निमित्तं मनश्चक्षुरादिप्रवृत्तौ ॥ निरस्ताखिलोपा धिराकाशकल्पः ॥
रविर्लोकचेष्टानिमित्तं यथा यः ॥ स नित्योपलब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥३॥
॥ टीका ॥ चित्तचतुष्टय अंतः करण ॥ ग्रंथार्थी त्यासी ह्नणती मन ॥ श्रवण मनन त्वचा घ्राण ॥ रसनेंसी जाण ज्ञानेंद्रियेंही ॥॥९७॥
कर चरण गुद शिश्न ॥ वाचेंसी कर्मेद्रियें पूर्ण ॥ मनश्चक्षुरादि भरण ॥ यातें विचक्षण बोलती ॥९८॥
ज्ञानेंद्रियीं बुद्धीची वस्ती ॥ कर्मेद्रियीं क्रियांची स्थिती ॥ उभययोगें कर्मप्रवृत्ती ॥ देह वर्तती निजकर्मी ॥९९॥
इंद्रियातें चेतवी प्राण ॥ मी आत्मत्वें प्राणाचा प्राण ॥ यालागीं मन जित्यत्व जाण ॥ वेदु आपण स्वयें बोले ॥१००॥
वेदु बोले वेदार्थू ॥ त्यामाजीं गूढ परमार्थू ॥ मजमाजीं मृषा इंद्रियमातु ॥ मा इंद्रियार्थु तेथें कैचा ॥१॥
प्रवृत्तीमाजील परमार्थू ॥ इंद्रिय प्रवृत्तीसि मुख्य मी हेतु ॥ तदर्थी रविदृष्टांतु ॥ स्वयें सांगतु अलिप्तत्वें ॥२॥
रवि निजागें लोक समस्त ॥ नुठवृनि स्वयें उठवीत ॥ त्या लोकव्यवहारा अलिप्त ॥ स्वयें भासत साक्षित्वें ॥३॥
होतां लोकक्रियाचरण ॥ क्रियेसीव्याप्त रविकिरण ॥ त्या किरणासी कर्म बंधन ॥ सर्वथा जाण लागेना ॥४॥
सूर्यकिरण कर्मी अलिप्त ॥ मा सूर्य केवीं होय लिप्त ॥ त्याभास्वताचा भी भास्वत ॥ कर्म कर्मार्थ मज मिथ्या ॥५॥
‘ सर्व खल्विदं ब्रह्म ’ तेथें कोठें राहे कर्माकर्म ॥ कर्म ह्नणणें परमभ्रम ॥ पूर्णत्वें परम परमात्मा स्वयें ॥६॥
सूर्यापासोनि आंधारा जन्म ॥ हें बोलणें काय पावन परम ॥ तेवीं निष्कर्म आत्मा करी कर्म ॥ हे भ्रांती परम सत्य ह्नणती ॥७॥
प्रत्यक्ष नभीं निळिमा दिसे ॥ परी तेथें नळिमेचा लेश नसे ॥ तेवीं आत्मत्वीं कर्म भासे ॥ शेखीं तेथें नसे स्वधर्मकर्म ॥८॥
मी तंव केवळ आत्माराम ॥ कर्म ह्नणतां मुख्यत्वें भ्रम ॥ मी प्रवर्तवी भ्रमात्मक कर्म ॥ हे बोल परम कार्य पावन ? ॥९॥
नभ सर्वी सर्वत्र व्याप्त ॥ व्याप्त होऊनियां अति अलिप्त ॥ त्या नभासी मी नभातीत ॥ शून्यत्वें तेथें शून्य कैचें ! ॥११०॥
वस्तू वस्तुत्वें समसमान ॥ चिन्मात्रैक चैतन्यघन ॥ तेथें आकाश हें कल्पक वचन ॥ शून्यत्व जाण निरासी ॥११॥
आत्मा चैतन्य जाण निष्कळ ॥ त्यासी शून्यत्वाचा जाण विटाळ ॥ नाहीं जाला आळुमाळ ॥ शून्याचा गोंदळ देखिलाचिनाहीं ॥१२॥
वस्तु वस्तुत्वें परिपूर्ण पाही ॥ शून्य जन्मलें भ्रांतीच्याठायीं ॥ क्रियाकर्म त्यामाजीं पाही ॥ इंद्रियें तींही तेथेंचि रमतीं ॥१३॥
नभ इंद्रियें क्रियाकर्म ॥ त्याचें मूळ मुख्यत्वें भ्रम ॥ मी तंव केवळ आत्माराम ॥ स्वानंदें परम परिपूर्ण ॥१४॥
यालागी निरस्तोपाधि ॥ स्वयें बोलिले वेदविधी ॥ त्या वेदार्थाची निज सिद्धि ॥ ऐक त्रिशुद्धी ते ऐसी ॥१५॥
प्रपंचु येक जाला होता ॥ हे समूळ मिथ्या वार्ता ॥ पुढें होईल मागुता ॥ कदा कल्पांता घडेना ॥१६॥
प्रपंचु मुळीं जाला नाहीं ॥ हें कळलें ज्याच्या ठायीं ॥ तोचि देहीं विदेहीं ॥ निरुपाधि पाही तो एकू ॥१७॥
ऐसी जे निजात्मसिद्धि ॥ यानांव निरस्तउपाधी ॥ हेंचि वेदांत वेदविधि ॥ हेंचि उपनिषदीं निज मर्यादा ॥ ॥१८॥
स नित्योपलब्धि मी आत्मा ॥ हे ही अत्यंत स्थूल प्रेमा ॥ ब्रह्मीं ब्रह्मत्व नुरेचि ब्रह्मा ॥ मी पूर्ण परमात्मा परिपूर्णत्वें ॥१९॥
येथ मुक्त ह्नणती तेचि वेडे ॥ ऐसें मुक्तीचें मूळ खुडे ॥ सच्चिदानंदत्रिपुटी बुडे ॥ सुखाचें उघडे सोलीव सुख ॥१२०॥
येणें जीवाचा जीव गेला ॥ शब्दाच्या सेनें ठाव पुसिला ॥ रात्रीदिवसेंसि रवि निमाला ॥ बोधाचा पाहाला निजात्मबोधु ॥२१॥
या परीचा मी निजबोधु ॥ बोलिला तो केला विशदु ॥ तेणें आचार्याची परमानंदु ॥ थोर विनोदु बाळकाचा ॥२२॥
ब्रह्मज्ञान निजप्रांजळ ॥ बाळभाषित अतिकोमळ ॥ तेणें आचार्यासी सुख कल्लोळ ॥ तें देखोनि बाळ सुखमय झाला ॥२३॥
त्या आचार्याचे स्वलीलें ॥ पुढारें ज्ञान येणें बाळें ॥ बोलावे अतिप्रांजळें ॥ हें मनोगत कळलें हस्तामलका ॥२४॥
तोचि धरुनि आवांका ॥ पुढील लावावया लापनिका ॥ स्वयें घेऊनि आशंका ॥ श्लोकार्थी श्लोकान्वयो लावी ॥२५॥
इंद्रियांसी आत्मेन प्रवृत्ती ॥ हें बोलावें कवणे अर्थी ॥ स्वयें इंद्रियें निजशक्ती ॥ कर्मप्रवृत्ती कां नव्हे ? ॥२६॥
ऐसी असतां आशंका ॥ तेहिवेशी उत्तर ऐका ॥ जडत्व इंद्रियांसी देखा ॥ आत्मा प्रकाशकां प्रकाशक स्वयें ॥२७॥
इंद्रियअधिष्ठात्री देवता ॥ आत्मा प्रकाशें प्रकाशविता ॥ तेथ इंद्रियांसी निजसत्ता ॥ प्रकाश कता ते कैंची ॥२८॥