हस्तामलक - श्लोक १

श्री संत एकनाथांचा आवडता ग्रंथ म्हणजे हस्तमलक .


कस्त्वंशिशो कस्य कुतोऽसि गंता ॥ किन्नाम ते त्वं कुत आगतोऽसि ॥ एतन्मयोक्तं वद चार्भकत्वं ॥ मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोऽसि ॥१॥

॥ टीका ॥ शिशो ह्नणावया कारण ॥ नेणें शब्दापशब्दज्ञान ॥ परी बालत्वाचें अज्ञान ॥ त्यामाजीं जाण असेना ॥ ॥५२॥

बाळपणीं अतिसज्ञान ॥ यालागीं आचार्ये केला प्रश्न ॥ जेवीं धुळीमाजीं रत्न ॥ जाणते यत्न स्वयें करितीं ॥५३॥

शिंपीमाजीं मोतीं होये ॥ परी शिंपीसी कामा नये ॥ तेंचि सज्ञानासि पाहे ॥ भूषण होय निजांगीं ॥५४॥

तेवी त्या बाळकांचे ज्ञान ॥ माता पिता नेणती जाण ॥ त्याचें प्रकाशावया ज्ञान विज्ञान ॥ आचार्ये प्रश्न स्वयें केला ॥५५॥

तूं कैचा ! कोणाचा ? कोठील ? कोण ? ॥ काय नाम ? कोण वर्ण ? ॥ तुझें कोठूनि आगमन ? ॥ पुढारें गमन तुज कोठें ? ॥५६॥

माझिये प्रीतीचा प्रश्न ॥ तुवां प्रीतीनें करावा परिपूर्ण ॥ प्रीती सुखावे पूर्ण ॥ तैसें प्रतिवचन मज देई ॥५७॥

प्रीतीनें प्रीति अतिशयें वाढे ॥ प्रीतीनें परम प्रीति जोडे ॥ प्रीति प्रीतीचें फेडी सांकडें ॥ प्रीती पुढें पुढें प्रियकारा पढिये ॥५८॥

ऐसा आचार्याचा प्रश्न ॥ ऐकतां प्रकाशे निजज्ञान ॥ जेवीं लागतां रविकिरण ॥ सूर्यकांत संपूर्ण प्रभा दावी ॥५९॥

देखोनि पूर्णिमा पूर्णचंद्र ॥ भरितेनि खवळे क्षीरसागर ॥ तेवीं देखोनि प्रश्नादर ॥ ज्ञानाब्धि अपार उथळे भरितें ॥६०॥

होतां वसंताचें आगमन ॥ कोकिळा सांडिती निजमौन ॥ तेवीं आचार्याचें ऐकतां वचन ॥ विसर्जीमौनें यावजन्म ॥६१॥

कां देखोनियां नवघन ॥ मयूर आनंदें करी गर्जन ॥ तेवीं द्यावया प्रतिवचन ॥ उल्हासे पूर्ण परीपूर्णत्वें ॥६२॥

ऐकोनि आचार्याचें वचन ॥ करतळा मळक प्रकाशी ज्ञान ॥ यालागीं तेंचि अभिधान ॥ हस्तामलक जाण या हेतू ह्नणती ॥६३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP