अंक दुसरा - प्रवेश दुसरा
गडकर्यांची नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनलेले आहेत, आपली नाटके वाङ्मयदृष्ट्या वरच्या दर्जाची व्हावी याची त्यांनी फार खबरदारी घेतली होती.
[यमुना, मधु व वसंत]
यमुनाः मग काय ? हो म्हणायचें ना ? वसंतदादाचा विचार कांहीं वावगा नाहीं !
मधुः वावगा नाहीं खरा; पण जर बाजू अंगावर आली तर मात्र फजीतीला पारावार नाहीं ! बाळाभाऊची नाटकी तर्हाच ही ! चोंहीकडे हसें होईल फसगत झाली तर !
वसंतः समजलें ! प्रलत्न करून पाहायचा, बोलूनचालून वेडयांचा बाजार हा ! साधलें नाटक; नाहीं तर प्रहसन आहेच पुढें !
मधुः साधला तर ठीक आहे प्रयत्न; पण
यमुना: पण नको नी बीण नको ! घरोतल्या माणसांनाच काय हंसायचें ? इकडे सुद्धां संशयाचें वेडच आहे, नाहीं तर काय?
वसंत: पहा, एका कामांत दोन कामें होत आहेत ! जबाबदारी सारी माझ्यावर !
मधुः तो नाटकांतला तात्या इतकें सारें करणार कसा ? त्याला असा मुलगा कोण मिळणार ?
वसंत: तें तर मी हां हां म्हणतां जमवून आणीन. पंचाईत आहे जरा या दुसर्या कामाची. रमाबाई गांवीं येणार कशा ?
यमुनाः दादा, त्याची नको तुला काळजी ! तें माझ्याकडे लागलें जाऊबाईंना मी सांगेन सारें समजावून आपलें कल्याण होतें आहे तिथें अडथळा कोण करणा ?
मधुः मग काय ? करायचें म्हणतां असें ?
वसंतः अगदीं कांहीं हरकत नाहीं, पिलंभटाला पैशानें सहज विकत घेतां येईल.
मधुः पण मी त्याला नाहीं विचारणार. एखादे वेळीं तो कबूल न होतां, रहस्य उघडकीस आणूं लागला तर तोंड दाखवायची पंचाईत पडेत मला ! तो पुरा आपलासा होईपर्यंत या गोष्टींत माझें अंग आहेसें त्याला कळतां कामा नये.
(राग-बागेश्री. ताल-एकताल)
सहजची तो भेद करील, मार्ग हा बरवा ॥धृ०॥
अतिलोभी भिक्षुक तो पाडिल फशिं मजला ॥१॥
यमुनाः मग काय रे दादा, कसें करायचें ? इकडचा स्वभावच असा पडला.
वसंत: मी विचारतों त्याला; मग तर झालें ना ? त्याच्याकडे कामें दोन, एक ही घरांत उंदीर मेल्याची बातमी पसरवावायाची आणि दुसरें रमाबाईंना घेऊन गुपचिप तुमच्या गांवीं जायचें. हो, आणखी मी बैरागीवेषानें तुमच्या गांवीं आलों म्हणजे माधवरावांजवळ, अण्णासाहेबांजवळ माझी निरनिराळी स्तुति करायची.
मधुः तुमच्या या घरगुती सौभद्रांतला गर्गमुनिच म्हणावयाचा ! त्या बाळाभाऊला हसतां हसतां तुम्ही सुद्धां त्याच वळणावर जात चाललां हळूहळू !
वसंत: खरें म्हणाल तर सौभद्रावरूनच मला ही युक्ति सुचली. त्यांतल्या त्यांत म्हटलें माधवरावही ताळ्यावा आले तर पाहूं. रमाबाईची आणि माधवरावांची एकदां गांठ पडली म्हणजे माधवरावांचें वैराग्य खात्रीनें लटपटणार.
यमुना: खात्रीनें. बायकांचें बळच असें आहे.
(राग-हमीर. ताल-एकताल.)
अबला आम्हीं प्रबला, चकुनि भ्रमुनि अलि येतां,
कमलिनि बद्धचि करि त्याला ॥धृ०॥
प्रेम-पाशबंधन-कर गळां पडतो, सुटका कधीं न कुणाला ॥१॥
पुरुष एकदां का हातीं सांपडले म्हणजे सुटावयाची आशाच नको.
वसंत: मधुकरांना तर त्याचा अनुभव आहेच म्हणा !
यमुनाः आणि तुला कुठें नाहीं ? वन्संसाठींच ना तुझी सारी खटपट ? इकडे
मधु: बरें, ठरलें ना सारें ?
वसंत: ठरलें, पण घरांत उंदीर पडल्याबरोबर अण्णासाहेब गांवीं जायला निघतील ना ?
मधु: अगदीं सहकुटुंब सहपरिवारें पहिपाहुण्यासुद्धां. घरांत पाणीसुद्धां पिऊं देणार नाहींत मग ते कोणाला. तडक गांवचा रस्ता धरतील.
वसंतः आणि गांवीं पोचतांच तुम्हीं तें औषध खुबीनें त्यांच्या पायाला लावायचें म्हणजे आपोआप वळंधा येईल.
मधु: काय काय होतें बधूं या आतां ! घोडामैदान जवळच आहे.
वसंतः आपल्याला एखादा चाबकाचा फटका खाण्याची पाळी न येवो म्हणजे झालें. बरें जातों मी आणि करतों सारी व्यवस्था.
मधु: ठीक आहे. मला कळवा मात्र ताबडतोब.
[जातात.]
N/A
References : N/A
Last Updated : December 08, 2012
TOP