालें । तेव्हांचि ठेवी फौजा ॥६३॥

किल्ले ग्रामे पट्टणें पुरें । घेता झाला राज्य सारें । संपत्ति सिंव्हासनें छत्रें । सरदार आणि सेनापति ॥६४॥

इतुके करून समर्थापाशीं । येऊन सांगे नमी साष्टांगेसी । कांहीं आज्ञा करावी ह्मणे मजसी । गुरुदक्षिणा ॥६५॥

समर्थ ह्मणती इतुकें करी । तुझें राज्य जितुक्या भूमीवरी । राम राम बोलवीं तेथवरी । येरू करीं तैसेंची ॥६६॥

पाहलें जोहार जोहार बोलत होती । पुढें राम राम बोलवितसे सर्वाप्रति । समर्थ ह्मणती माझी वचनोक्ति । सर्व सिद्धिस गेली ॥६७॥

एकदां राजवाडियासी सहकल्याण । जय रघुवीर भिक्षा मागती जाउन । शिवाजीने राज्य समर्पिलें ह्मणुन । पत्र लिहून झोळींत घाली ॥६८॥

तेथून पुधे जों चालिले । तों पाठीशी शिवाजी चाले । तूं कां येशी सांगे गा वहिले । येरू ह्मणे कोठें जाऊं ॥६९॥

तंव पत्र पाहिलें झोळिआंत । समर्थ ह्मणती आमुचें राज्य समस्त । परी तूं करीं सेवाधार होऊन अंकीत । आपुलें ऐसें न ह्मणतां ॥७०॥

तथास्तु ह्मणे आज्ञेसी करीन । मन शिवाजी राज्य चालवी आपण । पन्हाळगडी छत्रसिंव्हासन । स्थापिल्या पादुका समर्थाच्या ॥७१॥

त्या पश्चुकाम्चा राज्यभार । आपण चालवी होउनि किंकर । असो पुढील कथेचा अनुकार । सावध ऐका ॥७२॥

भोळाराम मुसळ गोसावी । भीमराज वासुदेवादि हे आघवी । ऐसे महंत शिष्य जाले समुदायी । बहात्तर गणती ॥७३॥

याहि वेगळे बहुत जन । तयांची कोण करील गणन । परी समागमें एक कल्याण । दुजिया राहों न देती ॥७४॥

एकें दिनीं अरण्यांत । कल्याणासी समर्थ बोलत । तुवां अक्षर गिरवावें नेमस्त । कित्ता दिधला काढोन ॥७५॥

तो कित्ता गिरवितां कांहीं एक दिन । अक्षर जाहलें सलक्षण । समर्थ ह्मणती लिही जें मी सांगेन । येरू ह्मणे महाप्रसाद ॥७६॥

मग दासबोध आरंभिला । सातवा दक्षक आधीं लिहिला । नंतर सहाविषयापर्यंत संपविला । ग्रंथ वीसही दशक ॥७७॥

पुढें आत्माराम पंचसमासी । पुर्वारंभ सप्तसमासी । अंतर्भाव जुनाट पुरुषासी । करिते जहाले ॥७८॥

मानसपूजा सगुण ध्यान । गोसावी आणि ध्यान निर्गुण । स्फुट समासादि मेळवून । ग्रंथ चवदा बोलती ॥७९॥

यांही वेगळे मनबोधश्लोक । कडकबीर साक्या अनेक । पदें दोहरें अभंअग प्रबंधादिक । किती काव्य तेंन कळे ॥८०॥

स्वमुखें समर्थें जें जें बोलावें । तें कल्याण लेखकें लेहून ठेवावें । असो सर्व शिष्यवर्गासी बोलावून बरवें आज्ञा करिते जाहलें ॥८१॥

कीं वेगळाला दासबोध बरवा । सर्वांनीं लिहून घ्यावा । नित्य नेमेंसि विचारें वाचावा । सर्व रामदासें ॥८२॥

तेव्हा सर्वजण ग्रंथ लिहून घेती । नित्य नेमेंसी आडवी वाचिती । ऐसा परमार्थ भूमीवरूती । वाढता जाला ॥८३॥

तया परमार्थाचा अर्थरूप चारा । हंस सद्‌गुरु चारिती मज लेंकुरा । तेणें तृप्त होतसे अंतरा । माजी चिमणें बाळ ॥८४॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपे ज्ञानाभिव्याक्ति । श्रीसमर्थहंसाख्यान निगुती । सप्तम प्रकरणीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP