राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती .
६१ . ( १ ) संविधानाच्या उल्लंघनाबद्दल राष्ट्रपतीवर महाभियोग लावावयाचा असेल तेव्हा , त्यासंबंधीचा दोषारोप संसदेच्या कोणत्याही सभागृहाकडून करण्यात येईल .
( २ ) ( क ) असा दोषारोप करण्याचा प्रस्ताव एखाद्या ठरावात अंतर्भूत करुन , तो ठराव मांडण्याचा आपला उद्देश असल्याबद्दल त्या सभागृहातील एकूण सदस्यसंख्येच्या किमान एक - चतुर्थांश सदस्यांनी स्वाक्षरित केलेली निदान चौदा दिवसांची लेखी नोटीस दिली गेल्यानंतर तो मांडला गेल्याखेरीज , आणि
( ख ) असा ठराव त्या सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान दोन - तृतीयांश सदस्यांच्या बहुमताने पारित करण्यात आल्याखेरीज , असा कोणताही दोषारोप केला जाणार नाही .
( ३ ) संसदेच्या कोणत्याही सभागृहाने याप्रमाणे दोषारोप केल्यावर दुसरे सभागृह त्या दोषारोपाचे अन्वेषण करील किंवा करण्याची व्यवस्था करील आणि राष्ट्रपतीस अशा अन्वेषणाच्या वेळी हजर राहण्याचा व प्रतिनिधीमार्फत आपली बाजू मांडण्याचा हक्क असेल .
( ४ ) जर अन्वेषणान्ती , राष्ट्रपतीच्या विरुद्ध करण्यात आलेला दोषारोप सिद्ध झाला आहे , असे घोषित करणारा ठराव , ज्या सभागृहाने दोषारोपाचे अन्वेषण केले किंवा करण्याची व्यवस्था केली त्या सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान दोन - तृतीयांश सदस्यांच्या बहुमताने पारित झाला तर , अशा ठरावाच्या परिणामी राष्ट्रपतीस , तो ठराव याप्रमाणे पारित झाल्याच्या दिनांकास व तेव्हापासून त्याच्या अधिकारपदावरुन दूर केले जाईल .
राष्ट्रपतीचे रिक्त अधिकारपद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे अधिकारपद भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी .
६२ . ( १ ) राष्ट्रपतीचा पदावधी संपल्यामुळे रिक्त होणारे अधिकारपद भरण्याकरता निवडणूक घ्यावयाची असेल तेव्हा , तो अवधी संपण्यापूर्वी ती निवडणूक पूर्ण करण्यात येईल .
( २ ) राष्ट्रपतीचा मृत्यू झाला . त्याने राजीनामा दिला किंवा त्यास दूर केले गेले या कारणामुळे किंवा अन्यथा रिक्त होणारे त्याचे अधिकारपद भरण्याकरता , ते अधिकारपद रिक्त झाल्याच्या दिनांकानंतर शक्य तितक्या लवकर , आणि कोणत्याही परिस्थितीत त्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत , निवडणूक घेण्यात येईल आणि रिक्त अधिकारपद भरण्याकरता निवडून आलेली व्यक्ती , अनुच्छेद ५६ च्या तरतुदींना अधीन राहून आपले अधिकारपद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या पूर्ण अवधीपर्यंत , अधिकारपद धारण करण्यास हक्कदार असेल .
भारताचा उपराष्ट्रपती .
६३ . भारताचा एक उपराष्ट्रपती असेल .
उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे .
६४ . उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल व तो कोणतेही अन्य लाभपद धारण करणार नाही :
परंतु , उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद ६५ खाली राष्ट्रपती म्हणून कार्य करील किंवा राष्ट्रपतीची कार्ये पार पाडील तेव्हा , अशा कोणत्याही कालावधीत तो राज्यसभेच्या सभापतिपदाची कर्तव्ये करणार नाही आणि राज्यसभेच्या सभापतीला अनुच्छेद ९७ खाली प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ता मिळण्यास हक्कदार असणार नाही .