सर्व शांतींचा सर्वसामान्य विधी
वय वर्षे ५० ते १०० या वर्षांत ११ शांती कराव्यात असे या ग्रंथात दिलेले आहे. सर्वसामान्यपणे सर्व शांती सारख्याच प्रकारच्या असतात. प्रामुख्याने संकल्प करताना वयाचा उल्लेख बदलतो. तसेच शांतीची देवता, मंत्र, हवनीय द्रव्ये, हवनसंख्या, उपदेवता, नक्षत्रदेवता इत्यादी बदलतात.
यजमानाने स्वतः ( पत्नीसह ) बसून संकल्प सोडावयाचा असतो. गणपतीपूजन आणि पुण्याहवाचनादी झाल्यावर शांतिकर्म चालविण्यासाठी आपल्या गुरुजींना सुपारी - म्हणजे अधिकार - द्यावयाचा असतो. यालाच याज्ञिकामध्ये ‘ वर्ण ’ देणे असे म्हणतात. हा देऊन झाल्यावर पुढील बरेचसे कार्य गुरुजी आणि त्यांचे ४/५ साहाय्यक गुरुजी हे करतात.
प्रथम पंचगव्य, मोहरी इत्यादिकांनी शांतीच्या जागेची शुद्धी व पुरुषसूक्त इत्यादिकांनी आपल्या, म्हणजे स्वतः गुरुजींच्या, देहाची शुद्धी करतात. नंतर देवतास्थापना, अग्निस्थापना ( ज्या शांतीमध्ये ज्याप्रमाणे सांगितले असेल त्याप्रमाणे तसे ) करतात. देवतापूजन इत्यादी करुन मग हवनाला प्रारंभ करतात. हवन झाल्यावर यजमानाला काही वैदिक मंत्र, सूक्ते आयुष्य - वर्धनार्थ व आरोग्यासाठी ऐकवितात. ही सूक्ते वेगवेगळया शांतीच्या वेळी वेगवेगळी नाहीत. यानंतर काही हविर्द्रव्यातून जो थोडा थोडा शिल्लक ठेवलेला भाग असतो तो सर्व एकत्रित करुन गुरुजी त्याची एक आहुती देतात. यालाच स्विष्टकृत असे म्हणतात. कोणत्या हविर्द्रव्यातून शिल्लक भाग ठेवायचा व कोणत्यात ठेवायचा नाही हे पूर्वाचार्यांनी ठरवून दिलेले आहे. यानंतर प्रायश्चित्तहोम करण्यात येतो. तो झाल्यावर यजमानाला बसवून व अन्य देवताप्रीत्यर्थ क्षेत्रपालबळी देऊन व त्याची पूजा करवून कुटुंबातील मंडळींच्या अंगावरुन ओवाळून काढला जातो. मग शांतिसूक्त म्हणतात. ते झाल्यावर यजमानाच्या हातून पूर्णाहुती दिली जाते. ती देऊन झाल्यावर होमाचे राहिलेले उत्तरांग, स्थापितदेवतांची उत्तरपूजा इत्यादी झाल्यावर गुरुजी त्या देवतांच्या कलशोदकांनी व इतर अभिमंत्रित केलेल्या जलांनी यजमान व सर्व कुटुंबीय यांच्यावर अभिषिंचन करतात. अभिषेक संपल्यानंतर यजमानाने नूतनवस्त्र धारण करुन ( दुसरे वस्त्र नेसून ) होमाजवळ बसावे.
अग्निदेवता इत्यादींची प्रार्थना करुन होमविभूती धारण करावी. आयुष्याच्या वाढीसाठी आणि आरोग्य मिळावे म्हणून दूध प्यावे. आज्य - कांस्यपात्रात ( काशाच्या वाटीत पातळ तूप घेऊन ) स्वतःचे मुखावलोकन करावे. नंतर गुरुजींना पीठदान दशदान इत्यादी दाने द्यावीत. नंतर यजमानाच्या मुलांनी अथवा मुलींनी यजमानांना पुष्पमाला, वस्त्रे, भेटी इत्यादी देऊन त्यांचा सन्मान करावा व ५, ७ अथवा १० सुवासिनींनी, जितकी वर्षे वय तितके, दीप घेऊन ओवाळावे. यजमानाला सर्वांनी दीर्घायुष्य आणि अखंड आरोग्य चिंतून शांतीची समाप्ती करावी. ब्राह्मणभोजनाचा संकल्प करुन नंतर दक्षिणा द्यावी व आशीर्वाद घ्यावा. सर्व कर्म पूर्ण झाल्यावर यजमानाने श्रीविष्णूचे तीन वेळा स्मरण करावे. ( प्रार्थना करावी. )
सर्व शांतींची सर्वसामान्य यादी
हळद, पिंजर, गुलाल, रांगोळी प्रत्येकी द्रोणभर. पंचामृतपूजासाहित्य. पंचगव्य साहित्य - गोमूत्र, गोमय वगैरे. पंचपल्लव - आंबा, वड, पिंपळ, उंबर, पायरी प्रत्येकी थोडे. १० पाट, २ चौरंग, ३ कलश, ३ ताम्हने, समई, दिवा, १५ नारळ, तांदूळ, १०० सुपारी, ५० विडयाची पाने. वस्त्रे - १ धोतर, २ पंचे, २ खण, २ रुमाल व अभिषेक वस्त्रे, होमाकरता वाळू किंवा शुद्ध माती. शेणी, सालपा, फुंकणी, तूप, जानवी जोड, चरु ( शिजलेला भात ) २ किलोचा, तीळ, भाताच्या लाह्या, पिकलेली केळी वगैरे फळे. समिधा - रुई, पळस, खैर, आघाडा, पिंपळ, शमी प्रत्येकी २०, दूर्वा ( भरपूर ), उंबर १५०. हवन संख्येनुसार कमीजास्त. सुवर्णप्रतिमा. बळीकरिता - २ परडया किंवा विर्या, बळी नेण्याकरता गडी; मोहोर्या, उडदाची डाळ, प्रत्येकी थोडया, काशाची वाटी. अहेराचे सामान. दशदाने - गो, भू, तिल, हिरण्य, वस्त्र, धान्य, गुड, मीठ, लोह, ऊर्णावस्त्र यांच्याबद्दल निष्क्रयद्रव्य, सुवर्णदान दशगुंजा, गोप्रदान, खर्चाकरिता द्रव्य. अग्निसिद्धी प्रायश्चित - ब्राह्मण कमीतकमी ६, आचार्य दक्षिणा, मंगल वाद्य, तोरण. ज्या वयाची शांती असेल तितके पिठाचे दिवे.
ही सर्वसामान्य यादी आहे. हवनसंख्येनुसार समिधा - तूप, चरु यांचे प्रमाण कल्पनेनुसार ठरवावे. साठीशांतीसाठी तीळ, दूर्वाहवन विशेष आहे. भीमरथीमध्ये केवळ तीळच आहेत. सहस्त्रचंद्रदर्शनमध्ये केवळ आज्य.