मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसाईसच्चरित|
अध्याय ४६ वा

साईसच्चरित - अध्याय ४६ वा

श्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.


॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
धन्य श्रीसाई तुझे चरण । धन्य श्रीसाई तुझें स्मरण । धन्य श्रीसाई तुझें दर्शन । जें कर्मबंधनमोचक ॥१॥
जरी सांप्रत अद्दश्यमूर्ति । तरी धरितां भावभक्ति । समाधिस्थ जागती ज्योति । सद्य:प्रतीति भक्तार्थ ॥२॥
दोरी सूक्ष्म धरिसी ऐसी । पाहूं जातां दिसों ना देशी । परी निजभक्तां खचून आणिशी । देशीं विदेशीं असो कीं ॥३॥
आणूनि सोडिसी पायांपाशीं । प्रेमें धरिसी त्यां पोटाशीं । माता जैसी निजबाळकासी । तैसा तूं पोशिसी अवलीला ॥४॥
ऐसें कांहीं सूत्र चाळविसी । नकळे कोणा कोठें अससी । परी परिणामीं वाटे मनासी । आहेस कीं पाठीसी भक्तांच्या ॥५॥
ज्ञानी पंडित शहाणे सुर्ते । अभिमानें रुतती संसारगर्ते । भोळे भाबडे अज्ञानी नेणते । त्यां निजसत्ते खेळविसी ॥६॥
आंतून सकल खेळ खेळसी । अलिप्ततेचा झेंडा मिरविसी । करोनि अकर्ता स्वयें म्हणविसी । नकळे कवणासी चरित्र तुझें ॥७॥
म्हणोनि कायावाचामन । करूं तुझिया पायीं अर्पण । मुखीं निरंतर नामस्मरण । होईल क्षालन पापाचें ॥८॥
सकामाचा पुरविसी काम । निष्कामा देसी निजसुखधाम । ऐसें गोड तुझें नाम। उपाय सुगम सद्भक्तां ॥९॥
तेणें पापांचा होई क्षय । रजतम जातील नि:संशय । सत्त्वगुणाचा क्रमें उपचय । धर्मसंचय त्यापाठीं ॥१०॥
धर्मवृत्ति होतां जागृत । वैराग्य येई मागें धांवत । नामशेष विषय होत । तात्काळ प्रकटत निजज्ञान ॥११॥
विवेकेंसीं लाभतां ज्ञान । स्वस्वरूपीं अनुसंधान । तेंच गुरुपदीं अवस्थान । पूर्ण ‘गुर्वर्णण’ या नांव ॥१२॥
मन साईपदीं अर्पण । जाहलें याची एकच खूण । साधक होय शांतिप्रवण । उल्हासे संपूर्ण निजभक्ति ॥१३॥
सप्रेम गुरुभक्ति या नांव ‘धर्म’ । अवघा तो मीच हें ‘ज्ञानवर्म’ । विषयीं अरति ‘वैराग्य’ परम । संसारा ‘उपरम’ ते ठायीं ॥१४॥
ऐसिया भक्तीचा महिमा धन्य । केलिया जीवेंभावें अनन्य । शांति विरक्ति कीर्ति या तीन । जियेच्या आधीन सर्वदा ॥१५॥
गुरुभक्ति ऐसी जयासी । उणें कैंचें तरी तयासी । इच्छील जें जें आपुले मानसीं । तें तें अप्रयासीं लाधेल ॥१६॥
ऐसिया त्या भक्तीपासीं । ब्रम्हास्थिति तों आंदणी दासी । तेथें कोणी न मोक्षा पुसी । तीर्थें पायांसी लागती ॥१७॥
पूर्वील अध्यायीं जाहलें कथन । दीक्षितांचें भागवतवाचन । नवयोगियांचें भक्तिवर्णन । चरणदर्शन साईंचें ॥१८॥
साईभक्त आनंदराव । पाखाडे जयांलागीं उपनांव । कथिलें तयांचें स्वप्नलाघव । भक्तीचें वैभव साईंच्या ॥१९॥
साई जयास घेती पदरीं । तो घरीं असो वा द्वीपांतरीं । तयासन्निध अष्टौ प्रहरीं । वसे निर्धारीं श्रीसाई ॥२०॥
भक्त जेथें जेथें जाई । तेथें तेथें कवण्याही ठायीं । आधींच जाऊन उभा राही । दर्शन देई अकल्पित ॥२१॥
ये अर्थींची अभिनव कथा । कथितों तुम्हां श्रोतयांकरितां । विस्मय वाटेल श्रवण करितां । आनंद चित्ता होईल ॥२२॥
येथील साईमुखींचीं अक्षरें । भावें सेवितां श्रवणद्वारें । समाधिसौख्य फिरे माघारें । स्वानंदें तरतरे सद्भक्त ॥२३॥
जेथ प्रतिपदीं चमत्कारता । ऐसी ही गोड कथा परिसतां । आपआपणा विसरेल श्रोता । अलोट गहिंवरता दाटेल ॥२४॥
काकासाहेब दीक्षितांचा । ज्येष्ठ पुत्र बाबू याचा । नागपुरीं व्रतबंध साचा । करावयाचा निश्चय ॥२५॥
नानासाहेब चांदोरकर । तयांचाही ज्येष्ठ पुत्र । तयाच्याही लग्नाचा विचार । जाणें ग्वाल्हेर शहरासी ॥२६॥
मौंजीबंधन झालियापाठीं । ग्वाल्हेरीस लग्नासाठीं । काकामुळें व्हावी न खोटी । होतें हें पोटीं नानांच्या ॥२७॥
नागपुराहूनि ग्वाल्हेरीस । काकानें यावें स्वस्थमानस । ऐसिया धरिलें सुमुहूर्तास । जो कीं उभयतांस सोयीचा ॥२८॥
नंतर साईंचे दर्शनास । लग्नाच्याही आमंत्रणास । नानासाहेब भक्तावतंस । पातले शिरडीस उत्साहें ॥२९॥
काकासाहेब तेथेंच होते । नाना जाऊन मशिदीतें । बाबांस निमंत्रिती लग्नातें । करसंपुटातें जोडून ॥३०॥
तंव बाबा बरें म्हणती ।  “सवें शाम्यास नेईं” वदती । पुढें दों दिवसीं काकाही पुसती । बाबांस आमंत्रिती मुंजीतें ॥३१॥
त्यांसही बाबा तैसेंच वदती । “शाम्यास नेईं” म्हणती संगती । काकासाहेब आग्रह करिती । स्वयें येण्याप्रती बाबांस ॥३२॥
तयावरीही तात्काळ उत्तर । काशीप्रयाग करूनि सत्वर । शाम्याचेही येतों अगोदर । मज काय उशीर यावया ॥३३॥
आतां श्रोतीं या शब्दांवर । देऊन चित्त व्हावें अर्थपर । पहावया तयांचें प्रत्यंतर । बाबांची सर्वव्यापकता ॥३४॥
असो भोजन झालियावर । माधवराव करिती विचार । एकदां पदरीं पडतां ग्वाल्हेर । काशी मग काय दूर असे ॥३५॥
रुपये खर्चीस घेतले शंभर । नंदरामाचे उसनवार । गेले बाबांचा घ्यावया रुकार । पुसती अतिआदरपूर्वक ॥३६॥
आतां लग्न - मुंजीनिमित्त । घडतसे जाणें ग्वाल्हेरीपर्यंत । काशी गया प्रसंगोपात्त । साधावी उचित वाटे मना ॥३७॥
तरी देवा पडतसें पायां । करूनि येऊं का काशी - गया । बाबांनीं आज्ञा दिधली जावया । माधवरावांस आनंदें ॥३८॥
आणीक वरती वदले तयांसी । “वावगें तरी तूं काय पुससी । सहज घडे जें अप्रयासीं । अचूक तें निश्चयेंसीं साधावें” ॥३९॥
असो ऐसी आज्ञा झाली । माधवरावांनीं गाडी केली । वाट कोपरगांवची धरली । गांठ तंव पडली आपांची ॥४०॥
आणावयास आपुली नात । आपा जात चांदवडाप्रत । ऐकूनियां ती काशीची मात । उडी ते टाकीत तांग्यांतुनी ॥४१॥
करावया काशीप्रवास  । पैसा जरी नव्हता गांठीस । माधवरावांसारखा सहवास । आपा कोत्यांस त्यागवेना ॥४२॥
माधवरावांनीं दिधला धीर । आपा कोत्यांस मग काय उशीर । आनंदें गाडींत बैसले सत्वर । प्रसंगातत्पर होऊनि ॥४३॥
आपा कोते पाटील सधन । परी न मार्गीं पैशाचें साधन । तदर्थ त्यांचें काशीप्रयाण । चुकेल ही दारुण चिंता तयां ॥४४॥
वाहत्या गंगेचिया आंत । हात धुवावे आलें मनांत । माधवरावांसारखी सोबत । साधावी हें मनोगत आपांचें ॥४५॥
असो ही त्यांची वेळ जाणून । वेळीं तयांसी धीर देऊन । माधवरावांनीं सवें नेऊन । काशी त्यां घडवून दीधली ॥४६॥
पुढें ते गेले नागपुरास । मुंजीचिया समारंभास । काकासाहेब माधवरावांस । देती खर्चावयास दोनशें ॥४७॥
तेथून गेले ग्वाल्हेरीस । तेथील लग्नसमारंभास । नानासाहेब माधवरावांस । देती ते समयास शंभर ॥४८॥
नानांचे व्याही श्रीमंत जठार । तयांनींही दिधले शंभर । ऐशिया रीतीं प्रेमसंभार । झाला गुरुबंधूवर नानांच्या ॥४९॥
काशीस मंगळघाटावर । जडावाचें कोरीव सुंदर । लक्ष्मी - नारायणाचें मंदिर । जयाचे हे जठार मालक ॥५०॥
अयोध्येंतही श्रीराममंदिर । जठारांचें आहे सुंदर । दोन्ही क्षेत्रीं आदरसत्कार । तयांचे मुनीमांवर सोंपविला ॥५१॥
ग्वाल्हेरीहून मथुरे गेले । सवें ओझें बिनीवाले । पेंढारकरही होते आले । तिघेही परतले तेथून ॥५२॥
माधवराव आणि कोते । तेथून प्रयागा झाले जाते । रामनवमीच्या उत्सवातें । अयोध्येआंतौते प्रवेशले ॥५३॥
दिन एकवीस तेथें राहिले । महिने दोन काशींत काढले । चंद्रसूर्यग्रहण झालें । दोघे मग निघाले गयेस ॥५४॥
गयेंत ग्रंथिज्वराची सांथ । गल्लोगल्लीं जन सचिंत । ऐसी तेथें परिसिली मात । असतां अग्निरथांत दोघांनीं ॥५५॥
अग्निरथ स्टेशनांत । येऊन थांबतां पडली रात । तेथेंच मग धर्मशाळेंत । दोघेही स्वस्थ विसांवले ॥५६॥
असो होतां प्रात:काळ । भेटीस आला गयावळ । तो वदे करा उतावळ । यात्राही सकळ चालली ॥५७॥
माधवराव उद्विग्नचित्त । तयांलागीं हळूच पुसत । येतों परी ज्वराची सांथ । तुमचिया वस्तींत आहे का ॥५८॥
मग तो तयां देई उत्तर । येऊनि पहा कीं हो तेथवर । तेथें नाहीं तसला प्रकार । चला मजबरोबर नि:शंक ॥५९॥
असो पुढें हे दोघेजण । गयावळाचे येथें जाऊन । पाहूनि त्याचें सदन विस्तीर्ण । प्रसन्नांत:करण जाहले ॥६०॥
प्रसन्नतेचें आणीक कारण । ते जों तेथें बैसती जाऊन । समोर बाबांची छबी पाहून । माधवराव गहिंवरून दाटले ॥६१॥
नव्हतें कधींही ध्यानीं मनीं । गयेसारिख्या दूर ठिकाणीं । पडेल साईंची छबी नयनीं । आश्चर्य मनीं दोघांच्या ॥६२॥
माधवराव अति गहिंवरले । आनंदाश्रु नयनीं लोटले । कां हो आपण रडूं लागले । ऐसें त्याम पुसिलें गयावळें ॥६३॥
कांहीं एक नसतां कारण । माधवराव करितां रुदन । गयावळ होय़ संदेहापन्न । जाहला उद्विग्नमानस ॥६४॥
गयेमाजी ग्रंथिज्वर । कैसी यात्रा घडेल निर्धार । मधवरावां मनीं हा विचार । गयावळ फार चिंतावला ॥६५॥
आधींच आपण कळविलें होतें । कीं ग्रंथिज्वर नाहीं येथें । तरीही आपण करितां चिंतेतें । आश्चर्य आम्हांतें वाटतें ॥६६॥
नसेल आम्हांवरी विश्वास । पुसुन घ्या ना या अवघियांस । येथेंन भीति तुमचिया केसास । पाणी कां डोळ्यांस आणितां ॥६७॥
घेतला ग्रन्थीचे सांथीचा धसका । मोडली जयाचे धैर्याची बैसका । म्हणून रडे हा यात्रेकरू देखा । ऐसा हा एकसारखा निष्कारण ॥६८॥
म्हणोनि गयावळ करी समजी  । माधवरावांचे मनामाजी । माझ्याआधींच माउली माझी । कैसी ही आजि मजपुढें ॥६९॥
“काशी प्रयाग करोनि सत्वर । शाम्याच्याही येतों अगोदर” ॥ हे जे बाबांचे पूर्वील उद्नार । तें हें प्रत्यंतर मूर्तिमंत ॥७०॥
छबी बाबांची डोळ्यांसमोर । दिसतां गृहप्रवेशाबरोबर ।  पाहूनि हा अकल्पित प्रकार । वाटला चमत्कार अत्यंत ॥७१॥
कंठीं प्रेमाचा गहिंवर । डोळां आनंदाश्रूंचा पूर । उठले रोमांच सर्वांगावर । फुटला पाझा घर्माचा ॥७२॥
ऐसी माधवरावांची स्थिती । गयावळाचे विपरीत चित्तीं । ग्रंथिज्वराची पडली भीति । म्हणोनि हे रडती सत्य वाटे ॥७३॥
शामाच पुढें जिज्ञासाप्रेरित । गयावळासी पृच्छा करीत । कैसेनि ही तुम्हांस प्राप्त । कथा हें साद्यंत आम्हांतें ॥७४॥
पुढें गयावळ सांगूं लागला । समग्र वृत्तान्त माधवरावाला । बारा वर्षांमागें जो घडला । नवलाव झाला परिसा तो ॥७५॥
एक ना दोनतीनशें नोकर । गयावळाचे पगारदार । मनमाड आणि पुणतांब्यावर । यात्रा सविस्तर नोंदीत ॥७६॥
यात्रेकरूंची लावावी सोय । गयावळांचा नित्य व्यवसाय । चाललें असतां ऐसें कार्य । गयावळ हा जाय शिरडीतें ॥७७॥
साई समर्थ मोठे संत । ऐसी त्यानें परिसिली मात । व्हावें तयांच्या दर्शनें पुनीत । धरिला हा हेत तयानें ॥७८॥
घेतलें साईबाबांचें दर्शन । करूनियां पायांचें वंदन । छबी तयांची संपादन । इच्छा ही निर्माण जाहली ॥७९॥
होती माधवरावांपाशीं । छबी एक टांगिली भिंतीसी । गयावळ मागूं लागला तियेसी । पुसूनि बाबांसी ती दिधली ॥८०॥
तीच कीं ती आपुली छबी । तोच गयावळ हें मग आठवी । तेथेंच बाना कैसें मज पाठवी । कैसें मज भेटवी दीर्घकालें ॥८१॥
वस्तुस्थिति पाहूं जातां । बारा वर्षांमागील वार्ता । कोण किमर्थ कीं ही स्मरतां । कधीं न चित्ता आठवली ॥८२॥
परी बाबांची अगाध लीला । तेथेंच पाठविलें शामाला । तेथेंच दिधलें निजदर्शनाला । गयावळही धाला अत्यंत ॥८३॥
हीच कीं दिधली आपुले येथून । साईबाबांची आज्ञा घेऊन । याच गयावळालागून । जाहलें स्मरण शामास ॥८४॥
यांचेच येथें पूर्वीं आपण । उतरलों होतों शिरडीस येऊन । यांनींच बाबांचें करविलें दर्शन । जाहलें स्मरण गयावळा ॥८५॥
मग परस्पर कृतोपकार । नाहीं आनंदा पारावार । ठेविली उत्तम व्यवस्था फार । त्यांनीं गयेवर शामाची ॥८६॥
तया घरची काय श्रीमंती । दारीं जयाचे झुलती हत्ती । आपण पालखीमाजीं बैसती । शामास बैसविती हत्तीवर ॥८७॥
आनंदें विष्णुपदावर जाऊन । पूजासंभार सवें घेऊन । घातलें देवास अभिषेक स्नान । केलें पिंडप्रदान यथाविधि ॥८८॥
जाहलें मग ब्राम्हाणसंतर्पण । नैवेद्यसमर्पणपूर्वक भोजन । आनंदें झाली यात्रा संपूर्ण । घेतली करवून बाबांनीं ॥८९॥
असो या सर्व कथेचें सार । सार्थ बाबांचे सुखोद्नार । अनुभवा येती अक्षरें अक्षर । प्रेमही भक्तांवर अनिवार ॥९०॥
हें तर काय भक्तप्रेम । इतर जीवांसही देखत सम । तयांसींही तादात्म्य परम । आवड ही नि:सीम तयांची ॥९१॥
कधीं लेंडीहून मशिदीं येतां । सहज मार्गें चालतां चालतां । कळप एकदां शेळ्यांचा भेटतां । परमानंदता बाबांस ॥९२॥
तंव त्या समस्त कळपावरून । निज अमृतद्दष्टी फिरवून । त्यांतून कधीं एक दोन । शेळ्या ते निवडून काढीत ॥९३॥
धणी मागेल जी ती किंमत । बाबा तत्काळ देऊनि टाकीत । कोंडाजीचे पाशीं ठेवीत । ऐसी ही पद्धत बाबांची ॥९४॥
एके दिवशीं शेळ्या दोन । किंमत बत्तीस देऊन । बाबा आले खरीदून । सकळांलागून आश्चर्य ॥९५॥
पडतां या दोनी द्दष्टीं । अवचित आवडी उपजली पोटीं । जाऊनियां तयांचे निकटीं । पाठी थोपटी तयांची ॥९६॥
पशुजन्मीं देखूनि उभयतां । कृपा उपजली साईसमर्थां । स्थिति पाहोनि कळवळले चित्ता । प्रेमोद्रेकता दाटली ॥९७॥
घेवोनियां तयांसी जवळी । साई प्रेमें तयां कुरवाळी । साश्चर्य झाली भक्तमंडळी । पाहोनि नव्हाळी बाबांची ॥९८॥
पूर्वजन्मींचा लोभ परम । स्मरला साईंस आलें प्रेम । पाहूनि तयांचा पशुजन्म । कळवळा अप्रतिम उपजला ॥९९॥
दोन रुपये जिची किंमत । तीन अथवा चार तिजप्रत । देती बाबा सोळा हें विपरीत । पाहोनि हो चकित तात्याबा ॥१००॥
‘देई वाणी घेई प्राणी’ । ऐसें प्रत्यक्ष देखूनि नयनीं । तात्यासह माधवरावांनीं । धिक्कारिली करणी बाबांची ॥१०१॥
दोहोंच्या माला सोळा कां देती । बाबांस पैशाची किंमत का नव्हती । कीं ते यथेच्छ कांहींतरी करिती । ऐसीही उपपत्ति बैसेना ॥१०२॥
दोघे अंतरीं बहु चडफडती । ऐसा कां बाबा हा सौदा करिती । दोघेही बाबांस दूषण देती । ही काय रीती सौद्याची ॥१०३॥
ऐसे कैसे बाबा फसले । पाहूं अवघे लोक तैं जमले । बाबा अंतरीं स्वस्थ ठेले । जाणों न हरवलें यत्किंचित ॥१०४॥
जरी हे दोघे ऐसे कोपले । बाबांस दूषण देऊं सरले । तरी न बाबा यत्किंचित ढळले । अचल ठेले शांतिसुखें ॥१०५॥
मग आदरोनि विनयवृत्ती । दोघेही ते बाबांस पुसती । ही काय उदारपणाची रीती । रुपये बत्तीस गेलेना ॥१०६॥
केवळ पैशाचा तो प्रश्न । परिसोनि साई हास्यवदन । मनीं म्हणे हे वेडे जन । कैसें म्यां समाधान करावें ॥१०७॥
परी बाबांची शांति विलक्षण । स्थैर्य न ढळे अणुप्रमाण । हेंच परम शांतीचें लक्षण । आश्चर्य अवघेजण करिताती ॥१०८॥
क्रोध नाहीं जयाच्या गांवीं । परमशांतीच जो अनुभवी । भूतमात्रीं जो भगवंत भावी । कैशी त्या शिवावी अविवेकता ॥१०९॥
विवेकद्दष्टीचे जे निधडे । क्रोध येऊं न देती पुढें । विपायें जैं हा प्रसंग जडे । भांडार उघडे शांतीचें ॥११०॥
‘अल्ला मालिक’ निरंतर ध्यान । तयाचें काय वानूं महिमान । चरित्र अगाध आणीक गहन । अतिपावन हितकर ॥१११॥
ज्ञानगर्भ वैराग्यनिधि । निजशांतीचा जो उदधी । करुणापरिपूर्ण जायची बुद्धि । वदला त्रिशुद्धी तें परियेसा ॥११२॥
पाहूनियां दोघांचा आग्रह  । बाबांनींही केला निग्रह । ज्या मज बसाया ठाव ना गृह । त्या मज संग्रह किमर्थ ॥११३॥
म्हणाले जाऊनि दुकानांत । आधीं आणा डाळ विकत । चारा शेरभर त्यां मनमुक्त । मग द्या त्या परत धनगरा ॥११४॥
आज्ञेनुसार मग तात्काळ । शेळ्यांस खाऊं घातली डाळ । मग कांहींही न दवडितां वेळ । पाठविल्या परत कळपांत ॥११५॥
मूर्तिमंत परोपकार । तो हा प्रत्यक्ष साई अवतार । तयास तात्या, शामा, वा इतर । काय सुविचार सुचवितील ॥११६॥
डाळ चारवूनि परम प्रीतीं । पाहूनि शेळ्या पावल्या तृप्ती । मग म्हणती द्या धनियाप्रती । घेवोत विश्रांती कळपांत ॥११७॥
रुपये गेले रुपयापरी । शेळ्या गेल्या फुकटवारी । पुढें गतजन्मींची नवलपरी । कथिली सारी बाबांनीं ॥११८॥
जैसा तात्या तैसाच शामा । दोघांवरही बाबांचा प्रेमा । तयांचिया कोपोपरमा । कथिती मनोरमा आख्यायिका ॥११९॥
साई स्वयें होऊनि आपण ॥ दोघांलागीं करिती निवेदन । शेळ्यांचें पूर्वजन्माचें कथन । श्रोतांही श्रवण कीजे तें ॥१२०॥
पूर्वजन्मीं यांचें सुदैव । तेव्हां हे जीव होते मानव । मजपाशींच बसावया ठा । कर्मप्रभाव यांनाही ॥१२१॥
या ज्या शेळ्या दिसती तुम्हां । होते हे बंधू पूर्वजन्मा । भांडतां परस्पर झाली सीमा । ते या परिणामा पावले ॥१२२॥
बंधुबंधूंत आरंभीं प्रेम । एकत्र अशन शयन नेम । नित्य चिंतिती कुशल क्षेम । एकात्मता परम उभयांसी ॥१२३॥
ऐसे दोघे जरी सहोदर । कर्मधर्मसंयोग दुर्धर । द्रव्यलोभ अति भयंकर । पाडिलें वैर परस्परीं ॥१२४॥
ज्येष्ठ बंधु महा आळसी । कनिष्ठ व्यवसायी अहर्निशीं । तेणें जोडिल्या द्रव्यराशी । मत्सर ज्येष्ठासी संचरला ॥१२५॥
काढूनियां टाकावा कांटा । मग द्रव्यास नाहीं तोटा । ऐसिया विचारें आडवाटा । आवडल्या ज्येष्ठा धनलोभें ॥१२६॥
धनमोहें द्दष्टिप्रतिबंध । डोळे असतां झाला अंध । विसरला बंधुप्रेमसंबंध । जाहला सन्नद्ध तद्‌घाता ॥१२७॥
परम कठिण प्रारब्धभोग । उपजला निष्कारण वैरयोग । फुटले गुप्त कपटप्रयोग । लोभावेग अनावर ॥१२८॥
होतें त्यांचें आयुष्य सरलें । बंधुत्वप्रेम समूळ विसरले । दुरभिमानें अत्यंत खवळले । वैरीसे झगटले परस्पर ॥१२९॥
सोटा हाणोनियां माथां । एकानें दुजिया पाडिलें खालता । तेणें कुर्‍हाडीचिया आघाता - । सरसा निजभ्राता मारिला ॥१३०॥
मग ते दोघे पडले मूर्च्छित । छिन्न भिन्न रुधिरोक्षित । अल्पावकाशें असुविरहित । पावले पंचत्व दोघेही ॥१३१॥
ऐसा त्यांचा होतां अंत । प्रवेशले ते या योनींत । ऐसा यांचा हा वृत्तान्त । स्मरला मज साद्यंत तयां पहातां ॥१३२॥
ए कृतकर्म  भोगावयासी । आले शेळीचिया जन्मासी । अवचित कळपांत देखतां त्यांसी । प्रेमावेशीं आलों मी ॥१३३॥
म्हणोनि खर्चोनि पल्लवचे दाम । वाटलें तयांसी द्यावा विश्राम । तुमचिया मिषें तयांचें कर्म । आडवें कीं ठाम तयांपुढें ॥१३४॥
शेळियांलागीं दया पोटीं । परी तुमचिया आग्रहासाठीं । मीही जाहलों कबूल शेवटीं । द्यावया त्या पाठीं धनगरा ॥१३५॥
असो येथें संपली कथा । क्षमा करावी मजला श्रोतां । पुढील अध्याय पुढां परिसतां । आनंद चित्ता होईल ॥१३६॥
तोही परम प्रेमभरित । तेंही साईमुखींचें अमृत । हेमाड साईचरणीं विनत । होऊनि विनवीत श्रोतयां ॥१३७॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । काशीगयागमन - अजाजन्मकथनं नाम षट्‍चत्वारिंशत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥


॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP