समर्थहंसाख्यान - वासुदेवशास्त्र्याचा गर्वपरिहार

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


एकदां शिवाजी राजधानींत । सहपरिवारें राज्य करित । एक वासुदेवशास्त्री जयपत्र घेत । आला राजदर्शना ॥१॥

तो महापंडित अभिमानी । दिवसा मशाली लाउनी । शिवाजीसी भेटला येऊनी । म्हणे जयपत्र आम्हां द्यावें ॥२॥

तेव्हां मेळवून सर्व द्विजां । पत्र द्यावया सिद्ध जाला राजा । तों त्या पंडितें ऐकिलें वोजा । कीं एक राजगुरु समर्थ असे ॥३॥

तेव्हां म्हणे तया जिंकिल्यावीण । जयपत्र कैसें घ्यावें आपण । शिवाजी तुवां समागमें येऊन । भेट करावी गुरूची ॥४॥

मन ससैन्य उभयतां निघाले । अरण्यांत धुंडीत चालिले । तंव एका कड्यावरी देखती बैसले । समर्थ कल्याण ॥५॥

तेथें अश्व शिबकेसी नाहीं मार्ग । शिवाजी पादचारी जाला अभंग । तेव्हा शास्त्रीही चालिला लगबग । पायी एकट ॥६॥

शिवाजीनें साष्टांग करोनी । पाठीसी उभा राहे जाउनी । मागुती शास्त्री बैसला येवोनी । समर्थापुढें ॥७॥

तों समर्थ मुख फिरविलें । त्याकडे पाठी देउनि बैसलें । तंव तो पंडित गर्वे बोलें । की अह्माम्शीं संवाद करावा ॥८॥

समर्थ त्याकडे न पाहतां । बोलती कीं तूं पंडित पृथ्वी जिंकिता । मज ओची गांड न ये फोडितां । तरी म्यां काय बोलावें ॥९॥

मागुती बोलती शिवाजीसी । तो कोण मोळक्या जातसे वेगेसी । बोलउन आणी तयासी । येरें तात्काळ आणिला ॥१०॥

समर्थ ह्मणती तूं कोण रे बापुडा । येरू ह्मणे मी अति हीन धेडा । तंव काडीनें रेघ ओढुन ऐलिकडां । ये ह्मणती तया ॥११॥

मग पुसतां तो ह्मणे शुद्र । ऐशा रेघा ओढिल्या सप्त आंत येता बोलतसे प्रकार । उंच उंच वर्णाचा ॥१२॥

वैश्य क्षत्रिय मी ब्राह्मण असे । वेदपाठक मी वेदार्थ जाणतसे । शेवटीं ह्मणे मज जें येतसे । तें त्रैलोकी नसे ॥१३॥

तंव समर्थ म्हणती सर्वज्ञा । वाद घेसी का इया ब्राह्मणा । येरू ह्मणे जी द्यावी आज्ञा । ब्रह्मादेवा जिंकीन ॥१४॥

तेणें पूर्वपक्ष करीं ह्मणतां । येरू ह्मणें मी काय बोलूं आतां । प्रत्यक्ष् महाराचा ब्राह्मण जाला जो कर्ता । तो ईश्वर कीं मनुष्य देही ॥१५॥

मग उठोनी घाली नमस्कार । स्वामि मी दासानुदास किंकर । समर्थे माझा करावा अंगिकार । उपदेश द्यावा ॥१६॥

वस्त्रालंकारादि संपत्ति । लुटविली ब्राह्मणा हातीं । कौपीन घालूनियां निश्चितीं । रक्षा लाविली ॥१७॥

समर्थ म्हणती तूं शास्त्रज्ञ । मज कांहीं न कळे पदपदार्थज्ञान । उपदेश करा म्हणसी पूर्ण । तरी मी कैसा करूं ॥१८॥

येरूं ह्मणे मी पंडित ज्ञानी । मातलों होतों दृढाभिमानी । पावलों असतों ब्रह्माराक्षसयोनी । मूर्खपणें कीं ॥१९॥

तरी आपण पंचाक्षरी भेटला । तेणें माझा अनर्थं वाटे चुकला । आतां पुरता पाहिजे अंगिकार केला । मज पतिताचा ॥२०॥

समर्थ ह्मणती अभिमान न सांडुनी दुरी । द्वादश वर्ष सेवा करी । मग तुजसी अंगिकारूं निर्धारी । येरू ह्मणे अवश्य ॥२१॥

तंव जो धेडाचा ब्राह्मण जाला । तेणें साष्टांग नमस्कार केला । कृपेनें ब्राह्मणत्व पावलों मजला । आतां पुढें आज्ञा काय ॥२२॥

तंव स्वगीहून आलें विमान । गंधर्वत्वा पावला पूर्ण । नमस्कारून विमानारूढ होऊन । स्वर्गासी गेला ॥२३॥

परी तो चुकला थोर । मोक्ष मागता करुनि नमस्कार । तरी उपदेशिते ज्ञानविचार । परी तो ठायींचा अभागी ॥२४॥

असो जैसें जेणें केलें । तैसें तया फळ मिळालें । येरंडासी गहूं आले । हें तों घडेना ॥२५॥

वासुदेवशास्त्री सेवा करितां । मी थोर पंडित नाठवे चित्ता । ऐसा अभिमान गलित पाहतां । मम्त्र उपदेश करिती ॥२६॥

समर्थ मागुती तयाप्रति बोलती । तुवां कोठें मठ करून रहावें निश्चिती । येरें वंदोनि निघाला त्वरित गति । मठ करोनि राहिला ॥२७॥

शिवाजी विनवी एके दिनीं । जी जी परई गडीं रहावें येवोनी । समर्थे पुढील भविष्य जाणोनी । येउनी राहिले ॥२८॥

तेथें शिष्यमंडळी मिळाली । वेणाबाइही तेथें आली । आक्का मात्र चाफळीं राहिली । सेवा करी रघुपतीची ॥२९॥

एके दिनीं रामा नामाचा शिष्य । तया समर्थ आज्ञा करिती विशेष । माझे दांत हे पडिले निःशेष । तरि तूं कुटुन विडा देत जाई ॥३०॥

झोळणा खलबत्ता तया दिधला । तो आनंदेंक नाचूं लागला । हा भोळाचि असे म्हणुन तयाला । भोळा राम ह्मणती ॥३१॥

दिवसेंदिवस अधिक प्रीति । समर्थ त्यावरी करूं लागती । हें न साहेचि अन्यांप्रति । मंदमति होती जे ॥३२॥

याजवरी व्हावी अवकृपा । ऐसिया करूनि संकल्पा । खलबत्ता लपवूनि ठेविला । पा तया मंदमतियें ॥३३॥

समर्थ ह्मणती विडा आणी । तंव खलबत्ता नसे सर्व सदनीं । भोळाराम गेला घाबरूनी । ह्मने आतां कैसेआं करावें ॥३४॥

मागतां विडिया लागला उशीर । तरी मी उत्तर नव्हे सेवाधार । मी कायहो दुर्बळ पामर । खलबत्ता सांपडेना ॥३५॥

मागुती विचारिता जाला चित्ता । हा सुंदर नव्हे काय खलबत्ता । मग चाऊन विडा मुखाआतौता । रसभरित हातीं घेत ॥३६॥

अतिप्रेमें समर्था करी वोपी । मुखीं घालितां बोलती साक्षेपीं । भोळा आजचा विडा काय रसरूपी अति मिष्ठ लागतसे ॥३७॥

ऐसा प्रतिदिनीं देत जाई । ऐसी बोलतां मुमुक्षुची आई । तथास्तु ह्मणतसे निःसंशयी । अत्यंत भोळाराम तो ॥३८॥

मग कासयासी खलबत्ता । विडा चावून देतसे शुद्धदंता । हें कळलें दुर्जनां समस्ता । ह्मणती अपराधी हा थोर कीं ॥३९॥

आतां शिवाजी यास सांगुनी । वर्तमान रूढ करूं श्रवणीं । तरी श्रीसमर्थ सध्यांच कोपोनी । अवकृपा करिती यावरी ॥४०॥

मग शिवाजी येतां सकळ सांगतीं । कीं विडा चाऊन देतसे दंतीं । शिवाजी ह्मणे रे तुमची उक्ति । मिथ्या मज वाटत ॥४१॥

भोलाराम उच्छिष्ट आपुलें । नेदीच मज ठाउकें वहिलें । तव येरी संकेतें दाविलें । तो पहा चावून देतसे ॥४२॥

ऐसें शिवाजीसी भरी घातलें । तेव्हां समर्थापुढें कर जोडुन बोले । जी आम्ही दासीं उच्छिष्ट वहिलें । न द्यावें कीं महाराज ॥४३॥

समर्थ ह्मणती गा झालें काय । येरू ह्मणे मोठा करितो अन्याय । हा भोलाराम चाऊन विडा दे काय । बहु विज्ञापना करूं ॥४५॥

तैसाचि भोळारामापाशीं आला । ह्मणे समर्थें खलबत्ता मागितला । ऐकतांचि कंठ कापून दिधला । शिवाजीचे हातीं ॥४६॥

तें कापिलें परी मुख बोलत । शिवाजी खलबत्ता घेई त्वरित । विलंब न करावा गा किंचित् । समर्थ मजवरी कोपती ॥४७॥

मेलों मेलों शिवाजी ह्मणत । मी अधःपातीं पडिलों कीं निश्चित । थरथरा कांपे रडे ऊर बडवीत । आला तैसा समर्थापुढें ॥४८॥

मी अन्यायी माझें कर्म वोढवलें । अहा स्वामी म्यां हें कैसें केलें । यावंचद्रसुर्य जरी नरक भोगिले । तरी मी यापासाव न सुटे ॥४९॥

पाहून समर्थ अति कळवळले । ह्मणती शिवाजी रे काय जालें । खलबत्या मिशीं कां वहिलें । पहिला विचार न करिसी तूं ॥५०॥

तंव तें मुख असें कीं बोलत । शिवजी खलबत्ता नेई त्वरीत । शिवाजी थरथरां कापत । पडुं पाहत भूमीवरी ॥५१॥

मग समर्थं आपुलें हातीं । चुना लावून विडिया करिती । भोळ्या कुटून देई गा सुमति । लावीं पां उशीर ॥५२॥

ऐसें ह्मणून मुखीं घातला । येरें तत्क्षणींच सुंदर चाविला । समर्थाचें निज करी बोपिला । देई ऐसें ह्मणतांचि ॥५३॥

अरे शिवाजी ऐसा खलबत्ता । तुवां कीं मिया देखिला होता । ऐसेंक बोलोनि मुखा आतौता । विडा टाकिते जालें ॥५४॥

धड आणवूनि तयावरुती । मस्तक पूर्ववत् बैसविती । मध्यें तांबूल लावितां निजहस्तीं । भोळा उठे खडबडुनी ॥५५॥

मग कुरवाळुन हनुवटी । अति संतोषें थापटिली पाठी । अगा शिवाजी करिसी काय गोष्टी । वारंवार ऐसी ॥५६॥

तंव शिवाजी घाली लोटांगण । वारंवार करी स्तवन । चुकलों मी अन्यायी असे पुर्ण । समर्थे क्षमा करावी ॥५७॥

एकदा कोणी येउन समर्थापाशी । वासुदेवशास्त्राचें सांगे वर्तमानासी । कीं वीजें लाविलीं राममंत्रासी ऐकतां कोपले समर्थ ॥५८॥

तत्क्षणीं त्या बोलाउन आणिलें । येरें साष्टांग अकरा घातले । माझिये मंत्रासी बीज कां लाविलें । यास्तव लोटिला गडाखाली ॥५९॥

अत्यंत खोल तुटेल कडे । त्यावरुन आदळे आपटे देह पडे । एका दगडाचे संधीत सांपडे । परी प्राण नाही गेला ॥६०॥

गुरुपदीं विश्वास अतिशय । तरी प्राण हा कैसेनि जाय । तरी गूरूच्या कोपें मोडेल हातपाय । पडिला मुखें गुरु स्तवित ॥६१॥

तीन दिवस तैसाचि पडला । परी कवणेंही नाहीं उठविला । तेव्हां वेणीसी कळवळा आला । आली तयापाशी ॥६२॥

अरे वासुदेवा पाहे मजकडे । मी घेऊन जात्यें तुजला कडें । येरू बोले बाई ऐके निवाडे । समर्थें सांडिलें हतीचें ॥६३॥

गुरूनें जयाचा त्याग केला । तो कवणाचेनि जाय रक्षिला । ब्रह्मा विष्णु ईश्वर जरी आला । तरी काय होय ॥६४॥

समर्थचि जरी कृपा करिती । तरीच तयासी उत्तम गति । तस्मात् समर्थें येऊन न्यावें मजप्रति । मी अन्यायी परी गुरुचा ॥६५॥

मग समर्थापाशींवेणी येउन । विनविती जाली कर जोडून । तेव्हा समर्थेहीं कळवळुन । आले तयापाशीं ॥६६॥

त्यासी उठवून बैसविलें । सर्वांगासी करें स्पर्शिलें । तेणें दुःख अवघेंचि गेलें । परम सुखी जाला ॥६७॥

माझिये मंत्राची बीजें जो लावी । तो कदा न पावे परम पदवी । मंत्रासी बीजरूप अक्षरें अघवीं । असती ह्मणउनी ॥६८॥

तस्मात् पुढेंही कोणी संप्रदायांत । बीजें न लावावीं निश्चित । एक ब्राह्मणासी मात्र प्रणवयुक्त । मंत्र सांगावा ॥६९॥

एकदां अंगलाई समीप बुरुजावरी । समर्थ बसले असतां निर्धारी । शिवाजी येऊन पूजा करी । वस्त्रालंकारें ॥७०॥

भरजरी शेला एक पांघरविला । तंव तो वारियानें अकस्मात उडाला । समर्थ ह्मणती कल्याणा शेला । बोलतां उडी घातली ॥७१॥

खोल किती असे खालुती । हें नाहीं पाहिलें न स्मरे चित्तीं । आज्ञा होतांचि सत्वरगती । देहाचि समर्पिला ॥७२॥

गुरु गुरु हें मुखीं भजन । गुरुरुप जालें अंतःकरण । जीत कीं मेलों नाहीं स्मरण । मिथ्यारुप देहाचें ॥७३॥

ऐसा हा भाव दृढ असतां । मरेल कैसा पहा पुरता । शेला घेऊन आला वरुता । नामस्कारूनी उभा राहे ॥७४॥

समर्थे थापटुणि पाठी । कल्याणासी धरिलें पोटीं । सर्वत्रांसी सांगती गोष्टी । कीं माझें हेंआत्मलिंग ॥७५॥

ऐसी समर्थांची चरित्रें अद‌भुत । अनंत प्रकारें भूभार हरित । तितुकीं बोलतां शेष तटस्थ ।तेथें माझी मति किती ॥७६॥

समर्थ आणि रंगनाथ स्वामी । आनंदमूर्ति केशवस्वामी । पांचवे ते जयरामस्वामी । ऐसें हें पंचक ॥७७॥

इतुके एके ठायीं मीनतां । अंत नसे चर्चेसी कीं विचरंता । हा कलि नव्हे प्राणियां समस्ता । भाग्योदय जाहला ॥७८॥

समर्थ हंसाचें जितुकें आचरण । तें तें साधकाप्रति शिकवण । तितुकें मज न बोलवे जाण । परी एक इतिहास सांगूं ॥७९॥

एकदां पडिला भूमीवरी दुष्काळ । तो दुर्गादेवीसारिखाच बोलती सकळ । तेव्हा समर्थांचे शिष्या उपवास केवळ । पडे भिक्षा मिळेना ॥८०॥

तेव्हा शिवाजीनें गडावरी । सत्र घातलें प्रतिज्ञा करी । कीं जितुकें समर्थ उपदेशी निर्धारी । तिही नित्य यावें भोजना ॥८१॥

ऐसें कळलें बहुत जनांसी । भोजन मिळेल आपणांसी । यास्तव जे ते म्हणती आम्हांसी । उपदेश द्यावा समर्थें ॥८२॥

कल्याणासी ह्मणती एके दिनीं । आतां बहु लोक येती उपदेशालागुनी । तंव कल्याण विनवी कर जोडुनी । जी जी दुष्काळ पडिला असे ॥८३॥

आपुले संप्रदायी लोकांसी । शिवाजी घालितो भोजनासी । यास्तव येताती उपदेशासी । तरी समर्थे यां वांचवावें ॥८४॥

मग सहस्त्रावधि जन मिळतां । आपण उभे राहाती बुरुजावरुता । ह्माणा रे ह्माणा रामनाम आतां । माझे तुह्मी शिष्य जालां ॥८५॥

ऐसा उपदेश बहुतांस केला । शिवाजी भोजन घाली तितुक्यांला । पुढें काळही असे उजेडला । सुमिक्ष जाले ॥८६॥

परी ऐतें मिळतां खावया । कोण जाईल शीण करावया । राहिले तैसेचि तितुकिया । शिवाजी अन्न घाली ॥८७॥

समर्थ ह्मणती अगा कल्याणा । अजून बहु मंडळी होतसे भोजना । येरू ह्मणे सुभिक्ष जालें असतांही जना । जावेना वाटे ॥८८॥

इतुकें ऐकोनि मौनेंचि राहिले । एके दिनी प्रातःकाळी काय केलें । फिरंग उपसून हाती घेतलें । मळवट भरला कुंकवाचा ॥८९॥

बाबरझोटी सोडून मोकळी । दीर्घनादें दिधली आरोळी । आलों रें मारीन आतां सकळी । धांवती अव्हा सव्हा ॥९०॥

सकळ म्हणती हें काय जालें । समर्थासी कैसें वेड लागलें । अरे पळा रे पळा नातरी मेले । जाऊं आतां ॥९१॥

मग सर्वही मागें न पाहतां । पळूं लागले गडाखालूता । समर्थ उडी टाकून एकही परतून न पाहे मागें । दश दिशा पळती ॥९३॥

तिकडून भिक्षा मागून कल्याण । किल्याकडे करितो गमन । तंव सर्व ह्मणती पावशी मरण । कासया जासी ॥९४॥

समर्थांसी वेड लागलें । तरवार धोडें मारीत उठले । तरी परते माघारा येरु बोले । मज मारूं द्या तुह्मी जा ॥९५॥

तैसाचि पुढें जों चालिला । तों समर्थ पाषाण फेंकीला । अरे कासया येशी जाशी मेला । येरें घातला दंडवत ॥९६॥

आणिक तैसाचि पुढें जात । तंव समर्थें पाषाण फेंकिले बहुत । प्रति पाषाणासी घाली दंडवत । आणि चालत तैसाची ॥९७॥

अति सन्निध येता क्षणीं । जटेसी धरिला जाऊन सज्जनीं । तैसाचि भूमिवरी पाडूनी । उरावरी बैसले ॥९८॥

तरवार ठेविली कंठावरी । हें पाहे कापितों झडकरी । ऐसें बोलती परी तिळभरी । नाहीं कापिलें ॥९९॥

अरे मेलासी कांपितो पाहे । कापितों ह्मणे कोण ह्मणताहे । स्वकीय दासा मारा लवलाहे । जो मी पुनः न ये जीवित्वा ॥१००॥

ऐसें उत्तर ऐकतां निःसीम । समर्थ ह्मणती तूं लठ्ठाश्रम । कांपित कांपित कांपूं परम । आह्मां एकदां न छेदवे ॥१०१॥

कल्याण म्हणे इच्छा समर्थाची । येथें निवारणा नसे कवणाची । तेघवां तरवार फेंकून हातीची । पोटीसी धरिला ॥१०२॥

अरे कल्याणा मज वेडा म्हणुनी । अवघे गेले कीं पळोनी । येरू ह्मणे दुर्भाग्यालागोनी । निधान सापडतां उपेक्षिती ॥१०३॥

असो उभयाचि वनीं बैसतीं । तेथें प्रगटला वीर मारुती । हस्त धरुनी समर्थाप्रती । बोलता जाहला ॥१०४॥

अगा सखया संकेत पहिला । आजी वाटे सिद्धित गेला । तुझा परमार्थ अति वाढला । गगनचुंबित ॥१०५॥

हा परमार्थ या भवसागरीं । नौकाचि केवळ अति साजिरी । तूं गुरुरूपें कर्णधारी । सुगड जीव ताराचया ॥१०६॥

तुझिये हातीं आवलें तीन । तेचि ऐक कोण कोण । उद्धव भोळाराम तिजा कल्याण । यायोगें जीवा उत्तरसी तूं ॥१०७॥

ज्ञानियांमाजी शिरोमणि । उद्धव मुख्य शिष्य तुजलागुनी । तो या नावेच्या मुख्य स्थानीं । मागील अवला ॥१०८॥

नाव फिरवावी कोणीकडे । तें स्वाधीन मागील आवलियाकडे । यास्तव मुख्यत्व उद्धवाचे पाडे । नसे अन्या ॥१०९॥

कल्याण आणि भोळाराम । हे दोनीही गुरुभक्त निःसीम । हे उभय भागींचे आवले परम । नाव त्वरां चालविती ॥११०॥

कल्याण तोचि उजवा आवला । डाव तोचि कीं राम भोला । ऐसी परमार्थ नाव चालली स्वलीला । देखतां तुष्टलों मी ॥१११॥

नावेवरी विश्रांती ठेवणी । ते हे जाण बापा नामें वेणी । ध्वजा लागलीचे रामभजनीं । मी त्यावरी उपासना ॥११२॥

ऐसा समर्थासी स्वय़ं बोलोनी । पावता जाला अंतर्धानी । श्रोते ह्मणती वक्तयालागुनी । आम्हां उद्धवली शंका ॥११३॥

मुख्यत्वें आवला उद्धवस्वामी । स्वमुखें मारुतीचतया नेमी । परी सर्वांच्या कथा लिहिल्या अनुक्रमीं । तरी तयाची कां नाहीं ॥११४॥

वक्ता ह्मणे सावधान असा निके । ते कथा बोलिजेल द्वितीयाष्टके । विस्तारें वर्तणुक निश्चयात्मकें । असे बहुधा ॥११५॥

येथे लडिवाळपणें चिमणें बाळ । समर्थ हंसाचेंच चरित्र सकळ । त्यांतुन यथामतीनें केवळ । अल्पसें बोलिलें ॥११६॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरुपें ज्ञानभिव्यक्ति । श्रीसमर्थहंसाख्यान निगुती । अष्टम प्रकरणीं ॥८॥

एकंदर ओ .सं ४८१


References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP