माधवहंसाख्यान - जन्म

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


जय सद्‌गुरू कृपावरदा । पृथ्वीवरी राहसी सदा । शिष्यबोधाचिया वेवादा । उणें पडोचि न देसी ॥१॥

उद्धवहंसस्वामी सद्‌गुरु । टाकळीग्रामी असतां निरंतरु । मनी करिते जाले विचारु । कीं व्यक्ति धरूं दुजीं ॥२॥

आपण मागुतीं देह धरुन । ग्रहण करावें आपलें ज्ञान । या ज्ञानासी अधिकारीं नसे आन । आपणाविण दुजा ॥३॥

बहुत संप्रदाय असे वाढला । परी भजनी कीं कर्मी अडकला । एखादा मुमुक्षु असे वहिला । परी तोही मंदप्रज्ञ ॥४॥

उपदेशमात्रें संशय ग्रासून । कोन पावेल समाधान । तस्मात् आपणचि व्यक्ति धरून । शुद्ध परमार्थ उजळूं ॥५॥

ज्ञानपरंपरा चाले जरी । वंश वाढला हें जाणावें तरी । मंत्रउपदेशा जे अधिकारी । ते वंशदीप नेव्हती ॥६॥

तस्मात् आपण धरावी दुर्जा व्यक्तिआ । वाढवावी ज्ञानाची संपत्ति । ऐसें आठवून चित्ती बैसती । तंव एक अद्‌भूत वर्तलें ॥७॥

नारायण नामें एक ब्राह्मण । त्याची पत्‍नी रमा अभिधान । उभयतां आले करिती नमन । उद्धवहंसासी ॥८॥

ते म्हणती जी आमुची विनंति । अवधारावी हो गुरुमुर्ति । गंगानामिस्थानी आम्हां वस्ती । किंचित्समीप दुर ॥९॥

अमुचें वयही जाले बहुत । पुत्र संतति आम्हां न होत । तेव्हा उभयंता मिळूनि त्वरित । अनुष्ठान केलें ॥१०॥

मारुतीची सेवा केली । तया द्वादश वर्ष लोटली । एके दिनी स्वप्नीं मूर्ति आली । श्रीमारुतीची ॥११॥

तेणें सांगितलें कीं जनस्थानीं जावें । श्रीउद्धवस्वामीसी भेटावें । आणि एक पुत्ररत्‍न मागावे । म्हणजे पुत्र होईल तुम्हां ॥१२॥

तेव्हा आम्हीं आलों जा भेटी । पुत्र व्हावा हे इच्छा आम्हां पोटीं । तरी स्वामिकृपा करूनि गोमटी । इच्छा पुर्ण करावी ॥१३॥

ऐसी प्रार्थना करित असतां । तेथें मारुतीहि बैसला होता । परी वृद्धब्राह्मणवेर्षें तत्त्वतां । तो ठाउकें नव्हे कोणा ॥१४॥

कवणें शिष्यें हंस स्वामींची । पूजा केली होती साची । हारतुरें गुंफोनी फुलांची । आणि उटीही सुंगध ॥१५॥

त्या उभयतांची प्रार्थना ऐकतां । मनी विचारिती की जन्मावें आतां । यांचे गर्भी आपण मागुता । ज्ञानपरंपरा चालवावया ॥१६॥

इतुकें मनीं मात्र आठविलें । परी तयासी उत्तर नाहीं दिधलें । उगेंचि मारुतीकडे अवलोकिलें । तेव्हा वर्तलें एक ॥१७॥

उद्धवस्वामीचें शिरीचा तुरा । अकस्मात् पडला असे सारा । तया उभयतांनी देखोनि त्वरा । प्रसाद म्हणुनी घेतला ॥१८॥

म्हणती जाहली आमुची कार्यसिद्धि । आतां पुत्र होईल नाहीं अवधि । तंव मारुती ब्राह्मणवेर्षें आधी । बोलता जाला ॥१९॥

तुम्हां पुत्र होईल निश्चयेसी । परी उपेगा न ये प्रपंचासी । तंव उभयतां बोलती वाणीसी । उपेगा न ये परी होवो ॥२०॥

ऐसें बोलोनि तये दिनीं । भोजन करूनि राहिले रजनीं । तंव गर्भ राहिला रमेलागुनी । पतिपासुनी तेव्हा ॥२१॥

मग स्वामीसी पुसुनी ग्रामासि आले । ते धनकनकसंपन्न होते आथिलें । गर्भ वाढुं लागतां कळलें । तया उभयांसी ॥२२॥

म्हणती फळलें अनुष्ठान । करूं लागले अन्नादि दान । तंव नवमास भरतां पुत्ररत्‍न । प्रसवती जाली ॥२३॥

त्या उभयतांची अति प्रीति । जातकर्मादि विधि करिती । माधव नाम ठेविलें निश्चिती । वाढविती तयासी ॥२४॥

कांहीं एक थोर जाहला । वस्त्रें अलंकार लेवाविती त्याला । तंव तो वाटीतसे मुलांला । ब्राह्मांणाच्या ॥२५॥

चिपळ्या घेऊन करी भजन । अथवा खापराच्या देवाचें पुजन । अथवा एकांती बैसोनि करीं ध्यान । हेंचि खेळणें जयाचें ॥२६॥

कीर्तन होतां आवडीं जावें । पुराण होता सादर बैसावें । लोक म्हणती बाळपणीच स्वभावें । हा साधु दिसतो ॥२७॥

रमा नारायण पंत म्हणती तो वृद्ध ब्राह्मण बोलिला निश्चिती । कीं प्रपंच न घडेल या प्रति । तेंचि सत्य होईल ॥२८॥

असो तयाचें व्रतबंधन । जनक करितसे आपण । पुढें ब्रह्मकर्म संध्यास्नान । यथाविधि करी ॥२९॥

पुढील कथा चिमणें बाळ । होईल तें बोलल सकळ । तें साधक मुमुक्ष ऐकती केवळ । एकाग्रभावें ॥३०॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानभिव्यक्ति । माधवहंसाख्यान निगुती । प्रथम प्रकरणी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP