सुदाम्याचे पोहे - भाग ६ ते १०

प्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो


[ कृष्ण - बलराम मोळ्या घेऊन रानांतून चालले असतांना त्यांना सांदीपनींच्या हाका ऐकूं येऊं लागतात . ते थांबतात . ]

कृष्ण : गुरुदेव ! आम्ही इकडे आहोंत !.... दादा , ते पाहा गुरुदेव !

[ सांदीपनी कृष्ण - बलरामांना पाहून त्यांच्याकडे धावून जातात . ]

सांदीपनी : वत्सांनो ! आमच्या चुकीमुळं किती रे कष्ट पडले तुम्हांला ?

बलराम : आपली कसली चूक , गुरुदेव ?

कृष्ण : अन् आम्हांला कष्ट तरी कसले ?

सांदीपनी : तुमच्यासारख्या राजबिंड्यांनीं का असलीं कष्टाचीं कामं करायचीं ? ज्या मस्तकावर राजमुकुट शोभायचे , त्या तुमच्या मस्तकांनीं अशा लकडांच्या मोळ्या वाहायच्या ?

कृष्ण : गुरुदेव ! गुरुसेवा आहे ही ! ह्यांत कष्ट कसले ?

बलराम : कर्तव्यच आहे हें आमचं .

कृष्ण : पण गुरुदेव , आपण सुदाम्याला हाका मारीत होतां ?

बलराम : तो इकडे आलाय् कीं काय ?

सांदीपनी : होय रे बाळांनो ! तुमच्यासाठीं फ़राळाचं घेऊन आलाय् तो .

कृष्ण : पण आम्हांला तर भेटला नाहीं . मी आणतों शोधून त्याला . आपण नि दादा आश्रमाकडे जा ...

बलराम : छे ! छे ! आम्हीही सुदाम्याला शोधतों . आम्ही ह्या बाजूला शोधतों . तूं त्या बाजूला शोध .... आण ती मोळी इकडे ....( मोळी घेऊं लागतो . )

सांदीपनी : अरे , हें काय खुळ्यासारखं ? आण त्या मोळ्या इकडे .... मी घेतों ....

कृष्ण : छे ! छे ! गुरुदेव !

बलराम : आपणांला नाहीं मी हात लावूं देणार .... फ़ार जड नाहींत ह्या ....

[ दोन्ही मोळ्या घेऊन बलराम सांदीपनीसह चालूं लागतो . सुदाम्याच्या शोधार्थ कृष्ण जातो . ]

[ सुदामा खाणें संपवून पोटावरून हात फिरवीत ढेकर देतो . ]

सुदामा : कृष्ण - बलराम गेले असतील आश्रमाकडे .( फ़डकें झटकून उठतो , चालूं लागतो . पण चालतां चालतां चिखलाच्या डबक्यांत पडतो . तसाच उठून पुन्हा चालूं लागतो . तोंच त्याच्या पायां कांटे मोडतात . किंचाळून मटकन् खालीं बसतो . तसाच खुरडत कोरड्या जागीं येतो व कृष्णाचा धावा मांडतो . )

धाव रे झडकरी

कृष्णा , धाव घे लवकरी

संकट पडलें भारी

कृष्णा , धाव घे झडकरी !

शिणलों तुजला वनीं शोधुनी

पायांनी बघ कांटे रुतुनी

चाळण खाली पुरी !

गुंतलास रे कोठ देवा ?

सांग , तुझ्याविण कुणास केंवा ?

कोण दुजा कैवारी ?

पाहशील किति अत हा असा ?

जिवास अवघा तुझा भरंवसा

धाव सख्या , श्रीहरी !

[ तितक्यांत कृष्ण सुदाम्याला हाका मारीत येतो . ]

कृष्ण : सुदाम्या ! ए सुदाम्या !....

सुदामा : कृष्णा ! कृष्णा ! मी इकडे आहें रे !

[ कृष्ण सुदाम्याच्या जवळ येतो . ]

सुदामा : कृष्णा , कृष्णा , माझ्या पायांत कांटे मोडलेत रे !

कृष्ण : घाबरूं नकोस . मी काढतों हं !

[ कृष्ण सुदाम्याच्या पायांतले कांटे काढतो . ]

कृष्ण : अरे पण सुदाम्या , हे दोन कांटे निघत नाहींत रे !

सुदामा : मग आतां मी चालूं कसा ?

कृष्ण : माझ्या खांद्यावर बैस .....

सुदामा : तुझ्या खांद्यावर ?

कृष्ण : हो ... काय हरकत आहे ? अरे , तूं ब्राह्मणपुत्र ! तुझा ... ब्राह्मणाचा भार मीं क्षत्रियानं वाहिला तर बिघडलं कुठं ? धर्मशास्त्राला धरूनच आहें तें ..... त्यांतून तूं तर माझा परम मित्र !

सुदामा : कृष्णा ! दीनदुबळ्यांचा भार बाहाण्यासाठींच तुझा अवतार आहे का रे ?

कृष्ण : तसं समज . पण चल , लवकर बैस खांद्यावर . तिकडे गुरुदेव आपली वाट पाहात असतील ...

[ सुदाम्याला खांद्यावर घेऊन चालू लागतो . ]

[ देवापुढें दिवा लावून हात जोडून गुरुपत्‍नी प्रार्थना करते . ]

गुरुपत्‍नी : दिवेलावणी झाली तरी अजून कोणीच कसं परतलं नाहीं ? देवा ! सर्वांना सुखरूप घरीं येऊ दे . तुळशीचा लक्ष वाहीन तुला ...

[ इतक्यांत गायींतल्या घंटा वाजलेल्या एकू येतात . गुरुपत्‍नी आंगणांत येते . गायींना घेऊन येतांना कुमार दिसतात . ]

गुरुपत्‍नी : ( कुमारांस ) तुम्ही आलांत .... अन् राम , कृष्ण , सुदामा वगैरे कुठं आहेत ?

१ कुमार : आम्हांला नाहीं ठाऊक .

२ कुमार : गुरुदेव आले ! ते पाहा !....( बलराम व सांदीपनी येतांना दिसतात . )

गुरुपत्‍नी : अरे , पण त्या मोळ्या आधीं उतरून घ्या ...( कुमार मोळ्या उतरून घेतात . )

सांदीपनी : कृष्ण - सुदामा आले का ?

गुरुपत्‍नी : नाहीं .

सांदीपनी : नाहीं ? अजून नाहीं ? म्हणजे ?

[ कृष्ण सुदाम्याला खांद्यावर घेऊन येतो . ]

कृष्ण : गुरुदेव ! आलों .... सुदाम्याला घेऊन आलों !

बलराम : तरी मला वाटलंच .... अखेर ही मोळी तुला खंद्यावरनंच आणावी लागली ना ?

( सर्वजण हसतात . )

कृष्ण : गुरुदेव , सुदाम्याच्या पायांत कांटे मोडलेत !

सांदीपनी : कुठं ? पाहूं .... पाहूं ....

[ सुदाम्याला घेऊन सांदीपनी आश्रमांत जातात . त्यांच्यामागून सारेजण जाऊं लागतात . तोंच गुरुपत्‍नी कृष्णाला जवळ घेऊन कुरवाळते व डोळ्यांना पदर लावून हूंदका देते . ]

कृष्ण : मातोश्री , असं वाईट वाटून काय घेतां ?

गुरुपत्‍नी : मीं तुला सारा दिवस उपाशी तापाशी रानावनांत रखडायला लावलं ....

कृष्ण : मग ? त्यांत तुमचा काय दोष ? पावसानं घोटाळा केला . सारेचजण उपाशी राहिले ...

गुरुपत्‍नी : पण मला न विचारतां तूं कां बरं गेलास लाकडं आणायला ?

कृष्ण : त्यांत काय विचारायचं ? सरपण संपलं होतं ...

गुरुपत्‍नी : पण मीं तें तुला आणायला सांगितलं नव्हतं .

कृष्ण : गुरुदेवा काय सांगकाम्याप्रमाणं करायची असते होय ?

गुरुपत्‍नी : कसा रे बृहस्पतीसारखा बोलतोस ? प्राण ओवाळून टाकावासा वाटतो तुझ्यावरनं !

( कृष्णाला पोटाशीं कुरवाळते . )

[ आश्रमापुढील प्रशस्त आवार . उच्चासनावर सांदीपनी बसले आहेत . कृष्ण , बलराम , सुदामा , वगैरे शिष्यगण त्यांच्या समोर बसलेला आहे . ]

सांदीपनी : कृष्ण , बलराम , सुदामा ! तुम्ही तिघेही परीक्षेंत उत्कृष्टपणें यशस्वी झालां आहांत . तुमचं अध्यपनं संपलं . आश्रमांतला आजचा शेवटचा दिवस तुमचा . उद्यां तुम्ही आपापल्या घरीं जाणार . तुमच्यासारखे शिष्य लाभले म्हणून आनंदानं , आभिमानानं माझा ऊर भरून येतो . पण तुमचा आतां वियोग होणार म्हणून वाईटही वाटतं . मोठी चमत्कारिक अवस्था झाली आहे माझ्या मनाची . तुम्हांला विशेष कांहीं सांगायचं नाहीं .... सांगायची आवश्यकताही नाहीं . तुम्ही सुज्ञ , समंजस , सद्गुणी आहांत . पण एवढंच सांगतों ... आपलं ज्ञान , आपलं बल , आपलं जीवनसर्वस्वच लोकहितासाठी खर्च करा !

लक्षांत ठेवा .... जनसेवा हीच ईश्वरसेवा ! तुमचं जीवन सुखी , समृध्द , कृतार्थ होईल ..... हा तुम्हांला माझा शुभाशीर्वाद आहे !

१०

[ गांवीं जाण्यासाठीं सुदाम्या आपल्या सामानाची आवराआवर करून बोचकें बांधतो . तितक्यांत कृष्ण तेथे येतो . ]

कृष्ण : जाणारच तूं आज ?... माझं ऐक . अरे , उद्यां आमचा रथ येईल ... मग तूं , मी , दादा ... आपण सारेचजण उद्यां रथांतून जाऊं या ...

सुदामा : आज काय , नि उद्यां काय , सारखंच ! शिवाय तुम्ही जाणार मथुरेला .... मी जाणार कपिला नगरीला ...

कृष्ण : होय , आर्ध्या वाटेपर्यंत तर मिळून जाऊं .....

सुदामा : नको ... नको . मला आपलं आजच जाऊं दे .

[ सांदीपनी येतात . ]

सांदीपनी : झाली तुझी तयारी ? आपलं सगळं सामान घेतलंस ?

सुदामा : होय गुरुदेव !

सांदीपनी :( पत्‍नीस ) सुदामा निघाला बरं का . त्याची शिदोरी ....

गुरुपत्‍नी : ही काय आणली ...( सुदाम्याला शिदोरी देऊन त्याच्या पाठीवरून प्रेमाळपणें हात फिरविते . ) निघालासच ?

[ सुदामा सांदीपनींना नमस्कार करतो . ]

सांदीपनी : दीर्घायुष्मान् भव !

सुदामा : मातोश्री ! ( नमस्कार करतो . )

गुरुपत्‍नी : चिरंजीव हो ! जरा थांब !...( लगबगीनें आंत जाते . )

सांदीपनी : आतां पुन्हा कधीं भेटशील तेव्हां खरं !

[ इतक्यांत गुरुपत्‍नी दह्याचें भांडें आणते व सुदाम्याच्या तळहातावर दहीं घालते . सुदामा तें चाटतो . ]

सुदामा : येतों हं !

सांदीपनी : नीट जपून जा .

गुरुपत्‍नी : प्रकृतीला सांभाळ ....

[ सुदामा सर्व कुमारांचा नमस्कारपूर्वक निरोप घेतो व चालूं लागतो . कृष्णही त्याच्या मागून चालूं लागतो . ]

बलराम :( कृष्णास ) तूं कुठं चाललास ?

कृष्ण : ह्याला चार पावलं पोचवायला .....

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP