माधवहंसाख्यान - तत्वझाडानिरूपण

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीमत्सद्गुरु उद्धवहंस । बोलते जाले माधवहंसदासास । बापा सावधान करोनि मानस । तत्त्वझाडा ऐके ॥१॥

प्रथम तुझा हा स्थूल देहे । हाचि तूं कांहीं आत्मा नव्हे । हा देह भूतकार्य आहे अस्थिमांसादि ॥२॥

दुसरा चंचल देह सूक्ष्म । वाउगा आभासाचा संभ्रम । तो सत्रातत्वात्मक परम । ते अवधारी पृथक् ॥३॥

अंतःकरणाचे विभाग दोन । एक बुद्धि दुजें मन । निश्चय करिते बुद्धि जाण । मन संशयात्मक ॥४॥

अंतःकरण म्हणिजे आठव । उगीच स्फुरतसे जाणिव । संकल्पाविण निर्विकल्प स्वभाव । ते तत्वांत न गणिजे ॥५॥

चिंतनधर्म तेंचि चित्त । तें मनामाजी होय मिश्रित । अहं कार अभिमान ते धरित आ। तो बुद्धीचेआं पोआटीं ॥६॥

एवं अंतःकरण हे दोन । बुद्धि आणि दुजें मन । हें आंतील करण म्हणुन । अंतःकरण नाम ॥७॥

या दोवृत्तीचे निर्गमद्वारें । पांच ज्ञानेंद्रिय प्रकारें निघून होती विषयाकारें । तेआंचि ऐके ॥८॥

श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । या पांचा द्वारें बाहेरी निघून । शब्दस्पर्शरूपरसंगघग्रहण । विषयांचे होतसे ॥९॥

परी वृत्तीसी प्राणांचा आधार । प्राणवायूच यांचे घर । ते प्राणही पांचचि प्रकार । व्याससमानोदानप्राणापान ॥१०॥

स्थूल विषय भोगावया । पंचधा असे कर्मेंद्रियक्रिया । वाक्पाणिपादउपस्थ पाचविया गुदेंद्रिय नामें ॥११॥

एवं पंच प्राण ज्ञानेंद्रिय । आणि ते पंच कर्मेंद्रिय । मन बुद्धि हें मिळोन द्वय । सत्रा तत्वें सूक्ष्माचीं ॥१२॥

अंतःकरणवृत्ति व्यानाधारें । श्रोत्र वाचा दोनी द्वारें । निघोर शब्दरूप दोन व्यापारे । ऐकणें बोलणें ॥१३॥

मनोवृत्ति समानाधारें । त्वचा पाणी दोहीं द्वारें । निघोनि स्पर्श रूप दोन व्यापारे । ग्रहणदान स्पर्शन ॥१४॥

बुद्धिवृत्ति उदानाधारें । चक्षु पाद या दोहो द्वारें । निघोनि रूपरूप दोन व्यापारे । पाहणें चालणें ॥१५॥

चित्तवृत्ति प्राणाधारें । रसना उपस्थ दोहीं द्वारें । निघोनि रस रूप दोनी व्यापारे । अशन रती होय ॥१६॥

अहंकारवृत्ति अपानाधारें । घ्राण गुद या दोही द्वारें । निघोनि गंधरूप दोनी व्यापारे । गंधग्रहण विसर्ग ॥१७॥

पंच वृत्तिप्रकार यांचे । दोन दोन व्यापार एकेकाचे । प्रत्यक्ष विषयोभोग स्थूलाचे । या नांव जागृति ॥१८॥

हा व्यापार तरी सुक्ष्माचा । परी स्थूळ भोगी भोग स्थूळाचा । यास्तव व्यापार जागृतीचा । स्थूळासी म्हणावा ॥१९॥

मुळी स्थूळ देहचि जड । असज्जडदुःखात्मक दगड । आत्मा अस्तिमातिप्रियात्मक वाड । तरी आत्मा देह कैसा ॥२०॥

पांच व्यापार जागृतीचें । हें तरी वर्तणें देहाचें । हे व्यापार नव्हेंचि आत्मयाचे । तरी जागृति आत्मया केवी ॥२१॥

या जागृति व्यापारामुळें । मी भोगितों विषय सगळे । विश्वाभिमान उगाचि उफाळे । आत्मज्ञान नाहीं म्हणुनी ॥२२॥

एवं स्थूल देह अवस्था जागृति । विश्वाभिमानी धरी त्याप्रति । हे असज्जडदुःखात्मक असती । सच्चिद्धन आत्मा भिन्न ॥२३॥

पांचचि व्यापार विषयाविण । अंतरीच आठवी वृत्ति आपण । तया मासात्मकासी बोलिजे स्वप्न । अवस्था सुक्ष्मांची ॥२४॥

मन बुद्धि प्राण ऐंद्रिय । हा सत्रा कळांचा समुदाय । बोलिजे सूक्ष्म देह परी ताचि न होय । आत्मा आपण ॥२५॥

मनादि हे उप्तन्न होती । व्यवहारोनि लयाते पावती । यास्तव असज्जडदूःखात्मक होती । तरी हें आत्मरूप नव्हे ॥२६॥

सूक्ष्म देहहि आत्मा नसतां । स्वप्न अवस्था कवणाची तत्त्वतां । त्या अवस्थेचा अभिमान धर्ता । मी म्हणुन तो तैजस ॥२७॥

आपुलें निजरूप कळेना । यास्तव मी देह केली कल्पना । आत्मा नव्हे हा पाहतो विवंचना । आत्मानात्म विचारें ॥२८॥

असो हे देहद्वय उपाधि । जडली जया करणें बुद्धि । तेंचि अज्ञान जें स्वरुप त्रिशुद्धि । न कळे सर्वथा ॥२९॥

तेंचि कारण शरीर अज्ञान । असज्जडदुःखात्मक आपण । आत्मा सच्चिदानंद घन । होय कैसेनी ॥३०॥

मनादिकांची होय विश्रांति । दोन्हीं अवस्था लया जातीं । तयासी नाम ठेविलें सुषुप्ति । अवस्था कारणाची ॥३१॥

कारणचि नसतां आपण । सुषुप्ति अवस्था कवणालागुन । बळेंचि मी नेणे ज्ञाता असोन । तो प्राज्ञाभिमानी ॥३२॥

आपण तिही अवस्थेसी जाणे । तरी अभिमानी आत्मा केवी होणें । अस्तिभातिप्रियात्मक असणें । विकाराभावीं ॥३३॥

एवं देहद्वय तिसरें कारण । तिनी अवस्था तिन्ही अभिमान । हे असज्जडदुःख केवि संपूर्ण । कल्पिसी तरी ऐक ॥३४॥

स्थूळ देह असतां जागृती । विश्वाभिमानही दह्री सूक्ष्मा । तेव्हा जागृति लोपे रूपनामा । विश्वाभिमानहि पावे उपरमा । स्थूळासहित ॥३६॥

जेधवां सुषुप्ति अवस्थेंत पडे । तेव्हां देहद्वय अवस्थेसहित उडे । दोहीही अभिमानाचें होय मडे । प्रौढासहित ॥३७॥

एवं एक असतां दोन हरपती । यास्तव तया असत् म्हणती । जड म्हणजे परप्रकाशें वर्तती । सुखदुःख भोगिती ते दुःखरूप ॥३८॥

ऐसें हें असज्जडदुःखात्मक । सांगितले अनात्मियांचे रूपक । आतां अस्तिमातिप्रियात्मक । आत्मा कैसा तो ओळखावा ॥३९॥

अस्ति म्हणजे सर्वदा आहे । भाति म्हणजे सर्व जाणताहे । प्रिय म्हणजे सुखरुप आहे । सुखदुःखविण ॥४०॥

तिही अवस्थेमाजीं सदा । या ती रूपासी नाश नाहीं कदा । तयाच्याचि बोलिजे संवादा । तरी सावध होय ॥४१॥

जागृतीचे पांच व्यापार । वेगळाले शब्दादि प्रकार । परी जाणता एकचि निर्विकार । पांचाही विषयांसी ॥४२॥

शब्दादि व्यापार त्यागावे । त्यांतील जाणणें मात्र निवडावें । तेंचि जाणणें अवलोकार्वें । स्वप्नामाजींहीं ॥४३॥

स्वप्नीहिं भासात्मक पंच विषय । वेगळाले परी जाणता अद्वय । पाहातां सुषुप्तीचाही समय । जाणणें तेंचि ॥४४॥

पदार्थ मात्र कांहीं नसती । मनादि वृत्तीचीही समाप्ति । यास्तव नेणीव नांव तया ठेविती । परी जाणता असे ॥४५॥

अमुक वेळ निजलों होतों । कांहीं जाणिलें नाही ऐसें सांगतों । जाणिलें नसता उत्थानकाळीं तों । बोलणें न घडे ॥४६॥

तस्मात् नेणिवेसी वृत्तीवांचुन । जानीलें तेंचि सामान्य ज्ञान । तोचि आत्मा प्रकाशमान । चिद्रूपत्वें ॥४७॥

पदार्थासी डोळा देखणा । तेवी आत्मा जाणें जागृतिस्वप्ना । वृत्तिअभावीं जाणतां अज्ञाना । जेवि डोळा अंधार देखे ॥४८॥

अवस्था एक येतां एक जाय । परी आत्मा एक तिहीसी प्रकाशमय । ऐसा आत्मत्वाचा असे अन्वय । व्यतिरेक अवस्थेचा ॥४९॥

एवं आत्म्याचें चिद्रूप सांगितलें । आतां सद्रूप पाहिजे ऐकिलें । तेंचि अस्तित्व न जाय नासलें । कवणेही काळी ॥५०॥

तिही काळींही जाणीव आहे । तें आहे तेंचि सद्रूप पाहे । कालिचें ज्ञानचि आजि राहे । तेंचि उद्याचें ॥५१॥

पक्ष मास अयन वर्ष । एकचि असे जाणता निर्दोष । युग कल्प महाकल्प विशेष । एकलेंचि ज्ञान ॥५२॥

एका देहाचिये परी । एकचि जाणता नाना शरीरीं । तस्मात् ज्ञानासी नाश नाहीं निर्धारी । तेंचि सद्रूप ॥५३॥

जें सद्रूप तें चिद्रूप । आणि तेचि असे आनंदरूप । तेचि कैसें बोलिजे अल्प । अवधान असावें ॥५४॥

सर्वही पदार्थमात्र आवडती । परी आपणाकरिता त्याची प्रति । त्या त्या पदार्थासाठी नव्हे म्हणे श्रुति । आणी अनुभवही ऐसा ॥५५॥

तेवीच देह इंद्रिय प्राण । मन बुद्धी आणि अंतःकरण । हेही तरतम्य आवडती जाण । परी आपणासाठीं ॥५६॥

सर्व प्रीति हे सातिशय । स्वात्मप्रीति जें निरतिशय । एवं परप्रेमास्पद आत्मा आनंदमय । अखंडचिद्रूपापरी ॥५७॥

आत्मज्ञानें जें सुख वृत्तीसी । होय तें नव्हें अविनाशी । वृत्तिअभावी जे सुखराशी । सहजचि सिद्ध असे ॥५८॥

जें सुख उप्तन्नहि होईना । आणी कदापिही नासेना । तेंचि सुख सच्चिद्रूपही लक्षणा । त्रिविध परी एकरूप ॥५९॥

एवं अस्तिभातिप्रियरूप आत्मा । असज्जडदुःख ते अनात्मा । अया रीती तत्त्वझाडा अंतर्यामा । करून पाहे विचारें ॥६०॥

नामरूप अनात्मजात । मिथ्यत्वें त्यागीं हें समस्त । अस्तिभाति आत्मा सदोदित । मीचि ऐसें दृढ करी ॥६१॥

ऐसा आत्मा जो निवडून दाविला । तोचि मारूति ओळखी वहिला । तोचि मी गुरु अससी तुझा तुं अपला । आता अखंड भेटी घे ॥६२॥

सर्व देवांचाही तोचि देव । तोचि तूं परब्रह्मा स्वयमेव । बद्ध जाला होता न कळण्यास्तव । तो मुक्त जाला ज्ञानें ॥६३॥

रज्जु दीप लावुनी पाहिला । तेव्हा सकार्येंर्स सर्प नासला । तेवी अज्ञानभ्रम ज्ञानें निरसला । उरला असे आत्मा बद्ध ना मुक्त ॥६४॥

असें सद्‌गुरु उद्धवस्वामिहंसे चिमणें बाळ बोधिलें असे । हेंचि दृढिकरण होईल विश्वासें । पुढील प्रकरणीं ॥६५॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । माधवहंसाख्यान निगुती । पंचम प्रकरणी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP