शुकाख्यान - अभंग ३५१ ते ३७१

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


ऐसें मी जाणतों गे सुंदरी । तरी येतों तुझिया उदरीं । माता शिणविली येरझारीं । नर-देहीं ॥३५१॥
तुझिया कुळीं जन्मतों । कडेसी वो खेळतों । मुखें स्तनपान करितों । आनंदें करोनियां ॥३५२॥
तुज ऐसी माता । केवि होय पतिव्रता । पूर्व सुकृतावांचोनि सर्वथा । प्राप्त नव्हे ॥३५३॥
तूं माझी वो जननी । क्रष्टविली दुष्ट वचनीं । हें वचन ऐकोनि । तेच क्षणीं उठली रंभा ॥३५४॥
मग निघाली तेथोनि । पावली इंद्रभुवनीं । राया इंद्रासी भेटोनि । बोलती जहाली ॥३५५॥
ह्मणे जी इंद्रराया । गेली या ऋषिच्या ठायां । बहुतप्रकारें तया । बोलिलें म्यां ॥३५६॥
तपें शब्दें प्रसवे कामधेनु । तृण चरे पंचाननु । पश्चिमेस उगवे भानु । जाण राया ॥३५७॥
ऐसें जाण गा नृपति । कवणें समयीं होती । परि शुक देवाचिये चित्तीं । अविनाश ॥३५८॥
ऋषि मुनि संन्यासी । मज देखोन ढळती तपासी । तैसी परी शुक-देवासी । नव्हे जाण ॥३५९॥
तैसा तो नव्हेजी योगिराजा । मनीं भाष न धरी दुजा । म्यां गेलिया ज्या काजा । तें सिद्धि न पावलें ॥३६०॥
शुक देव नमस्कार करूनि । अदृश्य झाला तेथूनि । देव अंतरीं विमानीं । पहात ठेले ॥३६१॥
सुरवर करिती पुष्प वर्षाव । तपा न ढळे शुक देव । देवगणांचा संदेह । फिटला तेणें ॥३६२॥
तप सुरवरांसि मानलें । शुकदेव अलक्ष्य जाहले । तेजीं तेज निमालें । निवडेचिना ॥३६३॥
उतरला पैलपार । संसारींचा भव-सागर । दुस्तर आणि दुर्धर । लोका तरावया ॥३६४॥
दोहों वा-तीचा दीपकू । प्रजळला एकरूपा । हरीहर स्वरूपू । एक झाले ॥३६५॥
ऐसें शुकदेव चरित्र । ऐकतांचि पुण्य पवित्र । वर्णितां जाणा विचित्र । तिहीं लोकीं ॥३६६॥
जे पढती नित्य नेमीं । ते होती मुक्तज्ञानी । तें फळ पावतां निर्वाणीं । झाला शुकदेव ॥३६७॥
श्रोते जे ऐकती । तया होय फळ प्राप्ती । हरिहर चरित्र क्षितीं । पुण्य पावन ॥३६८॥
विनवी विष्णुदास नामा । शुक देवें केली सीमा । चौर्‍यांशीं लक्ष योनीचे जन्मा । सार्थक केलें ॥३६९॥
ऐसें शुकदेव चरित्र । अगाध आणि विचित्र । विष्णुदास नामा विन-वित । भक्तांप्रति ॥३७०॥
मन्मथ संवत्सर पौष्य मासीं । सोम-वार अमावासेच्या दिवशीं । पूर्णता आली ग्रंथासी । श्रोते साव-काशीं परिसीजे ॥३७१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP