शुकाख्यान - अभंग २०१ ते २२५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
नृत्य करावया उठली । नाना भाव करिती जहाली । परी शुकची नाहीं विसर्जिली । योगमुद्रा ॥२०१॥
आलाप करी सुंदरी । नाना प्रबंध कुसरी । तंव योगीयाची झाली पुरी । ध्यानमुद्रा ॥२०२॥
शुकानें नेत्र उघडिले । रंभेची पुढें देखिलें । येरीनें कर जोडिले । केलें नमन ॥२०३॥
शकें नमस्कारिली खेंचरी । बैसविली गुंफे माझारीं । येरी देखोनि हास्य करी । सुमनें मुखीं उपजती ॥२०४॥
रंभा व्यं-कट दृष्टि पाहे । हावभाव दाविताहे । मंजुळ स्वर गाये । सानुराग ॥२०५॥
तारुण्याचेनि भरें । हावभाव दावी भृकुटी भारें । तंव शुक देव ह्मणे सुंदरे । हरिचरित्र गाइजे ॥२०६॥
मागें तप करितां चंद्र-मौळी । तंव ऐसीच एक प्रवेशली । तयाची समाधि लागली । काम-बुद्धि ॥२०७॥
रुक्मांगद नृपवरा । मोहोनि घाली मंदिरा । ते मारविती जाहलीं कुमरा । धर्मागंदा ॥२०८॥
तैसी रंभा वना प्रगटली । इंद्ररायें पाठविली । काय करील हे माउली । तें सुचेना ॥२०९॥
इयेचेनें काय होईल । शुकाचें तप अढळ । कां कष्टविली अंबा केवळ । वेदव्यासें ॥२१०॥
शुक ह्मणे विचारूं इयेसी । ह्मणे तूं आससी कवणे देशीं । कीं देवकन्या ह्मणविसी । कीं मानवीन ॥२११॥
कीं या वनीं वनदेवता । कीं योगिनी तूं तत्वता । तूं सिद्ध आहेस माता । खेंचरीये ॥२१२॥
तुझें नाम काय । कवण बापमाय । कवण ठायीं आहे । आश्रम तुझा ॥२१३॥
येथें यावया काय का-रण । काय अपेक्षित तुझें मन । हें सकळ वर्तमान । सांगे मज ॥२१४॥
मग बोलली ती खेंचरी । मी देवकन्या निर्धारीं । असे या वनाभीतरीं । क्रीडा करीत ॥२१५॥
आजि देखिली शुकाची मूर्ति । मज आली करुणा चित्तीं । तूं धाकुटा योग स्थिती । कां कष्टसी ॥२१६॥
तूं नेणसी तप प्रमाण । कां वांयांच कष्टविसी प्राण । आंगीं असे तारुण्यपण । सुंदर तूं ॥२१७॥
तुझी मंद असे दशा । दिससी लावण्य राजसा । मदना परिस सुरसा । सुकुमारा ॥२१८॥
तप तुंवा आदरिलें । तुज कवणें उपदेशिलें । तुझें कार्य नासिलें । सुखभोगाचें ॥२१९॥
तप सांडीं अमंगळ । दोघें असों कुशळ । बरवीं वस्त्रें सर्वकाळ । शेजेवरी पांघरवीन ॥२२०॥
मस्तक तुझें वि-घरलें । विभूतीनें आंग मळलें । मी पुसीन करतळें । सुकुमार वस्त्रें ॥२२१॥
बरवे चंदन शीतळ । त्यांत नाना परिमळ । पुष्पांची शेज कुशळ । निद्रेलागीं करीन ॥२२२॥
चांपा आणि शेवंती । दवणा मरवा पुष्प जाती । तितुक्या अर्पिन तुजप्रति । सुगंधाकारणें ॥२२३॥
याउपरि दह्याची वाटी । अमृता ऐसी निकटी । षड्रस प-क्कान्नें गोमटीं । वाढीन तुज ॥२२४॥
कळीया जैशा मोगरीच्या । तैसा भात उष्ण जिरेसाळीचा । त्यावरी ओगर डाळीचा । साजुक तूप वाढीन ॥२२५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP