श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ६

श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .


पार्वती म्हणाली , हे देवा तुमच्या तोंडून लक्ष्मीतीर्थाची थोरवी ऐकल्यावर येथील इतर तीर्थांचे माहात्म्य ऐकण्याची उत्सुकता मला वाटत आहे ; तरी आपण मला ते सांगावे . शंकर म्हणाले , हे पार्वती , लक्ष्मीतीर्थाचे मागील बाजूस जवळ्च पद्मतीर्थ आहे . पूर्वी देवी लक्ष्मी उग्र तप करीत असता श्रीनृसिंहानी प्रसन्न होऊन दर्शन दिले . त्यावेळी झालेल्या आनंदात तिच्या हातातील कमळ या जागी गळून पडले . ते हे पद्मतीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले . कुबेराला येथेच संपत्ती प्राप्त झाली . येथे अनुष्ठान केल्याने दारिद्र्य दूर होते . पद्म तीर्थाच्या डाव्या बाजूस पूर्वेला शंखनिधी , हे तीर्थ असून त्याच्या जवळच गदातीर्थ आहे . या तीर्थांच्या स्मरणाने दुरितांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते . गदातीर्थावर भगवान् ‌ नृसिंह गदा धारण करुन नित्य वास्तव्य करीत असतात . येथील श्राद्धविधीचे माहात्म्य गयेहून कितीतरी अधिक आहे . येथे क्रियाकमें व्हावीत अशी पितरांची कामना असते . नीरा तीरावरील या गदातीर्थावर स्नान , दान यासारखी क्रियाकर्में करुन भक्त मोक्षाचे अधिकारी होतात .

पूर्वी दक्षिणेतील एक ब्राह्मण क्रियाकर्मे करण्यास गयेस जाण्यास निघाला वाटेत तो या गदातीर्थावर आला . भक्तिभावाने या तीर्थात स्नान करुन त्याने पितृकार्य , दानधर्म इ . केले . यामुळे तृप्त पितरांनी त्यास दर्शन दिले . ते पितर म्हणाले , मुला तू आमचा उद्धार केलास . आता आम्हास वैकुंठ प्राप्ती झाली आहे , हे या तीर्थाचे माहात्म्य आहे . आता यापुढे तुला तीर्थयात्रेचे प्रयोजन उरलेले नाही . तू घरी परत जा . पितरांची ही दिव्य वाणी ऐकून मुग्ध झालेला तो ब्राह्मण आमरण गदातीर्थावर राहिला आणि शेवटी श्रीहरिरुप झाला . गदातीर्थाच्या पश्चिमेला थोड्या अंतरावर पिशाचमोचन हे तीर्थ आहे . येथे घडलेली कथा , हे पार्वती आश्चर्यचकित करणारी आहे .

विष्णुशर्मा नावाचा एक अधर्ववेदी ब्राह्मण या पिशाच मोचन तीर्थावर राहात असे . तो नृसिंहभक्त होता . एकदा तो इष्टमित्रांसह विंध्यपर्वताच्या पायथ्याशी मुक्कामास राहिला . त्यास समोर एकदम धुराचा लोट दिसला . त्यात मोडक्या हाडांचा एक विद्रुप पुरुष होता . दृष्टीतील ज्वाळांनी वृक्ष जळत होते . तो भयंकर दिसत असून लांब मानेचा होता . त्याचा रंग काळा असून ‘खावू की गिळू ’ असे दृश्य होते . सभोवती कितीतरी पिशाच्चे नाचत होती . ते पाहताच मित्रांसह विष्णुसर्म्याने नृसिंह नामाचा गजर केला ; आणि जवळील भांड्यातील तीर्थोदक त्या पिशाच्यावर शिंपडले . यामुळे तो भीषण पुतळा आणि पिशाच्च समूह मुक्त झाले . ते म्हणाले . हे ब्राह्मणा तू आम्हाला मुक्त केलेस . तुझ्या कृपेने आम्ही वैकुंठास प्राप्त होऊ .

श्री नृसिंह नाम श्रवण केल्याने आम्हास दिव्य ज्ञान झाले आहे . विष्णुशर्मा म्हणाला , महाराज , आपण कोण आहात ? आपणास असले अमंगल रुप का प्राप्त झाले ? आपणास कशाने मुक्तता लाभून आपण वैकुंठास जात आहात ? यावर पिशाच्च म्हणाले , हे श्रेष्ठ ब्राह्मणा , पूर्वी मी विख्यात अशा भोजराजाकडे वेदात प्रवीण असा उपाध्याय होतो . हे माझे मित्रही वेदवेत्ते होते . यांच्या साहाय्याने मी अन्य उत्तम पंडितांचा वादसभेत पराभव केला . त्यांचा उपहास व छळ केला . त्यांच्या पुरस्काराचा अपहार केला . इतरांना सन्मान मिळू दिला नाही . इतरांचा द्वेष करुन राजद्रव्याचा अपहार केला . यामुळे मला अत्यंत तीच अशी पिशाच्च योनी प्राप्त झाली . आपल्या पवित्र तीर्थाने आम्ही मुक्त झालो . अहो , पण मजजवळील या पाण्यात हे सामर्थ्य कोठून आले , हे कृपाकरुन सांगाल काय ? पिशाच्च म्हणाले , आपल्या हातातील कळशीत पिशाच्च मोचन तीर्थातील पाण्याचा ओलावा होता . त्यामुळे कळशीतील पाणी पवित्र झाले होते . त्याच्या स्पर्शाने आमचा उद्धार होऊन दिव्य गती लाभली . हे तीर्थ निरानरसिंहपूर येथील गदा तीर्थाचे वरचे बाजूस आहे .

या पिशाच्च मोचन तीर्थात जे स्नान , क्रियाकर्मे इत्यादी करतात , त्यांचे पूर्वज अंधतमादि यातनातून तत्काल मुक्त होतात . येथील नित्य स्नानामुळे अविद्या नष्ट होऊन दिव्य ज्ञान प्राप्त होते . भक्ताचे मनोरथ हे तीर्थ पूर्ण करील , असे श्री नृसिंहाचे वरदान आहे . या ठायी मोक्षाच्या बाबतीत साधकात कसलाही भेदभाव नाही . याठिकाणी साक्षात् ‍ भगवान गुरुरुपाने वास्तव्य करीत असतात . या तीर्थाचे माहात्म्य श्रद्धेने श्रवण करण्यानेही दूरस्थ भक्तांना ज्ञानाचा लाभ होतो . नृसिंहरुपच असणारी नीरा नदी या तीर्थात प्रविष्ट झालेली आहे . हे श्रेष्ठ तीर्थ म्हणजे साक्षात् ‍ नृसिंहाचे वरदान आहे . शंकर म्हणाले , हे पार्वती , त्या पिशाच्च्याचे बोलणे ऐकून आणि त्याला प्राप्त झालेली दिव्य गती पाहून तो विष्णुशर्मा ब्राह्मण आश्चर्यमुग्ध झाला , आणि पुढे काशीस न जाता निरातीरावर परत आला . पुढे या पिशाच्चमोचन तीर्थावरच राहून श्रीनरहरीचे स्तवन करुन अखेर मुक्त झाला . अशा प्रकारे भक्तांना श्रीविष्णुपदाची प्राप्ती करुन देणारे हे परमपवित्र तीर्थ आहे .

याप्रमाणे ‘पिशाच्चमोचन तीर्थवर्णन ’ हा सहावा अध्याय संपला .

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP