सद्‍गुरु - जुलै ९

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते . दृश्य हे स्वतंत्र नसते , भगवंताच्या अधीन असते . म्हणून , जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे . आपला देह दृश्यच आहे , आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे ; त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे . हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते , म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा . आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते . ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदु : खाची बाधा उरली नाही . संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते , पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदु : ख नाही . व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरु नये . आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून , जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे . आपण प्रपंची लोक आहोत , म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यावाचून कधी राहू नये . पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता , त्यामध्ये भगवंताला विसरु नये . परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे . उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये , आणि अनीति - अधर्माच्या मार्गाला जाऊ नये . संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून , मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा . असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो . बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो . खरोखर , हे सर्व हिंग - जिर् ‍ याचेच गिर् ‍ हाईक आहेत ; देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही .

जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा . अगदी विषयातल्या माणसांनासुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा . त्याच्याजवळ जाऊन नुसते ‘ मी शरण आलो आहे ’ असे म्हटले तरी पुरे होते . हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही ; पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत , अलीकडे ते जास्त संकुचित झाले आहेत . पूर्वी खेडेगावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची , पण आता काळ पालटला आहे . तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की , मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे . मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा . कशाचीही काळजी करु नका , मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा .

N/A

References : N/A
Last Updated : July 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP