सुखाभासको दर्पणे दृश्यमानो ॥ मुखत्वात्पृथकत्वेन नैवास्ति वस्तु ॥
चिदाभासको धीषु जीवोपि तद्वत्स नित्योपलब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥५॥
॥ टीका ॥
आरिसा न पाहतां पहिलें ॥ मुख काय होतें हरपलें ॥ मग आरिसियांत सांपडलें ॥ तैसें नव्हे , संचलें मुखी मुख ॥६१॥
निजमुखाचें वैभव ॥ पाहो , ऐसी बांधे हाव ॥ ते हांवेनें केलें अपूर्व ॥ मिथ्या द्वैतभाव प्रकट दावी ॥६२॥
मज म्यां देखावें आपण ॥ ऐसी आत्मत्वीं इच्छा पूर्ण ॥ तेचि मुख्यत्वें माया जाण ॥ तेंचि अंतः करणगुणभागें ॥६३॥
तेवीं सहज आत्मस्थिती ॥ तें आत्मत्वें स्फुरे आत्मस्फूर्ती ॥ ते स्फूर्तीची नवल ख्याती ॥ जीवशिवप्राप्ति नसतीचि दावी ॥६४॥
मज म्यां देखावें आपण ॥ ऐशी आत्मत्वीं इच्छा पूर्ण ॥ तेचि मुख्यत्वें माया जाण ॥ तेचि अंतःकरणगुणभागें ॥६५॥
‘ एकाकी नरमते ’ या श्रुती अद्वैतीं द्वैत स्फूर्ती ॥ तेचि माया वेदोक्ति ॥ तेचि प्रकृती शास्त्रार्थे ॥६६॥
अविद्या संत ना असंत ॥ शेखी नव्हे सदसंत्त ॥ निजकल्पनाउत्पात ॥ अविद्या निश्चित ती नांव ॥६७॥
भलता पुसे अविद्या कोण ॥ अविद्या मुख्यत्वें अंतः करण ॥ तेथें बिंबलें जें चैतन्य ॥ ‘ जीव ’ अभिधान ये त्यासी ॥६८॥
हो कां गगनींच्या सूर्यासी । थिर्ल्लुर आणी अधोगतीसी ॥ तेवीं निजयुक्त आत्मयीसी आणि जिवत्वासी निजकल्पना ॥६९॥
जेवीं अर्धनारी नटेश्वरीं ॥ जो पुरुष तोचि नारी ॥ तेवीं प्रकृती पुरुष संसारी ॥ एकात्मतेवरी मृषा द्वैत ॥१७०॥