मूळस्तंभ - अध्याय ८

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशायनमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

शंभु म्हणे वो गौरी ॥ हा मनरण्य युग जाहलियावरी ॥ ब्रह्या पडला भरोवरी ॥ अहंमतीच्या॥१॥

मग द्दढ भावें व्यक्ति ॥ धरुंनिया एकमती ॥ काय करिता जाहला व्यक्ति ॥ तें ऐक देवी ॥२॥

मग मनरण्ययुगांभीतरी ॥ ब्रह्या दर्शन कथन करी ॥ तें ऐकावें वो गौरी ॥ एकचित्तें ॥३॥

तंव बोले आदिशक्ति ॥ देवा सांगा साही दर्शनांची उत्पत्ति ॥ आणि उपदर्शनें काय करिती ॥ तें मी नेणे देवा ॥४॥

मग बोले शंकरु ॥ साही दर्शनांचा विचारु ॥ आणि उपदर्शनाचा ॥ विस्तारु ॥ सांगतो तुज ॥५॥

साही दर्शनें तीं कवण ॥ आणि सहा लिंगे कोण कोण ॥ तीं ऐक चित्त देऊन ॥ पार्वती वो ॥६॥

देव ब्रह्या आचारलिंग ॥ देव विष्णु गुरुलिंग ॥ देव रुद्र शिलिंग ॥ जाण देवी ॥७॥

देव ईश्वर जंगम लिंग ॥ देव आदिपुरुष प्रसादलिंग ॥ देव सदाशिव महालिंग ॥ ऐसीं तुज कथियेली ॥८॥

हीं लिंगदर्शनाचीम नामे जाण ॥ पार्वती हेचिं षट्दर्शन ॥ यांचे भक्तिचे देव जाण ॥ तेचि सहा लिंगे बोलिजेती ॥९॥

माझिया रुपापासाव वेद ॥ त्यांचा न कळे कोणा भेद ॥ मग साही दर्शनीं अनुवाद ॥ करुनि दाविले ॥१०॥

तरी ही साहीं दर्शनें जंबुक ॥ वरी देत सिंहाची हांक ॥ ऐकोनि म्हणती राख ॥ भजलों तुज ॥११॥

म्हणुनि थोर ते वेदांत ॥ वेदांग दर्शनें फॊडित ॥ आणि वेदांतासी भीत ॥ दर्शनें उपदर्शनें ॥१२॥

हीं दर्शनें बोलिजे ॥ तेहतीस कोटी देव कीजे ॥ ये -हवी फाडिती म्हणोनि भीजे ॥ तिहीं देवी ॥१३॥

सहा दर्शनें परिकरें ॥ तीचं झालीं साही शास्त्रें ॥ त्याचीं नामे पवित्रें ॥ परिस देवी ॥१४॥

मीमासक नैय्यातिक ॥ चार्वाक वैशेषिक ॥ बौद्व आनि सांख्याक ॥ हीं जाण देवी ॥१५॥

सहा दर्शनें पवित्रें ॥ ह्यांचा वेष मिरविती ती उपदर्शनें विचित्रें ॥ ऐसीं ब्रह्ययासे रचिली नाममात्रें ॥ माझेनि देवी ॥१६॥

जंगम १ जोगी २ संन्यासी ३ वैष्णव ४ म्लेंच्छ ५क्षपणिक ६ हीं दर्शनें ऐसी वेषधारी ॥१७॥

हे सर्व माझें नाम जाणती ॥ परि माझें स्वरुप नेणती ॥ माझें गर्भी उपजती ॥ परि नेणती ते अंध ॥१८॥

ऐकिल्या शब्द लागती ॥ आम्हां शिव दावीं म्हणती ॥ महाकाकुळती येती ॥ नानापरी ॥१९॥

नानाभावें ते रुदती ॥ आपुला छंद वाढवि ती ॥ मग माझे मायेतें म्हणती ॥ दावा शंभू ॥२०॥

मग ती माया विचित्री ॥ शिव दावावा कोणेपरी ॥ दिव्यनेत्रेंवीण विचारी ॥ तो पाहावा कैसा ॥२१॥

मग हातीं घेऊन कर्मकाठी ॥ सर्व शिवस्थानें प्रतिष्ठी ॥ तीं साही लिंगे गोमटी ॥ दावी त्यांसी ॥२२॥

एकासि दाविलें आचारलिंगा ॥ दुजयाचा हात ठेवी गुरुलिंगा ॥ तिजिया दावी शिवलिंगा ॥ आदिशक्ति ते ॥२३॥

चौथियासी जंगमलिंग ॥ पांचव्यासी प्रसादलिंग ॥ साहाव्यासि महालिंग ॥ ऐसे लिंगभाग दाविले ॥२४॥

ऐसी सहाजणा सहापरी ॥ माय समजावी वेगळाले उत्तरीं ॥ हात ठेवूनी लिंगावरी ॥ चांचपती ते ॥२५॥

मग माया म्हणे बाळकारे ॥ ह्या शिवा तुम्हीं पाहिला कीरें ॥ येरु म्हणती संतोषानें उत्तरें ॥ माते शिव देखिला वो ॥२६॥

मग त्यातें करीं धरुनी ॥ बैसविले मृत्युभुवनीं ॥ शिव देखिला याच वनीं ॥ जन बोलती ॥२७॥

पहिला म्हणे आचारलिंग ॥ दुसरा म्हणे ग्रुलिंग ॥ तिसरा म्हणे शिवलिंग ॥ तुवां देखिला नाहीं ॥२८॥

चौथा म्हणे तुम्हीं रहा ॥ माझें जंगमलिंग पहा ॥ पांचवा म्हणे कां तिष्ठत आहां ॥ नाना उत्तरीं ॥२९॥

माझें थोर प्रसादलिंग ॥ सहावा म्हणे महालिंग ॥ ह्यापासाव नानालिंग ॥ येथें होय जाय ॥३०॥

हें महालिंग अगाध ॥ जो तुम्ही नेणा प्रसिद्व ॥ तोचि शंभू आनंदबोध ॥ म्यांचि देखिला ॥३१॥

ऐसी मायेनें दाविली परिपाठी ॥ तीही म्यांच बांधिली गांठी ॥ मग ते सहाही करिती गोष्टी ॥ समारंभाच्या ॥३२॥

ऐसीं झगडतीं साहीं दर्शनें ॥ आपआपलें मतीप्रमाणे ॥ मग रचिती शास्त्रपुराणें ॥ नानापरींची ॥३३॥

ऐसे ते चर्मचक्षु भरले ॥ त्यांसी ज्ञानचक्षु नाहीं झाले ॥ जे अज्ञानांधकारीं बुडाले ॥ मज न पावती ते ॥३४॥

ऐसी सहा दर्शनांची बोलणी ॥ पार्वतीस सांगे पिनाकपाणी ॥ तीं ऐकोनी मग भवानी ॥ प्रश्न करी शिवाप्रत ॥३५॥

म्हणे देवा ही दर्शने ॥ आनिक सहा उपदर्शनें ॥ तीं हीच की आणिक कवणें ॥ ती सांगा देवा ॥३६॥

ऐसे देवीचे पुसणे ॥ त्यामाजी आणिक उपहासणे ॥ मग सांगो आदरिलें त्रिनयनें ॥ म्हणे ऐक देवी ॥३७॥

शैव १ वैष्णव २ जोगी ३ ब्राह्यण ४ संन्यासी ५ जैन ६ हीं हा उपदर्शनें ॥३८॥

ऐसी सहा उपदर्शनें ॥ यांची देवपूजा परिसणें ॥ उपरी मठ बांधणे ॥ विवाद करिती ॥३९॥

शैवीम करतळीं पूजिला ॥ वैष्णवीं देउळी स्थापिला ॥ संन्यासी गिरी राहे म्हणितला ॥ अखंडित ॥४०॥

योगी सभराभरीत मानिला ॥ ऐसा पाखंडी देव खंडिला ॥ आणि वाटूनी घेतला ॥ अर्ध अर्ध ॥४१॥

अवो माझी जे खंडना करिती ॥ तेचि पाखंडी म्हणिजेती ॥ अखंडित देवातें खंडिती ॥ ते निजभक्ति ॥४२॥

भक्त आपुलें मन फाळी ॥ सप्तधातुंची करी पुतळी ॥ तो उठोनि धावें सकाळी ॥ देव पूजावया ॥४३॥

तो आपणाऐसे करी हातपाय ॥ त्यासी माझें नाव ठेविताहे ॥ देव करुनि पूजिताहे ॥ देव्हा -यावरी सगुण ॥४४॥

मुखीं नामस्मरण करी ॥ स्वमतें ह्रदयीं ध्यान धरी ॥ अवयव रेखी देहावरी ॥ नानापरीचे ॥४५॥

शंख चक्रलावी शरीरी ॥ नामें रेखी देहावरी ॥ चोवीस मूर्तीची निर्धारी ॥ देही देव ॥४६॥

तो एका करंड संपुष्टें ॥ नाना देव धरिनि कनिष्ठें ॥ तो घेऊनि जाय चोरटे ॥ सोनार हाटा ॥४७॥

ऐसा भक्ति भांडविलों ॥ प्रतिमा करिनि पूजिलों ॥ ऐसिया भक्तिस तूडलों ॥ हें केवीं घडे ॥४८॥

आणिक नाही भरंवसा ॥ मी सर्वत्र आहें कैसा ॥ पडिलिया भक्तिभासा ॥ निर्धारुनियां ॥४९॥

या भावानें वेचलें मातें ॥ हें न कळे तें सांगों द्दष्टांते ॥ तें आठवलें चित्तें ॥ परिस देवी ॥५०॥

बहुतरुपी आणी सोंग ॥ तेणें राजा संतोषें दे त्याग ॥ तें देतां होय अनेक ॥ परी घेता एकचि ॥५१॥

ऐसें भावें मज पूजिती ॥ नाना नामें मज ठेविती ॥परी सर्व पूजा पावे प्रीती ॥ एकलीया मज ॥५२॥

जे प्रपंचाची भक्ति करिती ॥ ते मज कैसे पावती ॥ ऐसे देवार्चन म्हणती ॥ साहीं दर्शनांचे ॥५३॥

वैष्णवासी शंड चक्र मुद्रा गदा ॥ कीर्तिमुखें त्रिपुंड् सदा ॥ शैवदेही भूषणें मतिमंदा ॥ जाण देवी ॥५४॥

आपण ओळखावया कारणें ॥ ओळखी करिती भूषणें ॥ ह्यानें जगाची पूजा घेणें ॥ परी सुभक्ति नको ॥५५॥

तरी हो बाह्य मुद्रा सांडोनी ॥ अंतरी द्दढ मुद्रा धरोनी ॥ भक्तिभावें अनुसरती जाणीं ॥ ते शैव वैष्णव जाणावे ॥५६॥

ऐसिया भावभक्ति ॥ वर्तणें तरी दर्शनभक्ति ॥ मनोबुद्वी मज अर्पिती ॥ तेंचि शिवज्ञान ॥५७॥

देवी मी व्यापक जाणिजे ॥ मी थोर ऐसा नेम कीजे ॥ मग थांबे तो देवी म्हणिजे ॥ तरीच शिवज्ञान ॥५८॥

जैसा जळावेगळा नव्हे तरंगू ॥ कीं रवीवेगळॆं किरण नव्हें चांगू ॥ तैसा ज्ञानिया द्विभंगू ॥ न करवे देवी ॥५९॥

ऐसे ज्ञानियांचे ज्ञान ॥ देवावेगळें नव्हे जाण ॥ त्यामसहित देव आपण ॥ तोचि होय वो ॥६०॥

तो चाले तितुकीं तीर्थे त्याचे पायीं ॥ त्यांचे बोलणे तितुके देव पाही ॥ भोजन तेंचि हव्य पाहीं ॥ मनोवाचांस कोमळ तो ॥६१॥

त्याची निद्रा ती समाधी ॥ त्याची आत्मभाव निद्रा आधी ॥ तो जनीं वर्तता पूजा वेधी ॥ तीच त्याची पूजा ॥६२॥

ऐसीं साही दर्शनें ॥ अधिष्ठिलीं शिवज्ञानें ॥ परी आचरती कर्मज्ञानें ॥ ते शैव वैष्णव ॥६३॥

येरु चारी दर्शनें ॥ करिती कर्मक्रिया आचरणें ॥ उपदेशिलीं ब्रह्ययानेम ॥ चतुर्मुखी ॥६४॥

ह्यांपासाव निर्धारु ॥ सर्व शास्त्रांचा विचारु ॥ मग शास्त्रांपासाव प्रकारु ॥ पापपुण्याचा ॥६५॥

देवीसी म्हणे ईश्वरु ॥ हा मनरण्ययुगाचा विस्तारु ॥ दर्शनें उपदर्शनें आचारु ॥ सांगितला तुज ॥६६॥

हा युग चार कोडी ॥ वर्तोनि राहिला परवडी ॥ दर्शनाची उतरडी ॥ सांगितली ॥६७॥

ऐसा हा मनरण्ययुग सागीतला ॥ त्यांत दर्शनासी जन्म झाला ॥ पुढें वृत्तांत वर्तला ॥ तो म्हणे ईश्वरु ॥६८॥

इति श्रीमूळस्तंभे शिवपुराणे ईश्वरपार्वतीसंवादे मनरण्ययुगकथन नाम अष्टमोऽध्यायः ॥८॥

श्रीसांवसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्रीरस्तु ॥


References : N/A
Last Updated : September 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP