खिल - नीति - निरुपण नावाच्या या अध्यायात राज्याची सात अंगे आणि सर्व लोकांना हितकर शास्त्रसंमत संक्षिप्तरुपाने उरलेल्या नीतिचे संक्षिप्त वर्णन करतो. ॥१॥
मी शंभर वर्षांनंतरही कदाचित शत्रूला आपल्या आधीन करीन असा विचार करुन सावधान मनाने शत्रूच्या दोषांना शोधीत रहावे. ॥२॥
सुंदर युक्त सेनेमध्ये राहून असे करावे की शत्रू स्वतःच्याच सेनेवर संदेह करु लागेल आणि हीन मंत्र आणि शक्तिहीन होईल. ॥३॥
सावधान चित्ताने मनोनुकूल आचरण किंवा वाण्याच्या व्याजाने शत्रूच्या राष्ट्राला नीटप्रकारे पाहून मांजर किंवा बगळा यासारखे स्थिर होऊन प्रथम निर्भय रहाण्याचा विश्वास देऊन व्यसनांमध्ये गुंतलेल्या शत्रूला वेळ पाहून नष्ट करावे. ॥४॥
शत्रू सेनेला नष्ट करु शकणारी आपली सेना युद्धात नियुक्त करावी आणि जी शत्रूच्या राज्यात रहाणारी आणि एकांत मिळाला तर आपला द्वेष करणारी आहे तिची नियुक्ती करु नये. ॥५॥
सेवक किंवा सैनिक हे दान आणि सन्मान मिळाला नाही तरी आपल्या राजाला कधीही सोडणार नाहीत आणि जीवनाचे रक्षण करण्यासाठी किंवा धनाच्या आशेने वेळप्रसंगी शत्रूच्या आधीन होणार नाही अशी सेवक आणि सैनिक यांची विशेषता असली पाहिजे. ॥६॥
बल आणि सेना जास्त असली तरी आपल्या मृदुपणाचे प्रदर्शन करीत शत्रूच्या राज्यात घुसून प्रथम त्याच्या दैनंदिन कामांत मदत करणारा बनावे. त्यानंतर तेथे आपली सर्व प्रकारे आवश्यकता जाणवेल तेव्हा संपूर्ण शत्रू राज्याचे हरण करावे. हे हरण अशा प्रकारचे असावे की शत्रूचा द्वेष करणारे पाटीदार आणि सेनापती यांना राज्याचा काही भाग देऊन मुळापासून उखडून टाकून सर्वांना आपल्या आधीन करावे. ॥७॥८॥
जसे झाडाचे मूळ कापल्याने झाडाच्या फांद्या सुकून जातात त्याप्रमाणे राजाशिवाय सेनापती इत्यादि लोक कोणी तत्काळ तर कोणी हळू हळू शक्तीहीन होत जातात. ॥९॥
राज्यरुपी वृक्षाचे मूळ राजा असतो, शरीर मंत्री, फांद्या सेनापती, पालवी सेना, फूल प्रजा, फळ जमिनीपासून मिळणारा कर आणि बी राज्याची भूमि मानली गेलेली आहे. ॥१०॥११॥
घरगुती व्यवहारात विश्वसनीय सिद्ध करणार्या शत्रू राजावर कधी विश्वास ठेवू नये. तसेच त्याच्याजवळ एकट्याने किंवा त्याच्या घरी थोड्या सहायकांसह जाऊ नये. ॥१२॥
सेवक, स्त्री आणि पुत्र यासंबंधी एक क्षणभरही असावधान राहू नये. कुठल्याही ठिकाणी जिवंत असणार्या आपल्या मुलाला आपले स्वामित्व कधी देऊ नये. ॥१३॥
स्वभावाने सदगुणी असणार्या मुलालाही अधिकार दिल्याने महान अनर्थ आणि माज देणारा होतो. म्हणून विष्णु इत्यादिंनीही आपल्या मुलांना पूर्ण अधिकार दिला नव्हता. ॥१४॥
जर आपले आयुष्य थोडेच राहिले असेल आणि त्यावेळी सत्पुत्र असेल तर त्याला पूर्ण अधिकार द्यावेत. कारण अधिकाराच्या लोभामुळे होणारी चंचलता अधिक प्रमाणात झाल्याने युवराज राजाच्या राज्याला क्षणभर सुद्धा सांभाळण्यास समर्थ नसतात. ॥१५॥१६॥
मुलाने उत्तम राजपद मिळाल्यावर सुंदर नीतिपूर्वक प्रजेचे पालन करुन पित्याच्या वेळेपासून असलेल्या मंत्र्यांना पित्याप्रमाणे गौरवावे. ॥१७॥
मंत्री लोकांनीही राजकुमाराची आज्ञा उचित असेल तर राजाच्या काळात जशी मानीत असत त्यापेक्षा अधिकरुपाने मानावी. जर ती आज्ञा अनुचित वाटली तर दुसर्यावेळी ह्या आज्ञेचे पालन होईल असे बोलून त्यावेळी ती आज्ञा टाळावी. ॥१८॥
धनाच्या आशेने नवीन राजाने अनीतिनुसार व्यवहार करु नयेत. कारण जर मंत्रीगणसुद्धा अनीतिपूर्ण व्यवहार करु लागले तर ते राजासह स्वतः नष्ट होतात. ॥१९॥
जो नवीन राजा राजकुळाला भक्त मंत्रीलोकांचा द्वेष करतो आणि नवीन लोकांच्या सांगण्याप्रमाणे कार्य करतो तो शत्रूच्या आधीन होतो आणि आपले धन आणि प्राण दोन्ही नष्ट करुन घेतो. ॥२०॥
जर कोणी नवीन अधिकारी गुणी आणि सुनीतिवान् असेल तर त्याला जुन्यांप्रमाणेच सांभाळावे. आणि चांगल्या प्रकारे अनुभव घेऊन त्याला जुन्यांबरोबरच राजकार्यांत नेमावे. ॥२१॥
जे धूर्त असतात ते त्यांचे स्वतःचे कार्य सिद्ध होईपर्यंत मृदु व्यवहार, प्रशंसा, नमन, सेवा, दान आणि प्रियवचन इत्यादिने राजाची सेवा करतात. आणि जे सज्जन असतात ते सत्य वचनाने प्रत्यक्ष किंवा परोक्ष ह्या दोन्ही प्रकारात राजाची सेवा करतात. ह्या दोघांमध्ये आकाश आणि पृथ्वी यात जेवढे अंतर आहे तेवढे अंतर असते. ॥२२॥२३॥
दुसर्याची वस्तु किंवा धन हरण करण्यास प्रवृत्त होण्याने जाट आणि चोर हे दोघेजण निंदीत मानले जातात. परंतु हे दोघे समोर धन हरत नाहीत. परंतु धूर्त मनुष्य समोरच धन हरुन नेतो. ॥२४॥
धूर्त मनुष्य मूर्खांच्या समक्ष हितकर गोष्टीला अहितकर आणि अहितकराला हितकर सिद्ध करुन शेवटी आपले कार्य पुरे करतात. आणि ते चतुरतेने प्रथम आपल्यावर अत्यंत विश्वास पैदा करतात आणि शेवटी त्याचा नाश करतात. आणि ज्याचे वाईट करण्याची इच्छा करतात त्याचे प्रथम चांगले करतात. ह्याच प्रकाराने शिकारी मृगाचा वध करण्याअगोदर प्रथम सुंदर स्वराने मृगाच्यासमोर गाणे म्हणतात आणि नंतर त्याला मारुन टाकतात. ॥२५॥२६॥
धुर्ततेशिवाय जास्त धन ताबडतोब मिळत नाही. दुसर्याचे धन हरण करुन कोणी मोठा धनी होत नाही. मायेशिवाय इच्छित कार्य पूर्ण होत नाही. ॥२७॥२८॥
बर्याच जणांकडून जो व्यवहार प्रशंसित केला जातो तो धर्म समजला जातो. आणि जो निन्दित होतो तो अधर्म समजला जातो. म्हणून धर्माचे तत्व गहन आहे, तो कोणाला समजणे असंभव आहे. ॥२९॥
जगात अतिदान, तपस्या आणि सत्याचा संबंध ह्या तीनही दरिद्रता उत्पन्न करणार्या आहेत. अतिदानाने दरिद्री होणे हे जग प्रसिद्ध आहे. तपस्या करताना धर्मानुष्ठान म्हणून धन खर्च केल्याने दारीद्र्य येते. धनप्राप्ती धूर्ततेने करावी लागते. जर त्यानी सत्याचा संबंध जोडला तर धनप्राप्ति असंभव असल्याने दरिद्री होणे सहज आहे. ज्या वाणीत धर्म आणि अर्थ नसतो ती अत्यंत निरर्थक समजली जाते. ॥३०॥
जर कोण मनुष्य धर्म आणि अर्थ ह्यामध्ये समर्थ आहे म्हणजेच धर्मानुसार आयोजन करण्यात निपूण आहे आणि देशकाळाला समजतो आणि कार्य करतो आणि संशयरहित आहे तो सदैव पूज्यनीय होतो. आणि जो संशय करतो तो अपूज्य होतो. ॥३१॥
अर्थाचा दास पुरुष होतो, अर्थ पुरुषाचा दास होत नाही. म्हणून अर्थासाठी नेहमी प्रयत्नपूर्वक यत्नशील रहाणे आवश्यक आहे कारण अर्थामुळेच धर्म, काम आणि मोक्ष हे सर्व पुरुषार्थ प्राप्त होतात. ॥३२॥
शस्त्र आणि अस्त्र यांच्याशिवाय शूरता, स्त्रीशिवाय गृहस्थी, सैनिकांच्या संघटनेशिवाय युद्ध, समजणार्या शिवाय चतुराई, चांगल्या सहाय्यकाशिवाय विपत्ती नेहमी दुःखदायक होते आणि विपत्तीमुळे चांगल्या मित्रासारखा दुसरा प्रामाणिक सहाय्यक नसतो. ॥३३॥३४॥
जो राजा आपल्या नातेवाईक, स्त्री, पुत्र, सेवक तसेच दासगण हे संतुष्ट होतील याचा प्रबंध करण्यासाठी आपल्या धनाचा उपयोग करतो तो सुखी असतो. ॥३५॥
दुसर्याच्या र्हासाला " दर्प ", मी सर्वांपेक्षा गुणी आहे ह्याला " मान ", खर्चात कंजूषी करण्याला " कार्पण्य ", आपला नाश होईल या शंकेला " भय " आणि मन स्थिर न रहाणार्याला " उद्वेग " म्हणतात. ॥३६॥
क्षुद्रजनांचा केलेला अपमान घोर शत्रूता उत्पन्न करतो. कोणाला नेहमी दान देणे, सन्मान करणे, सत्य व्यवहार करणे, शूरता आणि मृदुता ह्या सर्व गोष्टी मित्रता निर्माण करणारी आहेत. ॥३७॥
राजाने आपत्ती आल्यावर विनम्र होऊन पंडित, गुरु, भाऊ, भाऊबंद, सेवक, जातीतील लोक आणि सभासद या सर्वांना राजसभेत बोलवून यथायोग्य सन्मान केल्यानंतर आपले अभीष्ट करण्यासाठी अशारीतीने प्रार्थना करावी आणि उपाय विचारावा. ॥३८॥३९॥
मी आपत्तीतून बाहेर येण्यासाठी आपण सर्वांनी युक्ती सांगावी. आपण माझे मित्र आहात. मी आपल्याला नुसते सेवक मानीत नाही. ॥४०॥
आपल्यासारखा माझा दुसरा कोणी सहाय्यक नाही. म्हणून ह्यावेळी तुमच्या वेतनाच्या एक तृतीयांश किंवा एक बारावा फक्त आपण घ्यावा कारण ह्या काळात खर्च जास्त झाल्याने मी पूर्ण वेतन देण्यास समर्थ नाही. परंतु आपत्तीतून बाहेर पडल्यावर आपल्या उपकाराच्या बदल्यात मी आपले उरलेले सर्व वेतन देईन. ॥४१॥
जो सेवक असा धनी असेल तर आपण सोळा वर्षेपर्यंत वेतन न घेता जीवन चालवू शकतो तो वेतन न घेता आठ वर्षांपर्यंत स्वामीचे कार्य करतो आणि जो ह्याच्यापेक्षा दुसरा आहे तो आपल्या आर्थिक स्थितीनुसार जितका काळ वेतनाशिवाय रहाता येईल तितके दिवस स्वामीचे कार्य करतो. ॥४२॥
जो सेवक ज्याला सन्मानपूर्वक दिलेले अन्न एकवेळा खात असला आणि स्वामीचे रक्षण करण्यासाठी वेळ पडल्यास जीवनाचासुद्धा त्याग करतो तो सेवक सुयश देणारा मानला जातो. जो आपत्ती आली तरी स्वामीची साथ सोडीत नाही आणि तोच स्वामी आहे की आवश्यकता पडली तर सेवकाच्या रक्षणासाठी आपल्या जीवनाचासुद्धा त्याग करतो. ॥४३॥
ह्या पृथ्वीवर रामासारखा दुसरा कोणी नीतिवान राजा झाला नाही. कारण ज्याच्या नीतिमुळे वानरांनीही त्याचे सेवकपद स्वीकार केले. ॥४४॥
श्रीकृष्णासारखा दुसरा राजा कूटनीतिचा प्रयोग करणारा झाला नाही. त्याने कूटनीतिने जबरदस्तीने आपली बहिण सुभद्राचा विवाह अर्जुनाशी केला. ॥४५॥
नीतिवान माणसाची युक्ति, हिचा वस्तुतः उपाय आहे जो संपूर्ण कल्याण करण्यास योग्य आहे. ॥४६॥
जो आपल्या रक्षणाच्या उपायाचा विचार करीत नाही तो पशुपेक्षा मोठा आहे, स्त्री आपल्या जारपतीला लपविण्यासाठी छळाचा आश्रय घेते. ॥४७॥
कार्यसिद्धिसाठी दोन प्रकारची युक्ति असते. छळरुपा पहिली आणि सत्यरुपा दुसरी. जे छळ करणारे असतात त्याच्यासाठी छळरुपा युक्तिचा प्रयोग करावा. नाहीतर छळ करण्याने मोठ्या लोकांचे चरित्र बिघडते. ॥४८॥
बुद्धिमानांची श्रेणी असते. एकच कोणी बुद्धिमान नसतो. चतुर लोकांना जेथे सत्यरुपा युक्ति निष्फळ दिसते तेथे परदेश, काल आणि पात्र याच्या अनुसार अनेक प्रकारच्या युक्तीची ते कल्पना करतात. ॥४९॥५०॥
ह्या जगात छळ ( माया ) करण्यात निपुण लोक मंत्र, औषध, नाना प्रकारचे वेष, काळ, वचन आणि अर्थ यांचा आश्रय घेऊन छळ प्रयोग करतात. ॥५१॥
जो स्वामीला अनुरक्त राहतो तो " उत्तम " सेवक आहे. जोपर्यंत वेतन देणार्या स्वामीची सेवा अधिक वेतन मिळण्याच्या लोभामुळे करतो तो " मध्यम " आणि जो स्वामीमुळे उत्तमप्रकारे सांभाळला जात असूनही चोरुन दुसर्याची सेवा करतो तो " अधम " सेवक होय. ॥५२॥
जो अपकार केला तरी स्वामीवर उपकार करतो तो " उत्तम " आहे. उपकार करुनही जो अपकार करतो तो " अधम " समजला जातो. " मध्यम " सेवक उपकार करणार्यावर उपकार आणि अपकार करणार्यावर अपकार करतो आणि ह्या अतिरिक्त जो " अधम " असतो तो मात्र आपला स्वार्थ साधण्यासाठी तत्पर असतो. ॥५३॥
उपदेशाशिवाय केवळ प्रमाणे देऊनही जी गोष्ट नीट समजत नाही आणि बाल्य आणि तारुण्य या दोन अवस्थातून जी गोष्ट प्रारंभ होते त्याची समाप्तीसुद्धा होते. ॥५४॥
परंतु वृद्धावस्थेला बुद्धिमान बाल्य आणि युवा ह्याप्रमाणे कधी मानीत नाहीत. ह्यात प्रारंभ केलेल्या कार्याची समाप्ती होऊ शकत नाही. कारण असे कार्य आरंभ करावे की ज्याची समाप्ती क्लेश न होता होईल. ॥५५॥
बरीच कार्ये एकाचवेळी आरंभ करणे सुखकारक होत नाही. आरंभ केलेले कार्य पुरे झाल्याशिवाय दुसर्या कार्याची सुरुवात करु नये. ॥५६॥
कारण आरंभ केलेले कार्य पुरे होण्याअगोदर दुसरे कार्य आरंभ केल्याने पहिले कार्य संपन्न होत नाही. आणि दुसरे कार्यही संपन्न होत नाही. म्हणून बुद्धिमान माणसाने अशाच कार्याचा आरंभ करावा की जे सुखपूर्वक समाप्त होईल. ॥५७॥
ज्या भांडणामुळे आपला काही हेतू सिद्ध होत असेल तर ते चांगले असते. नाहीतर तेच भांडण आयुष्य, धन, मित्र, यश आणि धर्म यांचा नेहमी नाश करणारे होते. ॥५८॥
ईर्षा, लोभ, मद, प्रीति, क्रोध, भय आणि साहस हे सात कार्यात प्रवृत्ती आणि दोष विद्वानांनी सांगितले आहेत. ॥५९॥
ज्या प्रकाराने कार्य निर्दोष होईल त्या प्रकाराने ते करावे. आपत्ती नसताना, वेळ गेल्यावरसुद्धा पंडितांची ज्या कार्यास अनुमती आहे ते कार्य करावे. ॥६०॥
कल्याण व्हावे असे चिन्तिणार्या राजाने आपल्या राज्यात अशी व्यवस्था करावी की जेथे श्रेष्ठ पुरुषांचा आवश्यक तसा सन्मानापेक्षा कमी आणि न्यून पुरुषांला जेवढा पाहिजे त्यापेक्षा अधिक सन्मान मिळेल. म्हणजे सर्वांचा यथोचित सन्मान होईल. कुठे कमी जास्त होणार नाही. ॥६१॥
राजाने जो जो अधिकारी नियुक्त केलेला असतो त्या सर्वांना गावाच्या बाहेर रहाण्यासाठी जागा द्यावी. तसेच राजकार्याशिवाय सैनिकाने गावात प्रवेश करु नये. ॥६२॥
सैनिकांनी कधी कोणा ग्रामवासींना त्रास देऊ नये आणि ग्रामवासी लोकांनी सैनिकांजवळ कसल्याही प्रकारचा व्यवहार करु नये. ॥६३॥
राजाने सैनिकांची शूरता वाढण्यासाठी नेहमी युद्ध आणि धर्म याच्या गोष्टी त्यांना सांगाव्यात. त्यांच्यासाठी सुंदर वाद्य, नृत्य, गाणे इत्यादिंचा प्रबंध करावा. ज्याच्यामुळे त्यांची शूरता वाढेल. परंतु हे सर्व अश्लीलयुक्त नसावे. ॥६४॥
जेव्हा मूळ धनापेक्षा चौपट धन कर्ज घेणार्याने सावकाराला दिले आहे अशावेळी जास्त धन घेणार्या सावकाराला रोखावे म्हणजे कर्ज फिटलेले आहे म्हणून सावकाराला काहीही देऊ नये. ॥६५॥
शुक्रनीति समाप्त