यमग्न्युष्णवन्नित्यबोधस्वरुपं ॥ मनश्वक्षुरादिन्यबोधात्मकानि ॥
प्रवर्तत आश्रित्य निष्कंपमेकं ॥ स नित्योपलब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥४॥
॥ टीका ॥ अग्नीचें निज लक्षण ॥ स्वस्वरुपें स्वयें उष्ण ॥ तो त्यासी अवांतर नव्हे गुण ॥ स्वयेंआपण तेजस्वी ॥२९॥
त्या अग्निसंगें लोहगोळ ॥ सतेज होय अग्निकल्लोळ ॥ अबळा वाटे अग्नि केवळ ॥ परी तो अग्नि जडत्वें भिन्न ॥१३०॥
तेणें लोहें लागे आगी ॥ तें तेज नाहीं लोहाचे आंगीं ॥ ते सामर्थ्य अग्नि संगीं ॥ तैसी कर्मप्रयोगी इंद्रियें ॥३१॥
तेवीं आत्मा मी ज्ञानघन ॥ माझें स्वरुप शुद्धज्ञान ॥ इंद्रियां केवळ जडपण ॥ स्वतां चलन त्यां नाहीं ॥३२॥
आत्मेनि इंद्रियां चलन ॥ तैं आत्मा पावे कर्मबंधन ॥ हें सर्वथा नघडे जाण ॥ तें इंद्रियाचें आपण इंद्रियें भोगिती ॥३३॥
अग्निसंगें घणाचे घाये ॥ लोहाचे केवळ लोह साहे ॥ तेवीं सुखदुःखाचें अपाये ॥ इंद्रियाचे स्वयें इंद्रिये सोशिती ॥३४॥
अंतःकरण मनात्मक ॥ मन तें इंद्रिय अवश्यक ॥ त्या इंद्रियाचें सुखदुःख ॥ मनपणें देख मन भोगी ॥३५॥
अग्निसंगेंवीण लोह नघडे ॥ आत्मसंगेंवीण इंद्रियें जडें ॥ आत्मप्रभा सुख सुखाडें ॥ निज कर्मी निवाडे वर्ततीं इंद्रियें ॥३६॥
लोह घडऊनी अग्नि न घडतां ॥ कर्मै करुनि आत्मा अकर्ता ॥ हे आत्मस्थिति स्वभावता ॥ जाण तत्त्वतां गुरुवर्या ॥३७॥
इंद्रियें देव इंद्रियवृत्ति ॥ आत्मप्रभा प्रकाशती ॥ यस्य भासा सर्वमिदं विभाति ॥ विश्वाची स्फूर्ती चित्सत्तां स्फुरे ॥३८॥
इंद्रियें प्रकाशरुप होतीं ॥ तरी प्रेतदेहीं प्रकाशती ॥ इंद्रियें चित्सत्ता प्रकाशती ॥ तो मी चिन्मूर्ती चिदात्मा ॥३९॥
हें इतुकेंही व्याख्यान ॥ साधक वृत्तीचें साधन ॥ भजसी इंद्रियां सत्यपण ॥ कल्पांतीं जाण असेना ॥१४०॥
जेवीं घ्रताचिया कणिका ॥ घ्रतेसी नव्हती आणिका ॥ तेवीं इंद्रियां आणि व्यापका ॥ वे गळीक देखा असेना ॥४१॥
जैसी प्रभेची दीपकळा ॥ दीपूप्रभेसी जिव्हाळा ॥ तैसा इंद्रियांचा सोहळा ॥ शोभे स्वलीळा आत्मत्वें ॥४२॥
जैसें जळीचे जळतरंग ॥ जळीं वर्तती अनेग ॥ तेवीं इंद्रियांचे विभाग ॥ चित्सत्ता सांग चैतन्यें क्रीडती ॥४३॥
इंद्रियें ज्ञानें नित्य वर्तती ॥ तें ज्ञान ज्ञाते न मनिती ॥ अहेवा रांडवापण भॊगिति ॥ तेवीं ज्ञाते होती अज्ञान ॥४४॥
भ्रतारशेजे निजोनि नारी ॥ स्वप्नवैधव्यें शंख करी ॥ भ्रतार तिसी पुसे जरी ॥ सांगे ते तरी मी रांडेलें ॥४५॥
पति सन्मुख बैसोनि जाण ॥ ह्नणे आजि चुडियासि पडले खान ॥ बाप भ्रमाचें महिमान ॥ ऐसेचि सज्ञान जल्पती ॥४६॥
मी अज्ञान ह्नणविता ॥ ह्नणे तो जाला निखळ ज्ञाता ॥ तेचि नमनिती तत्त्वतां ॥ विकल्पती विटंबु ॥४७॥
जे नमनिती इंद्रियज्ञान ॥ त्यांसी जन मानिती सज्ञान ॥ वापु विकल्पाचें विदान ॥ ज्ञान तें अज्ञान दृढ केलें ॥४८॥
उंसाचे सेडा येईल फळ ॥ जो ह्नणे तो नाडला केवळ ॥ ऊंस सर्वागें सफळ ॥ तेवीं इंद्रियीं सकळ निजज्ञान नांदे ॥४९॥
यालागीं इंद्रियप्रवृत्तीं ॥ माजीं डंडळीना आत्मस्थिती ॥ इंद्रियें आलिया निवृत्ती ॥ माझिये निजस्थिती लाभ काय ॥१५०॥
मृगजळ जेथें आडलें ॥ तेथें केवळ कोरडें जालें ॥ मा होतें जेव्हां भरलें ॥ तेव्हां तरी बोलें करुं शकतें का ? ॥५१॥
तेवीं इंद्रियप्रवृत्तीनिवृत्ती ॥ हे भ्रांताची मुख्य भ्रांती ॥ मी निष्कंप निजमूर्ती ॥ भ्रांती विभ्रांती मज नाहीं ॥५२॥
निष्कंप पदाचें निरुपण ॥ त्याचें हें निज व्याख्यान ॥ प्रपंच परमार्थी स्थिती समान ॥ हें मुख्य ज्ञान सज्ञानाचें ॥५३॥
स नित्योपलब्ध मी आत्मा ॥ ये भूमिके हें गौण प्रेमा ॥ मी परमात्म्याचा निजात्मा ॥ परापर महिमा मजमाजीं नाहीं ॥५४॥
येथें मीतूंपणा बोळवण ॥ ज्ञानाज्ञानाची उजवण ॥ परापराचें विसर्जन ॥ तें मी परिपूर्ण गुरुवर्या ॥५५॥
ऐकोनी बाळकाची वदंती ॥ आचार्यासी परम प्रीति ॥ सुखावोनि पुढत पुढती ॥ त्याची ज्ञानोक्ति परिसोचि पाहे ॥५६॥
हें जाणोनि बाळक ॥ जेणें आचार्य पावे सुख ॥ तें वदावया ज्ञानार्थ चोख ॥ लापनिका देख स्वयें बोलवी ॥५७॥
आत्मा निष्कंप अवघा एक ॥ ऐसें बोलिलें निज निष्टंक ॥ तेथें एका सुख एका दुःख ॥ विषम कां लोक भोगिती ? ॥५८॥
आत्मा स्वयें सुखसंपन्न ॥ तैं सुखी असावे सकळ जन ॥ आत्मा आत्मत्वें ज्ञानघन ॥ तैं ज्ञानसंपन्न व्हावे सकळ ॥५९॥
ऐसा आशंकेचा भावो ॥ यालागीं तेणेंख बाळकें पहाहो ॥ निजज्ञानाचा निर्वाहो ॥ निःसंदेहो श्लोकार्थे बोले ॥१६०॥