देवी पार्वतीने शंकरांना म्हटले की , पिशाचमोचन तीर्थाचे माहात्म्य श्रवण केल्यावर पिशाचमोचनी स्तुती ऐकण्याची मला इच्छा आहे . हे स्तवन विष्णूंनी कां केले ते आपण मला सांगावे . शंकर म्हणाले , देवी , पूर्वी कल्पाचे आरंभी चारी युगे हजारो वेळा झाल्यावर निद्रा पूर्ण होऊन श्री विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली . याचवेळी श्रीविष्णूच्या कानातून मधु व कैटभ हे दोन राक्षस निर्माण होऊन त्यांनी वेद हरण केले . कालांतराने सृष्टिनिर्मिती साठी ब्रह्मदेवाने वेद आठविण्यचा प्रयत्न करुनही त्याला ते आठवेनात . त्या राक्षसाच्या भीतीने त्याची अवस्था पिशाचासारखी झाली . यावेळी भगवान विष्णूंनी प्रगट होऊन त्यास एका सुंदर स्तोत्राचा उपदेश केला . यामुळे त्या प्रजापती ब्रह्मदेवास वेदांचे ज्ञान झाले . हे सर्व सिद्धी प्राप्त करुन देणारे ज्ञान मी आता तुला सांगतो . ते मी ब्रह्मदेवाच्या मुखातून ऐकले आहे , ते तू श्रवण कर .
ब्रह्मदेव म्हणाले , शुद्ध , अनन्य , शांत आणि स्चित् व आनंद स्वरुप अशा परब्रह्माला मी वंदन करतो . अनादिसिद्ध , स्वयंप्रकाश असून अन्य सर्वकाही प्रकाशमान करणार्या , अविनाशी स्वरुपाला माझा नमस्कार असो . पाण्यातील प्रतिबिंबा प्रमाणे अंतर्बाह्य असूनही अलिप्त असणार्या ब्रह्मरुपाला नमस्कार असो . अलंकार रुपातील सोन्याप्रमाणे सर्वकाही व्यापून आबाधित असणार्या ब्रह्मस्वरुपाला वंदन करतो . परिपूर्ण , ज्ञानस्वरुप , आणि एकजिनसी अशा ब्रह्माला माझे वंदन असो . ज्याच्या आधारावर जीव विषयांचे सेवन करतात , त्या आनंदमय आणि अहंरहित रुपाला नमन असो . विचार , चलनवलनादी क्रिया ज्याच्यामुळे चालतात . परंतु जे या सर्वापलीकडील आहे , त्या अविकारी ब्रह्मरुपाला वंदन असो . सर्व वस्तूंचे ठायी सत्तारुपाने असूनही तिन्ही गुणांपासून अलिप्त असणार्या ; आणि मूढजनांना आकलन न होणार्या ब्रह्मरुपाला मी नमस्कार करतो . उत्पत्ति , स्थिती आणि लय यांचा आधारच , आणि प्रलयकाळी अवघ्या विश्वाला सामावून घेणार्या ब्रह्माला माझा प्रणिपात . ज्याच्या अधिष्ठानामुळे वाणीची रुपे गुणकर्मामध्ये प्रवृत्त होतात , परंतु जे अलिप्त आणि केवळ साक्षी आहे , अशा ब्रह्मस्वरुपाला मी नमन करतो . सत् व असत् यांच्या पलीकडील आणि मायातील अशा परब्रह्माला वंदन असो . स्थलकालातील प्रेरक पण गुणातील , मायेचा निरास करणार्या विचित्र विश्वरुपांनी नटलेल्या विश्वरुप ब्रह्माला मी वंदन करतो , वेद जाणाणार्यांना मोक्ष देणार्या , अग्नि , वायू इ . तत्त्वांना क्रियाशील करणार्या , वस्तुमात्रांना मंगल करणार्या , आणि वेदांचा विषय असणार्या ब्रह्मस्वरुपाला मी नमन करतो . मृत्यूचे भय हरण करणार्या , इंद्रियातीत , सत्तामात्र , परिपूर्ण असून वस्तुमात्रास पूर्णत्त्व आणणार्या सनातन ब्रह्माला मी नमस्कार करतो . हे पार्वती , या दिव्य पिशाच्चमोचन , स्तोत्राचा जप जो करील त्याला सायुज्यपदाची प्राप्ती होईल . सर्वार्थ सिद्धी देणारे हे स्तोत्र आहे , मग धन पुत्रादि शुल्लक गोष्टी प्राप्त होतील यात शंका नाही . आता उत्तर तीर्थांचे माहात्म्य मी सांगतो .
पिशाचमोचन तीर्थाचे पश्चिमेस गरुडतीर्थ आहे . येथे गरुडाने उग्र तपश्चर्या करुन अभ्दुत शक्ती प्राप्त केली अशी आख्यायिका आहे . नंतर गरूदाने इंद्राचा पराभव करुन अमृत हरण केले , आणि माता विनतेची कद्रूच्या दास्यातून मुक्तता केली . तपःसामर्थ्याने अजिंक्य बनलेल्या गरुडाने श्रीविष्णुबरोबर युद्ध करुन त्यांना प्रसन्न केले . विष्णूंनी त्यास आपले वाहन केले . त्याच्याकरवी असंख्य सर्पांचा नाश केला . येथील स्नानाने पुण्यफलांची प्राप्ती होते . गरुडतीर्थापासून एक कोसावर श्रीनृसिंह तीर्थ आहे . हिरण्यकशिपूच्या वधानंतर नृसिंहांनी येथे वास्तव्य केले . हे तीर्थ चतुर्विध पुरुषार्थ देणारे आहे . वरील सर्व तीर्थे श्री लक्ष्मीनृसिंहदेवाच्या डाव्या बाजूला आहेत . या प्रत्येक तीर्थाचे ठिकाणी अनेक उपतीर्थे आहेत . या तीर्थाचे पुढी इंद्रतीर्थ आहे . वृत्राला ठार केल्याच्या पातकातून इंद्राची भगवंतांनी येथे मुक्तता केली . यापुढे हंस , वा श्वेत तीर्थ आहे . येथे हंसरुपाने विष्णूंनी ब्रह्मदेवाला दिव्य ज्ञान दिल्याची आख्यायिका आहे . हंसतीर्थाचे सभोवताली ब्रह्मदेवाच्या सनकादि मानसपुत्रांनी निर्मिलेली चौदा तीर्थ आहेत . या तीर्थाच्या आसपास अत्रि . वसिष्ठ , देवल आदि विभूतींनी केलेली तीर्थ त्यांच्या दिव्य सामर्थ्य प्राप्त झाले आहे . या तीर्थांच्यापुढे सर्वतीर्थ व तारा तीर्थ आहे . श्रीरामाच्या अनुग्रहाने साध्वी तारेला दिव्य ज्ञान प्राप्त झाले . याशिवाय , दुर्वास , कपिल या ऋषींनी श्रीनृसिंह या एकाक्षरी मंत्राचे अनुष्ठान केल्याने त्यांच्या नावांची दोन तीर्थे आहेत . ही सर्व तीर्थे नीराभीमा या नद्यांच्या परिसरात आहेत . कालांतराने त्यांच्या नावात बदल झालेला असेल .
याप्रमाणे ‘तीर्थ महिमावर्णन ’ हा सातवा अध्याय संपला