शुक्रनीति - अध्याय तिसरा

प्रस्तुत नीति शुक्राचार्यांनी न लिहिता मूळ नीति भगवान् श्रीशंकरांनी लिहिली आहे.


ह्या नंतर म्हणजे युवराजादिंचे लक्षण सांगितल्यानंतर सर्वांसाठी नीतिशास्त्राचे लक्षण करतो. सर्व प्राण्याना काहीतरी करावे असे वाटते त्यामागील कारण आत्मसुख मिळावे हे असते. ॥१॥

धर्माशिवाय सुख नाही. म्हणून धर्मामध्ये तत्पर असावे. धर्म, अर्थ आणि काम ह्या तिघांना " त्रिवर्ग " म्हणतात. ह्यांच्या शिवाय कुठलेही कार्य करु नये. वरील त्रिवर्गाच्या विरोधापासून दूर राहून सर्व कामात ह्या त्रिवर्गांचे अनुसरण करावे म्हणजे धर्म, अर्थ, काम ह्यांचे पालन कधी सोडू नये. ॥२॥

मलमूत्रांचा वेग रोखून ठेऊन कुठलेही कार्य करु नये. त्या वेगांना बलपूर्वक कधीही रोखू नये. त्याचप्रमाणे दुर्जनांपासून दूर राहून कल्याणकारी कार्य आणि मित्रांना भक्तिपूर्वक सांभाळावे. ॥३॥

हिंसा ( कोणाची हत्या किंवा कष्ट देणे ), सेह ( चोरी ), अन्यथा काम ( अवैधरितीने केलेले मैथून ) पैशूना ( चुंगलखोरी ) निष्ठुर भाषण, खोटा व्यवहार, भोग तोडीची भाषा वापरुन मन दुखावणे, अविनय, नास्तिकता, अवैध आचरण हे दहा प्रकार पापकर्म म्हणून समजले जातात. त्यांना शरीर, वाणी आणि मन ह्यापासून दूर ठेवावे. ॥४॥

जरी मनुष्याने यथाशक्ति प्रयत्न करुनही धर्माच्या कार्याचे फळ विघ्नांमुळे मिळवू शकत नाही तरी दुसर्‍या काही कोणी त्या पुण्यकर्माचे फळ अवश्य मिळवितो. ह्यात काही शंका नाही. ॥५॥

पापकर्म करण्याची चिंता मनात करुनही मनुष्याने ते कार्य व्यवहारात आणण्याची इच्छा करु नये. कारण पापकर्म केल्यावर त्याचे फळ तो अवश्य मिळवितो असे धर्मज्ञ सांगतात. ॥६॥

उपजीविकेचे साधन नसलेला आणि रोग किंवा शोक यामुळे दुःखी असणार्‍याना यथाशक्ती मदत पोचवून उपकार करावेत. त्याचप्रमाणे किडे आणि पाखरे यांचे सुखदुःख आपलेच समजले पाहिजे. ॥७॥

आपल्यावर उपकार करण्यास तत्पर असणार्‍या शत्रुवरसुद्धा उपकार करावेत आणि संपत्ती आणि विपत्ती ह्या दोन्ही स्थितीत आपली मनोदशा सारखीच ठेवावी. त्याचप्रमाणे उन्नतीरुपाच्या फळाच्या विषयामध्ये ईर्षा करु नये. जर कोणी धनी झाला तर " मी सुद्धा प्रयत्न करुन असाच धनी बनेन " अशी आपण ईर्षा करावी. धनाबरोबर ईर्षा करणे अनुचित आहे. ॥८॥

निरंकारी होऊन आपण स्वतः प्रथम वार्तालाप करावा. तोंडावर सुखी भाव ठेवावेत. सुशील तसेच करुणा यांनी युक्त असे कोमल चित्त असावे. आणि चांगली वेळ पाहून थोडक्या शब्दात सुसंगत आणि गोड वचन बोलावे. ॥९॥

कधीही आपल्या सुखाचा उपभोग एकट्याने घेऊ नये. सर्वत्र विश्वास किंवा शंका घेणे उचित नाही. परंतु त्यासाठी योग्य वाटणार्‍यावर विश्वास किंवा शंका जरुर ठेवावी. ॥१०॥

आपण कुणालाही आपल्या कुणाशी असलेल्या शत्रुत्वाबद्दल बोलू नये. त्याचप्रमाणे आपल्या मालकाकडून झालेला अपमान किंवा प्रेमभाव ह्या गोष्टीही कुणाजवळ बोलू नये. ॥११॥

दुसर्‍याला प्रसन्न ठेवण्यामध्ये निपूण असणार्‍या व्यक्तीने त्या लोकांचे मनांतील भाव ओळखून तदनुसार त्याला प्रसन्न वाटणारा असा व्यवहार करावा. ॥१२॥

इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून बलपूर्वक रोखून अधिक आसक्तीसुद्धा करु नये. म्हणजे नियमपूर्वक राहून समभावाने विषयांच्या भोग घ्यावा. इंद्रिये जर अधिक प्रबल झाली तर ती जबरदस्तीने मनाला आपल्याकडे आकर्षित करतात. ह्याचप्रमाणे त्यांचे मनावर ताबा ठेऊन दमन करावे. ॥१३॥

हरीण, हत्ती, फुलपाखरे, भोवरे, मासे हे पाच जण क्रमशः शब्द, स्पर्श, रुप, गंध आणि रस या पाचही विषयांचा उपभोग करुन मारले जातात. हरीण सुंदर गाणे ऐकून फसते आणि एकाजागी उभे राहते आणि शिकार्‍याच्या हातात सापडते. हत्तीला हाताने स्पर्श केल्याने तो पळत नाही आणि त्यामुळे पकडला जातो. फुलपाखरुं दिव्याच्या ज्योतीचे रुप पाहून त्यावर झडप टाकते आणि मरुन जाते. भोवरा कमळाच्या सुगंधाने मोहित होऊन ते कमळ मिटल्यावर त्याचत अडकून बसतो. मांसाच्या वासाने आकर्षित होणारे मासे गळाला लावलेले मांस खातात आणि गळांत अडकून तडफडत मरुन जातात. ॥१४॥

वरील विषयांप्रमाणेच सुंदर स्त्रीचा स्पर्श सत्‍ आणि असत्‍ यांचा पूर्णपणे विचार करणार्‍या मुनी लोकांचे मनही हिरावून घेतो. म्हणून सावधान राहून यथोचित मार्गाने विषयांचे सेवन करावे. कारण अधिक सेवनाने विनाश होतो. आई, बहिण किंवा मुलगी यांच्या बरोबरही जास्त वेळ एकांतात रहाणे योग्य नाही. ॥१५॥

परपुरुषांबरोबर जास्त सहवास ठेवणे, समोर आहे म्हणून त्याच्या बरोबर बोलणे करणे, क्षणभराचे स्वातंत्र्य देणे, दुसर्‍याच्या घरी निवास करणे हे सर्व स्त्रियांसाठी दोष आहेत. ह्याना दूर ठेवणे उचित आहे. ॥१६॥

पती, पिता, राजा, पुत्र, सासरा आणि बंधु या सर्वांना गृहकृत्ये सोडून दुसर्‍या कुठल्याच कामात थोडासा वेळही स्त्रियांनी देऊ नये. ॥१७॥

अत्यंत क्रोधी, नपुंसक, नेहमी शिक्षा करणारा, प्रेम नसलेला, जास्त दिवस प्रवासात रहाणारा, अत्यंत दरिद्री रोगी, नेहमी परस्त्रीकडे आकर्षित होणारा पती पाहून स्त्री विरक्त होते किंवा दुसर्‍या पुरुषाचा आश्रय घेते. म्हणून ह्या सर्व दुर्गुणांना प्रयत्नपूर्वक मनुष्याने सोडून दिले पाहिजे आणि स्त्रीचे रक्षण केले पाहिजे. ॥१८॥१९॥

वस्त्र, अन्न, दागदागिने, प्रेम आणि गोड बोलणे यांचा यथाशक्ति व्यवहार करुन आपल्या अत्यंत जवळचे असे स्त्री आणि मुले बाळे यांचे रक्षण करावे. ॥२०॥

नाकात बोटे घालून कुरतडू नये. जमिनीवर रेषा मारु नये आणि उगाचच खोदू नये. आपले डोके दोन्ही हातानी खाजवू नये. ॥२१॥

हातपाय वेडेवाकडे करण्याचा प्रयत्न करु नये. कडक आसनावर फारवेळ एकाच स्थितीत बसू नये. देह, वाणी आणि मन हे थकले आहेत असे वाटले तर व्यवहार बंद करावा. म्हणजेच जोपर्यंत ह्या तीन गोष्टी थकत नाहीत तोपर्यंतच काम करावे. ॥२२॥

हात वर करुन जास्त वेळ बसू नये. रात्री झाडाच्या बुंध्याशी राहू नये. त्याचप्रमाणे कोणी देवतेच्या चबुतर्‍यावर, वृक्षावर, नाक्यावर, तसेच देवमंदिरात रात्री राहू नये. जंगल, स्मशान इथे दिवसाही राहू नये. रात्री तर मुळीच राहू नये. ॥२३॥२४॥

कोणत्याही कारणाने सूर्याकडे फारवेळ पाहू नये आणि डोक्यावर बोजा उचलू नये. निरंतर सूक्ष्म, अत्यंत चमकणारी वस्तू, अपवित्र आणि अप्रिय वस्तू यांच्याकडे बराच वेळ पर्यंत पाहू नये. ॥२५॥

बुद्धिमान माणसाच्या प्रत्येक व्यवहाराला जनमानसच आचार्य आहे. म्हणून विवेचनापूर्ण कार्य करणार्‍यां कार्यकर्त्याने लौकिक कार्यामध्ये लोकांचेच अनुकरण करावे हे उचित आहे. ॥२६॥

राजा, देश, कुळ, जात आणि सज्जन यांचा जो काही धर्म असेल त्याची निंदा करु नये. सामर्थ्य असूनसुद्धा लौकिक आचारांचे मनातसुद्धा उल्लंघन करु नये. ॥२७॥

कोणी अनुचित रुपाने केलेले किंवा सांगितलेले जे काही असेल ते बलपूर्वक किंवा खोटे कारण दाखवून उचित म्हणून सिद्ध करु नये. जगात कोणासमोर त्याचे दुर्गुण दाखविणारे लोक विरळच असतात. ॥२८॥

म्हणून लोक आणि शास्त्र ह्यांनी त्याज्य ठरविलेल्या विषयांना ओळखून बुद्धिमानाने त्यांना सोडून द्यावे. " अनीति नीतिसमान आहे " असा विचार मनातसुद्धा आणू नये. ॥२९॥

" हा दुसरा मनुष्य हजारो अपराधानी भरलेला आहे म्हणून माझा एक दोष काय बिघडवू शकतो " असे समजून थोड्याशा पापाचे चिंतन करु नये. कारण थेंबाथेंबाने माठ भरतो. त्याचप्रमाणे थोड्या थोड्या पापाच्या चिंतनाने मनुष्यही पापाने भरुन जातो. ॥३०॥

आता माझे जीवन दिवसा आणि रात्री कसे आहे याचा जो मनुष्य नेहमी चांगल्या आणि वाईट कर्माचे स्मरण ठेवतात तो मनुष्य वाईटाचा त्याग आणि चांगल्याचे ग्रहण यासंबंधी कधीही दुःखी होत नाही. ॥३१॥

आग लावणारा, विष देणारा, शस्त्राने उन्मत्त होऊन मारण्याची इच्छा करणारा, धन लुटणारा, शेती आणि स्त्री ह्यांना लुबाडणारा ह्या सहा प्रकारच्या माणसांना आततायी समजतात. ॥३२॥

स्त्री, लहान मूल, रोग, नोकर, पशु, धन, विद्याभ्यास आणि सज्जन माणसांची सेवा ह्या सर्व विषयांत क्षणभरही उपेक्षा करु नये. नेहमी त्याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. ॥३३॥

ज्या राज्यात नपुंसक, स्त्री, बालक, क्रोधी, मूर्ख, साहसी ह्यापैकी कोणीही अधिकारी म्हणून असेल त्या ठिकाणी एक दिवसही राहू नये. ॥३४॥

जेथील राजा विवेकी नसतो आणि राजसभेचे सभासद पक्षपात करणारे असतात, पंडित लोक सदाचारहीन असतात, साक्ष देणारे लोक खोटे असतात, आणि जेथे दुष्ट, स्त्रिया आणि नीचलोक यांची प्रबलता आहे त्या ठिकाणी राहून आपले " धन, सन्मान, घर आणि जीवन " ह्यांचे रक्षण होईल अशी इच्छाही करु नये. म्हणून अशा ठिकाणी रहाणे अनुचित आहे. ॥३५॥३६॥

जरी लहानपणी आईने पालन केले नाही, पित्याने शिक्षण दिले नाही आणि राजाने संपत्ती हरण केली, तर अशा स्थितीत दुःख करणे फुकट आहे. अशा स्थितीत बालक आणि प्रजा यांचा स्वतःचा काहीच दोष नसतो. ॥३७॥

आणि जर कोणी विश्वस्त किंवा हित पहाणारा अशा योग्य मनुष्याचे बोलणे अहंकाराने टाळण्याचा प्रयत्न करुन कार्य करु पाहिल तर त्याचे त्याला विपरीत फळ मिळते. ह्यावर दुःख करणे फुकट आहे. ॥३८॥

सावधान चित्ताने राजा, देवता, गुरु, अग्नि, तपस्वी आणि धर्म व ज्ञानामध्ये वृद्ध लोकांची नेहमी योग्यप्रकारे सेवा केली पाहिजे. ॥३९॥

माता, पिता, गुरु, मालक, भाऊ, पुत्र आणि मित्र या सर्वांचा क्षणासाठीसुद्धा विरोध करु नये. ॥४०॥

स्वतःच्या माणसाजवळ विरोध, बलवानाजवळ स्पर्धा आणि स्त्री, बालक, वृद्ध आणि मूर्ख यांच्याबरोबर वादविवाद करु नये. ॥४१॥

एकट्याने स्वादिष्ट भोजन करु नये, एकट्याने कुठल्या कार्याचा विचार करु नये, एकट्याने रस्त्याने चालू नये, सर्व झोपलेले असताना आपण एकट्याने जागू नये. ॥४२॥

दुसर्‍याचा धर्म स्वीकारु नये, किंवा त्याला विरोध करु नये. तसेच नीच कर्म करणारे किंवा दुर्गुण असणारे आणि स्त्रियांबरोबर एका आसनावर बसू नये. ॥४३॥

ह्या जगात निद्रा ( दिवसा जास्त झोपणे, तन्द्रा ( अर्धवट झोपेत असणे ), भय, क्रोध, आळस आणि दीर्घसूत्रता ( कमी वेळात होणार्‍या कामाला जास्त वेळ लावणे ), ह्या सहा दोषांना सुखाची अपेक्षा करणार्‍याने दूर ठेवले पाहिजे. कारण हे सर्व दोष कार्यनाशक आहेत. यात कसलीच शंका नाही. ॥४४॥

बराच वेळ गोष्ट ऐकून घेतली पाहिजे म्हणजेच संपूर्ण गोष्ट ऐकली पाहिजे आणि शीघ्र पद्धतीने सांगणार्‍याचे बोलणे समजून घेतले पाहिजे. सर्व नीट समजल्यावर कार्य करावे. त्यात कधी मनमानी करु नये. ॥४५॥

कुठलीही वस्तू घेताना किंवा विकताना त्यात अत्यंत आग्रह करु नये. तसेच कोणासमोर आपली दीनता प्रकट करु नये. कारण ह्या प्रकाराने वागल्यास विक्रीमध्ये होणार्‍या लाभात हानी किंवा कमीपणा येतो. काही कारणाशिवाय किंवा ओळख नसताना स्वतःहून कोणा दुसर्‍याच्या घरात घुसू नये. ॥४६॥

कोणी विचारल्याशिवाय आपल्या घरातील गोष्टी सांगू नयेत. पुष्कळ अर्थ असणारा आणि थोडक्या शब्दांत सांगितलेला सुंदर वार्तालाप करावा. ॥४७॥

अनुभवाशिवाय कुठल्या विषयावर आपले विचार प्रकट करु नयेत. दुसर्‍याचे अनुभव नीट प्रकाराने समजून त्याला माहित नाही म्हणून उत्तर द्यावे. ॥४८॥

स्त्री पुरुष किंवा पिता पुत्र यांच्या आप आपसातील भांडणात कोणाच्याही बाजूने साक्ष देऊ नये. आपले कार्य आणि विचार नेहमी गुप्त ठेवावेत. कार्य पूर्ण झाल्यावरच ते प्रकाशित करावे. शरण आलेल्या विपत्तीग्रस्त माणसाचा कधीही त्याग करु नये. ॥४९॥

यथाशक्ती प्रत्येक कार्य करण्याची इच्छा करावी आणि कार्य करताना काही संकट आले तरी विचलित होऊ नये. कोणाशी मनाला टोचणारी भाषा बोलू नये आणि कुणासंबंधी कोणाजवळ खोटी गोष्ट बोलू नये. अश्लील भाषा बोलू नये आणि अनर्थक शब्द उच्चारु नये. ॥५०॥

जे कार्य समाजामध्ये निन्दनीय समजले जाते. ते धर्मयुक्त असले तरी ते नरकात नेणारे असते. म्हणून ते कार्य करु नये. आपल्यामुळे कोणाचे भाषण तोडू नये. खूप विचार करुन उत्तर द्यावे आणि सहसा न बोलणेच योग्य असते. ॥५१॥५२॥

शत्रूचेसुद्धा गुण जवळ करावेत किंवा त्याचे अभिनंदन करावे आणि गुरुजनांचे दुर्गुण सोडून द्यावेत.

सुखावस्था आणि दुःखावस्था कायमची नसते. प्राक्तनानुसार मनुष्य श्रीमंत किंवा गरीब असतो. म्हणून एक स्थिती कायमची नसल्याने सर्व प्राण्यांजवळ नेहमी मैत्रीभाव ठेवावा. असे करण्याने सर्वजण संतुष्ट राहून आपल्याला दुःख देत नाहीत. ॥५३॥५४॥

नेहमी दूरचा विचार करणारा, समयानुसार तात्काळ कर्तव्य करणारा, आळशी म्हणजे हळू हळू कार्य संपविणारा असू नये. ॥५५॥

जो मनुष्य कुठल्याही कामाचे बर्‍या वाईट फळाचा किंवा फळ न मिळणार्‍या कामाचा विचार करुन त्यानुसार कार्य करण्याचा प्रयत्न करतो आणि जो कार्याला सुरवात करतानाच फार दूरच्या परिणामांना जाणतो तो चिरकाल सुख भोगतो. म्हणून दीर्घदर्शी असणे योग्य आहे. ॥५६॥

जो आळशी असतो तो हजर असूनही करण्यास योग्य असणारे कार्य करण्याचा प्रयत्नही करीत नाही त्याच्या कार्याची सिद्धि कधी होत नाही आणि तो स्वतःचा वंश आणि साथीदार यांच्यासह नष्ट होतो. ॥५७॥

जो साहसी मनुष्य केलेल्या कर्माच्या फळाचा विचार न करता ते कार्य करण्याचा प्रयत्न करतो तो त्या क्रियेमुळे किंवा त्याच्या फळामुळे दुःखी होतो. ॥५८॥

नोकर, भाऊ, पुत्र आणि पत्नी जे कार्य पूर्ण करु शकत नाही ते काम त्याचे मित्र निःसंदेह पूर्ण करतात. ॥५९॥

मंद बुद्धिचा मनुष्य मित्राचे मन चांगले का वाईट हे न समजता त्याच्याशी मित्रता करतो त्यांचा तो मैत्रीरुपाचा अर्थच नष्ट होतो. ॥६०॥

कुणाच्या मनातील भाव जाणणे कठीण आहे. म्हणून चांगले मित्र मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. चांगला मित्र मिळणे हे एक उत्तम कार्य असते. ॥६१॥

नेहमी विश्वासपात्र असणारी व्यक्ती म्हणजे पुत्र, भाऊ, पत्नी, अमात्य किंवा अधिकारी यांच्यावरही अतिशय विश्वास ठेवू नये. कारण सर्वांना धन, स्त्री आणि राज्य यांचा लोभ फार मोठा असतो. ॥६२॥६३॥

म्हणून विश्वस्त म्हणून काम करणारे प्रामाणिक, सुपरिचित आणि आपले हित चिंतणारे लोक यांच्यावर विश्वास करावा.

आपल्या सारखाच विश्वास ठेवण्यास योग्य वाटणार्‍याची सुद्धा लपून छपून परिक्षा घेऊन तो जर खरोखर विश्वासपात्र ठरला तर त्याच्यावर विरुद्ध तर्काने अनर्थ अर्थ काढून त्याचा विचार करु नये. त्याच्या सर्व वचनांवर निःशंक विश्वास ठेवावा. ॥६४॥

दान, मान आणि सेवा ह्याद्वारे अत्यंत पूज्य अशा माणसांची नेहमी पूजा करावी. ॥६६॥

पशुसुद्धा चारा देऊन आणि गोड बोलून बोलावल्यावर वश होतात तर मनुष्यांच्या बाबतीत काय सांगावे ?

विद्या, शूरता, धन, कुळ आणि बल या मदामुळे कधी मानी होऊ नये. ॥६७॥

विद्येच्या मदाने उन्मत्त झालेला मनुष्य तर्कवितर्क करुन हितैषी माणसाच्या उपदेशाला काहीच किंमत देत नाही आणि आपल्या अनर्थकारी विचारांना कल्याणकारी समजतो. ह्यामुळे चांगल्या माणसांनी स्वीकारलेला मार्ग हट्टाने सोडून देतो. ॥६८॥६९॥

बलाच्या मदाने उन्मत्त झालेला मनुष्य एकाएकी काहीही विचार न करता युद्ध सुरु करतो. आपल्या मनाप्रमाणे न वागणार्‍या सर्वांना कष्ट देतो, अश्वादिक प्राण्यांनासुद्धा तो पिडा देतो. ॥७०॥

अभिमानाने गर्विष्ठ असणारा मनुष्य जगातील सर्वांना गवताच्या काडीप्रमाणे तुच्छ समजतो आणि आपली योग्यता नसतानाही स्वतःला सर्वात श्रेष्ठ जागा मिळविण्याची इच्छा करतो. ॥७१॥

गर्व असणार्‍या लोकांना वर सांगितलेले विद्या, शौर्य वगैरे सर्व मद उन्मत्त बनविणारे असतात. सज्जन माणसांना हे सर्व विनय निर्माण करणारे असतात.

विद्येचे फळ ज्ञान आणि विनय आहे. लक्ष्मीचे फळ यज्ञ आणि दान करणे हे आहे. बळाचे फळ सज्जनाचे रक्षण करणे हे आहे. ॥७२॥

शूरतेचे फळ शत्रूचे मस्त्क झुकविणे आणि त्याच्याजवळून खंडणी नियमित देणारी आपली प्रजा बनविणे हे आहे. कुलीनतेचे फळ मन शांत ठेवणे, इंद्रियांचे दमन करणे हे आहे. मान ह्याचे फळ सर्वांना आपल्यासारखे सन्मानित समजणे हे आहे. ॥७३॥७४॥

आपल्या कार्याच्या सिद्धिसाठी आपला मान वगैरे सोडून प्रयत्न करुन सुंदर विद्या, मंत्र, औषध आणि गुणी स्त्री नीच कुळांतील माणसाजवळ असली तरी त्यांचा स्वीकार करावा. दिल्याशिवाय दुसर्‍याची वस्तू घेऊ नये. आणि दुसर्‍याचे छोटेसे पापसुद्धा कुणाला सांगू नये. कुणाची स्त्री दूषित करु नये किंवा तिला दोष लावू नये. ॥७५॥७६॥

खोटी साक्ष देऊ नये आणि कोणी दिली तर वाईट वाटून घेऊ नये. जर फार मोठे कार्य सिद्ध होणार असेल किंवा काही प्राणसंकट आले असेल तर खोटे बोलण्यास हरकत नाही. ॥७७॥

स्त्री पुरुष, माता पिता, भाऊ भाऊ, मालक नोकर, बहिणी बहिणी, मित्र मित्र, गुरु शिष्य ह्या सर्वांमध्ये परस्पर भेद करु नये. ॥७८॥

परस्पर बोलणे करणार्‍या दोघांमधून कधी जाऊ नये. आणि मित्र, भाऊ नातेवाईक ह्या सर्वांजवळ आपल्यासारखाच व्यवहार करावा. ॥७९॥

नेहमी स्त्री संभोग, भोजन आणि मलमूत्र विसर्जन एकांतात करावा. नेहमी उद्योग करण्यास तयार असावे आणि सुखपूर्वक व्यायाम करावा. ॥८०॥

अन्नाची कधी निंदा करु नये. आपले स्वास्थ ठिक असेल तरच आमंत्रित केलेल्या प्रीतिभोजनाचा स्वीकार करावा. तिखट, कडू, आंबट, खारट, तुरट आणि मधुर ह्या सहा रसांनीयुक्त आणि मुख्यतः मिठाईयुक्त जे भोजन असते ते सर्वोत्तम भोजन असे समजावे. ॥८१॥

आपल्या पत्नीबरोबर विहार करणे उचित आहे. वेश्यांबरोबर विहार करणे उचित नाही. लोकांसमोर विनम्र होऊन कुस्ती खेळणे हा उत्तम व्यायाम आहे. म्हणून तो नेहमी करावा. ॥८२॥

रात्रीचे प्रथम आणि चौथा प्रहर सोडून मधले दुसरा आणि तिसरा ह्या प्रहरात झोपणे उत्तम असते. दीन, आंधळा, पंगू आणि बहिरा अशा लोकांचा कधीही उपहास करु नये. ॥८३॥

कोणाशीही वाईट भाषा बोलू नये. त्याचप्रमाणे वाईट नजरेने पाहू नये. मोठ्या लोकांच्या आणि राजाच्या आज्ञेचे कधी उल्लंघन करु नये. ॥८४॥

वाईट कामावर नेमणूक करणार्‍या गुरुलाही समजवावे की त्यांनी अनुचित आज्ञा दिल्यामुळे मी ती करणार नाही. सत्कार्याचा उपदेश करणार्‍या लहान लोकांच्या शब्दाचे कधी उल्लंघन करु नये. ॥८५॥

आपल्या तरुण पत्नीला स्वतंत्र करुन आपण दुसरीकडे कुठे जाऊ नये. कारण परपुरुषांबरोबर रहाणारी सामान्य स्त्री सुद्धा अनर्थाचे कारण बनते. तर तरुण स्त्रीयांच्या बाबतीत काय सांगावे ? अशा तरुण स्त्रिया अनर्थाला फार मोठे कारण होतात. ॥८६॥

मद निर्माण करणार्‍या द्रव्याने अधिक मस्तवाल होऊ नये आणि नालायक मुलाला " हा माझा मुलगा आहे " असे सांगून जास्त प्रेम दाखवू नये. ॥८७॥

ज्याने आपल्या कुटुंबाचे भरण पोषण केले नाही, शत्रूला नष्ट केले नाही आणि मिळालेल्या वस्तूचे योग्यप्रकारे रक्षण केले नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे. ॥८८॥

जो स्त्रीयांना वशीभूत झालेला, कर्जबाजारी असलेला, अत्यंत दरिद्री, याचक, गुणहीन आणि धनाशिवाय असणारा असतो तो जिवंत असूनही मेल्याप्रमाणेच समजावा. ॥८९॥

आयुष्य, धन, घरातील दोष, मंत्र, मैथून, औषध, दान, मान, अपमान ह्या नऊ विषयांना अत्यंत गुप्त ठेवावे आणि कोणालाही सांगू नयेत. ॥९०॥

अनेक शास्त्रांच्या तत्वांचे चिंतन करुन अहंकार तसेच धर्मांधता यांनी मुक्त होऊ नये. एकाच शास्त्राचे अध्ययन करुन कुठल्याही कामाचा निर्णय करु नये. कारण बर्‍याच शास्त्राना जो अभ्यासतो तोच लौकीक व्यवहारांना समजतो. म्हणून बुद्धिमान मनुष्य आळस सोडून बर्‍याच शास्त्रांचा नेहमी अभ्यास करतो. ॥९१॥९२॥

ज्याप्रमाणे वेश्या कोणा मनुष्याचे धन ग्रहण करुन त्याच्या आधीन होत नाही आणि स्वतः आधीन न होता त्या मनुष्याला आपण वश करण्यास समर्थ असते त्याचप्रमाणे जगातील लोकांना आपल्या आधीन बनवावे. परंतु आपण दुसर्‍याच्या आधीन होऊ नये. ॥९३॥९४॥

विद्वान लोकांची संगती केल्याने श्रृति, स्मृति, पुराणे यांच्या अर्थाचे विशेष ज्ञान तसेच सत्‍ असत्‍ यांचा विचार करणारी श्रेष्ठ बुद्धि तयार होते. ॥९५॥

जेवता जेवता रस्त्याने चालणे, हसताना बोलणे, नष्ट झालेली वस्तू किंवा मेलेल्या माणसाच्या संबंधी शोक करणे, आपण केलेल्या कामाची आपण स्वतःच प्रशंसा करणे, सर्व गोष्टी करु नये. ॥९६॥

आपल्यावर शंका घेणार्‍याजवळ तसेच दुर्जनांच्या जवळ राहू नये. नीच लोकांची सेवा सोडून द्यावी. नेहमी लपून छपून कुणाचेही बोलणे ऐकू नये. ॥९७॥

श्रेष्ठ लोकांच्या बरोबर काम करण्याची त्यांची अनुमती नसेल तर त्यांच्या बरोबर काम करण्याची इच्छाही करु नये. कारण देवतांची अनुमती नसताना अमृतपान केल्याने राहूचे मस्तक कापले गेले. ॥९८॥

नेहमी प्रेम दाखविणे, जवळ रहाणे, स्तुति, नमस्कार, सेवा, चतुरपणा, चौसष्ट कला, गोष्टी सांगणे, ज्ञानोपदेश, आदर, सरळपणा, दान, विद्या, समोर आल्यावर आपल्या आसनावरुन उठून पुढे जाऊन स्वागत करणे, आनंद आणि हसून वार्तालाप करणे, उपहार आणि सुंदर आशय प्रदर्शन ह्या सर्व गोष्टी केल्याने सर्व जगाला आपल्या ताब्यात घेता येते. ॥९९॥१००॥१०१॥

परंतु वर सांगितलेले सर्व उपाय दुर्जनांच्या बाबतीत निष्फळ ठरतात. म्हणून बुद्धिमान लोकांनी दुर्जनांची संगत सोडून द्यावी. जर सामर्थ्य असेल तर त्यांना शिक्षा करावी किंवा प्रेमाचे नाटक करुन त्यांना वशीभूत करावे. ॥१०२॥

नेहमी शिकार करणे, जुगार खेळणे, स्त्री संभोग करणे, दारु पिणे ह्या चार गोष्टी मनुष्याला व्यसन म्हणून सांगितलेल्या आहेत. ह्या गोष्टी सातत्याने करु नयेत. कधी कधी केल्या तर चालू शकतील नाहीतर नाही. ॥१०३॥

कोणाजवळ कपटकारस्थान किंवा त्याच्या उपजिवीकेच्या साधनांचा नाश करु नये. त्याचप्रमाणे कोणाचे मनानेसुद्धा वाईट चिंतू नये. ॥१०४॥

जे कार्य केल्याने ह्या लोकांत आणि परलोकांत स्थिर सुख मिळते, त्याचप्रमाणे मेल्यावर स्वर्ग आणि जिवंत असताना स्थिर आणि सुंदर कीर्ति प्राप्त होते तेच कार्य करावे. ॥१०५॥

जो चिंता करुन त्रासलेला आहे, मानसिक पिडा आणि रोगाने पिडलेला आहे, व्यभिचारी, चोर, ज्याचा शत्रु बलवान आहे, विषय लोलूप, वाईट मित्रांसह रहाणारा, मंत्र्यांशिवाय, मित्रांशिवाय आणि गुणी प्रजा यांचा कुत्सित विचार करणारा राजा, हे सर्व लोक रात्रभर जागत असतात. म्हणून मनुष्याने विचार करुन असे कार्य करावे की बरेच दिवस तो रात्री सुखाने झोपेल. ॥१०६॥१०७॥

गुरुजन आणि राजा यांच्यासमोर उच्च आसनावर किंवा पायावर पाय ठेवून बसू नये. त्याचप्रमाणे त्यांच्या वाक्यांचा तर्काचा उपयोग करुन खंडण करु नये. ॥१०८॥

जो नीच मनुष्य असतो तो कर्तव्य करण्यास योग्य असणार्‍यास समजत नाही. फक्त केलेल्या कामाला समजतो. जो उत्तम मनुष्य असतो तो कर्तव्य आणि करणारा ह्या दोघांना जाणत नाही. ॥१०९॥

आपल्या प्रिय पत्नीने सांगितले म्हणून आई, सून, भावाची पत्नी किंवा सवत यांच्या अपराधांना स्वतः अनुभव घेतल्याशिवाय सत्य मानू नये. ॥११०॥

खोटे बोलणे, साहस, ढोंगी, मूर्खता, अत्यंत लोभ, अपवित्रता, निर्दयता आणि अहंकार हे आठ स्त्रियांचे स्वाभाविक दुर्गुण समजले जातात. ॥१११॥

सोळाव्या वर्षांनंतर मुलाला आणि बाराव्या वर्षांनंतर मुलीला कधी मारु नये. आणि सुनेला कधी कडू भाषा बोलून क्लेश देऊ नये. ॥११२॥

स्त्रियामध्ये खोटे बोलणे, साहस, मूर्खपणा आणि कामवासना यांचे अधिक्य असते. म्हणून कामवासना जास्त झाली नसेल तर पत्नीजवळ एका बिछान्यावर झोपू नये. ॥११३॥

धन, कुल, शील, रुप, विद्या, बल आणि आयुष्य ह्या सर्वांना पाहून ज्या वरांत हे सर्व उत्तम आहेत त्याला मुलगी द्यावी. कारण हे सर्व गुण उत्तम असेल तर त्याच्या बरोबर मैत्री आनि संबंध ठेवणे उचित असते. ॥११४॥

विवाह योग्य वय, विद्या आणि रुप चांगले असेल परंतु धन उत्तम नसले तरी त्याला बोलावून कन्या द्यावी. परंतु केवळ रुप, वय आणि धन पाहून मुलगी देऊ नये. ॥११५॥

सर्वप्रथम वराचे कुळ, नंतर विद्या, त्यानंतर वय, त्यानंतर शील, धन, रुप आणि देश यांचा क्रमशः विचार करुन मग नंतर त्या वराबरोबर आपल्या मुलीचा विवाह करावा. ॥११६॥

विवाह करणारी कन्या वराचे सुंदर रुप पसंत करते. माता उत्तम धन आणि पिता उत्तम विद्या आणि उत्तम नातेवाईक पसंत करतो. परंतु लग्नाला आलेली मंडळी केवळ मिष्टान्नाच्या जेवणाची इच्छा ठेवतात. कारण त्यांना वराच्या कुळाचा विचार करण्याचे काही प्रयोजन नसते. ॥११७॥

पत्नी म्हणून स्वीकार करावयाच्या मुलीचे ऋषि आणि गोत्र आपल्यापेक्षा भिन्न आहे हे पहावे. भाऊ वगैरे असलेली, चांगल्या कुळांत उत्पन्न झालेली, योनिरोग रहित आणि निर्दोष आईपासून उत्पन्न झालेली असेल तर तिच्याशी विवाह करावा. ॥११८॥

विद्या आणि धन यांची अपेक्षा करणार्‍याने क्रमाने क्षण आणि कण यांचा त्याग करु नये. क्षणक्षण दररोज अभ्यास करुन विद्या मिळवावी आणि कणकण भर संग्रह करुन धन कमवावे. ॥११९॥

उत्तम पत्नी, मुलगा, आणि मित्र यांच्यासाठी आणि दान करण्यासांठी नेहमी धनार्जन करणे हितकर आहे. हे सर्व नसेल तर धन आणि नोकर चाकर यांचे प्रयोजन काय आहे म्हणजेच ह्या गोष्टी नसतील तर धन व्यर्थ आहे. ॥१२०॥

भविष्यकाळात रक्षण करण्यास समर्थ असणार्‍या धनाचे प्रयत्नपूर्वक रक्षण केले पाहिजे. मी शंभर वर्षेपर्यंत जगणार आहे आणि ह्या धनाचा आनंद उपभोगेन ह्या बुद्धिने धन आणि विद्या यांचा पंचवीस वर्ष पर्यंत त्याच्या अर्धा, साडे बारा वर्षे त्याचा अर्धा आणि त्याच्या अर्धा भाग सव्वासहा वर्ष पर्यंत नेहमी संग्रह करावा. ॥१२१॥१२२॥

विद्यारुपी धन अत्यंत श्रेष्ठ आहे. दुसर्‍या प्रकारचे धन विद्येमुळेच प्राप्त होते. विद्या हे धन देण्याने नेहमी वाढते आणि दुसरे धन देण्याने कमी होते. विद्यारुपी धनाचा कधी भार होत नाही. परंतु दुसर्‍या धनाचा भार होतो. विद्येची कोणी चोरी करीत नाही अन्य धनाची चोरी होऊ शकते. ॥१२३॥

जोपर्यंत माणसाजवळ पैसा आहे तोपर्यंत सर्व लोक त्याची सेवा करतात. आणि तो जेव्हा धनहीन होतो तेव्हा तो कितीही गुणवान असला तरी त्याला पत्नी आणि मुले सोडून जातात. म्हणून जगात सर्व व्यवहार चालविण्यासाठी धन हेच मुख्य आहे असे सांगितलेले आहे. आणि म्हणून धनप्राप्तीसाठी मनुष्याने प्राणांचीही पर्वा न करता कठीणातील कठीण कार्य करण्यास प्रयत्नशील असावे. ॥१२४॥१२५॥

सुंदर विद्या मिळवून किंवा सुंदर सेवा करुन, शूरपणा दाखवून, शेती करुन किंवा व्याजाने पैसे देऊन, दुकानदारी किंवा संगीत ह्या कलांच्याद्वारे, दान घेऊन इत्यादि वृत्तींचा आश्रय करुन माणसाने धनवान बनावे. कारण धनी लोकांच्या दारात गुणी लोक नोकरांप्रमाणे पडून रहातात. ॥१२६॥१२७॥

धनवान माणसाचे दोषही गुणासमान होतात आणि निर्धनाचे गुणही दोषतुल्य होतात. म्हणून निर्धन माणसांची सर्व माणसे निंदाच करतात. ॥१२८॥

धनाच्या मागे धावणारे कैकजण चिंता करुन करुन वेडे होतात. काहीजण शत्रूला शरण जातात. कितीतरी जण दुसर्‍याची किंवा शत्रूचीही नोकरी करतात. ॥१२९॥

व्यवसाय करणार्‍यासाठी लेखी कराराशिवाय दुसरा आठवणीसाठी दुसरा प्रकार काही नाही. म्हणून बुद्धिमान माणसाने लेखी कराराशिवाय काहीही देण्याघेण्याचा व्यवहार करु नये. ॥१३०॥

लोभ नसलेला मनुष्य, विश्वासपात्र किंवा क्षमाशील मनुष्य, किंवा राजा यापैकी कुणाजवळही साठविलेले धन ठेवावे. किंवा जे धन ठेवावयाचे ते एकत्र लिहून ठेवून आपल्याला योग्य वाटेल त्याच्या जवळ ठेवावे. ॥१३१॥

मित्रतेच्या नात्याने मित्राने मागितल्यावर त्याला व्याज न घेता धन द्यावे. आणि त्या मित्राकडे व्याजाशिवाय दिलेले धन बाकी असले तर त्याला पुन्हा धन देणे हानिकारक नाही. ॥१३२॥

व्याज देण्यास समर्थ आहे हे पाहून त्याला ऋण द्यावे. कुणालातरी जामीन ठेवून, कोणाचीतरी साक्ष ठेवून लेख करुन योग्य मार्गाने पैसे परत देण्याची लायकी असणार्‍याला पैसे द्यावेत. व्याजाच्या लोभाने वरील रितींपेक्षा भिन्न रितीने धन देऊ नये. नाहीतर मूळ रक्कमच नष्ट होण्याची संभावना असते. ॥१३३॥१३४॥

ह्रदयात उदारता ठेवून वर वर कृपणता दाखवित मनुष्याने धन खर्च करावे. ह्यापेक्षा दुसर्‍या प्रकाराने कधीही व्यय करु नये. ॥१३५॥

पत्नी, पुत्र आणि मित्र जर चांगले असतील तर त्याचे पैशाने रक्षण्स करावे. परंतु ह्या सर्वांपेक्षा प्रथम स्वतःच्या शरीराचे रक्षण करावे. कारण पुन्हा शरीर मिळत नाही. पत्नी, पुत्र परत मिळू शकतात. जर मनुष्य जिवंत राहिला तर शेकड्यांनी कल्याणकारी गोष्टी पाहू शकतो. ॥१३६॥१३७॥

आपले कल्याण अपेक्षिणार्‍या पित्याने लग्न झालेल्या आणि कार्य करण्यात समर्थ झालेल्या मुलाला आपल्यापासून त्वरीत विभक्त करावे. ह्यामुळे भविष्यात आप आपसात भांडणे होत नाहीत. ह्याचप्रमाणे आपले सख्खे भाऊसुद्धा लग्न झाल्यावर आणि स्वतःला सांभाळण्यास समर्थ झाल्यावर त्यांनाही विभक्त करावे. नाहीतर ते भांडण तंटा करुन नष्ट होतात. ॥१३८॥

कोणा पुरुषाजवळ किंवा दोन स्त्रियांना जवळ जवळ किंवा दोन मादी पशुंच्या जवळ अथवा दोन नर पशुंना एकत्र ठेवू नये. कारण मनुष्य जातीत एकापेक्षा जास्त स्त्रीया, पशुंमध्ये एकापेक्षा अधिक माद्या एकत्र राहू शकत नाहीत. ॥१३९॥

व्याजावर किंवा बिन व्याजी दिलेले धन ज्याप्रकारे दोन मित्रांत क्लेश निर्माण करीत नाहीत तसेच साक्षीदाराशिवाय ऋणपत्र लिहू नये. ॥१४०॥१४१॥

जो मनुष्य आपल्या स्वतःच्या, पिता आणि माता ह्या तिघांच्या गुणांनी प्रख्यात होतो तो उत्तमोत्तम समजला जातो. जो केवळ आपल्या स्वतःच्या गुणांनी प्रख्यात होतो तो उत्तम, पित्याच्या गुणांमुळे होणारा मध्यम, आईच्या गुणांमुळे प्रख्यात नीच समजला जातो. भावाच्या गुणांनी प्रख्यात पुरुष अधम समजला जातो. जो कन्या, पत्नी किंवा बहीण यांच्या भाग्याने जीवन व्यतीत करतो तो अधमतम समजला जातो. ॥१४२॥१४३॥

विपुल धनाने संपन्न असूनही पालन करण्यास योग्य आहे त्याचेच पालन करणे योग्य आहे. बुद्धिमान माणसाला काहीतरी दिल्याशिवाय कुठलाही दिवस व्यतीत करु नये. ॥१४४॥

जर शत्रूसुद्धा दानाने मित्र बनतो तर दुसर्‍यांचे काय सांगावे. म्हणजे दुसरे मित्र बनतातच. ॥१४५॥

देवता, यज्ञ, ब्राह्मण, गाय, ह्यासाठी जे दान दिले जाते ते परलोक सुख साधनासाठी असते. आणि त्याला " संविद्‍ " दान म्हणजे " अवश्य दिले पाहिजे " अशा बुद्धिने दिलेले समजले जाते. ॥१४६॥

भाट ( स्तुतिपाठक ), जादुगार आणि मल्ल यांना त्यांचे कार्य दाखविण्यासाठी जो पुरस्कार दिला जातो त्याला " पारितोष्य " म्हणतात आणि यश मिळाल्यामुळे दिले जाते त्याला " श्रियादत्त " म्हणतात. ॥१४७॥

लग्नकार्यात मित्र, नातेवाईक तसेच बांधवांना जे उपहार म्हणून दिले जाते त्याला " आचारदत्त " व्यवहाराने दिले जाते असे म्हणतात त्याला " ह्रीदत्त " असेही म्हणतात. ॥१४८॥

राजा, बलवान, आणि कार्य नष्ट करणार्‍या ह्या लोकांना जे कार्यासाठी दिले जाते किंवा " न दिल्याने पाप आहे " ह्या भीतिपोटी दिले जाते त्याला " भीदत्त " भीतिपोटी दिलेले म्हणतात. ॥१४९॥

हिंसा करणार्‍यांच्या वाढीसाठी जे दिले जाते ते, जुगारामुळे नष्ट केले गेले आहे ते, जे चोराने चोरलेले आहे, जे पापी लोकांचे आहे आणि जे परस्त्रीजवळ जाण्यासाठी दिलेले असते त्याला " नष्ट " असे म्हणतात. ॥१५०॥

जो देवता किंवा प्रभू यांची आराधना करतो त्याला सर्वांपेक्षा अधिक उत्कृष्ट म्हणावे. त्याची न्यूनता कधी करु नये. त्याची सेवा प्रसन्न मनाने करावी. ॥१५१॥

दान आणि सरळपणा सोडून ह्या जगात वशीभूत करणारा दुसरा रस्ता नसतो. अमृताचे दान केल्याने क्षीण झालेला परंतु पुन्हा वृद्धिची इच्छा ठेवणारा शुक्लपक्षातील द्वितीयेचा चंद्र वाकडा असूनही शुभ असतो म्हणजे त्याला पुन्हा अमृतदान मिळण्याची संभावना असते. ॥१५२॥

विचार करुन कुणाशी मैत्री किंवा द्वेष करावा. आणि एकदा काय ते ठरवून केले की त्याविरुद्ध कधी वागू नये. म्हणजे स्नेह्याबरोबर अपकार आणि द्वेषी माणसासोबत उपकार करु नयेत. कारण हे दोन्ही अनर्थ निर्माण करणारे ठरतात. ॥१५३॥

अतिशय क्रूरता, अतिशय दुष्टपणा, अतिशय मृदुता, अतिशय बोलाचाली, अतिशय लीनता, अत्यंत आग्रह ह्या सर्व गोष्टी करु नये. ॥१५४॥

कोणताही विषय अति केल्याने ते नाशाचे कारण होते म्हणून प्रत्येक ठिकाणी अति करणे सोडावे. अत्यंत क्रूरता केल्याने लोक दूर होतात आणि अत्यंत कंजुषी केल्याने लोक निंदा करतात. ॥१५५॥

अत्यंत मृदुता दाखविणार्‍याला लोक किंमत देत नाहीत. अत्यंत बडबडणार्‍याचा अपमान केला जातो. अत्यंत दान दिल्याने दरिद्रता येते आणि अत्यंत लोभ करण्याने तिरस्कार केला जातो. ॥१५६॥

अत्यंत आग्रह केल्याने मनुष्याची मूर्खता प्रकट होते. आचार विचार केल्याने किंवा दुष्ट आचरण केल्याने धर्माची हानी होते. आणि आचाराच्या विरुद्ध आचरण करण्याने मूर्खता समजली जाते. ॥१५७॥

नेहमी तरुण स्त्री, धन आणि पुस्तक कधी दुसर्‍याला देऊ नये. जर केले आणि यदाकदाचित परत मागण्याची वेळ आली तर तरुण स्त्री संभोग करुन भ्रष्ट केलेली, धन नष्ट करुन आणि पुस्तक फाडून किंवा घाणेरडे केलेले असते. ॥१५८॥

ज्या बोलण्याने मित्राला लाज वाटेल, ज्यामुळे त्याच्या मनात दुरावा निर्माण होईल, ज्यामुळे चित्त दुःखी होईल असे बोलणे मजेमध्येसुद्धा बोलू नये. ॥१५९॥

ज्या माणसाच्या समोर चांगले किंवा वाईट दोन्ही सारखेच किंवा निरर्थक आहे त्याच्या समक्ष बुद्धिमान व्यक्तिने व्यर्थ बोलू नये. कारण त्याच्या जवळ बोलणे म्हणजे बहिर्‍या माणसासमोर गाणे म्हणण्यासारखेच असते. ॥१६०॥

जोपर्यंत शत्रूचे बळ आपल्यापेक्षा अधिक आहे तोपर्यंत त्याला खांद्यावर घ्यावा म्हणजे त्याचा आदर करावा आणि जेव्हा ध्यानात येईल की तो निर्बल झाला आहे तेव्हा रिकाम्या मडक्याला दगडावर आपटून फोडून टाकतात, तसा त्याला नष्ट करावा. ॥१६१॥

ज्याप्रमाणे सज्जनतारुपी भूषण मनुष्याला भूषित करतो तसे अलंकार, राजा, पराक्रम, विद्या किंवा धन भूषित करीत नाही. ॥१६२॥

चुंगलखोरी, क्रोध, चोरी, मत्सर, अतिलोभ, खोटे बोलणे, कार्य नष्ट करणे, आळस हे सर्व दोष आहेत. हे दोष गुणवानाला असले तरी ते त्याच्या सर्व गुणांना झाकून टाकतात. ह्या दोषांमुळे तो निंदेस पात्र ठरतो. ॥१६३॥१६४॥

श्रीमंताला मूल नसणे, दरिद्री माणसाला भूक लागणे, स्त्रीला नपुंसक पती मिळणे, प्रिय वस्तूंची चोरी होणे, ह्या सर्व गोष्टी सुखकर नसतात. म्हणजेच दुःख देणार्‍या आहेत. ॥१६५॥

मूर्खमुलगा, मूर्खमुलगी, अत्यंत क्रोधी स्त्री, दरिद्रता, नीच पुरुषाची सेवा, नियमित कर्ज घेणे ह्या सहा गोष्टी सुखकर नाहीत. ह्यामुळे मनुष्य नेहमी दुःखी रहातो. ॥१६६॥

जो मुलगा आई वडीलांच्या आज्ञांचे पालन करतो, त्यांची सेवा करण्यात आळस करीत नाही उलट सावलीप्रमाणे नेहमी त्यांची सोबत करतो, धन आणि विद्या कमाविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो आणि सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये निपुण होतो तो मुलगा आई वडीलांचा आनंद वाढविणारा होतो. जो माता पित्याच्या आज्ञेच्या विरुद्ध वागतो, दुर्गुणी असतो, धनाचा नाश करणारा असतो तो दुःखदायकच असतो. ॥१६७॥१६८॥

जी स्त्री आपल्या पतीवर नेहमी प्रेम करणारी, गृहकृत्यात चतुर, पुत्र देणारी, सुशील आणि सुंदर जीवन देणारी असते ती पतीला प्रिय असते. ॥१६९॥

जी आई मुलांच्या अपराधांना क्षमा करणारी असते आणि मुलांचे पालनपोषण नीट करते ती नेहमी आनंद देते आणि ह्या उलट वागणारी व्यभिचारीणी असते ती दुःख देणारी असते. ॥१७०॥

जो पिता मुलाला विद्वान बनविण्यासाठी, त्याला सुखी जीवन जगता यावे म्हणून स्थावर घरदार ठेवण्याचा प्रयत्न करतो, नेहमी मुलाला उत्तम शिक्षण देतो आणि आपल्यावर कोणाचेही ऋण ठेवीत नाही तो पिता आनंददायक होतो. ॥१७१॥

जो मनुष्य नेहमी मदत करतो, कधी उलट बोलत नाही, सत्य आणि हितकर गोष्टींचा उपदेश करतो, धन प्रेमाने देतो व घेतोही तो मित्र बनतो. ॥१७२॥

नीच माणसांबरोबर घनिष्ट मैत्री करणे, दुसर्‍याच्या घरी वारंवार जाणे, आपल्या जातीतील लोकांबरोबर प्रतिकूल आचरण करणे आणि दरिद्रता ह्या सर्वांमुळे मानहानी होते. ॥१७३॥

क्षत्रियांचे तेज अधिक तमोगुणी असते, ब्राह्मणांचे तेज अधिक सत्वगुणी आणि इतर वैश्यांचे तेज अधिक रजोगुणी असते. ह्यामध्ये सत्वगुणी तेजच श्रेष्ठ असते. ॥१७४॥

जी जीवन पद्धती आपल्या धर्माची हानी करीत नाही ती जीवन पद्धती श्रेष्ठ आहे. ज्या देशात आपल्या कुटुंबाचे पालन पोषण नीट प्रकारे करता येते तो देश सर्वोत्तम असतो. ॥१७५॥

गुणवान, शीलवान पत्नी, सुंदर गुणाची मुले, उत्तम विद्या, उत्तम धन, चांगला मित्र, चांगले नोकर, चांगली सुंदर मोलकरीण, रोग रहित शरीर, सुंदर घर, चांगला राजा ह्या दहा गोष्टी गृहस्थाश्रमी माणसाला सुख देणार्‍या असतात. ॥१७६॥१७७॥

जो दुर्गुणाला गुण सांगून त्याचे वर्णन करतो तो सर्वांना प्रिय होतो. आणि जो गुणाला मोठा सांगून प्रशंसा करतो तो अवश्य मित्र बनतो. ॥१७८॥

जो सत्याला दुर्गुण समजतो तो प्रिय असूनही ऐकणार्‍याला अप्रिय होतो आणि जो गुणाला दुर्गुण सांगतो तो कसा प्रिय होईल ? ॥१७९॥

मनुष्याने संकटाच्या काळात कोणा सबळ माणसाने खोटी सत्य गोष्ट सांगावयास सांगितले तर मुके बनावे. वाईट गोष्ट पहाण्यास आंधळे, वाईट ऐकण्यासाठी बहिरा आणि वाईट करण्यासाठी धावायचे असेल तर लंगडा बनावे. म्हणजे काहीतरी कारणाने वाईट व्यवहार करण्याचे टाळावे. जर असे केले नाही तर तो दुःखी होईल. ॥१८०॥

पारतंत्र्यापेक्षा दुसरे मोठे दुःख नाही आणि स्वातंत्र्यापेक्षा मोठे दुसरे सुख नाही. प्रवास न करणारा तसेच स्वाधीन होऊन आपल्या घरातच रहाणारा मनुष्य सुख प्राप्त करतो. ॥१८१॥

नवीन आणि जुन्या व्यवहारांत चतुर लोकांच्या बुद्धिने प्रतिक्षण नवे नवे व्यवहार होत रहातात, म्हणून त्या सर्वांना सांगणे कठीण आहे म्हणून प्रत्यक्ष, अनुमान, उपमान तसेच शब्द प्रमाण यांच्यातर्फे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. ॥१८२॥१८३॥

ह्या प्रकाराने संक्षिप्तरुपात सामान्यतः राजा तसेच राष्ट्र ह्या दोघांच्या संबंधामध्ये, विशेष करुन राजासाठी जे हितकारी आहे ते सांगितले आहे. ॥१८४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP