अंतर्भाव - समास २

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥    
ऐक शिष्या सावध । सिद्ध असतां निजबोध । मायिक हा देहसंबंध । तुज बाधी ॥१॥
बद्धकें कर्में केलीं । तीं पाहिजेत भोगिलीं । देहबुद्धि दृढ झाली । म्हणोनियां ॥२॥
मागें जें जें संचित केलें । तें तें पाहिजे भोगिलें । क्षुद्रें शेत जरी टाकिलें । तरी बाकी सुटेना ॥३॥
हा तों देहबुद्धीचा भाव । स्वस्वरूपीं समूळ वाव । परंतु प्राप्तीचा उपाव । सुचला पाहिजे ॥४॥
स्वस्वरूप लंकापुरी । सुवर्णविटा त्या दुरी । देहबुद्धीच्या सागरीं । तरलें पाहिजे ॥५॥
विषयमोळ्या वाहों सांडी । त्यास कोण म्हणे काबाडी । तैसी पदार्था गोडी । सांडितां आत्मा ॥६॥
देहबुद्धीचें लक्षण । दिसेंदिस होतां क्षीण । तदुपरी बाणे खुण । आत्मयाची ॥७॥
सर्वात्मा असें बोलतां । अंगीं बाणेना सर्वथा । साधनेंविण ज्ञानवार्ता । बोलों नये ॥८॥
दसर्‍याचें सोनें वांटलें । तेणें काय हातासी आलें । रायें विनोदें आलें । सुखासना ॥९॥
तैसें शब्दें ब्रह्मज्ञान । बोलतां नये समाधान । म्हणोनि आधीं साधन । केलें पाहिजे ॥१०॥
शब्दीं जेवितां तृप्ति झाली । हें तों वार्ता नाहीं ऐकली । पाक-निष्पत्ति पाहिजे केली । साक्षेपें स्वयें ॥११॥
कांहीं तरी एक कारण । कैसें घडे यत्नेंविण । ब्रह्मज्ञान परम कठीण । साधनावांचूनि ॥१२॥
शिष्य म्हणे जी सद्‍-गुरु । साधन मी काय करूं । तेणें पाविजे पैलपारू । मह्ज़दु:खाचा ॥१३॥
आतां पुढील समासीं । स्वामी सांगती साधनासी । सावध श्रोतीं कथेसी । अवधान द्यावें ॥१४॥
इति श्रीअंतर्भाव० ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP