हस्तामलक उवाच ॥
नाहं मनुष्यो नच देवयक्ष्यो ॥ न ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्राः ॥ न ब्रह्मचारी न गृही वनस्थो ॥ भिक्षुर्न चाहं निजबोधरुपः ॥२॥
॥ टीका ॥ हस्तामलक आपण ॥ आपुलें स्वरुपाचें लक्षण ॥ देहातीत पूर्णपण ॥ स्वयें संपूर्ण सांगतु ॥६४॥
मज लोक मानिती माणुसपण ॥ मी मनुष्य नव्हेगा आपण ॥ मी मनुष्याचा आत्मा जाण ॥ सबाह्य पूर्ण परमात्मा मी ॥६५॥
इंद्र चंद्र यम वरुण ॥ मी नव्हे , देव देवी देवगण ॥ माझेनि देवा देवपण ॥ मी परमात्मा पूर्ण देवादिदेव ॥६६॥
विष्णु विरिंची महेश ॥ हेही माझे अंशांश ॥ मी परमात्मा परेश ॥ जगदादि जगदीश मीचि स्वयें ॥६७॥
यक्ष राक्षस का पिशाचक ॥ तो मी नव्हे त्याचा चाळक ॥ सकळ भूतांचा मी पाळक ॥ भृतां भूतत्व देख माझेनि अंगें ॥६८॥
मी नव्हेगा ब्राह्मणवर्ण ॥ माझेनि ब्राह्मणां ब्राह्मणपण ॥ मी ब्रह्मदेवो आपण ॥ पूज्य ब्राह्मण माझेनि तेजें ॥६९॥
मी क्षत्रिय नव्हे आपण ॥ क्षत्रियांचा प्रताप तो मी जाण ॥ माझेनि क्षत्रियां क्षात्रपण ॥ शौर्य धैर्य पूर्ण क्षत्रियांचें मी ॥७०॥
मज नाहीं वैश्यपण ॥ मी वैश्यांचें निजधन ॥ माझेनि वैश्यां वैश्यपण ॥ मी निधिनिधान वैश्यांचें ॥७१॥
मी नव्हे गा नीचवर्ण ॥ नीचां नीच मी आपण ॥ मजहूनियां खालतेपण ॥ आनासी जाण असेना ॥७२॥
जे आतळतां भीती नारी ॥ तो मी नव्हे ब्रह्मचारी ॥ माझेनिब्रह्मचर्यायी थोरी ॥ भोगुनी नरनारी नैष्ठिक तो मी ॥ ॥७३॥
जेवी बोहरें लिहिलीं भिंतीवरी ॥ तेथें मिथ्या नोवरानोवरी ॥ तेवीं मुळीं नाहीं नरनारी ॥ मी ब्रह्मचारी नैष्ठिक ॥७४॥
देहगेह द्रव्यदारा आसक्त ॥ तैसा मी नव्हे गृहस्थ ॥ देहद्रव्य दाराअनासक्त ॥ तो मी गृहस्थ त्रैलोक्यगृहीं ॥७५॥
वनी वसोनि वानप्रस्थ ॥ तो मी जाण नव्हे येथ ॥ माझेनि जनवन प्रशस्त ॥ वनवासी विश्रांत मद्भावभावें ॥७६॥
वेदें लाविलें भिकेसी ॥ तैसा मी नव्हे संन्यासी ॥ न जाळुनी जाळिलें सर्व कर्मासी ॥ नित्यसंन्यासी गृहदारीं ॥७७॥
देव मनुष्य यक्ष नव्हेसी ॥ चारी वर्ण नव्हे ह्नणसी ॥ ब्रह्मचारी गृहस्थासी ॥ तूं नमनिसी भिक्षुत्वें ॥७८॥
इतुकींहीं न होनियां जाण ॥ ह्नणाल तूं येथ कवण ॥ त्याही स्वरुपाचें लक्षण ॥ ऐक संपूर्ण गुरुराया ॥७९॥
शुद्ध बुद्ध नित्य मुक्त ॥ चिन्मात्रैक सदोदित ॥ निजा नंदें आनंदभरित ॥ तो मी येथ निजबोधू ॥८०॥
जरी तूं निजबोध आपण ॥ त्या निजबोधाचें लक्षण ॥ विशद सांगावें संपूर्ण ॥ हें मनोगत पूर्ण आचार्याचें ॥८१॥
त्या मनोगताचे महिमान ॥ अतिगुह्य ब्रह्मज्ञान ॥ साह्य सखा श्रीजनार्दन ॥ एकाएकपणें ग्रंथार्थे आलें ॥८२॥
एका शरण जनार्दनीं ॥ जनार्दनचि वक्ता वदनीं ॥ ग्रंथीं परमार्थभरणी ॥ वदवी वाणी श्री जनार्दन ॥८३॥
जनार्दनें नवल केलें ॥ नांवासीं अभंगीं ठेविलें ॥ शेखीं नांवरुपेसी भंगिलें ॥ अभंग केले अक्षर ॥८४॥
पुरुषेविण व्यर्थ वनिता ॥ तेंवी श्रोतेनविण जाण कथा ॥ श्रोता जालया दुश्विता ॥ ग्रंथीची सुरसता विरस होय ॥८५॥
जेवीं नपुंसका हातीं ॥ दिधली पद्मिनी जाती ॥ तेवीं कथेची उपहती ॥ होय निश्चितीं श्रोतेनवीण ॥८६॥
कथेसी अवधान जीवन ॥ तेणेंवीण ते कोरडी जाण ॥ केवळ होय पाषाण ॥ जैं अनावधान श्रोतयाचें ॥८७॥
कथेसी अवधानाचें पेहे ॥ तेणेंवीण तें बाळ सें जाय ॥ केवळ रोडेजलीं ठायें ॥ ते पावल्या होय दोंदिएं ॥८८॥
दोंदिल होती पदपदार्थ ॥ अक्षरीं उथळे अक्षरार्थ ॥ कथेसी वोसंडे परमार्थ ॥ जैं सादरें संत परिसती ॥८९॥
संत केवळ ब्रह्ममूर्ती ॥ नित्य सावधान त्यांची स्थिती ॥ त्यांसी ही म्यां केली विनंती ॥ सावधानार्थी मुख्यत्वें ॥९०॥
संताचेनि मी ज्ञान संपन्न ॥ त्यांसी मी ह्नणे व्हावें सावधान ॥ हें थोर माझें उद्धतपण ॥ क्षमा पूर्ण करावी ॥९१॥
कृपेनें तुष्टले सज्जन ॥ तुज सर्वभूतीं जनार्दन ॥ तेथपरिहार आपण ॥ वेगळेपण कां धरिसी ? ॥९२॥
जनार्दनचि स्वयें जन ॥ हें ज्ञानाचें निजज्ञान ॥ एका जनार्दना शरण ॥ संत संपूर्ण तुष्टले ॥९३॥
पुढील कथ निरुपण ॥ द्वादशश्लोकीं व्याख्यान ॥ करतळामळक शुद्ध ज्ञान ॥ तें सावधान अवधारा ॥९४॥
आशंका प्रत्यक्ष दिसे देहसंबंधु ॥ तो तूं ह्नणविसी निजबोधु ॥ त्या निजबोधाचा प्रबोधु ॥ करुनी विषदु सांगावा ॥९५॥
ऐकोनि आचार्याचें वचन ॥ खवळलें निजात्मगुह्यज्ञान ॥ उल्हासें दे प्रतिवचन ॥ स्वानंदें पूर्ण पूर्णत्वे दावी ॥९६॥