श्रीगणेशाय नमः॥ श्रीनृसिंहरस्वतीगुरुभ्यो नमः ॥
आतां प्रथम त्रेतायुगस ॥ शुद्व तृतीया वैशाखमास ॥ आर्द्रा नक्षत्र गुरुवार दिवस ॥ तैं प्रांरभ जाहला ॥१॥
त्या युगाचें सांगतों प्रमाण ॥ तें ऐक देवी चित्त देऊन ॥ बारा लक्ष शाण्णव सहस्त्र जाण ॥ संख्या असे वर्षाची ॥२॥
त्या त्रेतायुगाभीतरी ॥ दैत्यवधार्थ भूमीवरी ॥ अवतरला असे श्रीहरी ॥ तीन वेळा ॥३॥
ते अवतार म्हणती कोण ॥ तरी प्रथम झाला तो वामन ॥ दुसरा परशुराम जाण ॥ तिसरा राम दाशरथी ॥४॥
हे श्रीहरीचे अवतार तीन ॥ आणि त्यायुगीं पस्तीस राजे जान ॥ जाहले ते म्हणसी कोण ॥ तरी तूं ऐक देवी ॥५॥
पृथु , त्रिशंकु , हरिचंद्र ॥ रोहिदास , अंबरीष पवित्र ॥ चंडजंघ , हीजवा , धुंधुमार ॥ सर आणि अंशुमान ॥६॥
सुमंत अस्मान भूप ॥ पुढें भगीरथ त्याचा दिलीप ॥ रघु , अज , दशरथभूप ॥ त्यापासुनी रामचंद्र ॥७॥
रामपुत्र कुशवीर ॥ लवस्पती त्याचा कुमर ॥ पुढें सुक्रमा , नळु नर ॥ त्यापासुनी पिंधलक्ष ॥८॥
क्षेमधान्य , दिवानक ॥ त्याचा पुत्र अहीनक ॥ त्यापासुनी पारिजातक ॥ शंखनाभ तयाचा ॥९॥
चंद्रवा , पुढें वीरसिंह ॥ त्याचा हरिनाभ ॥ कौसल्य सर्वशंभु , दुदसिंह ॥ अग्निव्रण पस्तिसावा ॥१०॥
एकापासुनी एक जन्मले ॥ ऐसे हे राजे सूर्यवंशी झाले ॥ ते त्रेतायुगीं प्रवर्तले ॥ महाप्रौढी ॥११॥
चौदा ताल उच्चत्व पुरुषाचें ॥ एका क्षत्रिया बळ साचे ॥ एकवीस सहस्त्र गजांचे ॥ होतें पैं ॥१२॥
त्रेतायुगीं सूर्यग्रहणें ॥ बत्तीस सहस्त्र झालीं जाणें ॥ आणिक झालीं चंद्रग्रहणे ॥ छत्तीस सहस्त्र ॥१३॥
सहस्र वर्षेपर्यत जाण ॥ बाळक करी स्तनपान ॥ आणि दीडमासांती भोजन ॥ करिती सर्व ॥१४॥
दीडमासे करिती उपहार ॥ साडेबारा मण असे आहार ॥ द्दष्टीं देखतां स्वभ्रतार ॥ गर्भ राहे स्त्रियांसी ॥१५॥
मातापिरभक्ति पूर्ण ॥ सदा असे पुत्रांलागुन ॥ पंधराविश्वे असे पुण्य ॥ सद्वर्मे लोक वर्तती ॥१६॥
नारी पतिव्रताधर्म पाळिती ॥ भ्रतारभक्ति सदां करिती ॥ धर्मासि तीन पाद असती ॥ आणि मान असे वित्रांसी ॥१७॥
क्षत्रिय नानायज्ञ करती ॥ सदा धान्य पिके क्षिती ॥ आणि सर्व काळ फळती ॥ वनस्पति ॥१८॥
त्या त्रेतायुगामाझारी ॥ दैत्यीं पीडिली धरित्री ॥ ऐसें पाहोनि श्रीहरी ॥ अवतरला तीन वेळ ॥१९॥
पंचम अवतार वामन ॥ त्याचा पिता कश्यप जाण ॥ अदिती माता आणि वसिष्ठालागुन ॥ गुरु केला तयानें ॥२०॥
क्षेत्र सुंदर अशा स्थळीं ॥ दानशूर जो दैत्यबळी ॥ त्यासी घातलें पाताळी ॥ त्रिपादभूमि मागुनी ॥२१॥
परशुराम सहावा अवतार ॥ रेणुका माता , जमदग्नि पितर ॥ गुरु वसिष्ठ नरहरपूर ॥ क्षेत्र जाण तयाचें ॥२२॥
अतिबलाढ्य सहस्त्रार्जुन ॥ तयासी युद्वीं निर्दाळून ॥ कामधेनूतें सोडवून ॥ स्वस्थानासी आणिली ॥२३॥
मग तयाने एकवीस वेळ ॥ नि :क्षत्रिय करुनि भूमंडळ ॥ ब्राह्यणाकारणें दीधलें सकळ ॥ जाण जगदंबे ॥२४॥
ऐसें ऐकोन शंकरवचन ॥ मग करी पार्वती प्रश्न ॥ सर्व क्षत्रिय मारिल्या जाण ॥ मग कैसें जाहले ॥२५॥
मग म्हणे हो त्रिनयन ॥ उमे केलासी बरबा प्रश्न ॥ तरी आतां चित्त देऊन ॥ ऐक तुजला सांगतों ॥२६॥
भार्गवें सर्व क्षत्रिय वधिले ॥ नाहीं कोणी एक शेष राहिलें ॥ ऐसें पाहुनी पलायन केलें ॥ गर्भवंती स्त्रियांनी ॥२७॥
गर्भ छेदिल म्हणोनियां ॥ हिंगळजादेवीसी शरण गेल्या ॥ मग हस्तपाद जोडूनियां ॥ प्रार्थना करिती तियेची ॥२८॥
जयजय देवी जगज्जननी ॥ जय भक्तसंकटनिवारिणी ॥ आदिमाये जय भवानी ॥ दीननाथें हिंगळजे ॥२९॥
श्रीपरशुराम जमदग्निसुत ॥ त्यांने नि :क्षत्रिय केली पृथ्वी समस्त ॥ आतां क्षत्रियोद्वव उदरस्थ ॥ गर्भ छेदिल आमुचे ॥३०॥
दीन अनाथ आम्ही कामिनी ॥ शरण आलों याकारणीं ॥ तरी आमुचे गर्भ रक्षुनी ॥ कृतार्थ करीं आम्हांसी ॥३१॥
आणिक ऐक यासमयी ॥ सत्वर आम्हां अभय देई ॥ तूं जैसी तैसी भाक घेई ॥ आम्हांपासूनि जगदंबे ॥३२॥
ऐसी प्रार्थना ऐकुनि भवानी ॥ म्हणे रक्षित्यें तुमच्या गर्भालागुनी ॥ परी क्षत्रियपण हें द्या टाकुनी ॥ जीविका करा तंतुपटें ॥३३॥
ऐसें बोलूनि स्त्रीयांप्रत ॥ मग दिधलें कुंचीतावत ॥ आणि पट विणवून विख्यात ॥ नामं दिधलें खत्री ऐसें ॥३४॥
तैंपासुनी खत्री झाले ॥ मागील क्षत्रियपण राहिलें ॥ ऐसे हें वरदान दीधलें ॥ हिंगळजेंने ॥३५॥
आणि पोलिली आदिमाता ॥ माझें व्रत चालवा आतां ॥ तैपासूनि प्रसिद्वता ॥ खत्र्यांसी जाण ॥३६॥
आतां सातवा झाला अवतार ॥ श्रीरामनामें गुणगंभीर ॥ तयाचे जाण मातापितर ॥ कौसल्य आणि दशरथ ॥३७॥
गुरु वसिष्ठ अयोध्या क्षेत्र ॥ रावण कुंभकर्ण दोघे असुर ॥ त्यांते वधूनि समस्त सुर ॥ बंदिमुक्त केले पैं ॥३८॥
त्रेतायुगीं सहस्त्र गुणदान ॥ प्राप्त होय पुण्य एक गुण ॥ आणि धर्म विष्णुस्थापन ॥ आचार्यत्व त्या युगीं ॥३९॥
त्या युगीं बलिष्ठ राजे तीन ॥ प्रथम ऋक्षपक्षु बलवान ॥ दुसरा प्रवासकू जाण ॥ आणि अजपाळ तीसता ॥४०॥
तैं रेणुकापुराण जाहलें ॥ शतकोटी रामायण विस्तारलें ॥ दैत्यराक्षस पैं वधिले ॥ ऐसें संपलें त्रेतायुग ॥४१॥
आतां द्वापारयुग सांगेन ॥ तें ऐक देवी चित्त देन ॥ जेणे दोष जाती दारुण ॥ म्हणे महादेव ॥४२॥
इति श्रीमूळस्तंभे शिवपार्वतीसंवादे त्रेतायुगकथनं नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥