रंगपटावर स्त्री - पुरुषांची फुटली रे जोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥ध्रु०॥
नरजन्माचा नरा ! येइना पुनः पुन्हा खेळ
जशी का केळीला केळ
तरुणपणाचा बहार अंगीं येतो एक वेळ
नदीचा पूर केवळ
वृद्धपणामधिं शिरिं पांढरी फुटली हरळ
अवघी मग पडली भुरळ
आयुष्याची शिल्लक बाकी राहिली थोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥१॥
जोंवर आहे स्त्रीपुरुषांची संगत संसारीं
तोंवर ही गम्मत सारी
रामचन्द्रही स्त्री - दुःखानें करी ‘ नारी ’ , ‘ नारी ’
झाला वेडा मदनारी
विवाहिताचा विधूर झाला पुरुष निराधारी
कोळसा पडला अंधारीं
प्रारब्धानें केलि प्रीतिच्या मधें ताडातोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥२॥
लग्न लाविती वैदिक ब्राह्मण म्हणति सावधान
आतां द्या दुरवर अवधान
प्रसिद्ध झालें जगांत राधाबाई अभिधान
ऐका पुढें अनुसंधान
दारिद्रयांतहि पार्वति ऐसें मानि समाधान
सदोदीत राहे आनंदानं
भ्रतार मानुनिया शिवरुपी पुढें हात जोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥३॥
गृहकार्याला अनुकुल होती ती भार्या माझी
अखण्डित मजवर ती राजी
कधिं खावी शिळि भाकर - भाजी, कधिं साजुक - सोजी
करी सर्वांसि हांजि हांजि
नित्य क्रमानें उदक गायी - वासरांसि पाजी
आवड सर्वत्रांमाजी
पतिकार्यासी तत्पर राहूनि साधे आघाडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥४॥
या परि गेले सहज आनंदामधें दिवस चार
पुढें काय सुचला विचार
दैवबळानें गोड वाटला असुनी अविचार
करावा भु - लोकीं संचार
द्यूत खेळतां धर्म न ऐके विहीत उपचार
कळविला तिला समाचार
ऐकुनि वाटे पडली अंगावर पर्वत - धाडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥५॥
काळ - गतीचा कठीण फांसा, ओढुनिया नेतो
उद्यां मी मुलखावर जातों
तुजवांचुनि जळहीनमिनापरि केवळ तळमळतों
वल्लभे, जिव व्याकुळ होतो
परंतु तव संमतें तुझा मी निरोप अतां घेतों
परतुनि अविलंबें येतों
कसें करुनिया चार दिवस हे विरहाचे काढी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥६॥
ऐकुनि राधा झाली उलटी खड्गाची धारा
वाहती नेत्रांतुनि धारा
टाकुनि द्यावी आपुलि बायको दुसर्याचे दारां
नव्हे हा सूज्ञांचा धारा
टाकुनिया गृहदीप - प्रकाशित पतिच्या आधारा
कोण स्त्री पडेल अंधारां
म्हणे, का करितां ब्रह्मगांठिची तुम्हि सोडासोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥७॥
येईन तुमच्या समागमें मी, तुम्हिं मजला न्यावें
येवढें वचन ऐकावें
मला वाटतें अपण वनामधें आनंदानें रहावें
ऋषींचे पुण्याश्रम पहावे
चार दिवस निश्चिंत वनाचें वैभव भोगावें
तुमच्या सेवेंत वागावें
खाउनि ओला सुकला पाला करुं सुकृत जोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥८॥
अधिकचि तळमळ वाटे, पडेना चैनचि अणुमात्र
सती ती गुणगंभिर पात्र
जागत बसली, नाहिं लाविला नेत्राला नेत्र
सोडिली झोंप सप्त रात्र
परंतु मोठें कर्मगतीचें चरित्र विचित्र
अचेतन केलें जसें ‘ चित्र ’
अठवे दिवशीं त्या संधीमधें साधिलि घरफोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥९॥
जसा काय नळ दमयंतीचें अर्धवस्त्र कापी
तदा ती गेलि होति झोंपीं
तशि दुष्टानें धेनु घातली व्याघ्राच्या खोपीं
असोनि जिवाचे संगोपी
त्या दुष्कर्माचे पहा झाडे पटती अद्यापी
कोणि नसे मजऐसा पापी
अन्यायाविण त्या साध्वीची केलि मानमोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥१०॥
टाकुनि गेला पती सतीला त्या निजल्या जागीं
झाली दचकुन ती जागी
अकस्मात दुर विखार शंभर विंचवांचे नांगी
टोंचल्या वाटति सर्वांगीं
दुःखाग्निमधें करपलिं गात्रें जशिं सगळीं वांगीं
विपत्तिस जाहली विभागी
रडे पडे आक्रोशें ओरडे आरडे शिर फोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥११॥
एक वेळ येउनि कांहीं तरि तुम्हिं मजसी बोला
आतां कां धरिला अबोला
दिली गळ्यांतुनि फेंकुनि पुतळी कवडीच्या मोला
आली काय किंमत समतोला
टाकुनि गेला नळ निळ कंटकवनीं बायकोला
उसाचा फड पाहुनि कोल्हा
ज्ञानहीन अज्ञान जात ही बायकोचि वेडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥१२॥
ही इकडे असे, पति तिकडे मग धुंडे रानोमाळ
पडेना चैन अळूमाळ
कोठें राहणें, मास, पक्ष, ऋतु ऐन वर्षकाळ
कोठें एक दिन, संध्याकाळ
मिळाली भ्रमतां पहा विश्रांती माहुरच्या पहाडीं
आतां काय खेळण्याचि गोडी ॥१३॥
श्रीदत्तात्रय निद्रास्थळ निळ अवळि महासिद्ध
देव देवेश्वर सन्निध
त्या स्थळिं केलें तप मागुनिया माधुकरी शुद्ध
कटाक्ष न सोडी प्रारब्ध
तदनंतर मातापुरिं केला बहु नाटक छंद
जोडिली कविता कटिबंद
परंतु झाली त्या स्वस्त्रीची स्मृति थोडी थोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥१४॥
रेणुराव सरदेशमूख रणशूर अखाड्यांत
राहिलों त्यांच्या वाड्यांत
त्या पुरुषाशीं जडला स्नेह - संबंध थोडक्यांत
अडकला कासव हंड्यांत
तो झाला नर गत व्याघ्राच्या पडुनी जबड्यांत
ज्याचे गुण गावे पोवाड्यांत
मग त्यामागें गृह पत केली पाटिल पासोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥१५॥
प्रयाग, काशी, मथुरा, वृंदावन, गोकुल - शाला
धुंडिल्या अनेंक देशाला
कृष्णा, वेण्या, गंगातट, मठ दाही दिशांला
शोधितां पावे निराशेला
करितां बहु जपतपव्रत खचलें मनिं उपदेशाला
दया मग ये जगदीशाला
दाखवि लीला कला चरित्रचि विचित्र गारुडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥१६॥
सकळ जगावर तुझि भगवंता करुणामृत - वृष्टी
असूनी मज करसी कष्टी
बाप नव्हे तो साफ बुडवितो दुःखामधिं सृष्टी
यमाहुनि निर्दय परमेष्ठी
शुभाशुभ फळें काय लिहीतो न कळे अदृष्टीं
आतां कधिं पति पाहिन दृष्टीं
आइ धरणि ! घे पदरामध्यें, उदरामधिं ओती
आतां काय खेळण्याचि गोडी ॥१७॥
अशा परीनें त्या साध्वीचा अवलोकुनि शोक
कृपेनें शांतविती लोक
भ्रतार भेटेल, पलटेल विपरित काळाचा झोंक
अतां त्वां रहावें बिनधोक
पर्जन्य पडतो परी न दिसतें गगनाला भोंक
ईश्वरी चरित्र अवलोक
धैर्य धरुनी ह्रदय - बिळामधिं पंचप्राण कोंडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥१८॥
अशि इकडे मग झाली षोडश वर्षांची भरती
तिकडे खबर नसे पुरती
म्हणती, वाटे विपरित सुकृत गति शतशिरती
कल्पना विवीध जन करिती
दुःशब्दांचे इंगळ पडती त्या साध्वीवरती
ऐकुनी हळहळती गरती
कां झाला हरि कंटक संकट - सागर - नावाडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥१९॥
रहिमतपुरिं सदभावें पूजन विठ्ठलाचें केलें
तयाचें पुण्य फळा आलें
पाषाण - मूर्ति प्रत्यक्षचि ती संक्षिप्तहि बोले
आतां तुझें कार्य सिद्ध झालें
या महिन्याचे अंतीं जाइल वर्तमान कळलें
बोलुनी असें मौन धरिलें
त्या काळिं गमे मनीं तीजला लक्ष लाभ कोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥२०॥
सदोबा काळे होते मेहुणे रहात शेजारीं
सहज ते आले माहूरीं
मनिं खुण पटली, भेट जाहली मग तिसर्या प्रहरीं
उठली सौख्याची लहरी
वृत्तांत कळवुनि, कुशलक्षेम मग पत्र सुविस्तारीं
घेउनी गेले माघारीं
सकळ जनाला वृत्तांत कळला मग तोंडातोंडीं
आतां काय खेळण्याचि गोडी ॥२१॥
वृत्तांत कळला सतिला विठ्ठल - संकेताचे दिवशीं
पावला रुक्मिणिपति नवशीं
मग त्या नाहीं पारावारा थारा आनंदासी
चढली राज्यपदीं दासी
मग अविलंबें लगबग करुनी आली माहुरासी
भेटली नार भ्रतारासी
परंतु राहिली होती अंगीं कर्म - मळी थोडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥२२॥
तेथें जाहला ताप असा कीं जीवचि त्यागावा
तरि तो कशासि मग गावा
परंतु कधिंही नाहिं वंचिलें पतिच्या मनोभावा
पाहुनी जन म्हणती वाहवा
गरोदर झालि असतां नाही क्षणभर वीसांवा
जाच हा तिनेंचि सोसावा
प्रसुत - काळच्या संधिंत ग्रह - गति बाहेरी काढी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥२३॥
पाहुनी तो क्रुर कृतघ्नपर्या वाटलें आश्चर्या
उतरली सखिची मुखचर्या
मित्रोत्तम गोविंद दामोदर यमुना तदभार्या
झाले साह्य अडित कार्या
घालिति संकटिं आप्त, परी परिजन देती धैर्या
वाटलें नवल तें सूर्या
तदा पतीची मति शुद्धीवर आलि, जिरली भोंडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥२४॥
कामिनिसह गृहदार - ठिकाणा मग केला दुसरा
वाटला सुदीन तो दसरा
लग्नापासुनि तरि घडला हा पतिसंगम तिसरा
म्हणति जन, पूर्वदूःख विसरा
श्रीदत्तात्रय - जगदंबेच्या पदकमलाऽनुसरा
धरुनि रहा त्यांचाची आसरा
अनुकुळ जाहला काळ माइना आनंद ब्रह्मांडीं
आतां काय खेळण्याचि गोडी ॥२५॥
तप्त अंगावर सदा पाझरे चंद्रामृत - किरण
पावलें स्वस्थांतःकरण
लक्ष्मीपतिनें धनधान्यादिक भरपुर सुवर्ण
पुरविली बहुवस्त्राभरणं
जी जी वासना धरिली ती ती केली परिपूर्ण
झाला सकळ शोक हरण
दैवें कंटकवनीं लाभली कल्पद्रुम झाडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥२६॥
सकळहि केले पूर्ण मनोरथ जय तुळशी माते
अतां नको दाऊं दुःख मातें
अखंडित सौभाग्य रक्षुनी करि या देहातें
आनंदें मुक्त पतीहातें
जसें जसें दैवामधें लिहिलें तसें तसें होतें
चुकेना नर हो ! कदापि तें
भविष्यकाळाकडे मनानें बळें घेतलि ओढी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥२७॥
भेटायास्तव माय पार्वती पिता शंकरासी
म्हणे मी जातें माहेरासी
सकळ पावलें शुभ मंगळ सौभाग्य भरपुरासी
लाभलें सुख संसारासी
ज्येष्ठ शुद्ध द्वितिया दिनिं दक्षिणायन दशहारासी
मिळाली गौरीहरासी
वाटे सुख - सिंधुच्या बुडाली अधेंमधें होडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥२८॥
कामिनि - वांचुनि काय करावें उजाड सदनासी
निघूनी जावें अरण्यासी
सांगावें तरि काय कर्महिन दुःख धन्यासी
दाउं नये दिन मुख अन्यासी
काय करावें उत्तम कनकांबर धनधान्यासीं
टाकुनी व्हावें संन्यासी
गेलीं वायां बाळी, बुगडी, नथ, लुगडीं, साडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥२९॥
प्रपंच - भुवनांगणीं सुशोभित द्राक्षाची वेली
मंडपीं होती पालवली
प्रारब्धानें मुळासकट ती उपटुनिया नेली
जगांतुनि या नाहींशी केली
संसाराची सर्व उभारी येथुनिया सरली
सुखाची सरिता ओसरली
परि काळानें केळ कोंवळीं कापिली अघाडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥३०॥
जातों आतां अम्ही जेथुनी अलों तेथल्या गांवा
आमचा नमस्कार घ्यावा
अजवर होता लोभ तसाची पुढें असूं द्यावा
मनामधें राग नसूं द्यावा
हाची सर्वहि मित्रजनांला निरोप सांगावा
पोवाडा पंडितांत गावा
बहुत काय लिहिणें, विनंती मोडिली मांडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥३१॥
आरस नाहीं, सरस आहे खिरस गाईचा
मिळे ना बहु महागाईचा
घ्यावा मासला मधूर केवळ साखर - साईचा
आहे बहु तुमच्या सोईचा
सुगंध पुष्पांसहित पसरला वेल जाईचा
पोवाडा राधाबाईचा
विष्णु कवीची घांट वाजली, सुटली रेलगाडी
आतां काय खेळण्याचि गोडी ॥३२॥