सुदाम्याचे पोहे - भाग ६१ ते ६५

प्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो


६१

[ सुवर्णमंचकावर झोपलेला सुदामा एकदम दचकून उठतो . डोळे उघडतो . अंगाची आग झाल्याप्रमाणे ’ हा - हा - आई ग ’ असें ओरडत तळमळूं कागतो . ]

दासी : काय हवंय् महाराजांना ?

सुदामा : ( बिछान्यावर उठून बसतो . ) कांहीं नको .

दासी : पाणी हवं का ?

सुदामा : नको . नको - पाणी नको ... पंखा नको ... वाणी नको ... कांहीं नको . तुम्ही सार्‍या जणी येथून ज बरं !

दासी : आज्ञा महारज !

[ दासी निघून जातात , सुदामा दार बंद करतो व अस्वस्थपणें येरझरा घालूं लागतो . एकदम एका मोठ्या आरशासमोर थांबतो . आरशांतलें प्रतिबिंब बोलूं लागते . ]

प्रतिबिंब : सुदाम्या ! काय मांडलंस हें ? तुझीं बायकामुलं ... तुझे सारे गांवकरी तिकडे भाकरीच्या शिळ्या तुकड्यालाहि महाग झाले आहेत ... अन् तूं इकडे खुशाल पंचपक्वान्नं झोडतोस ? ते लोक तिकडे मरणाच्या दारीं पडलेत अन् तूं इकडे चैनींत सुवर्णमंचकावर परांच्या गादीवर लोळतोस ?.... तुला जनाची नाहीं पण मनाची तरी कांहीं लाजलज्जा ? मोठ्या विश्वासानं गांवकर्‍यांनीं तुला इकडे श्रीकृष्णाकडे धाडलं ... त्यांचा असा विश्वासघात करतोस तूं !

सुदामा : विश्वासघात ? छे - छे ! मी कधेंच कुणाचा विश्वासघात करणार नाहीं .

प्रतिबिंब : मग हें काय चालवलं आहेस ?

सुदामा : पण मी तरी काय करूं ? कृष्णाला सांगायला जावं तर तो मला बोलूंच देत नाहीं . संधीच मिळत नाहीं सांगायची .

प्रतिबिंब : आतां ... ह्या घडीला कृष्णाला हांक मारून सांग ... तूं कशासाठीं आला आहेस तें त्याला स्पष्टपणे सांग ....

सुदामा : सांगतों ... सांगतों !... कृष्ण ! कृष्ण ! अरे कृष्ण !

[ शेजारच्या महालातून लगबगीनें श्रीकृष्ण येतो . ]

श्रीकृष्ण : काय रे सुदामा ! काय हवं तुला ?

सुदामा : ( गोंधळून ) मला .... मला कांहीं नको .

श्रीकृष्ण : मग असा घाबरलास कां ? ओरडलास कां ?

सुदामा : ओरडलों ?.... नाहीं - नाहीं - कृष्ण !

श्रीकृष्ण : तुला चांगली झोंप मिळाली नाहीं म्हणून असं होतंय् . चल , नीज चल ...

[ मंचकावर सुदामाला नेऊन बसवितो . ]

सुदामा : कृष्णा , तुला पुष्कळ सांगायचं आहे रे !

श्रीकृष्ण : अन् मालाहि तें ऐकायचं आहे . पण आजच लगेच तूम कांहीं जायला निघाला नाहींस . सावकाश सांग काय सांगायचं तें उद्यां ... परवां .... तेरवां ! पण आतां आधीं नीज पाहूं .

[ सुदामाला बळजबरीनें निजवून त्याचे पाय चुरूं लागतो . सुदामा ताडकन् उठून बसतो . ]

सुदामा : कृष्णा , हें काय चालवलंस ? कां असा लाजवतोस मला ? माझे पाय चुरतोस ?

श्रीकृष्ण : अरे , पं माझ्या पुण्यासंपादनाच्या आड तूं कां येतोस ? विद्वान् ब्राह्मणाच्या सेवेचं आयतं मला मिळतंय् ...

सुदामा : नाहीं ... नाहीं ... मी तुला असं करूं देणार नाहीं .

श्रीकृष्ण : तूं नीज पाहूं . मी तुला थोपटतों . ( सुदामाला झोपवून थोपटूं कागतो . ) जरा डोळा लागला की तुझा सारा शीण निघून जाईल .

सुदामा : कृष्णा , तुझ्या केवळ दर्शनानंच मला नवजीवन ... संजीवन मोळलं आहे रे !

[ सुदामा झोंपीं जातो . श्रीकृष्ण हलकेंच उठून जातो . ]

६२

[ विचारांत गढलेला सुदामा पाठीशीं हात बांधून अस्वस्थपणें चांदण्या रात्रीं बागेंत एकटाच फिरत असतो . त्याला धनशेठीचें व सुशीलेचें बोलणे आठवत असतें . हातवारे करीत स्वतःशींच कांहींतरी पुटपुटत असतो . इतक्यांत त्याला हांका मारीत श्रीकृष्ण तेथें येतो . ]

श्रीकृष्ण : सुदामा ! सुदामा ! अरे , इथं असा एकटाच काय फिरतोस ? एवढ्या कसल्या विचारांत गढला आहेस ?

सुदामा : कृष्णा ! इतके दिवस झाले मला इथं येऊन ... नुसता बसून राहिलोंय् ....

श्रीकृष्ण : भले ! उभा तर आहेस !

सुदामा : तुला सगळी थट्टाच वाटतेय् ....

श्रीकृष्ण : दोन वेळां माझ्या पंगतीला जेवातोस ... आरामांत सोन्याच्या पलंगावर झोपतोस ....

सुदामा : तेंच - तेंच ! ह्याच आरामाला कंटाळलोंय् रे मी !

श्रीकृष्ण : म्हणजे ? तुझ्या पाहुणचारांत कांहीं कमी पडलंय् की काय इथं ?

सुदामा : छेः रे कृष्णा ! देवेंद्रालाहि हेवा वाटावा , एवढ्या थोर ऐश्वर्यांत तूं मला ठेवलं आहेस . पण ... पण मी इथं आलों कशासाठीं ?.... अन् हें चाललंय् काय ? तिकडे बायको , गांवकरी काय म्हणत असतील ?

श्रीकृष्ण : काय म्हणणार ? चार दिवस बाळमित्राकडे चैनीनं आलास ...

सुदामा : नाहीं - नाहीं . मी चैनीनं आलों नाहीं . तुला एक मह्त्त्वाची गोष्ट सांगायची आहे . तेवढ्यासाठीं तर इतक्या लांब तुझ्या पायांकडे धांव घेतली !

श्रीकृष्ण : असं ? अरे , मग इतके दिवस कुठं बोलला नाहींस हें ?... सांग ... सांग ... काय आहे तुझं महत्त्वाचं काम ?

सुदामा : नीट बैस इथं .....

श्रीकृष्ण : ( स्फटिकासनावर बसून ) हा बसलों ! तूं पण बैस . कीं उभ्यानंच सांगणार आहेस ? ( हंसतो . )

सुदामा : ( बसून ) हंसतोय काय असा ? हसूं नको . प्रश्न महत्त्वाचा आहे ... गंभीर आहे ...

श्रीकृष्ण : ठीक आहे . मीहि गंभीर झालों बघ ! हं ! सांग तुझी गोष्ट ...

सुदामा : गोष्ट अशी आहे ...

[ इतक्यांत लगबगीनें रुक्मिणी येते . ]

रुक्मिणी : छान ! छान ! आम्ही तिकडे समारंभाची सारी तयारी करून तुमची वाट बघतोंय् अन् तुम्ही इकडे निवांतपणें गोष्टी सांगत बसलांत काय ? ( श्रीकृष्णास ) भावोजींना बोलवायला म्हणून इकडे आलांत नि ...

श्रीकृष्ण : अहो , पण सुदामाचं महत्त्वाचं काम ...

रुक्मिणी : आधीं उठा नि मग बोला . हीच वेळ मिळाली तुम्हांला महत्त्वाच्या कामाला ?

श्रीकृष्ण : चल , ऊठ बाबा सुदामा ! कांहीं इलाज नाहीं . मग सांग तुझी गोष्ट . ह्या बायका म्हणजे ...

रुक्मिणी : ( सुदामास ) तुमच्यासाठीं आम्ही मनोरंजनाचा खास कार्यक्रम करणार आहोंत ...

सुदामा : अहो , पण ....

रुक्मिणी : पण - परन्तु कांहीं नाहीं .

श्रीकृष्ण : आधीं चल तूं . ( सुदामाला ओढीत नेतो . )

६३

[ उद्यान . श्रीकृष्णाच्या बाळपणींचा रासलीलेचा कार्यक्रम साजरा होतो . ]

गोपी : उसळला रासलीला - रंग

राधिकेसंगे श्रीरंग

सांवळा हरि खेळे रंग !

झिम्मा घुमला चढत्या छंदीं

टाळी लागली ब्रह्मानंदीं

वाजती वीणा , झांज , मृदंग !

चला , दणाणा खेळूं फुगडी

स्वर्गसुखाचीं दारें उघडीं

धुंद मन बनलें ग निस्संग !

प्रीतिगोफ गुंफुंया भरारा

हिंदोळ्यावर झुलूं झरार

जीव हो मुरलीनादीं दंग !

गुलाल - रंगानें ब्रिजलाल !

अंग अंग माखिशी कशाला ?

रंगले पहा अंतरंग !

६४

[ उद्यानाचा एक भाग . सुदामा व श्रीकृष्ण येतात . ]

सुदामा : कृष्णा , आतां तरी ऐकून घेतोस का माझं सांगणं ?

श्रीकृष्ण : आतां ? ( जांभई देऊन ) आतां नको रे बाबा ! झोंप आली ... उद्यां नक्की .

सुदामा : उद्यां ? उद्यां सकाळीं मी जावं म्हणतों ...

श्रीकृष्ण : कां रे बाबा ? कंटाळलास इथ ?

सुदामा : फार दिवस झाले येऊन . खरं म्हणजे आल्याबरोबरच परतायला हवं होतं . पण तुझ्या संगतींत मन गुंतलं . दिवस कसे भरभर गेले तें कळलंच नाहीं .

[ इतक्यांत रुक्मिणी व सत्यभामा येतात . ]

रुक्मिणी : भावोजी , कर्यक्रम आवडला ना ?

सुदामा : वा ! हें काय विचारणं ? उत्कृष्टच झाला कार्यक्रम .

श्रीकृष्ण : हा उद्यां जातों म्हणतोंय् ...

सत्यभामा : खरं का हो भावोजी ? इथ मन रमत नाहीं ?

रुक्मिणी : बायकोशिवाय करमत नाहीं . होय ना ?

सुदामा : छेः छेः ! तसं नव्हे . तिकडे गांवांत गांवकरी ...

श्रीकृष्ण : वाट बघत असतील तुझी . ठीक आहे . उद्यां जा बाबा ... पण आतां निवांतपणें झोंप जा ....

६५

[ दुसरे दिवशीं सकाळीं सुदामा आपले जुने कपडे घालून जायला निघाला आहे . श्रीकृष्ण येतो . ]

श्रीकृष्ण : हें रे काय , सुदामा ? जुनेच कपडे घालतोस ?

सुदामा : होय . लांबचा प्रवास ... तुझ्या ह्या राजेशाही वस्त्रांमुळं वाटेंत माझ्यावर प्राणसंकट ओढवायचं .

श्रीकृष्ण : तेंहि खरंच आहे .

[ रुक्मिणी - सत्यभामा येतात . दोन दासींच्या जवळ अलंकार - वस्त्रांचीं ताटे असतात . ]

रुक्मिणी : भावोजी , हें एवढं न्यायचं बरं का .

सुदामा : हें काय ?

सत्यभामा : जाऊबाईंना भेट !

श्रीकृष्ण : हे अलंकार नि हें वस्त्रं ! चांगलं ! अहो , प्रवासांत चोराचिलटांचं भय म्हणून ह्यानं अंगावरचे उंची कपडे काढून ठेवले . अन् तुम्ही हें जडजोखीम त्याला न्यायला सांगताय् ! काय म्हणावं तुम्हांला ?

रुक्मिणी : पण हें रीतीनें आहे , पुरुषांना कांही रीतभात नसली तरी ...

सत्यभामा : आम्हीं बायकांना सारं सांभाळावं लागतं

सुदामा : पण वहिनी , कशाला हें ? खरंच कांहीं नको .

रुक्मिणी : तुम्हाला नव्हे ... जाऊबाईंना ... मुलांना ...

सुदामा : त्यांनाहि नको . तुम्ही माझा सन्मान केलांत .... त्यांतच त्यांचाहि सन्मान झालाच की !

सत्यभामा : पण जाऊबाईंना हा एक शालू नि मुलाला कंठा तरी ...

श्रीकृष्ण : तो नेणार नाहीं . मी सांगतों . तुम्ही त्याला आत्तां बघतांय् , पण मी लहानपणापासून ओळखतोंय् ह्याला . कमालीच्या निरीच्छ ... निःस्पृह ब्राह्मण आहे हा ! अगदीं अयाचित वृत्तीचा ! बराय् , सुदामा , आतां पुन्हा कधीं येणार ?

रुक्मिणी : लवकरच या ...

सत्यभामा : आणि सहकुटुंब सहपरिवार या ! एकटे येऊं नका .

सुदामा : कृष्णा , येतों ...

रुक्मिणी : थांबा , नमस्कार करतें . ( सत्यभामा व रुक्मिणी नमस्कार करतात . सुदामा त्यांना आशीर्वाद देतो . )

श्रीकृष्ण : ( एकदम सुदामाचे पाय धरून ) मलाहि तुझा आशीर्वाद असूं दे .

सुदामा : देवाला भक्तानं आशीर्वाद द्यायचा ? ( श्रीकृष्णाला मिठी मारतो . दोघेहि गहिंवरतात . ) कृष्ण , येतों ; वहिनी , येतों बरं ...( एकदम मिठी सोडून चालूं लागतो . )

श्रीकृष्ण : सांभाळून जा .

सुदामा : ( वळून पाहात ) येतों . ( त्वरेनें निघून जातो . रुक्मिणी - सत्यभामाहि जातात . )

[ विश्वकर्मा येतो . ]

विश्वकर्मा : महाराजांचा विजय असो !

श्रीकृष्ण : विश्वकर्मा ! बरें आलांत ! बोलावणारच होतों मी तुम्हांला .

विश्वकर्मा : काय आज्ञा आहे महाराजांची ?

श्रीकृष्ण : एक गुप्त कार्य आहे . तांतडीचं ..... तसंच महत्त्वाचं ...( कानांत सांगतो . )

विश्वकर्मा : आज्ञा महाराज ! एका रात्रींत प्रतिद्वारका निर्मांण करतों . चिंता नसावी .

( वंदन करून जातो . )

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP