६६
[ सुदामा कपिलानगरीला परत चालला असतां वाटेंत एका सरोवराजवळ पाणी पिण्यासाठीं थांबतो . पाण्यांतलें प्रतिबिंब बोलूं लागते . ]
प्रतिबिंब : कृष्णाला भेटून आलास ? काय दिलं कृष्णानं ? गेलास तसाच हात हालवीत परत आलास ना ?
सुदामा : हो ... पण मला कांहीं नकोच होतं . मी गेलों होतों गांवाचं गार्हाणं घेऊन .
प्रतिबिंब : पण ते तरी कृष्णाला सांगितलंस का ?
सुदामा : सांगायचा खूप प्रयत्न केला . पण ....
प्रतिबिंब : तुला तशी संधीच दिली नाहीं कृष्णानं . खरं ना ? एकूण , तुझ्या भ्रमाचा भोपळा फुटला ! मोठे लोक कसे असतात तें आतां तरी समजलं ना तुला ?
सुदामा : चांगलंच समजलं .
प्रतिबिंब : पण आतां गांवकर्यांना काय सांगणार ?
सुदामा : ( चमकून ) खरंच . मी आतां गांवकर्यांना काय सांगणार ?
[ सुदामा पाणी हलवून प्रतिबिंब नाहींसें करतो व पळत सुटतो . ]
६७
[ रात्रींची वेळ . विश्वकर्मा कपिला नगरींत प्रवेश करतो . ]
विश्वकर्मा : हीच ती कपिला नगरी ! सुदामदेवांचं गांव ! सारा गांव झोंपला आहे तोंवरच श्रीकृष्णमहाराजांच्या आज्ञेप्रमाणं ह्या सुदामनगरीची प्रतिद्वारका बनवावी !
[ विश्वकर्मा हातांतून ज्वाळा सोडतो . जिकडे तिकडे झगझगाट होतो . क्षणार्धांतच गांवाचें सारे स्वरूप पालटून जाते आणि सर्वंत्र सोन्याचांदीचीं घरें दिसूं लागतात . ]
६८
[ इंद्रसेनाचा वाडा . कुक्कुट - भैरव ’ इंद्रसेनमहाराज ..... इंद्रसेनमहाराज ’ असें ओरडत येतात . ]
पहारेकरी : अहो , असं ओरडतांय् काय ? महाराजांची झोपमोड होईल ना ?
कुक्कुट : अहो , उठवा महाराजांना ! भयंकर अघटित घडलंय् ! मोठ्ठं नवल वर्तलंय् !
भैरव : चमत्कार ! भयंकर चमत्कार ! महाभयंकर चमत्कार !
[ इंद्रसेन व चंपाराणी झोपेंतून उठून येतात . ]
चंपाराणी : काय गडबड आहे ?
इंद्रसेन : कोण ओरडतंय् ?
कुक्कुट : मी कुक्कुट शास्त्री !.... अन् हा भैरवभट !
भैरव : महाराज ! भयंकर चमत्कार घडलाय् ! गांवाचं स्वरूप पार पालटलंय् ! चहूंकडे झगझगाट ! चांदीसोन्याचीं घरं !
चंपाराणी : चांदीसोन्याचीं घरं ? कुठं पाहिलींत ? स्वप्नांत कीं काय ?
इंद्रसेन : आमचा वाडा तर आहे तसाच आहे !
चंपाराणी : पहारेकरी ! हांकलून दे ह्यांना . फुक्कट मेली झोपमोड ....
कुक्कुट : थट्टा नव्हे महारज ! एक भव्य दिव्य महापुरुष आला आहे !
भैरव : सारा गांव त्यांच्याभोंवतीं गोळा झालाय् !
इंद्रसेन : त्याला पकडून आणा आमच्यासमोर !
चंपाराणी : पहारेकरी ! सेनापतीला वर्दी दे ! ( पहारेकरी धांवत जातात . )
६९
[ एका चव्हाट्यावर विश्वकर्मा घोड्यावर असून त्याच्याभोंवतीं लोकां चें कडें पडलें आहे . ]
१ गांवकरी : आज खरंच अक्षरशः सोन्याचा दिवस उगवला !
१ वृध्द : सुदामादेवांनीं आमची हांक कृष्णदेवाला पोंचविली !
विश्वकर्मा : म्हणून तर मी आलों आहे . आजपासून कपिलानगरी स्वतंत्र झाली !
२ गांवकरी : द्वारकेप्रमाणेंच सोन्याची झाली !
लोक : श्रीकृष्ण महाराजांचा जयजयकार ! सुदामदेवांचा जयजयकार !
[ इतक्यांत इंद्रसेनाचा सेनापति कांहीं घोडेस्वारांसह येतो . ]
सेनापति : कृष्णाचा जयजयकार ?...[ विश्वक र्म्या स ] को ण रे तूं ?
कुक्कुट : महाराज ! हेच ते महापुरुष !
सेनापति : पकडा ह्याला ...
[ घोडेस्वार व शिपाई विश्वकर्म्याला पकडण्यासाठीं पुढें धावतात . पण लगेच जागच्या जांगीं डाबलें जातात . घोडेहि मागे मागे हाटतात . ]
सेनापति : [ शिपायांस ] पाहातां काय ? व्हा पुढं !
शिपाई : पायच उचलत नाहीं , सेनापति !
विश्वकर्मा : पकडा ह्यांना ... चला घेऊन इंद्रसेनाकडे ...
कुक्कुट - भैरव : पकडा ... पकडा लोकांना !
७०
[ इंद्रसेन व चंपाराणी . ]
चंपाराणी : एका माणसाला पकडायला एवढा उशीर ? सेनापति आहे कीं सोंग आहे ?
इंद्रसेन : सारेच लोकाचे अजागळ , भेकड आहेत ... मी जातों ...
[ इतक्यांत विश्वकर्मा . कुक्कुट , भैरव वगैरे येतात . ]
विश्वकर्मा : ( इंद्रसेनास ) थांब , कुठं चालसाल ?
कुक्कुट : हेच ते इंद्रसेनमहाराज !
इंद्रसेन : ( विश्वकर्म्यास ) कोण रे तूं ?
भैरव : महापुरुष !
इंद्रसेन : अग , माझी तलवार ... तलवार कुठं आहे ? ( नोकर तलवार आणून देतो . )
चंपाराणी : पाहातां काय ? उडवा डोकं !
[ इंद्रसेन उलटी तलवार धरून विश्वकर्म्याचे अंगावर धावून जाऊं लागतो . पण जागच्या जागीं डांबला जातो . ]
चंपाराणी : थांबलांत कां ? व्हा पुढं !
इंद्रसेन : अग , पण पाय चिकटले ना जमिनीला ?
चंपाराणी : तुम्ही असेच अवसानघातकी ! ( त्याची तलवार घेऊन धांवते . पण तिचीहि तीच गत होतें . ) अगबाई ! मेल्यानं चेटूक केलं ग बाई चेटूक केलं !
[ सर्व लोक हसतात . ]
विश्वकर्मा : चला ह्यांना घेऊन तुरुंगाकडे !