जर लहानात लहान काम सहाय्यकाशिवाय एकटा कोणी सहजपणे करु शकत नाही. तर महान अभ्युदय असणारे राज्यकार्य एकट्याने चालविणे कसे सहज शक्य आहे ? ही गोष्ट पूर्णपणे असंभव आहे. ॥१॥
सर्व विद्यामध्ये कुशल आणि उत्तमप्रकारे मंत्रणा करणारा एकट्या राजाने मंत्री लोकांच्या सल्ल्याशिवाय कसल्याही व्यवहारात निर्णय घेवू नये. ॥२॥
समजुतदार राजा नेहमी सभ्य अधिकारी, मंत्री आणि निरनिराळ्या मंडळांचे प्रमुख यांच्या मताशी स्थिर रहातो. कधीही आपल्या एकट्याच्या मतावर स्थिर नसतो म्हणजे आपल्या एकट्याच्या मतानुसार कुठले कार्य करीत नाही. ॥३॥
स्वातंत्र्य मिळालेला राजा आपलीच मनमानी करु लागला तर त्याच्या हातून अनर्थ होतो. अशा राजाचे राज्य ताबडतोब तुकडे तुकडे होते आणि त्याचे मंत्री इत्यादि लोक त्याच्यापासून दूर होतात. ॥४॥
जो कुल, गुण आणि शील यांनी मोठा आहे, आणि शूर, राजभक्त, प्रियभाषी, हिताचा उपदेश देणारा, क्लेश सहन करणारा, नेहमी धर्मानुसार चालणारा, कुमार्गगामी राजाला आपल्या बुद्धिच्या शक्तीने कुमार्गावरुन दूर करण्यास समर्थ असणारा, पवित्र आचार - विचार असणारा, मत्सर, काम, क्रोध, लोभ आणि आळस ह्या गोष्टी नसलेला असावा. ॥५॥६॥
कुसकट सहकार्यांमुळे राजा आपल्या धर्माला आणि राज्याला मुकतो. जसे दैत्य लोक आणि दुर्योधनादि राजे लोक शूर आणि शक्तीशाली असूनही कुत्सित कर्म केल्यामुळे आणि कुत्सित सहकार्यांची संगत केल्याने नष्ट झाले. म्हणून राजाला अभिमान नसलेल्या आणि चांगल्या सहकार्यांची गरज असते. ॥७॥८॥
युवराज आणि मंत्रीगण हे दोघेजण क्रमानुसार राजाचे उजवे आणि डावे हात, डोळे आणि कान मानले जातात. ॥९॥
म्हणून राजा ह्या दोघांशिवाय हात, कान आणि डोळे ह्याशिवाय असणारा समजला जातो. म्हणून ह्या दोघांची नेमणूक विचारपूर्वक करावी. योग्य नेमणूक न झाल्यामुळे दोघेजण म्हणजे राजा आणि युवराज, मंत्री नाश पावतात. ॥१०॥
राजाने मंत्रीगणांच्या मदतीने मुलांना सुंदर नीतिशास्त्रांत कुशल करावे. धनुर्वेद विद्येमध्ये विशारद, नेहमी क्लेश सहन करण्यास समर्थ, भाषेने शिक्षा देण्यात कठोर असणारा, विरतेने युद्ध करण्यात निष्णांत, सामान्यपणे सर्व कला आणि विद्या जाणणारा, उत्तम शिक्षित आणि विनम्र असणार्यालाच युवराज बनवावे. ॥११॥१२॥
आणि त्यांना सुंदर कपड्यांनी सुशोभित, चांगल्या खेळांत आवड, चांगल्या आसनावर बसवून सन्मानित करुन, चांगले भोजन देऊन त्यांचे पालन पोषण करुन युवराजपदासाठी योग्य झाले की त्यांना युवराज बनवावे. कारण ज्या राजवंशाचे युवराज अशिक्षित असतात ते राज्य लवकरच नष्ट होते. ॥१३॥१४॥
दुष्ट आचरण करणार्या राजपुत्राचा त्याग करणे योग्य नाही. कारण क्लेश झालेला तो शत्रूचे सहाय्य घेऊन आपल्या पित्याला म्हणजे राजाला मारुन टाकू शकतो. ॥१५॥
ज्याप्रमाणे ऊच्छृंखल दुष्ट हत्तीला क्लेश देऊन सुखाने बांधता येते. त्याचप्रमाणे एखादा राजपुत्र जुगारादि व्यसनाने फळाला गेला असेल तर त्या व्यसनांच्या आश्रयदात्यांकडून त्याला क्लेश द्यावेत नंतर समजवावे आणि चांगल्या रस्त्यावर आणावे. ॥१६॥
जे राजवंशाचे लोक अत्यंत दुष्ट आचरण करणारे असतात त्यांना प्रयत्नपूर्वक वाघाच्या तोंडी द्यावे. शत्रू किंवा छळ करुन राज्याच्या उन्नतीसाठी मारुन टाकावे. असे नाही केले तर हे लोक राजा आणि प्रजा यांच्या नाशास कारणीभूत होतात. ॥१७॥
बरीच उन्नती झाली तरी पित्याच्या आज्ञेप्रमाणे वागावे. कारण मुलाला पित्याची आज्ञा पाळणे हे परम भूषण असते. ॥१८॥
पित्याच्या आज्ञेप्रमाणे परशुरामाने आपल्या आईची हत्या केली आणि राम वनांत गेले. परंतु पित्याच्या तपोबलाने परशुरामाच्या आईचे पुन्हा पुनरुज्जीवन आणि रामाला पुनः राज्याचा लाभ झाला. कारण शाप देणे आणि अनुग्रह करणे ह्या दोन्हीमध्ये जो समर्थ आहे त्याची आज्ञा सर्वतोपरी मान्य होते. ॥१९॥२०॥
आपल्या भावांजवळ आपल्या मोठेपणाचे प्रदर्शन करु नये. कारण हिस्सा मिळण्यास योग्य अशा भावांचा अपमान करुन दुर्योधन नष्ट झाला. ॥२१॥
राजपुत्र लोक पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याने उत्तम पद मिळूनही भ्रष्ट होतात. जसे ययाति राजाचे पुत्र यदु आदि राज्यभ्रष्ट आणि विश्वामित्राचे पुत्रगण पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या शापाने कुत्र्याचे मांस खाणारे म्हणून समजले जाऊ लागले. ॥२२॥
म्हणून मुलाने नेहमी शरीर, वाणी आणि मन या सर्वानी पित्याच्या सेवेत तत्पर रहावे. ज्या कर्माने पिता प्रसन्न होईल ती कर्मे नियमित करावी. त्याचप्रमाणे ज्या कर्मामुळे पित्याला थोडेसे दुःख होईल असे कुठलेच कर्म करु नये. ॥२३॥२४॥
ज्याच्यावर पित्याचे प्रेम आहे, त्याच्याशी आपणही प्रिय व्यवहार करावा. ज्याचा पिता द्वेष करतो, त्याच्याशी आपणही द्वेषाने वागावे. म्हणजे जो पित्याच्या विरुद्ध वागणारा असे दिसून येते त्याच्याजवळ व्यवहारच करु नये. ॥२५॥
हेर किंवा चुगली करण्याच्या दोषामुळे जर पिता उलट वागू लागला तर त्याला काळवेळ पाहून एकांतात समजवावे आणि उलट सूचना देणार्या चुंगलखोराला किंवा हेराला पित्याकडून फार मोठी शिक्षा करावी. ॥२६॥२७॥
आपली विद्या, कर्म आणि शील या गुणांनी प्रेमाने प्रजेचे मनोरंजन करुन, दान आणि सत्व गुणांनी संपन्न होऊन प्रजेला ताब्यात ठेवावे. ॥२८॥
सोन्याची परीक्षा करणारा मनुष्य सोन्याला वितळवून त्याची परीक्षा करतो. त्याचप्रमाणे कर्म, सहवास, चरित्र, कुळ इत्यादि गुणांनी पगारदार नोकरांची नेहमी परीक्षा करावी. ह्यानंतर तो विश्वासास योग्य आहे असे वाटले तरच त्याच्यावर विश्वास ठेवावा. केवळ जात आणि कुळ ह्यावरुन परीक्षा करु नये. ॥२९॥३०॥
ज्याप्रमाणेकर्म, शील आणि गुण ह्यावरुनच मनुष्य पूजनीय होतो. त्याप्रमाणे जात आणि कुळ यामुळे नाही. कारण श्रेष्ठता जात आणि कुळ यानी होत नाही. कुळ आणि जात यांचा विचार फक्त विवाह आणि भोजन ह्याठिकाणी केला जातो. ॥३१॥
सत्य बोलणारा, गुणवान, उच्च वंशात उत्पन्न असलेला, धनवान, निर्दोष कुळात जन्मलेला, सुशील, उत्तम कर्म करणारा, आळस नसलेला, ज्याप्रमाणे स्वतःचे काम करतो त्यापेक्षा अधिक कायिक, वाचिक आणि मानसिक चारपट प्रयत्नाने मालकाचे कार्य करणारा, आपल्या पगारावर संतुष्ट रहाणारा, गोड बोलणारा, कार्य करण्यात चतुर, पवित्र मनाचा, कार्य करताना स्थिर विचार ठेवणारा, परोपकार करण्यात निपुण, अपकारापासून दूर रहाणारा, मालकाजवळ अपराध करण्यास प्रवृत्त, त्याची मुले आणि पिता यांच्यावरही नजर ठेवून असलेला, मालकाचा कोणी अपराध करणार नाही असा प्रयत्न करणारा, अन्यायाच्या मार्गाने चालणार्या मालकाला सत्पथावर चालविण्यासाठी प्रयत्नशील, मालकांच्या बोलण्यावर आक्षेप न करणारा, त्याच्या काही त्रुटी पाहूनही दुसर्यासमोर त्या प्रदर्शित न करणारा, चांगल्या कामाना लवकर आणि वाईट कामाना वेळ लावून करणारा, मालकाची पत्नी, मुले आणि मित्र यांच्या दोषांकडे कधी न पहाणारा, मालकाचे नातेवाईक, पत्नी, पुत्र इत्यादिंबरोबर मालक जसा आदर सन्मान करतो त्याचप्रमाणे बुद्धि ठेवून त्या सर्वांजवळ व्यवहार करणारा, स्वतःआपली प्रशंसा न करणारा, मालक किंवा त्याचे नातेवाईक यांचेबरोबर स्पर्धा किंवा त्यांच्या गुणांमध्ये दोषारोप किंवा निंदा न करणारा, दुसर्याचे अधिकार मिळविण्याची लालसा न ठेवणारा, निःस्पृह असून नेहमी प्रसन्न रहाणारा, मालकासमोर त्याने दिलेले कपडे आणि दागिने नेहमी वापरणारा, पगारानुसार आपला खर्च करणारा, इंद्रियांचे दमन करणारा, दयाळू, शूर आणि मालकाचे अनुचित कार्य एकांतात त्याला सांगणारा सेवक श्रेष्ठ समजला जातो. ह्या उलट आचरण करणार्या नोकराला निंद्य समजले जाते. ॥३२॥३३॥३४॥३५॥३६॥३७॥३८॥३९॥४०॥
सेवकाला योग्य वेतन मिळविणारा, नेहमी अपराध केल्यामुळे शिक्षा द्यावा लागणारा, शठ, भित्रा, लोभी, समोर गोड बोलणारा, दारु पिऊन बेशुद्ध होणारा, शिकार इत्यादिंचा व्यसनी, रोगी, लाच घेणारा, जुगारी, नास्तिक, दाम्भिक, खोटे बोलणारा, गुणांमध्ये दोष काढणारा, अपमानित होणारा, कठोर बोलण्याने मनाला त्रास मिळालेला, शत्रूचा मित्र किंवा सेवक, पूर्वी असलेली शत्रूता मनात जपून ठेवणारा, अत्यंत क्रोधी, न विचारुन अचानक कार्य करणारा, धर्महीन असणारा अशी माणसे सुंदर सेवक होत नाहीत. म्हणजेच ही सर्व निन्द्य सेवकांची लक्षणे आहेत. ह्या प्रकाराने थोडक्यात चांगले आणि वाईट सेवकांची लक्षणे सांगितली आहेत. ॥४१॥४२॥४३॥४४॥
यथाविधी मंत्रांचे अनुष्ठान करुन कार्य सिद्ध करणारा, तीनही वेदांना ( ऋक्, यजु, साम ) जाणणारा, कार्य करण्यात तत्पर असणारा, जितेन्द्रिय, क्रोधाला जिंकणारा, लोभ आणि मोह यांना दूर ठेवणारा, वेदांच्या सहा अंगांना जाणणारा. ( व्याकरण, शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष ही सहा अंगे आहेत ) उत्तमप्रकारे धनुर्वेद जाणणारा, धर्म आणि अर्थ समजून त्याच्या भीतिमुळे राजासुद्धा धर्म आणि नीति यानुसार वागतो ते नीतिशास्त्र शास्त्रार्थ करण्याची कला आणि व्यूहरचनेमध्ये कुशल व्यक्ती पुरोहित असावी. पुरोहिताला आचार्य म्हणूनही म्हणतात. असा मनुष्य शाप आणि वर देण्यास समर्थ असतो. ॥४५॥४६॥४७॥
वर सांगितलेल्या गुणांनीयुक्त माणसे ( पुरोहित, प्रतिनिधी, प्रधान, सचिव, मंत्री, पंडित, वादविवादपटू, सुमंत्रक, अमात्य आणि दूत ) यांच्याबरोबर चांगल्याप्रकारे सल्लामसलत न करता राजा जर राज्यकारभार करीत असेल तर त्या राज्याचा लवकरच नाश होतो आणि राजाला कुमार्गापासून कोणी रोखू शकत नाही. म्हणून ह्या सर्व पुरोहितादि माणसांनी उत्तम देणारे असावे. ॥४८॥
जो राजा पुरोहितादि लोकांना घाबरत नाही त्या राज्याची कधी वृद्धि होत नाही. ज्याप्रमाणे वस्त्र आणि अलंकार यांनी स्त्रिया फक्त सुशोभित होतात. त्याचप्रमाणे चांगला सल्ला न देणारे पुरोहितादि लोक राजाची फक्त शोभा वाढवितात म्हणून त्यांचा राज्याला कसलाच फायदा नसतो. ॥४९॥
ज्यांच्या सल्ल्यानुसार राजाचे राज्य, प्रजा, सेना, कोश आणि राजाचे चलनवलन यांच्यात वाढ होत नाही अशा लोकांच्या सल्ल्याचा काय फायदा ? हे असे सल्ले फुकटच असतात. ॥५०॥
काय करणे योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ह्या संबंधी उत्तम ज्ञान असणारा जो असतो त्याला " प्रतिनिधी " म्हणतात. सर्व प्रकारच्या कार्याचे निरीक्षण करणारा " प्रधान " आणि सैन्याची सर्व संचालन उत्तम प्रकारे करणारा " सचिव " समजला जातो. ॥५१॥
नीतिशास्त्र समजणारा आणि त्यानुसार कार्य करण्यात जो कुशल असतो त्याला " मंत्री " म्हणतात. धर्माच्या तत्वांना जाणणार्यास " पंडित " म्हणतात आणि लोक व्यवहार आणि शास्त्रोक्त व्यवहार जाणतो त्याला " न्यायाधीश " म्हणतात. ॥५२॥
देशकाल आणि लिखाणासंबंधी चांगले ज्ञान असणारा " अमात्य " आणि जमाखर्चासंबंधीचे उत्तम ज्ञान असणार्याला " सुमंत " असे म्हणतात. ॥५३॥
मनांतील भाव आणि कार्याची दिशा समजणारा, उत्तम स्मृती असणारा, देशकाळानुसार कर्तव्य कर्म समजून संधी, विग्रह, वाहन, आसन, वर वर शत्रूला सामिल आहोत असे दाखवून मनातून दुष्मनी ठेवणारा, शक्तीमानांचा आश्रय घेणारा ह्या सर्व विषयांचा विचार करुन बोलण्यात चतुर आणि निडर असतो त्याला दूत समजतात. ॥५४॥
नेहमी जे कार्य अहितकारी असते परंतु ज्या काळात ते करणे उचित आहे हे जाणून राजाला सांगून त्वरीत ते कार्य त्याच्याकडून करुन घेतो व आपणही करतो त्याचप्रमाणे नेहमी हितकर असणारे परंतु ज्यावेळी ते करणे अनुचित आहे ते कार्य राजाला करण्यास मनाई करणारा आणि आपणसुद्धा न करणारा जो असतो त्याला प्रतिनिधीचे कर्तव्य समजतात. ॥५५॥५६॥
राजकार्यात कुठले कार्य सत्य आहे आणि कुठले कार्य असत्य आहे याचा योग्यप्रकारे विचार करणे हे प्रधानाचे कर्तव्य आहे. ॥५७॥
हत्ती, घोडे, रथ, पायी चालणारे सैनिक, सदृढ उंट, परदेशी भाषातील संकेत आणि व्यूहरचना या गोष्टींचा सतत अभ्यास करणारा, पूर्व आणि पश्चिम दिशांच्या देशात जाणार्या, मध्यम आणि उत्तम श्रेणीचे कार्य करणारे, राजचिन्ह, शस्त्र आणि अस्त्र धारण करणारा असे परिचारक गण आणि अस्त्र तसेच अस्त्राना वापरण्याच्या नियमांना जाणणारे किती आहेत, त्यांची स्थिती काय आहे, कार्य करण्यास योग्य असे जुने आणि नवीन घोडेस्वार किती आहेत आणि कार्य करण्यास अयोग्य असे किती आहेत. शस्त्र, तोफेचे गोळे, दारु अशा प्रकारची लढाईसाठी वापरली जाणारी सामुग्री किती आहे. ह्या सर्वांचा विचार ठेवून राजाला ह्या सर्वांची माहिती यथार्थपणे लिहून देणे हे सचिवाचे कर्तव्य आहे. ॥५८॥५९॥६०॥६१॥६२॥
कुठल्या विषयात केव्हा आणि कशाप्रकारे तह, दान, भेद आणि विग्रह केला पाहिजे आणि त्याचे फळ काय असेल, आणि ते अधिक, मध्यम किंवा अल्प असेल याचा विचार करुन राजाला निवेदन करणे हे मंत्र्याचे कार्य आहे. ॥६३॥
न्यायालयात उपस्थित राहून तेथील सभासदांजवळ मिळून मिसळून राहून साक्षीदार आणि कारकून यांजकडून सत्य किंवा असत्य वागणार्या मनुष्य आणि आपल्या स्वतःलाच मनात उपस्थित झालेल्या विचारांमध्ये कोण साक्षीदार आणि लेखक यांच्या अनुपस्थित त्याचप्रमाणे व पुष्कळ जणांना मान्य असणारे कुठले प्रमाण उचित आहे यांचे प्रत्यक्ष, अनुमान, दृष्टांत तसेच लोकशास्त्र यांचा विचार करुन त्यानुसार राजाला निवेदन करणे हे न्यायाधिशाचे कर्तव्य असते. ॥६४॥६५॥६६॥
प्रजेमधील कोण प्राचीन आणि नवीन यापैकी कुठल्या धर्माचे पालन करीत आहेत आणि शास्त्राने सांगितलेल्या कुठल्या धर्माचा आदर करीत नाहीत आणि प्रचलित धर्मशास्त्राच्या विरुद्ध कोण आचरण करतात या सर्वांचा विचार करुन जो ह्या लोकात आणि परलोकात सुखाचा धर्म आहे त्याचे निवेदन राजाला करणे हे पंडिताचे कर्तव्य आहे. ॥६७॥६८॥
ह्या वर्षी धान्याचे आणि इतर अस्थाई द्रव्याचे किती उत्पादन झाले आणि त्यापैकी किती खर्च झाले आणि किती शिल्लक आहे याचे राजाला निवेदन करणे हे सुमंताचे कर्तव्य आहे. ॥६९॥७०॥
राज्यात किती नगरे, गांवे आणि जंगले आहेत ? कुठे किती जमिन शेतीसाठी वापरली जाते ? त्यातून किती धान्य मिळते ? कुठे शेतीपासून शेतात वापरात नसलेला किती भाग आहे ? किती जमीन शेती शिवायची आहे ? आपल्या देशात दरवर्षी कर किती मिळतो ? अपराधी लोकाना दंड केल्यामुळे किती द्रव्य मिळते ? शेती न केल्यामुळे नुकसान किती होते ? जंगलातून किती उत्पन्न होते ? खाणीतून किती उत्पन्न होते ? बेवारस द्रव्य किती आहे ? शत्रूपासून मिळविलेले उत्पन्न किती आहे ? चोरांकडून दंड म्हणून मिळविलेले धन किती आहे ? ह्या सर्वांचा योग्यप्रकारे हिशेब करुन त्याचा ताळमेळ राजाला सांगणे हे अमात्याचे कर्तव्य आहे. ॥७१॥७२॥७३॥७४॥
राजाने एकाच अधिकारावर म्हणजे कार्यावर तीन माणसांची नियुक्ती करावी. त्यापैकी एक किंवा दोन बुद्धिमान असेल त्याला मुख्य आणि उरलेल्या दोघांना सहाय्यक बनवावे. तीन, पाच, सात आणि दहा वर्षेपर्यंत त्याचे कामातील निपुणता पाहून त्यानुसार परिवर्तन करावे. ॥७५॥७६॥७७॥
राजाने कुणाही कर्मचार्याला त्याच्या जागेवर जास्त दिवस ठेवू नये आणि अधिकाराला समर्थ आहे हे पाहूनच त्या माणसाला त्या अधिकारावर ठेवावे. ॥७८॥
अधिकाराची मस्ती निर्माण होऊन कोण प्रमत्त होत नाही ? म्हणून एखाद्याला चिरकाल एकाच अधिकार पदावर ठेवू नये. त्या कर्मचार्याचे कार्य करण्यातील सामर्थ्य पाहून एका कामातून काढून दुसर्या कार्याच्या ठिकाणी नियुक्त करावे. ॥७९॥
कार्याचे पालन करण्यामध्ये असणारा सहाय्यक ज्या कार्यामध्ये कुशल वाटतो त्याला त्या कार्यासाठी नियुक्त करावे. जर त्याची समर्थता नसेल तर दुसर्याला नियुक्त करावे. जर एखाद्या कर्मचार्याचा मुलगा पित्याप्रमाणेच ते कार्य करण्यास योग आहे असे आढळले तर त्याला त्या कार्यासाठी नियुक्त करावे. ॥८०॥
जेव्हा एखादा नवा कर्मचारी जसजसा आपल्या कामात योग्य होतो आहे असे वाटेल तेव्हा त्याला वरीष्ठ पदावर नेमावे. उत्तरोत्तर त्याला श्रेष्ठ पदावर चढवावे. शेवटी त्याला प्रधान म्हणून नियुक्त करावे. ॥८१॥
जे लोक राज्यात तपस्या करणारे आहेत. दानशील, वेद आणि स्मृती यांना जाणणारे, पुराणांना जाणणारे, शास्त्रज्ञ, ज्योतिषी, मंत्र तंत्र वेत्ता, वैद्य, कर्मकांड यांचा ज्ञाता, शैवादि धर्मशास्त्र तसेच अशा इतर शास्त्रांना जाणणारा, श्रेष्ठ गुणी, बुद्धिमान आणि जितेंद्रिय असतो त्या सर्वांना मासिक किंवा वार्षिक अनुदान, वेळोवेळी दान आणि सन्मान करुन पूजन करुन त्याचे भरणपोषण करावे. राजाने हे केले नाही तर तो राज्यापासून दूर होतो आणि त्याची सर्वत्र अपकिर्ती होत जाते. ॥८२॥८३॥८४॥
अनेकजणांमधील सर्वांचे कार्य पाहून ते कार्य करण्यामध्ये जो कुशल आहे हे लक्षात आल्यावर त्याला त्या कार्यावर अधिकारी म्हणून नेमावे. ॥८५॥
कुठलेही अक्षर असे नाही की ज्याला काही अर्थ नसतो. वृक्ष वेली यांचा काहीही भाग ( मूळ, फूल इत्यादि ) औषधी नाही असे नाही. त्याचप्रमाणे असा कुठलाही मनुष्य नाही की जो कुठल्यातरी कामात योग्य नाही. परंतु अशा लोकांना यथोचित नीतिच्या कामाला लावणारा पुरुष दुर्लभ आहे. ॥८६॥
जो कर्तव्य आणि अकर्तव्य जाणतो. शास्त्र, शस्त्र, अस्त्र, व्यूहरचना, नीतिविद्या ( शत्रूवर हल्ला करुन जिंकणारा ) ह्या सर्व शास्त्रांत विद्वान, तरुण, शूर, सैनिक शिक्षण घेतलेला, पिळदार शरीराचा, मालकावर पूर्णपणे भक्ति ठेवणारा, मालकाच्या शत्रूचा द्वेष करणारा, शूद्र, क्षत्रिय, वैश्य, म्लेच्छ या सर्व जातींचे आणि नेहमी विजयाची इच्छा करणारा अशा सैनिकास सेनाध्यक्ष किंवा सैनिक बनवावे. ॥८७॥८८॥८९॥
जो विनम्र स्वभावाचा, धनी, व्यवहारात चतुर, धनाचे प्राणाप्रमाणे रक्षण करणारा, अत्यंत कृपण आहे अशा मनुष्याला " कोषाध्यक्ष " पदावर नेमावे. ॥९०॥
जो आपल्या धर्माचरणामध्ये हुशार, देवतांच्या आराधनेमध्ये निष्णात, स्वतः कुठल्याच वस्तूची इच्छा न ठेवणारा, त्याला " देव पूजाध्यक्ष " म्हणजेच सर्व पुजारी लोकांचा प्रमुख नेमावे. ॥९१॥
जो याचकांना विन्मुख पाठवित नाही. स्वतः कसल्याच गोष्टीचा संग्रह करीत नाही. त्याचप्रमाणे दानशील, लोभरहित, गुणीज्ञ, आळस नसलेला, दयाळू, गोड बोलणारा, दान देण्यास योग्य कोण आहे हे ओळखणारा, आणि विनम्र असतो तोच " दानाध्यक्ष " ह्या पदासाठी योग्य असतो. ॥९२॥९३॥
जो लोकव्यवहार जाणतो. विद्वान, सदाचारी आणि सौजन्य आणि दया उदारता ह्या गुणांनीयुक्त, शत्रू आणि मित्र या दोघांमध्ये समभाव राखणारा, धर्मज्ञ, सत्यवादी, आळस नसलेला, क्रोध, काम आणि लोभ ह्यांना जिंकणारा, अशा गुणांनीयुक्त कुठल्याही जातीतील वृद्ध माणसाला सभेचा सदस्य म्हणजेच सभासद बनवावे. ॥९४॥९५॥
जो परोपकारात सतत गुंतलेला असतो, दुसर्याचे मर्म म्हणजे मर्माला विदीर्ण करणार्या दोषांना प्रकाशित करीत नाही, कोणाशी मत्सरतेने वागत नाही, गुणग्राही, ज्या विषयाची परीक्षा करावयाची त्या विषयाचा माहितगार असतो त्यालाच " परीक्षक " बनवावे. ॥९६॥
ज्या प्रमाणे बागकाम करणारा माळी खूप प्रयत्न करुन वृक्षांना वाढवितो आणि त्यापासून मिळणार्या फुलांचा आणि फळांचा संग्रह करतो त्याप्रमाणे प्रजेकडून राजाचा भाग ( कर वगैरे ) मिळविणारा असतो त्यालाच " कराधिकारी " बनवावे. ॥९७॥
जो गणना करण्यात कुशल, देशातील भाषातील फरक उत्तमप्रकारे समजणारा, संदेह निर्माण न करता समजायला योग्य आणि स्पष्ट लिहिणारा असतो त्यालाच " लेखक " ह्या पदावर नियुक्त करावे. ॥९८॥
जो शस्त्र आणि अस्त्र चालविण्यात निपुण, सुदृढशरीराचा, आळस नसलेला आणि नम्रतापूर्वक योग्यतेनुसार लोकांना हाक मारुन राजाजवळ नेणारा असतो त्याला " द्वारपाल " नियुक्त करावे. ॥९९॥
विकणार्याच्या मूळ धनात ज्याने जराही कमी होणार नाही असाच कर जो व्यापारी लोकांकडून वसूल करणारा असतो त्याला " शौल्किक " म्हणजेच कर घेणारा अधिकारी म्हणून नियुक्त करावे. ॥१००॥
जो नेहमी जप, उपवास, नियम, शास्त्रोक्त कर्म आणि ध्यान ह्यामध्ये मग्न असतो, इंद्रिय दमन करणारा असतो, क्षमाशील, निःस्पृह असणारा असतो त्याला " तपोनिष्ट " म्हटले जाते. ॥१०१॥
जो याचकाने मागितल्यावर आपले धन, स्त्री आणि मुलेबाळे हे सर्व देऊन टाकतो आणि स्वतःजवळ काही ठेवीत नाही तो " दानशील " म्हटला जातो. ॥१०२॥
जो वेद, स्मृति, आणि पुराणे यांचे अध्ययन आणि अध्यापन करण्यात समर्थ असून त्या सर्वांचा नियमित अभ्यास करणारा असतो तो " श्रुतज्ञ " म्हणून ओळखला जातो. ॥१०३॥
जो साहित्य शास्त्रात निपूण, संगीत जाणणारा, सुंदर आवाज असणारा, सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वन्तर, वंशातु चरित्र ह्या पाच विषयांना जाणणारा असतो त्याला " पौराणिक " असे म्हटले जाते. ॥१०४॥
जो मिमांसा, तर्क, वेदांत, शब्दशासन हे जाणतो ह्या विषयामध्ये तर्क करुन यथार्थरुपात त्यांना समजविण्यात समर्थ असतो त्याला " शास्त्रविद् " म्हणतात. ॥१०५॥
जो संहिता, होराशास्त्र, गणित यांना यथार्थपणे जाणतो आणि त्रिकालज्ञ असतो त्याला " ज्योतिर्विद् " म्हणतात. ॥१०६॥
जो मुळापासून मंत्रांचे गुण आणि दोष जाणतो आणि मंत्राचे नियमित अनुदान करण्यामध्ये गुंतलेला असतो, देवतांची सिद्धि प्राप्त करणारा असतो त्याला " मांत्रिक " म्हणतात. ॥१०७॥
जो हेतू ( कारण ), लिंग ( लक्षण ), तसेच औषधीज्ञान याच्या माध्यमातून रोगाचे यथार्थ निदान करुन साध्य तसेच असाध्य ओळखून चिकित्सा करतो त्याला " वैद्य " म्हणतात. ॥१०८॥
जो श्रुति आणि स्मृती याच्यापासून भिन्न अशा पुराणादिमध्ये सांगितल्याप्रमाणे मंत्रानुष्ठान करुन देवतांचे पूजन अत्यंत हितकर समजून त्या पद्धतीनुसार प्रयत्न करतो त्याला " तांत्रिक " म्हणतात. ॥१०९॥
अनन्य भावाने मालकाची भक्ती करणारा, धर्मनिष्ठ, सुदृढ शरीराचा, बाल्यावस्था संपलेला म्हणजे तरुण, नेहमी सेवा करण्यात कुशल, मालकाचे कुठलेही काम उत्तम असो नाहीतर मलमूत्रादि साफ करण्याचे नीच कार्य असो सर्व कामांसाठी सदैव तयार असणारा, मालकाच्या आज्ञेनुसार काम करणारा असतो अशा माणसाला राजाचा " परिचारक " समजावे. ॥११०॥१११॥
जो शत्रू आणि प्रजा यांच्या व्यवहाराला जाणणारा, सर्व गोष्टी ऐकून ठीक रुपात सांगणारा असा जो असतो त्याला गुप्तचर म्हणून नियुक्त करावे. ॥११२॥
सत्य आणि परोपकार यांना सर्व पुण्यकर्मात श्रेष्ठ समजले जाते म्हणून ह्या गुणांनीयुक्त आज्ञेनुसार खरे काय ते जाणून राजकार्य करणार्या सेवकाला राजाने स्वतःजवळ ठेवावे. ॥११३॥
सर्व पापांमध्ये फार मोठे पाप म्हणजे हिंसा आणि खोटे बोलणे आहेत. म्हणून या दोन्हीमध्ये तरबेज असणार्या सेवकांना आपल्याजवळ ठेवू नये. ॥११४॥
ज्यावेळी जे कार्य करण्यास आणि जी गोष्ट बोलण्यास योग्य वेळ आहे हे जो जाणतो हे राजाला समजते. आणि अशी गोष्ट पटकन समजून जो ती गोष्ट बोलतो किंवा त्याप्रमाणे कार्य करतो तो खरा सुसेवक असतो. आणि त्याचा योग्यप्रकारे आदरही केला जातो. ॥११५॥
तो रात्रीच्या शेवटच्या काळात उठून त्या दिवशी काय करावयाचे आहे त्या कामांचा विचार करुन मलमूत्रांचा त्याग करुन विष्णुचे स्मरण करता करता स्नान करतो किंवा पटकन साधारणतः दीड तासात नेहमीप्रमाणे सकाळची सर्व दैनिक कामे पुरी करुन आपल्या कार्यालयात जाऊन काय करावयाचे आणि काय नाही याचा विचार करुन नंतर स्नान करतो. ॥११६॥११७॥
द्वारपालाचे प्रथम कर्तव्य म्हणजे दरवाजावर उभे राहून राजाच्या आज्ञेशिवाय आत येणार्याना आंत येऊ न देणे आणि त्याने सांगितलेल्या कामाची सूचना राजाला देऊन जर राजाची त्याला आंत आणण्याची आज्ञा मिळाली तर त्याला आत जाण्याचे सांगावे. ॥११८॥
ऐकण्यास प्रिय, सत्य आणि हितकारक, धर्म आणि अर्थ यांनी युक्त असे वचन नेहमी राजाला सांगतो आणि उदाहरणे देऊन नेहमी राजाला हिताच्या गोष्टी समजावतो तो हितकारी सेवक समजला जातो. ॥११९॥
जो ज्या कामावर नेमला गेला आहे. ते काम करण्यास नेहमी तत्पर आहे. दुसर्या कुणाचे अधिकार मिळविण्याची इच्छा न करणारा आणि कुणाचाही मत्सर न करणारा असतो तो हितकारी सेवक समजावा. ॥१२०॥
कुणाच्या कसल्या त्रुटीवर लक्ष न देता आपल्या शक्तिनुसार त्याची त्रुटी दूर करावी. कारण दुसर्यावर उपकार करण्यापेक्षा जास्त मैत्री करणारे दुसरे काहीच काम नाही. ॥१२१॥
कोणाला " मी तुझे काम करतो " असे सांगून त्याच्या कामात विलंब करु नये. ते काम करण्यास आपण समर्थ असू तर ते काम त्वरीत पुर्ण करावे. दीर्घकाळ त्याला आशेने ताटकळत ठेवू नये. ॥१२२॥
कोणाचे अन्न आदरपूर्वक एकवेळाच भले खाल्ले असले तरी त्याच्या भल्यासाठी नेहमी चिंतन करणे योग्य असते. मग आपले पालन पोषण करणार्याचे हितचिंतन अवश्य केले पाहिजे. ॥१२३॥
मालकाची वेळेवर सेवा केल्याने गौण असणारा सेवकसुद्धा मुख्य सेवक बनतो. परंतु सेवेमध्ये आळस करणारा मुख्य सेवक गौण सेवकही बनतो. ॥१२४॥
गुप्तरुपाने विचार करुन ठरविलेले कुठलेही राजकार्य आपल्या मित्रालाही कधी सांगू नये. आपला पगार सोडून राजाच्या कोठल्याही धनावर राजाने दिल्याशिवाय इच्छाही करु नये. ॥१२५॥
राजाच्या आज्ञेशिवाय कुठलेही काम मधेच किंवा ते पूर्ण होण्याअगोदर त्याची मजुरी मिळण्याची इच्छा करु नये. आणि पैशाच्या लोभाने कुणाचे चांगले काम नष्ट करु नये. ॥१२६॥
संकटाचा काळ आल्यावर आपली पत्नी, पुत्र, धन तसेच प्राण देऊनही राजाचे रक्षण करावे. लाच खाऊन राजाला वस्तुस्थितीचा विपरीत सल्ला देऊ नये. ॥१२७॥
योग्य ती शिक्षा न देणारा किंवा नेहमी फार मोठा दंड देणार्या राजाला राज्याच्या रक्षणासाठी एकांतात चांगल्याप्रकारे समजावणे योग्य आहे. ॥१२८॥
ज्यामुळे केवळ राजाचे हित आहे परंतु प्रजेचे अहित आहे असे कार्य राजाला समजावून त्याच्याकडून करुन घेऊ नये. कारण नवीन कर तसेच पथकर वगैरे लावल्यास प्रजा उद्विग्न होते. ॥१२९॥
चांगल्या कुळात जन्मलेला राजासुद्धा जर गुण, नीति तसेच शक्ती याच्या सहाय्याने द्वेष करणारा आणि अधार्मिक असेल तर त्याला राजाला नष्ट करणारा आहे असे समजून त्याला गादीवरुन उतरवले पाहिजे. ॥१३०॥
सेवकाला लिहिल्याशिवाय कुठलीही आज्ञा राजाने देऊ नये. त्याचप्रमाणे लेखी आज्ञा नसेल तर सेवकाने तिचे पालनही करु नये. भ्रम होणे हा मानवी स्वभाव आहे. ह्या भ्रमाचे निवारण करण्यासाठी लेख फार मोठे प्रमाण सिद्ध होते. ॥१३१॥
जो राजा लिहिल्याशिवाय आज्ञा देतो तो आणि जो सेवक न लिहिलेल्या आज्ञेचे पालन करतो तो, हे दोघेजण म्हणजे राजा आणि सेवक चोर असतात. ॥१३२॥
जी आज्ञा राजमुद्रेने केलेली आहे ती राजाज्ञा आहे म्हणजे ती वस्तूतः राजाच आहे. परंतु राजा राजा नाही. ॥१३३॥
राजाने दिलेल्या लेखी लेखपत्राचे स्मरण देणारे एक " स्मृतिपत्र " आणि पावती राखून ठेवावी. कारण बराच काळ गेल्यावर विस्मृती किंवा भ्रम होणे मनुष्याला स्वाभाविक आहे. ॥१३४॥
ज्यामध्ये यथायोग्य बोललेला विषय आणि त्याचे उत्तर तसेच अंतिम निर्णय यासंबंधीचा लेख लिहिलेला असतो त्याला " जय पत्रक " म्हणतात. ॥१३५॥
ज्या लेखाने मांडलिक राजाना अथवा राष्ट्र पालन करणार्या अधिकार्यांना जो आदेश राजा देतो त्या लेखाला " आज्ञा पत्र " म्हणतात. ॥१३६॥
ज्या पत्रात असे लिहिलेले आहे की, " हे सेवकांनो आणि प्रजेतील लोकांनो ! तुम्ही माझे बोलणे ऐका आणि माझ्या आज्ञेप्रमाणे निश्चित केलेले काम करा " असे आपल्या हस्ताक्षरात सही करुन आणि दिनांक वगैरेचा उल्लेख करुन लिहिलेले पत्र " शासन पत्र " समजले जाते. ॥१३७॥
कोणाला घर वगैरे दानरुपाने दिल्यावर त्या लेखात " याचे कोणी खंडण किंवा अपहरण करु नये " असे लिहून जनतेसमोर घोषित करणारे पत्र " दानपत्र " समजले जाते. ॥१३८॥
घर, शेत इत्यादि योग्य किंमत देऊन खरेदी करुन त्या विषयासंबंधीचा जो लेख केला जातो त्याला " क्रय पत्र " ( खरेदीखत ) म्हणतात. ॥१३९॥
व्याजावर घेतलेल्या पैशासाठी साक्षीदारांच्या समक्ष योग्य प्रकारे स्वतः लिहिलेला किंवा लिहून घेतलेला जो लेख असतो त्याला पंडित " ऋणलेख्य " असे म्हणतात. ॥१४०॥
लावलेला अपवाद प्रमाणित न झाल्याने दूर झाल्याने, प्रायश्चित्त करुन साक्षीदारांसमोर त्याच्या सह्या घेऊन विद्वानानी जो लेख लिहून प्रमाण म्हणून दिलेला असतो त्याला " शुद्धिपत्र " म्हणतात. ॥१४१॥
किंमत म्हणून जे दिले जाते त्याला " प्रतिदान " म्हणतात. सेवा किंवा शूरता यामुळे प्रसन्न होऊन जे दिले जाते त्याला " पारितोषिक " म्हणतात. पालन पोषणासाठी नोकरांना जे दिले जाते त्याला " वेतन " म्हणतात. ॥१४२॥
धान्य, वस्त्र, घरे, बगिचा , गाई, हत्ती इत्यादि तसेच रथासाठी आणि विद्या आणि राज्य यांच्या उपजीविकेसाठी त्याचप्रमाणे धन इत्यादिंची प्राप्ती आणि सर्वांचे रक्षण करण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला " उपभोग्य " म्हणतात. ॥१४३॥१४४॥
ज्या ठिकाणी जसा व्यवहार असेल तसाच व्यवहार राजाने त्या ठिकाणी केला पाहिजे. ॥१४५॥
संसार करण्यासाठी ज्या पदार्थांचा जितका खर्च केला जातो त्या खर्चाला " मूल्य " म्हणतात. ॥१४६॥
पदार्थाची सुलभता किंवा दुर्लभता यावरुन अथवा माल चांगला आहे का खराब आहे हे पाहून त्याचे मूल्य विक्रेत्याच्या इच्छेनुसार कमी अधिक होते. ॥१४७॥
अत्यंत कमी वेतन मिळणारे सेवक राजा आपले स्वतःचे शत्रु बनवितो. मिळणार्या पगारात पोट न भरल्याने राजाचे काम सोडून दुसर्याचे काम करुन पोट भरतात आणि सदैव राजाचे दोष शोधीत असतात, त्याचे धन पळवितात आणि प्रजेला लुटतात. ॥१४८॥
मंद ( हळू हळू काम करणारा ), मध्य ( हळू नाही आणि जलद नाही असे काम करणारा ) आणि शीघ्र ( जलद काम करणारा ) असे सेवकांचे तीन प्रकार आहेत. ह्या सर्वांना क्रमानुसार समा, मध्या आणि श्रेष्ठा नावाच्या तीन प्रकाराचे वेतन देणे योग्य असते. ॥१४९॥
नोकरांना दररोज आपले घरकाम करण्यासाठी दिवसा एक प्रहर ( तीन तास ) आणि रात्री तीन प्रहर ( नऊ तास ) सुट्टी द्यावी. रोजंदारीवर असणार्या नोकरांना दिवसा अर्धा प्रहर ( दीड तास ) सुट्टी द्यावी. ॥१५०॥
पाच वर्षे नोकरी झालेल्या नोकराला आजारपणात एक चतुर्थांश कमी पगार द्यावा आणि जर तो एक वर्षपर्यंत आजारी राहिला तर त्याला तीन महिन्याचा पगार द्यावा. आजारपणाचे जसे कमी अधिक प्रमाण असेल त्याप्रमाणे पगारात कमी अधिकपणा असावा. ॥१५१॥
दीर्घकाळपर्यंत ( एक वर्षापेक्षा जास्त ) जर आजारी असेल तर त्याला सहा महिन्याचा पगार द्यावा. ह्यापेक्षा जास्त देऊ नये. एकच आठवडा कोणी आजारी असेल तर त्याचा पगार मुळीच कापू नये. ॥१५२॥
एक वर्ष पर्यंत सुट्टी घेणार्या नोकराने त्याचा प्रतिनिधी म्हणून सांगितलेल्या त्याच्याबदली कामावर ठेवावे. अत्यंत योग्य असा सेवक आजारी पडला तर नेहमी त्याला अर्धा पगार द्यावा. ॥१५३॥
ज्या नोकराने चाळीस वर्षे काम केले आहे त्याला निवृत्त करुन आजीवन निवृत्ती वेतन म्हणून अर्धा पगार द्यावा. त्याचप्रमाणे त्याची मुले जोपर्यंत काम करण्यास योग्य होत नाहीत तोपर्यंत त्यांना नोकराच्या अर्ध्या पगाराचा अर्धा भाग वेतन द्यावे. ह्याचप्रमाणे त्याची पत्नी आणि अविवाहीत कन्या यांनाही पेन्शनचा अर्धा भाग द्यावा. ॥१५४॥१५५॥
मालकाचे काम करताना जर नोकराला मृत्यु आला तर त्याच्या मुलाला त्याचा पगार द्यावा. जोपर्यंत तो काम करण्यास योग्य होत नाही तोपर्यंत असा पगार द्यावा किंवा तो मोठा होऊन त्याच्या गुणांना पाहून त्यानुसार पगार देऊन त्याला कामावर नेमावे. ॥१५६॥
वेळेवर पगार दिल्याने नोकर संतुष्ट होतो. सन्मान आणि गौरवाने गोड शब्दात त्याला समजावले तर नोकर मालकाला कधी सोडीत नाही. ॥१५७॥
जो फक्त धन अपेक्षितो तो " अधम " जो धन आणि मान दोन्ही अपेक्षितो तो " मध्यम " आणि जो फक्त मान अपेक्षितो तो " उत्तम " समजला जातो. कारण मोठ्या लोकांचे धन म्हणजे मान ( आदर ) हाच आहे. ॥१५८॥
जो कुणाच्या उपकारांना मानीत नाही, उत्तमातील उत्तम सेवा देऊनही संतुष्ट होत नाही. काही बोलत असताना नोकराचे स्मरण करीत नाही उलट त्यावर शंका करतो, खोटे खोटे बोलतो आणि मन दुखविणारी भाषा बोलतो अशा प्रकारच्या राजाला सेवकाने सोडून द्यावे त्याची नोकरी करु नये. ॥१५९॥
ह्या प्रकाराने युवराजाचे लक्षण आणि कर्मे संक्षेपाने सांगितली आहेत. ॥१६०॥