साईसच्चरित - अध्याय ३० वा
श्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
ॐ नमो जी साई सदया । भक्तवत्सला करुणालया । दर्शनें वारिसी भक्तभवभया । नेसी विलया आपदा ॥१॥
आरंभीं वसती निर्गुणीं । तों तूं भक्तभावांचिया गुणीं । ओवूनि आणिलासी सगुणीं । संतचूडामणी साईनाथा ॥२॥
निजभक्तोद्धारणकार्य । संतां सर्वदा अपरिहार्य । तूं तर संतवृंदाचा आचार्य । तुजसीही अनिवार्य तें आहे ॥३॥
जिंहीं धरिलें तव चरणद्वय । पावले सकळ किल्मिष लय । जाहला पूर्वसंस्कारोदय । मार्ग निर्भय निष्कंटक ॥४॥
आठवूनियां आपुले चरण । येती महातीर्थींचे ब्राम्हाण । करिती गायत्रीपुरश्वरण । पोथीपुराण वाचिती ॥५॥
संस्कारहीन अल्पशक्ति । काय आम्ही जाणूं भक्ति । टाकिलें जरी आम्हां समस्तीं । साई न देती अंतर ॥६॥
जयावरी ते कृपा करिती । अचित्य महाशक्ति पावती । आत्मानात्मविवेकसंपत्ति । सवेंचि प्राप्ति ज्ञानाची ॥७॥
साईमुखवचनलालसे । भक्तजन होऊनि पिसे । शब्दशब्दांचे जोढूनि ठसे । पाहत भरंवसे प्रतीति ॥८॥
निजभक्तांचा मनोरथ । जाणे संपूर्ण साईनाथ । पुरविताही तोच समर्थ । तेणेंचि कृतार्थ तद्भक्त ॥९॥
धांव पाव गा साईनाथा । ठेवितों तुझिया चरणीं माथा । विसरोनियां अपराधां समस्तां । निवारीं चिंता दासाची ॥१०॥
ऐसा संकटीं गांजितां । भक्त स्मरे जो साईनाथा । तयाचिया उद्विग्न चित्ता । शांतिदाता तो एक ॥११॥
ऐसे साई दयासागर । कृपा करिते झाले मजवर ॥ तेणेंच वाचकां झाला हा सादर । ग्रंथ मंगलकारक ॥१२॥
नातरी माझा काय अधिकार । कोण हें कार्य घेता शिरावर । ज्याचा तोच निरविता असल्यावर । कायसा भार मजवरता ॥१३॥
असतां मद्वाचाप्रकाशाक । साई समर्थ ज्ञानदीपक । अज्ञानतमविध्वंसक । किमर्थ साशंक असावें ॥१४॥
त्या दयाघन प्रभूचा भरंवसा । तेणें न वाटला श्रम अणुमात्रसा । पुरला माझे मनींचा धिंवसा । कृपाप्रसाद हा त्याचा ॥१५॥
ही ग्रंथरूपी संतसेवा । माझ्या पूर्वपुण्याईचा ठेवा । गोड करूनि घेतली देवा । धन्य दैवाचा तेणें मी ॥१६॥
गताध्यायीं जाहलें श्रवण । नानापरीचे द्दष्टान्त देऊन । कैसें भक्तांस बोधप्रदान । साई दयाघन करीत ते ॥१७॥
आतां प्रकृतध्यायींही एक । सप्तशृंगी देवीचे उपासक । तयांचें हें गोड कथानक । आनंददायक परिसिंजे ॥१८॥
देवदेवी निजभक्तांप्रती । कैसे निरविती संतांहातीं । ही तरी एक चमत्कृती । सादर चित्तीं अवलोका ॥१९॥
महाराजांच्या कथा बहुत । एकाहूनि एक अद्भुत । हीही कथा श्रवणोचित । सावचित्त परिसावी ॥२०॥
कथा नव्हे हें अमृतपान । येणें पावाल समाधान । कळोन येईल साईंचें महिमान । व्यापकपणही तैसेंच ॥२१॥
चिकित्सक आणि तर्कवादी । इंहीं न लागावें यांच्या नादीं । येथें नाहीं वादावादी । प्रेम निरवधी पाहिजे ॥२२॥
ज्ञानी असून व्हावा भाविक । श्रद्धाशील विश्वासूक । किंवा संतांघरींचा पाईक । इतरां या माईक काहण्या ॥२३॥
हा साईलीलाकल्पतरु । निर्विकल्प फलपुष्पधरू । असेल भक्त भाग्याचा सधरु । तोचि उतारू ये तळीं ॥२४॥
ऐका हो कथा परम पावनी । परमार्थियां मोक्षदानी । सकळ साधनां पोटीं मुखरणी । कृतकल्याणी सकळिकां ॥२५॥
सहजें जडजीवोद्धारण । तें हें साईकथामृतपान । प्रापंचिकांचें समाधान । मोक्षसाधन मुमुक्षुवां ॥२६॥
करितां एक कल्पना एथ । पावे आणीक कल्पनातीत । म्हणोन हेमाड होऊनि विनीत । श्रोतयां पालवीत श्रवणार्थ ॥२७॥
ऐसी एकेक कथा कथितां । वाढेल लीलारसास्वादता । होईल समाधान भवदवार्ता । साईसमर्थता ती हीच ॥२८॥
जिल्हा नाशीक ग्राम वणी । काकाजी वैद्य नामक कोणी । असती तेथें वास्तव्य करुनी । उपाध्यें ते स्थानीं देवीचे ॥२९॥
देवीचें नाम सप्तशृंगी । उपाध्ये अस्थिर अंतरंगीं । अनेक दुर्धर आपत्तिप्रसंगीं । संसारसंगीं गांजले ॥३०॥
येतां कालचक्राचा फेर । मन हें भोंवे जैसा भोंवरा । देहही धांवे सैरावैरा । शांति क्षणभरा लाधेला ॥३१॥
तेणें काकाजी अति दु:खित । जाऊनियां देवळाआंत । देवीपाशीं करुणा भाकीत । चिंताविरहित व्हावया ॥३२॥
मनोभावें केला धांवा । देवीही तुष्टली पाहूनि भावा । तेच रात्रीं द्दष्टांत व्हावा । श्रोतीं परिसावा नवलावा ॥३३॥
देवी सप्तशृंगी आई । काकाजीच्या स्वप्नीं येई । म्हणे तूं बाबांपाशीं जाईं । मन होईल सुस्थिर ॥३४॥
हे बाबा कोठील कवण । करील देवी स्पष्टीकरण । म्हणवून काका जैं उत्कंठित मन । नयनोन्मीलन पावले ॥३५॥
जिज्ञासा ती तैसीच राहिली । स्वप्नवृत्ति तात्काळ मावळली । काकाजीनें बुद्धि चालविली । ‘बाबा’ जे वदली ते कोण ॥३६॥
असतील ‘बाबा’ त्र्यंबकेश्वर । काकाजी - मनीं हाच निर्धार । निघाले घेतलें दर्शन सत्वर । राहीना अस्थिरता मनाची ॥३७॥
काकाजीनें दहा दिवस । त्र्यंबकेश्वरीं केला वास । अखेरपर्यंत राहिला उदास । मनोल्लास लाधेना ॥३८॥
जाईना मनाची दुश्चित्तता । शमेना तयाची चंचलता । दिवसेंदिवस वाढे उद्विग्नता । निघाला मागुता काकाजी ॥३९॥
नित्य प्रात:स्नान करी । रुद्रावर्तन लिंगावरी । संतत धार अभिषेक धरी । परी अंतरीं अस्थिर ॥४०॥
पुनश्च जाऊनि देवीद्वारीं । वदे कां धाडिलें त्र्यंबकेश्वरीं । आतां तरी मज स्थिर करीं । या येरझारी नको गे ॥४१॥
एणेंपरी अति काकुळती । धांवा करी तो देवीप्रती । देवी त्या दर्शन दे रातीं । वदे द्दष्टान्तीं तयातें ॥४२॥
म्हणे मी जे बाबा वदत । ते शिरडीचे साई समर्थ । त्र्यंबकेश्वरीं गमन किमर्थ । केलें कां निरर्थक कळेना ॥४३॥
कोठें शिरडी कैसें जावें । बाबा हे न आपणा ठावे । आतां हें जाणें कैसें घडावें । नकळे व्हावें कैसें कीं ॥४४॥
परी जो संतचरणीं रत । मनीं धरी दर्शनहेत । संतचि काय परी अनंत । सदिच्छा पुरवीत तयाची ॥४५॥
जो जो संत तो तो अनंत । नसे लवलेश उभयांत । किंबहुना उभय मानणें हेंचि द्वैत । संतां अद्वैत अनंतीं ॥४६॥
चालून जाईन संतदर्शना । स्वेच्छा पुरवीन मनींची कामना । ही तों केवळ अभिमान - वल्गना । अघटित घटना संतांची ॥४७॥
विना आलिया संतांच्या मना । कोण जाईल तयांचे दर्शना । आश्चर्य तयांच्या सत्तेविना । पान हालेना वृक्षाचें ॥४८॥
जैसी जयाची दर्शनोत्कंठा । जैसा भाव जैसी निष्ठा । सानंदानुभव पराकाष्ठा । भक्तश्रेष्ठा लाधते ॥४९॥
कैसें जावें साईदर्शना । इकडे काकाजीस ही विवंचना । तिकडे तयांचा शोधीत ठिकाणा । पातला पाहुणा शिरडीचा ॥५०॥
पाहुणा तरी काय सामान्य । अवघ्यांपरीस जो बाबांस मान्य । जयाच्या प्रेमास तुळेना अन्य । अधिकारही धन्य जयाचा ॥५१॥
माधवराव नामाभिधान । देशपांडेपणाचें वतन । बाबांपाशीं अति लडिवाळपण । चालेना आन कवणाचें ॥५२॥
सदा सर्वदा पेमाचें भांडण । अरेतुरेचें एकेरी भाषण । पोटच्या पोरासम प्रेम विलक्षण । पातला तत्क्षण वणीस ॥५३॥
बाळास जंव जाहलें दुखणें । आईनें देवीस घातलें गार्हाणें । तुझ्या ओटींत घातलें हें ताहें । तारणें मारणें तुजकडे ॥५४॥
बाळ माझें बरें होतां । चरणांवरी घालीन तत्त्वतां । एणेंपरी देवीस नवसितां । लाधली आरामता बाळास ॥५५॥
वैद्य काय देव काय । कार्य उरकतां विसर होय । वोपत्कालींच नवसाची सय । पावे जंव भय न फेडितां ॥५६॥
कित्येक वर्षें महिनें दिवस । लोटले विसरले केलेला नवस । अंतीं मातेनें अंतसमयास । माधवरावांस विनविलें ॥५७॥
बहुतां वर्षांचा हा नवस । फेडतां फेडतां आले हे दिवस । बरवी न दीर्घसूत्रता बहुवस । जाईं गा दर्शनास देवीच्या ॥५८॥
तैसेंच मातेच्या दोनी स्तनांस । खांडकें पडूनि त्रासली असोस । होऊनियां बहु दु;सह क्लेश । आणीकही देवीस नवसिलें ॥५९॥
येतें माते लोटांगणीं । तारिसील जरी या यातनांतुनी । रौप्य - स्तनद्वय तुजवरुनी । ओवाळूनि वाहीन ॥६०॥
तोही नवस राहिला होता । फेडूं फेडूं म्हणतां म्हणतां । तोही आठवला मातेच्या चित्ता । देहावसानता - समयास ॥६१॥
देऊनि बब्यास याचीही आठवण । फेडीन म्हणून घेऊनि वचन । माता होऊनियां निर्वासन । गेली समरसोन हरिचरणीं ॥६२॥
पुढें मग जाऊं जाऊं म्हणतां । दिवस महिने वर्षें लोटतां । माधवरावांस जाहली विस्मरणता । नवस फेडितां रहिले ॥६३॥
एणेंपरी वर्षें तीस । होतां काय घडलें शिर्डीस । ज्योतिषी एक करीत प्रवास । त्याच स्थानास पातला ॥६४॥
ज्योतिर्विद्येचें ज्ञान गहन । जाणे भूत - भविष्य - वर्तमान । अनेक जिज्ञासु तृप्त करून । वाहवा मिळवून राहिला ॥६५॥
श्रीमंत केशवरावजी बुट्टी । आदिकरूनि बहुतांच्या गोष्टी । वर्तवूनि सकळांची संतुष्टी । उठाउठी संपादिली ॥६६॥
माधवरावांचा कनिष्ठ भ्राता । बापाजी आपुलें भविष्य पुसतां । ज्योतिषी तो जाहला वर्तविता । देवीची अप्रसन्नता तयावर ॥६७॥
म्हणे मातेनें केलेले नवस । तिच्या देहांताचिया समयास । तिणें तुझिया ज्येष्ठ बंधूस । फेडावयास आज्ञापिलें ॥६८॥
ते न फेडितां आजवरी । नडा देते देवी भारी । माधवराव येतां घरीं । बापाजी सारी कथी कथा ॥६९॥
माधवरावांस पटली खूण । सुवर्णकार आमंत्रून । करविले दोन रौष्य - स्तन । गेले कीं घेऊन मशीदीं ॥७०॥
घालूनि बाबांस लोटांगण । पुढें ठेवून दोनी स्तन । वदते झाले बाबांलागून । म्हणती घ्या फेडून ते नवस ॥७१॥
तूंच आमुची सप्तशृंगी । तूंच देवी आम्हांलागीं । ही घे वाचादत्त देणगी । घेऊनि उगी रहावें ॥७२॥
बाबा वदती प्रत्युत्तरीं । जाऊनि सप्तशृंगीच्या मंदिरीं । वाहें तिचीं तीस चरणांवरी । स्तनें हीं साजिरीं निजहस्तें ॥७३॥
पडतां ऐसा बाबांचा आग्रह । माधवरावांच्या मनाचाही ग्रह । तैसाच होऊनि सोडिलें गृह । जाहला निग्रह दर्शनाचा ॥७४॥
घेतलें बाबांचें दर्शन । प्रार्थिलें शुभ आशीर्वचन । करोनि उदी - प्रसाद ग्रहण । अनुज्ञा घेऊन निघाले ॥७५॥
आले पहा ते सप्तशृंगीस । लागले कुलोपाध्याय शोधावयास । सुदैवें काकाजीचेच गृहास । अनायास प्राप्त ते ॥७६॥
काकाजीच्या उत्कंठा पोटीं । शीघ्र व्हावी बाबांची भेटी । तोंच ही माधवरावांची गांठी । हे काय गोठी सामान्य ॥७७॥
आपण कोण कोठील पुसतां । शिर्डीहूनचि आले समजतां । काय त्या आनंदा पारावारता । पडली उभयतां मिठीच ॥७८॥
ऐसे ते दोघे प्रसन्नचित्त । साईलीला गात गात । पूर्ण होतां नवसकृत्य । उपाध्ये निघत शिरडीतें ॥७९॥
माधवरावांसारखी सोबत । तीही लाधली ऐसी अकल्पित । उपाध्येबुवा आनंदभरित । मार्ग लक्षीत शिरडीचा ॥८०॥
नवस फिटतां शीघ्रगतीं । दोघे पातले शिरडीप्रती । येतांच साईदर्शना निघती । परमप्रीतीं सोत्कंठ ॥८१॥
आधीं जैसी मनाची आवडी । तैसाच पाउलीं निघाले तातडीं । पातले काकाजी गोदेथडीं । जेथून शिरडी सन्निध ॥८२॥
पुजारी वंदी बाबांचे चरण । करीत सजलनयनीं स्नपन । होऊनि दर्शनसुखसंपन्न । चित्त प्रसन्न जाहलें ॥८३॥
देवीचा द्दष्टान्त होता यदर्थ । द्दष्टी देखतां ते बाबा समर्थ । काकाजी सुखावले यथार्थ । पुरला मनोरथ तयांचा ॥८४॥
असो काकाजी सुखसंपन्न । दर्शनसेवनें चित्त प्रसन्न । जाहले खरेंच निश्चिंत मन । कृपाघन वर्षणें ॥८५॥
हरपलें मनाचें चंचलपण । स्वयें जहाले विस्मयापन्न । आपणांसचि पुसती आपण । काय विलक्षण ही करणी ॥८६॥
नाहीं कांहीं वदले बचन । नाहीं प्रश्न - समाधान । नाहीं दिधलें आशीर्वचन । केवळ दर्शन सुखदाई ॥८७॥
माझी चंचल चित्तवृत्ति । केवळ दर्शनें पावली निवृत्ति । लाधली अलौकिक सुखसंवित्ति । ‘दर्शनमहती’ या नांव ॥८८॥
साईपायीं जडली द्दष्टी । तेणें वाचेस पडली मिठी । कर्णीं परिसतां बाबांच्या गोष्टी । आनंद पोटीं न समाये ॥८९॥
उपाध्येबुवा निजभावेंसीं । शरण गेले समर्थांसीं । पावते झाले निजसुखासी । विसरले वृत्तीसी पूर्वील ॥९०॥
ऐसे काकाजी बारा दिवस । राह्ते झाले तैं शिरडीस । होऊनियां सुस्थिरमानस । सप्तशृंगीस परतले ॥९१॥
स्वप्नांसही लागे काळा । उष:काळ वा प्रात:काळ । तेव्हां जीं पडती तीं तींच सफळ । स्वप्नें निर्फळ तदितर ॥९२॥
ऐसी सार्वत्रिक प्रसिद्धी । परी या शिरडीच्या स्वप्नांची सिद्धी । पडोत तीं कुंठें आणि कधीं । भक्तां अबाधित अनुभव ॥९३॥
ये अर्थींची अल्प वार्ता । सादर करितों श्रोतयांकरितां । कौतुक वाटेल परम चित्त । श्रवणोल्लासता वाढेल ॥९४॥
दोनप्रहरीं एके दिवशीं । बाबा वदती दीक्षितांपाशीं । टांगा घेऊन जा रहात्यासी । खुशाल - भाऊंसी घेऊन ये ॥९५॥
जाहले कीं दिवस बहुत । भेटावयाची मनीं आर्त । म्हणावें बाबांनीं तुम्हांप्रत । भेटीप्रीत्यर्थ बोलाविलें ॥९६॥
करूनियां आज्ञाभिवंद । दीक्षित गेले टांगा घेऊन । खुशालभाऊ भेटले तत्क्षण । निवेदिलें प्रयोजन आगमनाचें ॥९७॥
ऐकूनियां बाबांचा निरोप । खुशालभाऊंस आश्चर्य अमूप । म्हणती हाच उठलों घेऊन झोंप । झोंपेंत आज्ञापत हेंचि मज ॥९८॥
आतांच मी दुपारा जेवुनी । करीत असतां आराम शयनीं । डोळ्यास डोळा लागतांक्षणीं । बाबाही स्वप्नीं हेंच वदत ॥९९॥
म्हणाले आतांच शिरडीस चल । माझीही इच्छा जाहली प्रबळ । करूं काय घोडें न जवळ । मुलास कळवाया धाडिलें ॥१००॥
मुलगा वेशीच्या बाहेर पडला । तोंच हा आपुला टांगा आला । दीक्षित विनोदें म्हणती तयाला । तदर्थच मजला आज्ञापिलें ॥१०१॥
आतां स्वयें येत असलां तर । टांगा बाहेर आहे तयार । मग ते शिर्डीस आनंदनिर्भर । दीक्षितांबरोबर पातले ॥१०२॥
तात्पर्य खुशालभाऊ भेटले । बाबांचेही मनोरथ पुरले । खुशालभाऊही बहु गहिंवरले । पाहून या लीलेस बाबांच्या ॥१०३॥
एकदां एक पंजाबी ब्राम्हाण । रामलाल नामाभिधान । मुंबईमध्यें वसतां जाण । बाबांनीं स्वप्न दिलें तया ॥१०४॥
दिङ - वायु - रवि - वरुणादि देवता । यांच्या अनुग्रहाचिया सत्ता । बाह्यांत:करण - विषयग्राहकता । जागरितता त्या नांव ॥१०५॥
विरमे जंव सकल इंद्रियगण । होई जाग्रत्संस्कारप्रबोधन । ग्राह्यग्राहकरूपें स्फुरण । असें हें लक्षण स्वप्नाचें ॥१०६॥
त्याचें स्वप्न तों विलक्षण । ठावें न बाबांचें रूपलक्षण । पूर्वीं कधीं नाहीं दर्शन । ‘मजकडे येऊन जा’ म्हणत ॥१०७॥
आकृतीवरून दिसले महंत । परी न ठावें ते कोठें वसत । रामलाल होऊन जागृत । विचाराकुलित जाहला ॥१०८॥
जावें ऐसें वाटलें मना । पत्ता नाहीं ठावठिकाणा । परी जो तयासी बोलावी दर्शना । तयाची रचना तो जाणे ॥१०९॥
मग तेच दिवशीं दुपारीं । सहज रस्त्यानें मारितां फेरी । छबी एके दुकानावरी । पाहूनि अंतरीं चमकला ॥११०॥
स्वप्नीं जें रूप दिसलें तयाला । तेंच तें गमलें रामलालाला । विचारपूस कराया लागला । दुकानदाराला तात्काळ ॥१११॥
लक्ष लावून छबी पाहे । कोण कोठील आहेत हो हे । कळतां हा अई शिरडींत आहे । स्वस्थ राहे रामलाल ॥११२॥
पुढील पत्ता पुढें लागला । रामलाल शिरडीस गेला । बाबांचिया निर्वाणकाला - । पर्यंत राहिला त्यांपाशीं ॥११३॥
आपुल्या भक्तांचे पुरवावे हेत । आणावें तयांस दर्शनार्थ । पुरवावे स्वार्थ वा परमार्थ । हेचि मनोरथ बाबांचे ॥११४॥
नातरी ते अवाप्तकाम । स्वयें सर्वदा निष्काम । नि:स्वार्थ निरहंकार निर्मम । भक्तकामैक - अवतार ॥११५॥
क्रोध ज्याचा घेई न वारा । द्वेषास जेथें न लभे थारा । डोळां न देखे जो उदरंभरा । साधु खरा तो समजावा ॥११६॥
सर्वांठायीं प्रेम नि:स्वार्थ । हाच ज्याचा परमपुरुषार्थ । वेंची न धर्मविषयाव्यतिरिक्त । वाचा ही व्यर्थ पळभरी ॥११७॥
सारांश माझा धरूनि हात । लिहवून घेतां हें निजचरित । भक्तीं व्हावें निजस्मरणरत । हेंचि कीं इंगित येथील ॥११८॥
म्हणवूनि हेमाड अति विनीत । नित्य श्रोतयां हेंचि विनवीत । होऊनि श्रद्धाभक्तिसमन्वित । साईसच्चरित परिसावें ॥११९॥
तेणें मनास होईल शांती । उपजेल व्यसनमग्ना उपरती । जडेल साईचरणीं भक्ती । भवनिर्मुक्तिदायक ॥१२०॥
असो पुढील अध्यायीं आतां । संन्यासी विजयानंदाची कथा । जयास मानस - सरासी जातां । लाधली निर्मुक्तता निजपदीं ॥१२१॥
भक्त मानकर बाळाराम । तयाही तैसाच दिधला विश्राच । तोच नूलकर - मेघांचा काम । पुरवी प्रकाम साईनाथ ॥१२२॥
व्याघ्रासारखा क्रूर प्राणी । तयाही दिधला ठाव चरणीं । ऐसी अगाध साईंची करणी । श्रवणा पर्वणी - महोत्सव ॥१२३॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । नवसादिथाकथनं नाम त्रिंशतितमोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
N/A
References : N/A
Last Updated : June 20, 2014
TOP