सद्‍गुरू - जुलै १४

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


परमार्थ म्हणजे काय , हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो . परमार्थाचे जर काही मर्म असेल तर , आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय . ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले , म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदु : ख बाधत नाही . हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे . गुरु कुणाला करावे ? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे . गुरुपद कुठेही एकच असते . गुरुला कुठे आडनाव असते का ? गोंदवलेकर गोंदवल्यास राहात असतील ; दुसरा कुणी आणखी कोणत्या गावी राहात असेल . म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले , तरी गुरुपद हे सर्वकाळी अबाधित असेच असते . तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा , आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पाहा ; त्याच्या देहाकडे पाहू नका . तो लुळापांगळा आहे की काय , हे पाहू नका . तो देहाने कसाही असला , तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा . त्याची लाज , जिथून गुरुपद निर्माण झाले , त्याला असते . गुरुआज्ञा हाच परमार्थ ; तो सांगेल तेच साधन . तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करु लागलात , तर त्यात तुम्हाला यश येणार नाही . अभिमान धरुन काही करु लागलात , तर ते साधणार नाही . म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा , गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा .

खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही , तो स्वत : करता आहे . आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल , तितका आपल्याला फायदेशीर आहे . जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही . खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे , हा तर फार मोठा घात आहे . एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसर्‍याने पेढ्याचे दुकान घातले ; दुकान कशाचेही असले , तरी शेवटी फायदा किती होतो , याला महत्त्व आहे . तसे , प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून , मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे . परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते . आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे . एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला , म्हणजे परमार्थ लवकर साधतो . खरोखर , परमार्थ इतका सोपा आहे , की तो सहज रीतीने करता येतो . पण गंमत अशी , की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही . प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही , तो परमार्थासाठीच आहे , हे पक्के लक्षात ठेवावे . साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून , मनाने मात्र ईश्वरोपासना करावी .

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP