अंतर्भाव - समास ६
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥ श्रीराम समर्थ ॥
शिष्या परम गुह्यज्ञान । जेणें घडे समाधान । ऐसें मागें निरूपण । केलें तुज ॥१॥
तें निरूपण पाहतां । अभ्यंतरीं तृप्त होतां । आशंकेसी सर्वथा । उरी नाहीं ॥२॥
आतां असो तें प्रस्तुत । देहास मांडतां अंत । तेव्हां साधकें निश्चित । काय करावें ॥३॥
निरालंबीं चित्त न्यावें । तरी राहेना स्वभावें । ऐक्यतेच्या नांवें । शून्याकार ॥४॥
निरावलंबींचें साधन । देह असतां सावधान । केलें पाहिजे समाधान । सत्संगें विवेकें ॥५॥
अनुसंधान अंतकाळीं । कैसें राहे तें निर्मळीं । अनुसंधानभिसें जवळी । मीपण उठे ॥६॥
ऐसें स्वरूपानुसंधान । अंतकाळीं न घडे जाण । आतां करावें ध्यान । सगुण मूर्तीचें ॥७॥
ध्यानासी कारण चित्त । तेचि झालिया दुश्चित । कैसें घडे सावचित्त । ध्यान अंतीं ॥८॥
आतां करावें रामचिंतन । वासना करी प्रपंचध्यान । प्रपंचीं गुंतलें मन । तें सुटलें पाहिजे ॥९॥
पडोनि कूपाअंतरीं । प्राणी नाना विचार करी । परी तें न घडे जोंवरी । बाहेर न ये ॥१०॥
तैसें मन हें गुंतलें । वासनाविषयीं नेलें । वरी वरी नाम स्मरलें । याचें कोण काम ॥११॥
तरी आतां काय करावें । कोणते उपायें तरावें । तेंचि आतां स्वभावें । सांगा स्वामी ॥१२॥
दीनदयाळ गुरुराव । पूर्वीच रचिला उपाव । अंतीं चळे अंतर्भाव । म्हणोनियां ॥१३॥
तरी त्या उपायाची खूण । केलें पाहिजे श्रवण । उपाय रविला कोण । सद्रुरुनाथें ॥१४॥
ऐका उपायाचें वर्म । दृढ लविला नित्यनेम । हेंचि उपायवर्म । समयीं अंतींच्या ॥१५॥
पूर्वी पढला अभ्यास । तोचि अतीं निजध्यास । म्हणोनियां सावकाश । नेम करावा ॥१६॥
जयासी ठांईची सवे । तयास नलगे सांगावें । म्हणोनि नित्यनेमासी जीवें । विसंबों नये ॥१७॥
नित्यनेम पूर्वीं कथिला । पुन: पाहिजे ऐकिला । जो मातें निरोपिला । तोचि आतां ॥१८॥
एकाग्र करोनियां मन । अंतरीं करावें ध्यान । सर्व सांग पूजाविधानं । प्रत्यहीं कीजे ॥१९॥
नित्य नेमिला जो जप । त्रिकाळ दर्शन साक्षेप आदित्य मारुतीचें रूप । अवलोकावें ॥२०॥
हरिकथानिरूपण । प्रत्यहीं करावें श्रवन । हीच जाणावी खूण । नित्यनेमाची ॥२१॥
अशक्त होवोनि प्राणी पडे । नित्यनेम त्यास न घडे । तेणें बळेंचि नेमाकडे । चित्त न्यावें ॥२२॥
नित्यनेमाचा अभ्यास । तोचि लागे निजव्यास । चुकतां कासावीस । अंतसमयीं ॥२३॥
अहा देवा जप राहिला । मारुती नाहीं देखिला । प्राणी योगभ्रष्ट झाला । निजध्यासें ॥२४॥
ऐसें नित्यनेमें कोडें । मन लागे देवाकडे । अंतकाळीं बळें घडे । निजध्यास ॥२५॥
खुंटतां अंतर पडे । अंतरींच जप घडे । स्वामी आधींच सांकडे । फेडीत गेले ॥२६॥
जें वाल्मीकासी आधार । जें शतकोटींचें सार । उमे सहित शंकर । जपे जया ॥२७॥
जेणें धन्य काशीपुरी । प्राणिमात्रासी उद्धरी । अंतकाळीं पृथ्वीवरी । उच्चार जयाचा ॥२८॥
तेंचि अंतरीं धरावें । तेणें संकटीं तरावें । कैलासपती सदाशिवें । उपाव केला ॥२९॥
इति श्रीअंतर्भाव समाप्त: ॥ ओंवीसंख्या ॥१५५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP