उपराष्ट्रपतीचे रिक्त अधिकारपद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे अधिकारपद भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी .
६८ . ( १ ) उपराष्ट्रपतीचा पदावधी संपल्यामुळे रिक्त होणारे अधिकारपद भरण्याकरता निवडणूक घ्यावयाची असेल तेव्हा , तो अवधी संपण्यापूर्वी ती निवडणूक पूर्ण करण्यात येईल .
( २ ) उपराष्ट्रपतीचा मृत्यू झाला , त्याने राजीनामा दिला किंवा त्यास पदावरुन दूर केले गेले या कारणामुळे किंवा अन्यथा रिक्त होणारे त्याचे अधिकारपद भरण्याकरता , ते अधिकारपद रिक्त झाल्याच्या दिनांकानंतर शक्य तितक्या लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत त्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्यात येईल ; आणि रिक्त अधिकारपद भरण्याकरता निवडून आलेली व्यक्ती , अनुच्छेद ६७ च्या तरतुदींच्या अधीन राहून आपले अधिकारपद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या पूर्ण अवधीपर्यंत , अधिकारपद धारण करण्यास हक्कदार असेल .
उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे .
६९ . प्रत्येक उपराष्ट्रपती आपले अधिकारपद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या किंवा त्याने त्यासंबंधात नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या समक्ष पुढील नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करुन त्याखाली सही करील , ती म्हणजे अशी ---
" मी , क . ख ., ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की , मी कायद्याद्वारे प्रस्तावित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि आता जे कर्तव्य मी अंगीकारणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडीन . "
इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणे .
७० . या प्रकरणात ज्याकरता तरतूद करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडण्यासाठी संसदेस , तिला योग्य वाटेल अशी तरतूद करता येईल .