श्रोते हो ऐका सावधान । श्रीमत्सज्जनहंसाचें आख्यान । जेणें श्रवणें लागे अनुसंधान । परमार्थपंथीं ॥१॥
त्रेतायुगीं श्रीराम अवतारु । तोचि परमहंस परमोष्ठिरूपें गुरु । पूर्व प्रकरणीं संकलित प्रकारु । बोलिला असे कथेचा ॥२॥
एके दिनीं मारुतीप्रति । राम घेऊनि गेले एकांतीं । हात फिरवून मुहावरुती । ह्मणती गुह्मां एक ऐकें ॥३॥
तुज मज नाममात्रचि भेद । परि निजरूपें असों अभेद । आह्मी सेवूं निज धाम शुद्ध । तूं आकल्प राहसी भुवीं ॥४॥
पुढें अज्ञानकलि होतां प्राप्त । ज्ञान लोपेल वेदांतसंमत । तेव्हा तुवां अवतार त्वरित । मानव देहीं घ्य वा ॥५॥
तेथें तुझी तुज होतां भेटी । मीही प्रगटेन उठाउठी । उपदेश करीन कर्णपुटीं । मीच ह्माणवुनी तुझ्या ॥६॥
तेव्हा अपरोक्ष ज्ञान प्रगटे । तोचि परमार्थओघ पुढें लोटे । तेणें भवसिंधु तत्क्षणीं आटे । मुमुक्षु जनाचा ॥७॥
ऐसें मारुतीसी बोलून प्रेमा । राम गेले असती निजधामा । पुढें त्रेतायुग जाउनी सीमा । द्वापाराचीही लोटली ॥८॥
चार हजार चारशेंवीस । गत कलीचें गेले वर्ष । तेव्हा प्रगटले समर्थहंस । मारुतीच अंगें ॥९॥
राम मारुती एकरूप । तरी हा रामचि पूर्ण प्रताप । तयाचें चरित्र मी मति अल्प । बोलेन ह्मणे ऐका ॥१०॥
गोदातटाकी योजनाआंत । जांब नामें पुरी विख्यात । तेथील कुळकर्णीं सूर्याजीपंत । राणुबाई पत्नी तया ॥११॥
प्रपंचीं असुन परमार्था साचा । तया उपदेश असे मुख्य सुर्याचा । मंत्र त्रयोदशाक्षरांचा । रामनामें सप्रणव ॥१२॥
सूर्य सांगें सूर्याजीपंतासी । रामचि येईल तुझिया उदरासी । तो तारिल बहुत जीवांसी । उपदेश करुनी ॥१३॥
हें ऐकुन परम संतोषला । प्रपंचींच परमार्थं चालविता झाला । तों अकस्मात् प्रथम पुत्र जन्मला । नाम ठेविलें त्या गंगाधर ॥१४॥
तयामगुन सलक्षण । जन्मते झालें बाळरत्न । तया नाम ठेवीं नारायण । आवडीनें पिता ॥१५॥
गंगाधराचा व्रतबंध केला । तो एकदां पित्यासी बोलता झाला ॥ जो जो उपदेश द्यावा मजला । परमार्थ घडे जेणें ॥१६॥
पित्याने बहु बरें ह्माणितलें । माडीवरी आसन घातलें । गंगाधरासी पाचारिलें । कीं सामुग्री घेऊन यावें ॥१७॥
तंव तेणें गंधपुष्पें घेउनी । चढता झाला पायरियावरुनी । मागें पाहे जों परतोनी । तों नारायण षाठीं येत ॥१८॥
तयासि ह्मणे बापा सखया । तुवां येऊं नये या समया । तुज अधिकार नसे उपदेश घ्यावया । कीं तुझा व्रतबंध नाहीं ॥१९॥
इतुकें वचन वडिले बंधूचें । एकताचि परतला साचे । मज अधिकार नाहीं या वचनाचें । तात्पर्य पाहूं ॥२०॥
ह्मणुन तैसाचि निघाला । मारूतीचें राउळीं आला । पाठीमागें सांदींत निजेला । तीन दिवसपर्यंत ॥२१॥
गंगाधरें उपदेश इकडें । घेतां जाला परम कोडें । पिता ह्मणे रे दृष्टीस न पडे । कोठें आहे नारायण ॥२२॥
येरु बोले तुज अधिकार नसे । मिया बोलतांचि ऐसें । माघारी गेला शब्दासरिसें । मायेपाशीं असेल ॥२३॥
पिता ह्मणे तया हाफ मारी । येरू धुंडाळित सर्व मंदिरीं । कोठें न दिसे यास्तव झडकरी । तिघेहि शोधा निघती ॥२४॥
ग्रामातिल जितुकीं घरें । तेथेंहि नसे शोधितां सारे । ग्रामस्थवासीहि जाले घाबरें । मळे तळें शोधिती ॥२५॥
परी नारायण कोठें सापडेना । श्रमुनि बैसती आपुलालें सदना । कोणीही न सेविती अन्ना । तीन दिवसपर्यंता ॥२६॥
इकडें नारायण मारुतीमागें । निजेला असतां लागवेगें । मारुती प्रगटूनि निजोगें । उठवी कुरवाळुनी ॥२७॥
ह्मणे सखया कां कष्टसी । खेद कां धरिला मानसीं । येरूनें वंदूनि चरणासी । वृत्तांत सर्व सांगितला ॥२८॥
मज उपदेश अधिकार नाहीं । बंधु बोलिला ते खंति वाटे पाहि । ऐकतां हनुमान वज्रदेही । बोलता जाला ॥२९॥
पूर्वी माझा आणि श्रीरामाचा । संकेत असे बापा साचा । तुज उपदेश रघुनाथाचा । निश्चयेसि होईल ॥३०॥
परि संध्या तूं सदनाचि जाई । उपवास करिती बाप आई । तयालागी सुख देई । अल्पचि काळ ॥३१॥
नारायण ह्मणे मी घरा जाईन । परी तुवां सांगावें येवोन । पितांबंधून्सी कळवी वर्तमान । मज अधिकार आहे कीं नाहीं ॥३२॥
बहु बरे मारुती ह्मणे । तुवां आधीं पुढें जाणें । मी तेथेंच प्रगटुन सत्राणें । निवेदीन सर्व ॥३३॥
इतुके ऐकांताचि नारायण । देऊळाबाहेरी करी गमन । तंव पहाते जाले सर्व जन । सांगती जांउनी पितरांसी ॥३४॥
मग ते तिघेही बाहेर आले । नारायणासी कडिये घेतलें । आज तीन असती जाले । कोठें होतासी सांगे ॥३५॥
येरू ह्मणे मी देउळांत । उगचि होतों खेळत । मग तैसाचि आणिला सदनांत । आनंदभरित तिघेही ॥३६॥
लोक अवघे उठूनि गेले । तिघेचि आनंदें असती बैसले । तों एकाएकी कडकाडिलें । विद्युल्लतेचे परी ॥३७॥
तिघे नित्र जों झांकिती । तों प्रगटला निजारों मारुती । बोलता जाला पहा मजप्रती । नेत्र उघडोनी ॥३८॥
मग त्रिवेर्गें जाऊन चरण वंदिलें । तेव्हा तिघांप्रती मारुती बोले । कीं तुमच्या कुळीं हें रत्न जन्मलें । तें हें राम ब्रह्मा अंगें ॥३९॥
मग सूर्याजीपंत बोले नम्रपणीं । जी जी सत्य सत्य आपुली वाणी । हें पुर्वी सूर्यें मजलागोनी । सांगितलें होतें ॥४०॥
कीं जगदुद्धार करावया । राम येईल उदरा तुझिया । तें सत्य जालें समयीं यया । आपुलें प्रसादें ॥४१॥
ऐसें बोलोनि पूजा केली । नमस्कारून प्रदक्षिणा घातली । संतोपून अंतर्धान पावली । मूर्ति मारुतीची ॥४२॥
तेव्हा त्रिवर्गही नारायणासी । नाचती आनंदें घेऊन कडेसी । वारंवार चुंबिती मुखासी । अलभ्य लाभ जाला ह्मणती ॥४३॥
सूर्याजीपंत ह्मणे सखया । गंगाधर बोलिला तें काय वायां । तुज अधिकार कोठें उपदेश घ्यावया त्रैलोक्यगुरु तूं ॥४४॥
करावया जगदुद्धार । अवतरलासी जानकीवर । ह्मणुन करूं धावें जों नमस्कार । तों येरें चरण वंदिलें ॥४५॥
जी जी तूं या देहाचा पिता । तरी जनक गुरु तूं तत्वतां । देहसंबंधाची नसतां वार्ता । आत्मारामीं भेद नाहीं ॥४६॥
एवं त्रिवर्गासीहि संबोखिलें । नमस्कारुन क्षेम दिधलें । मग ह्मणे पाक करा वहिलें । क्षुधा असती लागल्या ॥४७॥
ऐसिया ब्रह्मानंदासी । वर्णुं शके कोण वाचेसी । असो पाक करोनि वेगेंसी । भोजनें करिते जाहले ॥४८॥
पुढें पाहोनिया सुदिन । पिता करी व्रतबंधन । मुंजीउपरी आरंभिलें लग्न । नोवरी दिव्य पाहोनी ॥४९॥
कोसावरी एक सेन गांव । तेथें समारंभ केला सर्व । सर्व होवोनि महोत्साव । अंतरपाट धरिला ॥५०॥
पुरोहित ह्मणे सावधान । तेव्हां नारायण पाहे मुखावलोकून । आह्मी कोठें असों असावधपण । सर्वदा असो सावध ॥५१॥
ऐसें बोलोनि दिधली आरोळी । सर्व पहात असतां मंडळी । पुच्छ फडत्कारूनि तये वेळीं । धरिला वानरवेष ॥५२॥
गर्जोनिया भुःभुः कारें । मंडपावरी वेंधला त्वरें । तेथून ग्रामांतील भिंती घरें । उल्लंघोनि जातसे ॥५३॥
लोक ह्माणती वानर होवोनी । गेला आमच्या हातीचा निघुनी । आह्मी दुर्भाग्य आह्मा लागुनी । लाभेल कैसा ॥५४॥
तैसाचि जांबेजवळीं येउनी । ग्रामचिये सन्निघानीं । पांच वट असती तया स्थानीं । तया नांव पंचवटी ॥५५॥
तेथें गुप्तरुपें तीन दिवस । नारायणें केला वास । इकडे सुर्याजीपंत होउनि हिरास । ग्रामीं आले परतोनी ॥५६॥
त्रिवगींही अन्न त्यागिलें । करुणा भाकित सदनीं बैसलें । तिसरे दिनीं सुर्याजीपंत एकलें । पंचवटिकेसी ॥५७॥
तों एका वृक्षशाखेवरी । वानर बैसला देखिला नेत्रीं । पिता साष्टांग नमस्कार करी । बद्धांजली राहुन बोलत ॥५८॥
आमुची असोशी नाहीं पुरली । इतुक्यांत निजव्यक्ति आच्छादिली । कृपाळुवा आह्मां भेटी द्यावी वहिली । आह्मी दीनरूफ तुजवीन ॥५९॥
तव वानररूपें वृक्षावरून । बोलता जाला असा सावधान । देहाचा वियोग केव्हाहीं होणें । हें दृश्य मायिक ॥६०॥
प्रवाहांत काष्ठें पडलीं । ते कधीं तरी जाती बिघडलीं । संसारप्रवाहें एके ठायीं जन्मलीं । हे विघडती निश्चयें ॥६१॥
देहाची तो दशा ऐशी । आत्मत्वीं ठाव नाहीं मीतूंपणासी । तेथें पिता पुत्र बंधु स्वजनांसी । उरी कैची ॥६२॥
तरी शोक सांडोनी सदना जावें । त्रिवर्गीहि स्वस्थ असावें । उरले प्रारब्धभोग सारावे । आमुची भेटी हेचि आतां ॥६३॥
मागुती सुर्याजीपंत करी विनवणी । ते उभयतां । राहिली असती सदनीं । तयांसी भेटावया आणीतों जाउनी । तरी क्षणभरी स्थिर असावें ॥६४॥
तंव नारायण जाला बोलता । येथें क्षणभरी न राहुं आतां । तुह्मीं संबोखावें जाउन उभयतां । इतुकें बोलोनि निघाला ॥६५॥
गोदेच्या उत्तर तीरानें । वानारवेषें पश्चिमाभिगमनें । जनस्थानासी केलें येणें । पंचवटीकेसी ॥६६॥
पहिले श्रीराम जेथें राहत असती । तेथें श्रीरामाची स्थापिलीसे मुर्ति । तेथेंच नारायणें धरून मनूष्यव्यक्ति । अतिप्रीती राहिलासे ॥६७॥
आतां पुढें काय जें जें होईल । तें चिमण्याचे मुखें हंसगुरु बोलेल । तें मुमुक्षुजन ऐकतील । अति प्रेमभरें ॥६८॥
इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । श्रीसमर्थहसाख्यान निगुती । पंचम प्रकरणीं ॥५॥