श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ५

श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .


भगवान शंकरांनी पार्वतीला म्हटले की , या नृसिंह मूर्तीचे डाव्या बाजूस थोड्याच अंतरावर लक्ष्मीतीर्थ आहे . या चंचलपणाचा दोष जावा म्हणून उग्र तपश्चर्या केली . त्यामुळे प्रसन्न होऊन नृसिंहानी म्हटले की , हे देवी , योगी लोकांनाही कठीण असे दिव्य तपाचरण तू केले आहेत . आता तुझा चंचलपणा नाहीसा होऊन तू माझ्या वक्षःस्थलाचे ठायी आनंदाने वास्तव्य कर . देवीसूक्ताने वा दैविक मंत्रांनी जे भक्त तुझे शुक्रवारी यथाविधी पूजन करतील , त्यांची सर्व संकटे दूर होऊन मोक्ष प्राप्ती होईल . याप्रमाणे वर देऊन भगवान स्नेहयुक्त दृष्टीने तिच्या मुखाकडे पाहू लागले . यावर लक्ष्मी म्हणाली , नाथ , आपण जीवांवर करुणा करता , त्यांना वर देता , तरी आता माझे मनोगत पूर्ण करा . जे कोणी भक्त या तीर्थावर तप अनुष्ठान व अन्नदान करतील त्यांचा भाग्योदय व्हावा ; आणि भजन , पूजन करतील त्यांना सहज श्रेय प्राप्त व्हावे . येथे श्रद्धेने साधना करणार्‍या साधकांना निर्विघ्नपणे सिद्धी प्राप्त व्हाव्यात . भगवान नृसिंहांनी म्हटले , देवी , मी तुझ्यासह येथे राहून भक्तांना सर्व सिद्धीसहित मोक्ष देईन . तुझी मनोकामना पूर्ण होईल . या तीर्थाला यामुळे मुक्तितीर्थ व सिद्धितीर्थ अशी नावे प्राप्त होतील . आठ दिशांना अष्ठपीठे या तीर्थाचे रक्षण करतील . पूर्वस , करवीर दक्षिणेस , कामाक्ष , पश्चिमेस वीरज आणि उत्तरेस कामरुप ही पीठे असतील . चारी उपदिशांना , त्रिकूट , हिंगुला , सिंधू व जालंधर अशी क्षेत्रे राहतील . मात्र अविद्येच्या प्रभावामुळे , विषय हेच सर्व मानल्याने लोकांना या क्षेत्राचे महत्त्व कळणार नाही . लक्ष्मीनृसिंह या महामंत्राने योग सिद्धीची साधना करीत आपण येथे नित्य गुप्त रुपाने राहू .

शंकर म्हणाले , हे देवी याप्रमाणे वरदायी बोलून श्रीनरहरि तेथेच गुप्त झाले . अशा प्रकारे प्रगट झालेल्या या लक्ष्मीतीर्थात पुढे निरा येऊन मिळाल्याने साधक याला नारायणतीर्थ म्हणू लागले . पूर्वी या तीर्थावर एक अत्यंत श्रीमंत असा वाणी आला होता . या तीर्थावर स्नान केल्यावर त्याच्या मनात विचार आला की , आपणास हे वैभव कसे प्राप्त झाले असेल . आपण तर स्नानदानादि काहीच केलेले नाही . पूर्व काळी गोरगरिबांना काहीच अन्नपाणी दिले नाही . असा विचार करीत असताना त्याला समोर एक तेजस्वी अवधूत दिसले . ते भगवान , दत्तात्रेयचे होते . ते दिव्य दिगंबर रुप पाहून त्या वैश्याने मोठ्या आदराने त्यांना प्रणिपात करुन आपल्या कुबेरतुल्य संपत्तीचे कारण विचारले . यावर अवधूत किंचित स्मित करुन त्यास म्हणाले , तुझी अमाप संपत्ति आहे तरी किती , ते मला सांग . यावर त्या वैश्याने आपल्या जवळच्या रत्ने मोती , मणी , उंची , वस्त्रे , सोने , रथ , हत्ती , अश्च इत्यादी ऐश्वर्याचे वर्णन केले . कोणत्या पुण्य कर्मामुळे मला एवढे ऐश्वर्य लाभले ते आपण मला सांगा .

अवधूतांनी उत्तर दिले की , यापूर्वी सातव्या जन्मात तू एक याचक वृत्तीचा मंदबुद्धी ब्राह्मण होतास . पोटासाठी भटकत असता तू या निराकाथी आलास त्या दिवशी एकादशी होती . अन्न तर राहोच परंतु तुला त्या दिवशी थोडासा फलाहार देखील मिळाला नाही . भुकेने व्याकुळ होऊन तू नृसिंहमंदिराच्या आवारात फिरत होतास . असे तळमळत असताना तुला रात्रभर जाग्रण घडले . अशा स्थितीत भक्तांनी केलेली सुंदर पूजा तू पाहिलीस . हरिनामाचा गजर तुझ्या कानी पडला . पहाटे संगमावर स्नान केल्यावर तू या लक्ष्मीतीर्थावर आलास . त्यावेळी यात्रेकरुंनी तूझ्या झोळीत टाकलेले तांदूळ तू ब्राह्मणाला दान केलेस . कालांतराने तुला मृत्यू आल्यावर यमधर्माने तुला ‘जा ’ म्हटले . यामुळे तू द्रविड देशाच्या राजपदावर प्राप्त झालास , आणि हे ऐश्वर्य लाभले . पुढील पाच जन्मीही तुला राजवैभव लाभेल . या मंदिरात तुला उपोषण , जागरण आणि पाच प्रदक्षिणा घडल्या . या पुण्याच्या प्रभावाने तुला विष्णुपदाची प्राप्ती झाली आहे . दर्शनाच्या पुण्याईचे तू आज येथे आलास . तुझी आजची अलोट संपत्ती , ही तू येथे तीर्थावर घडलेल्या अल्पशा गोष्टीचे केवढे फळ मिळते . शंकर म्हणाले , की याप्रमाणे सांगितल्यावर ते दिव्य अवधूत तेथेच गुप्त झाले , याचे त्या वैश्यास फारच नवल वाटले . नंतर या वैश्याने आपली संपत्ती या तीर्थावर यज्ञदानात अर्पण केली ; आणि उरलेले आयुष्य तेथेच दरिद्री अवस्थेत घालविले . इंद्रियांचा संयम करुन श्रीनृसिंहाचे नित्य ध्यान व पूजन करुन शेवटी तो परमपदास गेला . भगवान विष्णूंच्या दूतांनी त्याला दिव्य अलंकार घातले . दिव्य अशा विमानात बसून तो वैश्य वैकुंठास गेला ; आणि तेथे वास्तव्य करु लागला . हे पार्वती याप्रमाणे लक्ष्मीतीर्थाचे माहात्म्य असून त्याच्या दर्शन व स्मरणाने भक्तांचा उद्धार होतो .
याप्रमाणे ‘लक्ष्मी तीर्थप्रभाव ’ हा पाचवा अध्याय संपला .

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP