सद्‍गुरू - जुलै ३

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


सदगुरुची कामगिरी कोणती ? आरशावर धूळ पडलेली असते , ती बाजूला सारायला सदगुरु सांगतात ; आपले चुकते कुठे ते सदगुरु सांगतात . सदगुरु आपल्याला मार्गाला लावतात . स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला , तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला ! सदगुरु जागे करण्याचे काम करतात . मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले , त्याने सदगुरु खरोखर केला असे म्हणावे . एखादा सुखवस्तू गृहस्थ ‘ मी स्वस्थ आहे ’ असे म्हणतो , पण ते काही खरे नाही . मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार .

शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात . जो शरण जातो त्याचा कार्यभार सदगुरु उचलतो . ज्याची दृष्टी रामरुप झाली तो खरा गुरु . जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे . खरोखर , सदगुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय . गुरुने सांगितलेले अक्षरश : पाळणे हेच खरे साधन . संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत . संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे . पुष्कळांना संतांची गाठ पडते , परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही . आपली जी कर्तव्ये ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत . व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो , त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल . आपले कर्तव्य कोणते ते सदगुरु आपल्याला दाखवून देतात .

रथ आहे खरा , पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल , तर रथ कुठेतरीच जाईल . केवळ ‘ गाडी माझी आहे ’ म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही ; साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही . आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवितो , आणि खड्ड्यामध्ये पडतो . सदगुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरुपी गाडीला योग्य रस्त्यावरुन नेतात . आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे , मग कसलाच धोका उरणार नाही ; आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार , अशी वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल . मनाची ही वृत्ती झाली की , जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल . असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल . पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंत : करणाची शुद्धता हा पाया आहे .

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP