श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ३

श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .


सूतांनी म्हटले की नृसिंहपूर क्षेत्राचे महत्त्व ऐकून देवी पार्वतीला अतिशय आनंद झाला . तिने भक्तियुक्त अंतःकरणाने शंकरांना पुन्हा विचारले . ‘भगवान् ‌ आपण आता मला या क्षेत्राची व्याप्ती केवढी आहे , ते सांगा ’ भगवान शंकरांनी म्हटले की , देवी या क्षेत्राची प्राप्ती फारच मोठी आहे . याच्या परिसररांत अनेकविध क्षेत्रे वसली आहेत . ही सर्व तीर्थे मनुष्यांना श्रेय प्राप्ती करुन देणारी अमोद्य साधनेच आहेत . या नगरीचा एकूण व्याप चोवीस मैलांचा असून यात १० मैलपर्यंत इतर तीर्थे वसली आहेत . या सर्वांच्या मध्यभागी विशाल असे श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर आहे . या मंदिराच्या पूर्वेस अष्टामहासिद्धिसहित श्री गणेश , दक्षिणेस अंबिका , पश्चिमेस दुर्गा आणि उत्तरेस श्री शारदा या दैवतांचा निवास आहे . चार उपदिशांना प्रचंड आयुधे आहेत . याच्या परिसरात देव , गंधर्व , यक्ष यासारखे दैवी जीव नित्य वास्तव्य करतात . या सर्वामुळे या क्षेत्राचे रक्षण होत असते . असे हे क्षेत्र म्हणजे भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवावर केलेला अनुग्रहच होय .

नृसिंहरुपात अवतरलेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवावर अनुग्रह कसा केला आणि हे क्षेत्र कसे निर्माण झाले , हे आपण मला सविस्तर सांगा , असे पार्वतीने म्हटल्यावर शंकरांनी सांगितले कीं , प्रलयानंतर भगवान विष्णु योगनिद्रेतून जागे झाल्यावर त्यांना सृष्टिनिर्मितीची इच्छा झाली . त्याबरोबर त्यांच्या नाभीतून कमल उत्पन्न होऊन त्यात विश्वनिर्मिती करणारा ब्रह्मदेव निर्माण झाला . त्याने आपल्या जन्माचे मूळ शोधण्याचा प्रयत्न शंभर वर्षे केला . पण त्याला यश आले नाही . निराशेने तो दु :खी होऊन स्वस्थ राहिला . तेव्हा नृसिंहाने गुप्त रुपाने त्यास तपश्चर्या करण्यास सांगितले . ही वाणी अनुग्रहच मानून ब्रह्मदेवाने शंभर वर्षे एकचित्ताने तप केले . ते पाहून श्री नृसिंहाने आपले तेजोमय विराट रुप त्याला दाखविले . हे रुप गीतेतील विश्वरुपासारखे सहस्त्रशिरे , सहस्त्रबाहू असे असून ते दिव्य गंध व अलंकारांनी युक्त होते . हातातून दिव्य आयुधे होती . गळ्यात कौस्तुभादी रत्नांच्या माळा होत्या . अशा रुपात नृसिंहाने ब्रह्मदेवास दर्शन दिले आणि तपश्चर्या पुरी करण्यस सांगितले . अमृतासारखी ती वाणी ऐकून ब्रह्मदेवास मोठाच धीर येऊन आनंद झाला . ब्रह्मदेवाने हर्षभराने त्या शरण्य नृसिंहाला वंदन करुन त्याचे स्तवन केले .

ब्रह्मदेवांनी म्हटले , भगवन् ‌ आपण गुणातील असून भक्तांसाठी सगुण रुप धारण केले आहे . आपली भक्ती केल्याने साधकांना श्रेयाचा सहजपणे लाभ होतो . आपले शुद्ध रुप भव्य , दिव्य पण अगम्य असून यामुळेच केवळ लीलेने जीवांना जगाचा अनुभव येतो जगाच्या उपत्ति , स्थिती आणि लय याचे आपण कारण आहात , पण त्यापासून पूर्ण अलिप्त आहात . या विश्वातील अणु रेणु व्यापूनही या रुपाचा शेष शिल्लकच असतो . अशा रुपाला वंदन असो . आपली रुपे व सर्व दिशा व्यापून आहेत . सागरावरील क्षणमात्र प्रतीत होणार्‍या लहरी प्रमाणे हे विश्व आहे . आपल्या दर्शनाने मला संजीवन लाभले . आता या जगाच्या उपत्तीचे ज्ञान मला होईल असा वर द्या . काळाच्या प्रभावाने मी दिग्मूढ झालो . तरी आपल्या अमृतमय वाणीने माझा मोह दूर करा . अनित्य आणि क्षणिक अशा विषयांच्या जीवांच्या कामना तृप्त करुन काल रुपाने आपण त्यांचा नाश करिता . जगाला मोहून टाकणार्‍या अज्ञानाचा नाश करिता , अशा महापराक्रमी पण मंगल अशा रुपाला मी वंदन करतो . मानवी वा दैवी वाणी आपले स्तवन करण्यास असमर्थ आहे . स्वयंप्रकाश अशा या रुपाला नमस्कार असो .

याप्रमाणे यथामति स्तुति केल्यावर ब्रह्मदेवास अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाले . या दिव्य अनुभवाने तो आश्चर्यमुग्ध होऊन स्तब्ध राहिला , असे शंकर म्हणाले . यावर श्रीनरहरींनी आपल्या अमृतमय वाणीने ब्रह्मदेवावर , अनुग्रह केला . हे ब्रह्मादेवा , तुझ्या तपश्चर्येने मी तुजवर प्रसन्न झालो आहे . सर्व चराचर माझीच रुपे आहेत , या भावनेने तू रजोगुणांचा त्याग कर . हे सर्व काही दिसण्यास वेगळे दिसते . माझ्या ठायी चित्ताचा संपूर्ण लय झाल्याने अशी अनुभूति येते . अज्ञ लोकांना मायेमुळे माझे यथार्थ ज्ञान होत नाही ; आणि केवळ अज्ञानामुळे ज्ञाता , ज्ञेय व ज्ञान असे भेद निर्माण होतात . ‘मीच ब्रह्म आहे ’, असा बोध झाला , म्हणजे तीन गुणांची बाधा तुला होणार नाही . सृष्टी निर्माण करताना तुझी हीच धारणा असू देत . यावर ब्रह्मदेवांनी म्हटले , हे दिवाधिदेवा , आपल्या कृपेच्या रुपाने मला कल्पवृक्षच मिळाला आहे . मी अविद्यादि दुःखांपासून मुक्त आहे . माझे मनोरथ आज पूर्ण झाले आहेत . मी कृतार्थ आहे . या भूतलावर , अज्ञानामुळे लोक विषयासक्त व पतित झाले आहेत . त्यांच्या उद्धारासाठी आपण या नृसिंहरुपात तेथे अखंड रुपात वास्तव्य करावे , अशी माझी प्रार्थना आहे . त्यांच्यावर कृपा करण्यास आपण समर्थ आहात .

यावर भगवान श्रीनृसिंहांनी म्हटले , की मी लोककल्याणासाठी आजपासूनच जगात वास्तव्य करीन . भारतात गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या मधील प्रदेशात भक्तांच्या कल्याणासाठी श्री शंकरांशी एकरुप होऊन मी राहीन . माझ्या नामसंकीर्तनाने भक्तांना उत्तम गती प्राप्त होईल . तुझ्या म्हणण्याप्रंमाणे मी तेथे राहिलो ; तरी मूढ व पातकी लोकांना मी दुर्लभच आहे . तथापि तुला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी निरा - भीमा संगमावर निरंतर वास्तव्य करीन . पुढे श्री नारदांच्या उपदेशावरुन माझा परमभक्त प्रल्हाद जन्माला येऊन मोठी तपश्चर्या करील त्यामुळे संतुष्ट होऊन या नद्यांच्या संगमावर पश्चिमेकडे तोंड करुन मी उभा राहीन . माझ्या भक्तीने श्र्द्धावंत लोकांना प्रेय आणि श्रेय या दोघांचाही लाभ होईल . असे आश्वासन दिल्यावर भगवान भूतलावर प्रगट होण्यासाठी तेथेच गुप्त झाले .

याप्रमाणे श्रीनृसिंह प्रादुर्भव हा तिसरा अध्याय संपला .

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP