माधवहंसाख्यान - उद्धवस्वामीकडे गमन

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रोते ऐका परम सुरस । काय आचरेल माधवहंस । बाळपणीं जयाचें मानस । परमार्थाकडे ॥१॥

नारायणपंतासी काळेकडुन । अल्प दिवसींच आलें मरण । रमा म्हणे हे बालक सान । आणि प्रपंचही न करी ॥२॥

तरी आपण सती जावें । ऐसा निश्चय करुनी स्वभावें । तिणें सहगमन केलें बरवें । नायकतां कवणाचें ॥३॥

तेव्हा लोक म्हणती बालकासी । कोण रक्षील आतां यासी । तंव तें बळ म्हणे मी नव्हे परदेशी । माझा मायबाप एकचि असे ॥४॥

ऐसें बोलून ब्राह्मण मेळविले । होतें धनधान्य तया वाटिलें । वाडा पशुही अर्पण केले । वस्त्रपात्रासहित ॥५॥

सर्वासि करोनि नमस्कार । म्हणे लोभ असो द्या नारीनर । माझा मायाबाप असें निरंतर । त्याची भेटी घेऊं जातों ॥६॥

मायबाप बोलत होती । तुझा गुरु असे टाकळीप्रति । तयाचें प्रसादें तुझी गा व्यक्ति । आमुचे गर्भीं जन्मलीं ॥७॥

गंगातीरीच टाकळी असे । हें ठाऊक होतें गुप्त मानसें । तिकडेचि जावेरं संकेत केलासे । गंगा तटाकेंचि ॥८॥

उठोन ज्या क्षणी चालिला । लोक म्हणती न जावें उणें काय तुला । येरू म्हणे माझिया मायबापांला । भेटुं जातों ॥९॥

लोक रडत पाठी लागले । माधवें गंगातटाका गमन केलें । कित्येक लोक समागमें चालिले । जाऊं म्हणती जनस्थाना ॥१०॥

परी कोणी तेव्हांचि परतती । कित्येक योजनावरुनी मागें जाती । कोणी उरले होते निश्चिती । तेही त्यागिती तों दिवसां ॥११॥

परि बाळ एकटाचि चालिला । पश्चिमेचा मार्ग अवलंबिका । गोदेचा दक्षिण तीर धरिला । मार्गहि नसतां आडरानीं ॥१२॥

गंगातीरी ग्राम जो पाहे । तेथें मारुतीचें देउळीं राहे । कोनी पुसतां तया सांगताहे । मज जाणें जनस्थाना ॥१३॥

कोणी कोणी तें लेंकरूं पाहोनी । भोजन घालिती सदनी नेउनी । कोणी जाती कळवळोनी । समागमें कोस एक ॥१४॥

केव्हां मागें एकटचि असावें । वृकरीसादि केव्हां आढळावें । तये स्थानी भेऊनि जावें । गुरु गुरु करित ॥१५॥

ते श्वापदे दुरी गेलिया । मर्ग क्रमीं अनवाणी पाया । ऐसें देखुनी मारुतिराया । कळवळा आला ॥१६॥

म्हणे हा आपुला अंशधारी । अवतरला असे भूमीवरी । वनश्वापदें मारिती जरी । तरी काय करावें ॥१७॥

मग मारूती जाला ब्राह्मण । अतिवृद्ध काठी हातीं घेऊन । तया बालकापासीं येऊन । म्हणे तुज कोठें जाणें ॥१८॥

येरू म्हणे जनस्थाना जाणें । तंव मारुती म्हणे मज लाही येणें । उभयांसी हळूंहळूं चालणें । तूं बाळ मी वृद्ध ॥१९॥

मग उभयतां समागमें चालती । एकचि स्थानी कोठेहीं राहती । कोणी तरी नेती भोजनाप्रति । तया बाळासी ॥२०॥

बाळ तो आजोबा म्हणुनी । हांक मारी प्रीतिकरुनी । आजोबा जैसा जनकजननी । परी सांभाळी ॥२१॥

मारुतीस म्हणे आजोबा पाही । माझे संगतीं बहु आले लवलाही । परंतु एकहीं उरला नाहीं । तुज ऐसा कृपाळु ॥२२॥

मारुती म्हणे मजही सांगात । नाहींच मिळाला यथायुक्त । तूं मज भेटतांचि मनोगत । पुरले माझें ॥२३॥

बाळ म्हणे अनस्थाना तुम्हांसी । जाणें असे कासयांसी । तुम्हीं ओळखीतसा की उद्धवस्वामीसी । आणि टाकळीहि ठावी तुम्हा ॥२४॥

मारुती म्हणे बापा माधवा । मीही राहत असे टाकळीं गांवा । उद्धवस्वामीं तो माझा विसावा । जीवींचा असे ॥२५॥

मी निघालों गंगाप्रदक्षिणा । परतलों नामीपासुन जाणा । गंगा तटकेंच करितसें गमना । तों तुझी भेटी जाली ॥२६॥

माझा स्वामीचा अति प्रेमा । तूंही आवडसी अंतर्यामा । तुज नेऊन घालीन टाकळीग्रामा । भेटी करीन हंसाची ॥२७॥

ऐसें मागें एकमेकांसी । रंजविती चालती वेगेंसीं । चालता कोणे ऐके दिवशी । सन्निधान पातले ॥२८॥

इकडे उद्धवस्वामी मारुती जवळा । बैसलें असती अवलीळा । तंव लविनला उजवा डोळा । वेळोवेळा बाहु स्फुरे ॥२९॥

तो इतक्यांत गडाहुनीं । समर्थ पातले उद्धवदर्शनीं । देखतांचि साष्टांग नमुनीं । म्हणती दर्शन सफळ ॥३०॥

समर्थ म्हणती चाल त्वरेनें । तुज दावितों अमोलिक रत्‍न । ऐसें बोलोनि दोघे जण । गंगातीरा पातले ॥३१॥

तंव तो वृद्ध ब्राह्मण घेऊन बाळा । येत असे उतावळा । बाळकासी म्हणे पाहे डोळा । गुरु परमगुरु तुझें ॥३२॥

ऐकतांचि त्या वृद्धांचें वचन । पुढें पाहताचि दोघे जण । माधव घाली साष्टांग नमन । तया पाहती उभयंतां ॥३३॥

बाळा धरूनियां मारुती । समर्थाचें देतसे हाती । हे घे तुझी तूं अभिव्यक्ति । ऐसें प्रीती बोलुनी ॥३४॥

समर्थें घेउनीं उद्धवहंसाचें । करी देउनी बोलती वाचें । हे बाळ असे काय ओळखीचें । तुरा कीं तुझा ॥३५॥

मागुती म्हणतीं गा उद्धवा । हा घट तुजला दिधला बरवा । यामाजी लावी ज्ञानदिवा । ब्रह्माडसदना प्रकाशक ॥३६॥

इतकें तुवा आतां करावें । तोंवरी जाऊन येतसों स्वभावें । ऐसें बोलून गेले आणि पावे । मारुतीहि अंतर्धान ॥३७॥

नंतर उद्धवस्वामीं अति हर्षोंनी । बाळासि घेउनी आले सदनी । मांडीवरी चिमणिया बैसउनी । मुख कुरवाळिती ॥३८॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । माधवहंसाख्यान निगुती । द्वितीय प्रकरणी ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP