स्फुट कविता - श्रीगुरुस्तवन

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( वृत्त : दिंडी )
अतां केव्हां तरि याल गुरुराया ।
मला दत्तात्रय स्वामि उद्वराया ॥
विविध दुःखें लागलों घाबराया ।
अतां केव्हां तरि याल गुरुराया ॥१॥
बाळपणचा अज्ञान खेळ झाला ।
तरुणपणाचाही बहर निघुन गेला ॥
शुभ्रवर्णी वृद्धापकाळ आला ।
हातपायहि लागले चांचराया ॥ अतां ॥२॥
काम - क्रोध - मद - मोह - मत्सरांनीं ।
जसा धरिला व्याघ्रेंचि वत्स रानीं ॥
तसा झालों व्याकळ शरीरांनीं ।
नीरवाणीं लागलों हंबराया ॥ अतां० ॥३॥
जवळ बसला येऊन काळ नाका ।
भेटिसाठीं हनुवटी आलि नाका ॥
सुना म्हणती वृद्ध हा मरेना का ।
उगा उरला सदनांत खांकराया ॥ अतां० ॥४॥
कुटुंबाचा त्रासला कीं आखाडा ।
म्हणती वैद्याचा पाजुं नका काढा ॥
अतां वेगें बाहेर यासि काढा ।
याचें भय वाटतें लेंकराया ॥ अतां० ॥५॥
तुझे अक्षयीं विजयी सदा बाहू ।
तुझ्यावीण कोणासि सांग बाहूं ॥
विष्णूदास म्हणे घाल उडी पाहू ।
नको पाहूं निर्वाण अंत राया ॥ अतां० ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP