शुकाख्यान - अभंग ३०१ ते ३२५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


औट पाद भूमिका । दिधली ब्राह्मणा एका । सत्वा न ढळे देखा । म्हणोनि पृष्टी ओढली ॥३०१॥
राज्यपद नको गे सुंदरी । तूं नेणसी आमुची थोरी । आह्मी जाण ब्रह्मचारी । सुखी असों ॥३०२॥
तेंच राज्य अढळ असे । तंव रंभा ऐकोनि हांसे । ह्मणे लागलें पिसें । वांयांविण ॥३०३॥
बरवें ठीक लेणें । नाना अलंकार भूषणें । यावरी शुक-देव ह्मणे । हे वानूम नको रंभे ॥३०४॥
तूं नेणसी माझे अलंकार । किती लेणें अपार । शंख चक्र याहूनि थोर । काय असे ॥३०५॥
शंगारिजे येणें शरिर । शंख चक्र आह्मांसि पवित्र । काय करसील लेणीं फार । तीं आह्मं पाषाण ॥३०६॥
शृंगार मुद्रा जाण धन । शरीरीं भार होय जेणें । आह्मां त्यांसी काय कारण । सांग तूं अंगनें ॥३०७॥
संपत्ति जोडावी ह्मणसी । तरी करीन तपाच्या रासी । ह्मणऊनियां सर्वांसी । मज चाड नाहीं ॥३०८॥
तप धन कधींच न सरे । सवेंच करितां उदंड उरे । आह्मां हेंच धन पुरे । लक्ष कोटी ॥३०९॥
एक मूर्ख असती । अनंत द्रव्य मिळविती । मग नेऊनियां पुरिती । भूमिमाजीं ॥३१०॥
माझें माझें म्हणती मनीं । तेच करिती घोकणी । तेणें कारणें फजित होउनी । जोडिलें धन ॥३११॥
पिता पुत्र भांडणें । स्त्रिये बाळकासी बोलणें । तें जाय क्षणामाजी जाण । हानि होतां ॥३१२॥
या धनासाठीं कैसें करिती । इष्ट मित्रांसी दु:ख देती । विश्वास न मानिती । प्राणिमात्रांचा ॥३१३॥
अग्नीपासोनि वांचे जरी ठेवा । तरी राज उपद्रव घडे देवा । नाहींतरी चोरापां-सूनि हानि व्हावा । ऐसें होय ॥३१४॥
ऐसें भलत्यापरि जतन करितां । परि जाईगा निभ्रांता । दु:ख होई त्वरितां । पाहें गे तूं सुंदरी ॥३१५॥
मग मनीं धरिती संताप । ह्मणती द्रव्य गेलें आपोआप । बहु जोडिलें पाप । तें मेळवितां ॥३१६॥
मागें धर्म जरी करितों । अथवा आपंगासी देतों । अथवा अपत्यव-र्गासी वेंचितों । तरी बरें होतें ॥३१७॥
ऐसी करितां चिंतनी । रात्रंदिवस घोकणी । म्हणोनी तपाची सांठवणी । कदांचि न सरे ॥३१८॥
आतां तूं जाय गा येथुनी । आह्मी ब्राह्मण निष्ठुर ज्ञानी । मग बोलिली परतोनि । रंभा त्यासी ॥३१९॥
अगा तूं शाहणा होसी । पाहें बा माझिया रूपासी । आलिये तुजपासीं । योगिराया ॥३२०॥
केले बहुत सायास । आतां पाहे माझी वास । पुरवाधी माझी आस । तुंवा शुकदेवा ॥३२१॥
तूं आहेसी शाहणा चतुर । पाहें माझें स्वरूप शृंगार । आतां होईं कृपासागर । ऋषि-नंदना ॥३२२॥
तुंवा देख देखसी । देखण्या बहूत पाहसी । तरी मज ऐसी सरिसी । निधान न सांपडेल ॥३२३॥
बरवें माझें ला-वण्य । देवीं पाठविलें सगुण । तुज जोडलें निधान । आपोआप ये ठायी ॥३२४॥
अगा तुझे तपा आलें फळ । आतां तुज घालीन मी माळ । पाहे पाहा भरुनी डोळे । लावण्य रूप माझें ॥३२५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP