हंसदासासी हंसस्वामी । स्वात्मत्व बोधोनी अनुक्रमी । उरोचि न देतां रूपनामी । हंसचि करिती ॥१॥
पूर्वील प्रकरणी माधवहंसासी । बोधिलें कीं आत्मा तूंचि मारुती अससी । तरी आतां हें सर्व भिन्न भासी । तरी ऐसें नव्हे ॥२॥
आत्मा तोचि परमात्मा । अभेदचि रहित रूपनामा । जैसा व्यतिरेकें अससी अंतर्यामा । तेवी सर्व जगीं तूंचि एक ॥३॥
एक घट मातीचा कळतां । मग सर्व गाडगें रांजण पाहतां । मृत्तिकाचि दिसे बाह्म अतौत । कीं सुवर्णचि नग ॥४॥
तैसी एकपिंडउपाधि शोधिली । आत्मया आत्मप्रतीति बाणली । मग ब्रहमदितृणांत अवलोकिली । आत्मतादात्म्यता ॥५॥
सर्व नाहीं खलु एक ब्रह्मा । तोचि स्वयें तूं आत्माराम । अलंकारामाजी एक हेम । तेव्हा नगनाम कोठें हिरण्यगर्भ ॥७॥
स्थूल तितुके घटवत् । सूक्ष्म तितिकें जल समस्त । त्यांत चैतन्यत्वे जीव प्रतिबिंबित । तो आत्माभास ॥८॥
संपूर्ण घटीं मठी आकाश व्यापक् । तेवीच तूं परमात्मा एक । ते ते नामरूप निश्चयात्मक तूं नव्हेसी ॥९॥
घटाचें नानात्व जरी दिसलें । परी त्यांतील आकाश काय विभागलें । तेवी ब्रह्मादितृणांत नामें वेंगळाले । परी तूं ब्रह्मा अद्वय ॥१०॥
जडां अस्तित्वें तूं अससी । घटीं अंतर्बाह्म मृत्तिका जैसी । चंचळी ओळखी उभय लक्षणासी । सच्चिद्रूप ॥११॥
चंचळाची होतां समाप्ति । सर्व भुतांसि वर्ते सुषुप्ति । तेथें तुझी तिन्ही रूपें असती । सच्चिदानंद ॥१२॥
अथवा जागृतिवप्नामाजी । ज्ञाते जे वर्तती सहजी । तेथें सच्चिदानंदावीण दुजी । गोष्टी असेना ॥१३॥
एवं सर्वौमाजीं एक अभेद । नामरूपेविण सच्चिदानंद । ऐसा वृतीसी वृत्तिवीण छंद । हेचि जीवन्मुक्तदशा ॥१४॥
तस्मात् माधवा सांगितले रीती । आपणासी पाहे या त्रिजगती । दुजी उमसूं नेदी वृतीसी व्यक्ति । ब्रह्मादिस्थावरांत ॥१५॥
सांगणीवांगणीचें काज नाहीं । ऐसें प्रत्यक्ष तूं अनुभवी पाही । ऐसें गुरुवचन ऐकता लवलाही । चरणांवरी लोळत ॥१६॥
अति विस्म यासी मन पावलें । म्हणे माझें रूप अभेदचि पहिले । असतां काय हो अज्ञानें केलें । नाथिलें भोगिलें सुखदुःख ॥१७॥
रज्जूचा सर्प जाला नसतां । काय हो झेंडु फुटला होता । तेवी ब्रह्मात्मत्व नेणुन अहंता । इनें भिन्न पाडिलें होतें ॥१८॥
दीप लावितांच सर्प मेला । ज्ञान होतांच भवबंध नासला । आत्माच आत्मप्रत्यया आला । नामरूप सांडुनी ॥१९॥
आतां कैचा बंध कैची मुक्ति । कैचें सुख दुःख कवणा बाधिती । कैंचे पापपुण्य गतिअवगती । एक अभेद ब्रह्मा निजांगें ॥२०॥
धन्य ध्नय जी हंस सद्गुरु । धन्य धन्य ज्ञानाचा विचारु । धन्य आम्हीं हंसदास निर्विकारु । येचि देही जालों ॥२१॥
मिथ्यांचि बंधन पडिलें होतें । तें तोडिलें स्वामिकृपहस्तें । मृगजलामाजी बुडतियाते । काढिलें तीरी ॥२२॥
काय उतराई तरी व्हावें । काय स्वमुखानें स्तवावें । रंकासी राज्यपदी बैसवावें । हें जाणें गुरुचा गुरु ॥२३॥
ऐसे बोलतां माधवहंसासी । सप्रेमें अश्रु आले नेत्रासी । कंठ सद्गद होऊन मस्तकासी । चरणी ठेविलें ॥२४॥
या रीती उद्धवस्वामीनीं पाहुनी । म्हणती खूण बाणली याचिया लागुनी । मग संतोषें तया उचलोनी । हृदयीं आलिंगिलें ॥२५॥
एवं हंसदास जाला हंसरूप । चिमणें बाळा नुरेचि अल्प । सर्व सांडुनी नामरूप । ऐक्यपदी शोभती ॥२६॥
इति श्रीमद्धसागुरुद्धति व ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । माधवहंसाख्यान निगुती । षष्ठ प्रकरणी ॥६॥