एकदा समर्थ सज्जनगडी । असतां स्मरण जालें परवडी । कीं माधवासी आपण आवडी । उद्धव करी दिधलें ॥१॥
तयांची स्थापना कोठें तरी । केली पाहिजे निर्धारी ! तेथून संप्रदाय । चालेल पुढारी । ज्ञानपरंपरेचा ॥२॥
ऐसें विचारूनि निघाले । नामिस्थाना गंगातीरी पातले । तेथूनही पुर्वेस इंदूर देखिलें सात योजनावरी ॥३॥
तें स्थळ पाहतां जाला आनंद । म्हणती माधवा योग्य हें स्थळ शुद्ध । येथें असे हा ब्रह्मावृदं । तरी येथेंचि स्थापावें ॥४॥
ऐसा हा मनीं करुनि विचार । तेथूनहि शोधित चालले कातार । तंव एक देखिला गिरिवर । भयंकर दीर्घ ॥५॥
प्रणिता नामें एक नदी आली । तया पेवता तळवटी रिचवली । पुढें मार्ग नव्हें यास्तव फिरवी । तेथून बाणगंगा नाम ॥६॥
ओघ जेव्हां तळी रिचवला । नेणों तो पाताळापासून उलटला । तैसाचि शब्द खळांळ दाटला । तेणें बसे कनिठाळी ॥७॥
तें स्थळ दृष्टीसी पाहतां । आनंद जाला समर्थाचें चित्ता । कडा तुटला जो खळाळावरुतां । तेथें पाषाण महाथोर ॥८॥
तेथेंक्षणएक बैसुनी । परतते जलि तेथोनी । एक पर्वत देखिला नयनीं । इंदुरासमीप ॥९॥
ग्राम आणि किल्ल्यापासून । समीप असे अर्धयोजन । एक दरा शोभा यमान । तेथें पाषाण महाथोर ॥१०॥
तेचि खडक नीट समान होते । त्यावरी कोलसा घेउनि हातें । महाविक्राळ काढिलें मुर्तीते । मारुतीचिया ॥११॥
तेहें इंदुरीहून समस्त ब्राह्मण । पर्वी करा वया गेले स्नान । माघारें येतां समर्थें बोलाउन । म्हणती अभिषेक करा ॥१२॥
तव ते ब्राह्मण हसती । म्हणती कोळसा पुसेल पाणी पडतां वरुती । आणि येथें जळ कोठें निश्चिती । अभिषेक करावा केवी ॥१३॥
त्यांत कोणी कोणी वृद्ध म्हणती । अरे मूर्ख हो हेलना न करा निश्चिती । कोण कैसी असेल नेणों अभिव्यक्ति । यया भूमीवरी ॥१४॥
ऐसें एकमेकांस बोलुन । समर्थासी करिती नमन । जी जीं येथें किंचित् नसे जीवन । तरी कैसें करावें ॥१५॥
तेव्हा समर्थें अंगुलिनें दाविला । तो झरा पहा जीवनें भरिला । ऐसें बोलतांचि ओघ चालिला । नंदी ऐसा इर्यांतून ॥१६॥
तेव्हा ते ब्राह्मणें स्नानें केली । कलश भरूनि आणिते जाली । त्या मारुतीपुढें मंडळी बैसली । अभिषेक करावया ॥१७॥
ब्राह्मण घागरीच वरी ओतिती । परि ते रेखा न पुसे कल्पांती । असो अभिषेकाची होत आली समाप्ति । तेव्हा एक अद्भुत जालें ॥१८॥
महान् दीर्घ शब्द उठिला । तो खडक अवघा फुटता जाला । जितुका होता मारुती रेखाटला । उरला तितुका सावयव ॥१९॥
सान मोठे खपरे उडाले । परी ब्राह्मणसमुदाया नाहीं लागले । ब्राह्मणी नेत्रें उघडून जंव पाहिले । तंव मूर्ति घडलियापरी ॥२०॥
सर्व ब्राह्मण आश्चर्य करिती । यथोपचारें पूजिला मारुती । सेंदुर आणून लाविती । आणी समर्पिती नैवेद्य ॥२१॥
अद्भुत वृत्तांत म्हणती वर्तला । एकाएकी मारुती उप्तन्न जाला । तंव विचारवंत बोले समस्तांला । हा मारुती पहा मनुष्यरूपी ॥२२॥
तेव्हा ब्राह्मणांचा मिळोनि संघ । समर्थासी घालिती साष्टांग । म्हणती स्वामी पहा अभंग । आम्हांकडे कृपें ॥२३॥
आतां चलावें ग्रामाकडे । आमुचें पुरवावें स्वामि कोडें । आम्हां अनाथां पादसेवा घडे । आवडे तोंवरी रहावें ॥२४॥
पुढील भविष्य जाणुनी । समर्थ बहु बरें म्हणती ते क्षणी । तेघवां सर्व ब्राह्मणीं मिळूनि । समर्थांप्रती आणिलें ॥२५॥
नानाप्रकारें वाद्यें वाजविती । आणि टाळ मृदंग भजन करिती । ग्रामामाजी समर्थ मिरविती । अति प्रीति करोनि ॥२६॥
जे ते आपुलाले सदनी नेऊन । पूजिती सेविती आवडीन । कितेक भाबडे भाविक जन । उपदेश घेती ॥२७॥
एकदां सर्व जन ग्रामस्थ मिळाले । समर्थाप्रति विनविते जाले । कीं स्वामि येथेंचि पाहिजे राहिलें । मठ करूनियां ॥२८॥
तंव स्वामीं बोलती सर्वांप्रती । आम्ही तरी न राहूं निश्चिती । परी येथें एक स्थापूं अभिव्यक्ति । आपुली दुजी ॥२९॥
समस्त म्हणती बहु चांगलें । ग्रामाबाहेरी स्थळ एक पाहिलें ।तेथें जाऊन समर्थ बैसलें । तेथेंचि अपूर्व स्थळीं ॥३०॥
ग्रामस्थांसी समर्थ म्हणती । तुम्ही येथें मठ करा निश्चिती । आम्हीं जाऊन येतों शीघ्रगती । अल्पचि काळें ॥३१॥
इतुकें बोलुनि समर्थ गेले । ग्रामवासियें मठासी काम लाविलें । आतां पुढील प्रकरणी पाहिजे ऐकिलें । बोललें चिमणें बाळें ॥३२॥
इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । माधवहंसाख्यान निगुती । सप्तम प्रकरणी ॥७॥