[पिलंभट प्रवेश करतो.]
पिलंभट: (स्वगत) एकदां कुठें पार्वती रावणाच्या हवालीं केली म्हणून शंकराला लोक भोळा शंकर म्हणतात; पण त्यांत काहीं अर्थ नाहीं. स्त्रीदान्त खरीं भोळीं दैवतें दोन. एक विष्णु आणि दुसरें गणपती. एकानें लक्ष्मी आणि दुसर्यानें सरस्वती सार्या जगाची मालमत्ता म्हणून मोकळ्या सोडल्या आहेत. चोरापोरांच्या सुद्धां हातांत त्या सांपडावयाच्या ! माझीच गोष्ट पाहा ना, आज इतकीं वर्षें या इनामदारांच्या घरच्या लक्ष्मीशीं खुशाल हवी तशी धिंगामस्ती करतों आहें. पैसा, पैसा म्हणजे बिशाद काय ? आणखी चार वर्षांत सोन्याचीं कवलें घालीन घरावर. नाहीं तर आमच्या वडिलांची कारकीर्द. घराला सोन्याचांदीचा विटाळ नाहीं. आम्ही दोन सोन्यासारखीं मुलें, तो शिंगमोडका सोन्य बैल आणि तो परसदारांतला सोनचाफ्याचा खुंट याखेरीज सोनें द्दष्टीस पडायचें तें दसर्याच्या दिवशीं आपटयाच्या पानाचें. याउपर सोन्याचें नांव नाहीं घरांत. नाहीं म्हणायला आमची आजी वारली तेव्हां मात्र कोणी कोणी म्हणालें कीं, “ तिचें काया वाईट झालें ? सोनें झालें तिचें. ” मग का ती सोनामुखी फार खात होती म्हणून म्हणाले कुणास ठाऊक. आम्ही लहान; गेलों तिसरे दिवशीं रक्षा उपासायला. पाहातों तों भट्टींत हीणकसच फार ! मूठभर अस्थि मात्र सापडल्या. त्या नेऊन बाईस पोंचविण्याच्या भानगडींत, आटलेलें सोनें सांपडण्याऐवजीं खर्चाच्या पेचानें चांगली चांदी मात्र आटली ! ही बाबांच्या संसाराची कहाणी ! तेंच आतां पाहा ! ज्योतिष, वैद्यक, देव खेळविणें; होय आहे, नाहीं आहे, निरनिराळ्या मार्गांनीं इनामदारांच्या घरांतून पैसा येतो आहे ! समुद्राला जसे चहूंकडून नद्यांचे ओघ मिळायचे तसा संपत्तीचा ओघ निरनिराळ्या मार्गांनीं आमच्या घराकडे वाहतो आहे. येवढयानें इनामदारांच्या मनमुराद उत्पन्नाला तरी काय धक्का बसणार ? कांहीं नाहीं; दर्यामें खसखस ! भरल्या गाडयाला सुपाचा काय भार ? आतां या वेणूताईच्या लग्नांत बरेंच चावपडायला सांपडेलसें वाटतें. त्या वसंतरावाचें टिपणामुळें फिसकटलें-अरे वा ! नांव काढल्याबरोबर स्वारी हजर [वसंतराव येतो] या वसंतराव !
वसंतः पिलंभटजी, तुमच्याकडेच आलों आहें. थोडें काम आहे माझें.
पिलं: हं हं ? काम आहे ? मग आंधळ्यापांगळ्यांना बोलवा ! दानधर्माला आंधळेपांगळे आणि कामाधामाला मात्र पिलंभटजी ! असें रे कां बाबा ? अरे, तुम्हां शिकलेल्या लोकांना लाजा नाहींत लाजा !~ साहेबलोकांच्या नादानें पूर्व विसरलांत ! आतां काय काम अडलें आहे भटाभिक्षुकांशीं ? जा, आतां जा साहेबांकडे, तेच तुमच्या पांचवीला पुजलेले.
वसंतः केलें आहे काय असें त्या साहेबांनीं तुमचें ?
पिलं: काय केलें आहे ? अरे पोथ्या नेल्या, पुस्तकें नेलीं, तुमच्या शेंडया नेल्या, आणखी काय करायचें राहिलें आहे त्यांनीं ? नाहीं म्हणायला तेवढा जानव्यांचा कारखाना कांहीं काढला नाहीं अजून ! आतांशा तर म्हणतात, पापडलोणचीं सुद्धां येतात विलायतेचीं डब्यांतून होते ! तेव्हां आतां कुठें तुमचें डोळे उघडतोहत ! आतां भटजीची आठवण होते ! म्हणे भटजी, माझें थोडेंसें काम आहे ! लाज नाहीं वाटत तुम्हां लोकांना ! बेशरम कुठले ! तुम्हा शिकलेल्या लोकांना पाहिलें म्हणजे असें वाटतें कीं एक कोरडा घेऊन मारावा फडाफड. (वसंत कांहीं रुपये देऊं लागतो.) तुमच्याबद्दल नाहीं म्हणत मी, या हुच्च शिकलेल्या लोकांची एक गोष्ट सांगितली ! सारेच तसे नसतात ! तुम्हीं झालां, आमचा मधु झाला, तुमची गोष्ट निराळी ! तुमच्यासारखे धर्माचे आधार नसते तर ब्राह्मणत्व कधींच गेलें असतें रसातळाला ! (पैसे घेतो.)
वसंत: हा आपला नुसता विसार दिला तुम्हांला ! देणगी अजून पुढेंच आहे ! आतां होईल ना माझें काम ?
पिलं: हें काय विचारणें ? झालेंच पाहिजे काम. नाहीं तर तुम्ही यजमान कशाचे आणि आम्ही आश्रित कशाचे ? आपल्या जिवावर आमच्या सार्या उडया. गरीबांचे वाली आपण; आंधळ्यापांगळ्यांनाही पैपैसा दिला पाहिजे. आमच्या. सारख्यांचाही हात भिजला पाहिजे. काम काय तें सांगा म्हणजे झालें. केलेंच म्हणून समजा.
वसंत: सांगतों, पण अगोदार यांतलें एक अक्षर कोठें बोलणार नाहीं अशी शपथ घ्या पाहूं !
पिलं: घेतों शपथ-पण-पण
वसंतः कां घुटमळतां कां असे ? काम वाईटपैकीं असेल वाटलें कीं काय ?
पिलं: भलतेंच, वाईट काम आणि आपल्या हातून, असें कुठें झालें आहे ? तुम्हां शिकलेल्या लोंकांच्या हातून वाईट कामें होणें नाहींत साहेबलोकांच्या विद्येचा हा तर मोठा गुण. साहेबलोकांसारके लोक मिळायचे नाहींत कुठें
वसंत: मग काय अडचण आहे आतां ?
पिलं: अडचण एवढीच, बाकी अडचण कसली ती म्हणा ? आपण तेव्हांच तिचा निकाल कराल ! इतकेंच म्हणत होतों आतां ही जी कृपाद्दष्टि केली आणि पुढच्या देणगीबद्दल जो कांहीं मनांत संकल्प केला असेल, हो, आपण कुठले रहायला ? आणि तो संकल्यसुद्धां अव्वाच्या सव्वा असायचा हं, तर हें सारें काम करण्याबद्दल झालें ! आतां तें पुन्हां गुप्त ठेवण्याची जबाबदारी,भिक्षुकाची जीभ अंमळ लवचीकच ! काम करणें आमच्या मतें सोपें; पण तें गुप्त ठेवणें मोठें कठीण ! तेव्हां म्हटलें या दुसर्या अवघड कामगिरिबद्दल ?
वसंत: हं समजलों ! गुमचें तोंड बंद करण्यासाठीं पिशवीचें तोंड मोकळें करावें लागणार. (पैसे देत) बरें हें घ्या ! आतां झालें ना !
पिलं भ ट: आतां ही यज्ञोपवीताचीच शपथ ! या कानाचा शब्द या कानालासुद्धां कळणार नाही. कुणीं माझी जीभ तोडली तरी शब्द नाहीं निघायचा एक, सांगा खुशाल आपलें काम !
वसंत: करा कान इकडे, आजच्या आज घरांत एक मेलेला उंदीर ठाकून याबद्दल बभ्रा करायचा ! आणखी दुसरें, एक दोन दिवसांत रमाबाईंना घेऊन करंजगांवीं जायचें. त्यांना अगदीं गुप्तपणें तुमच्याच इथें ठेवावयाच्या. (भट तोंड वाईट करतो.) खर्चाचा योग्य बंदोबस्त आम्हीं करूं. (सुरसन्न होतो.) पुढें लौकरच मी संन्याशाच्या वेशानें तुमच्या घरीं येईन. तेव्हां काय करावयाचें तें मधुकर, तुम्ही आम्ही मिळून ठरवूं.
पिलं: मधुकर आहेत ना या बाबतींत ?
वसंत: तर, तुम्हीं वाईटपणाबद्दल शंकासुद्धां आणूं नका मनांत ! इनामदारांच्या हितासाठींच ही खटपट आहे सारी. हं, मेलेल्या उंदराला शिवल्याबद्दल हें घ्या प्रायश्चित्तादाखल ! (रुपये देतो.)
किती वैराग्य तुमचें ! व्यर्थचि निंदा केली ॥धृ०॥
नच सौजन्यासि या तिळहि सीमा उरलि,
जगिं जन्मा-मृत्युसि जो ठेवी भेदा न मुळीं ॥१॥
पिलं: [घेत घेत] आतां काय बुवा नाहीं कसें म्हणावें-शब्द कसा मोडावा ?
वसंत: हं, लागा आपल्या कामाला ! या गोष्टीची वाच्यता मात्र अगदीं बंद !
पिलं: हें पहा घातलें तोंडाला कुलूप !
वसंत: आतां तें चांदीच्या किल्लीनेंही उघडणार नाहीं ना ! नाहीं तर कराल सारा घोटाळा, चला आतां लागा कामाला ! (जातात. पडदा. पडदा पडतो.)