मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - उपमा

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


कृषिविषयक उपमा
सुखाची चांचणी मह्या बंधूची मेव्हणी ।
हिच्या उजेडानं बैल चरती लवणी ॥
कपाळीचं कुंकू फिरत रानामंधी ।
जतन करा नारायणा बेलाच्या पानामंधी ॥

किंवा
लगनाचा जोडा देवा-धर्मावाणी ।
नको देवू गोरी हाव्या हाती पाणी ॥
एरंडं तोडूनी घातला गराडा ।
पुरुष नाही धडा नित नारीचा पवाडा ॥

 निसर्गविषयक उपमा
वळवाचा पाणी पडून वसरला ।
दादाले झाल्या लेकी आम्ही बहिणी इसरला ॥

झाडाझुडांच्या उपमा
कोण्या गावी गेला मह्या बर्फीचा तुकडा ।
भाग सर्जाचा वाकडा ॥
दोघी बहिणी आम्ही चार गावच्या बारवा ।
बंधू मंधी नांदतो जोंधळा हिरवा ॥

किंवा
मी नाही एकलो मले शंभर गणगोतं ।
वासनीच्या येलावनी बैया गेली मोकलतं ॥
बहिण भावंडं एका झाडाची संतर ।
आली परयाची नार इनं पाडले अंतर ॥

खाद्यपदार्थाच्या उपमा
बंधूचं बोलणं जसं मव्हळाच्या वानी ।
उडून गेला बाई जसा शाळू दिवस वार्‍यावानी ॥
जातं मी वढते जसं हरण पळते ।
बैयाचं दुध मह्या मनगटी खेळते ॥

किंवा
घरची आस्तुरी जसं कपाशीचं बोंड ।
परनारीसाठी करे घोडयावानी तोंड ॥
आकासी मांडव धरतरी बव्हलं ।
बाळाच्या माम्यानं सूर्य लगन लावलं ॥
पाऊस नवरा आभाळाचा केला डफं ।
इजबाई करवली कशी आली चमकतं ॥
स्वर्गीचा देव आहे जातीता कुंभार ।
नित करे घडामोड तव्हा चालतो येव्हारं ॥
आत्मा गेला वरी कुडी झाली नवरी । देलासे जानोसा गाव नगराचे बाहेरी ॥
हातात कडे तोडे डोक्याला लाल टोपी ।
वडिलापुढे बाळ शोभे जणू गणपती ॥
बहिण भावाची मया अंतरकाळजाची ।
पिकलं सीताफळ याले गोडी साखरेची ॥
संपत्तीची नार उतावळी बावळी ।
हुळवला तीळ कोळं पडलं बाहेरी ॥
समुद्र म्हणे नर्मदा महे बहिणी ।
उथळ तुहं पाणी थीर चाल मह्यावाणी ॥
नवरदेवापरता करवली आगजाळ ।
जवाईराजस जसा पानसमिंदर ॥
पेटला डोंगर जन गेल इझवाया ।
पेटली मही देही कोण येईल इझवाया ॥
जावईराजस सोन्याचा जायफळं ।
नणंती मैना लवंग आगजाळं ॥
सासरा भोळा राजा सासू शुक्राची चांदणी ।
कपाळीचं कुंकू सूर्या डोलती अंगणी ॥
देवाचं देऊळ फुलांनी शोभीवंत ।
नार पुत्राची भाग्यवंता ॥
घरं ग देता शोभा तान्ह्यागं बालकानं ॥
नार पुत्रानी भाग्यवान ॥
काय सांगु बाई माह्या माहेरची बढाई ।
येशीच्या डांभ्याले वाघ खेळती लढाई ॥

किंवा
काय सांगु बाई बाळाची नवलपरी ।
वासरासंग वाघ नेले पाण्यावरी ॥

किंवा
वाटच्या वाटसरा काय पाह्यतो खेडयाले ।
सोन्याचे कुलूप मह्या बंधुच्या वाडयाले ॥
पडतो पाऊस नका करु गाजावाजा ।
बोलली धरतरी आला पतीराजा माझा ॥
नाचीन नाचती खाली पाहून हासती ।
बंधुच्या मह्या डोईचा रुमाल मागती ॥
आपुन खातो पान रानीले देतो मेवा ।
बैयाचा बाळराज शेजंले गेला नवा ॥
आपून खातो पान राणीले देतो वाटी (खोबरे) ।
एवढा कावा रानीच्या शेजंसाठी ॥
बोलले भ्रतार आडमिती ।
राणी महिने झाले किती ॥
गर्भिन नारीले खावू वाटली पपई ।
हौशा भ्रतारानं बागत धाडला शिपाई ॥
गावाले गेला बाई मह्या कुंकाचा टिकला ।
पाचा पानाचा ईडा मह्या पदरी सुकला ॥
गावा गेला बाई मले ईसावा देवून ।
किती पाहू वाट वाडयाबाहेर जावून ॥
गेला कोन्या गावी कोणा वाढू ताट ।
सुना लागे चंदनाचा पाट ॥

किंवा
भ्रतार नाही बाई आहे पूर्वीचा गोतं ।
उशाखाली हात नाही माहेर आठवतं ॥
गावा गेला बाई मह्या आंब्याचा डगळा ।
रिकामा पलंग जीव लागला सगळा ॥
गेला कोण्या गावी मह्या जीवाचा पोपट ।
सपनात आलं बाई याच घडयाळं जाकीटं ॥
भ्रताराचं सुखं नार सांगती झोकात ।
चक्रशेल्याची सावली केली शेतात ॥

किंवा
भ्रताराची खूण कशी डोळयाच्या आडून ।
देणं राणी सुपारी फोडून ॥
भ्रताराची खूण वाजे धंगाळाची कडी ।
देणं राणी धोतराची घडी ॥
माय बापाची लाडकी भ्रताराची थोडीबहू ।
बोलले भ्रतार राणी माहेरा नको जावू ॥

किंवा
तुहे पैंजन महे पैंजन झुम झुम करे ।
दादा वहिनीले बांगडया भरे फु बाई फू ॥
इहिणीच्या गालाला म्हस ।
इव्हाई इहिणीले म्हणतो मांडीवर बस ॥
मांडवाच्या दारी पेरला चुका ।
इव्हाई भोळा घेती इहिणीचा मुका ॥
अशा प्रकारची गंमत करीत असतात.
अस्तोरी पुरुष दोहीचा अबोला ।
फुलाची केली शेज राजा एकला निजला ॥
गेली कोण्या गावी मह्या कपाळाची चिरी ।
दरुज्यात उभी आली हासत सवारी ॥
भ्रतार नाही घरी कोणाला टाकू बाजं ।
केसाचा सोडीनं साजं ॥
बोलले भ्रतार कुठं गेली घरवाली ।
हाती पानचोळी दारी हासत आली ॥
कपाळीचं कुंकू किती लावू ढबदार ।
जावो जन्मभरी पित्या तुमचा कारभार ॥
पहिल्या मासी आंब्याशी कैर्‍या येती ।
याच वेळेशी पती परदेशी जाती ॥
साजणेबाई माझं परदेशी गुज ।
सावळे श्रीरंग टाकुन गेले परदेशी मज गा ॥धृ॥
दुसर्‍या मासी आखाडी येती । पावसाची वात पाह्यती ।
याच वेळेसी पती परदेशी जाती ॥
साजणे बाई माझं परदेशी गुज ।
सावळे श्रीरंग टाकुन गेले मज गं ॥
चवथ्या मासी कसा उन्हाचा भर ।
मंदिरी पलंग त्यावर फुलाचा भार ।
त्यावेळी पती परदेशी जाती ॥
साजणे बाई माझं परदेशी गुज ।
सावळे श्रीरंग टाकुन गेले मज वं ॥धृ॥
पाचव्या मासी कशी हिवाची लहरी ।
सावळे श्रीरंग आज येतील घरी ॥
साजणे बाई माझं परदेशी गुज ।
सावळे श्रीरंग टाकुन गेले मज गं ॥धृ॥
सहाव्या मासी हत्तीवरचा पाऊस ।
न्हावून धुवून अंगी लेली कंचोळी ॥
मोत्याने भरलं ताट साजने बाई ओवाळू कोणा?
याचवेळी पती परदेशी जाती ॥
साजणे बाई माझी परदेशी गुज ।
सावळे श्रीरंग टाकुन गेले मज गं ॥धृ॥
जात्या इसवरा तू जंगलाचा ऋषी ।
माहेरी भाऊ भासे मुक्यानं दळू कशी ॥
जात्याच्या तोंडावर पाय नको देवू तू गरती ।
जात्याच्या तोंडावर महादेवाच्या पारबती ॥
पहिल्या वहिचा नेम नाही केला ।
मुखी राम आला ॥
पहिल्या वहिचा नाही केला नेम ।
पोथी वाचतो तुळशीखाली राम ॥
मह्या अंगणात तुळसाबाईचा वटा ।
विघ्नं जातील बारा वाटा ॥

किंवा
तुळशी घालू वटा लावू रोप ।
विघ्न जातील आपोआप ॥
तुळशी घालू पाणी । झाली पातकाची धुनी ॥
तुळशी लावू कुंकू । तिथं उभी व्हती सखू ॥
तुळशी लावू गंध । तिथं उभा होता गोविंद ॥
तुळशी लावू बुक्का । तिथं उभा व्हता तुका ॥
तुळशी लावू दिवा । उजेड पडला सर्व देवा ॥

किंवा
पाह्यटं उठूनी तोंड पहा गाईचं ।
दारी दर्शन तुळसबाई ॥
पाह्यटंच्या पारी कशाचं भेव ।
तुळशीच्या पायावरी इना वाजवती देवा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP