६) ऐकोनिया मात चोखा सांगे तिसी ।  पूर्ण नव मासांसी भरियेलें ॥१॥
साहित्य सामुग्री नाहीं कांही घरीं । म्हणोनी निर्धारी बोलियेली ॥२॥
ऐसा हा घोर कोणें वागवावा । म्हणोनी तुझे गांवा वेगें आलों ॥३॥
निर्मळा म्हणे अनुचित केलें । तुम्हां काय वहिलें म्हणो आतां ॥४॥

७) ऐसे आनंदाने एक मास राहिला । परी हेत गुंतला पांडुरंगी  ॥१॥
रात्रंदिवस छंद विठ्ठल नामाचा । नाहीं संसाराचा हेत मनीं ॥२॥
भोजन सारूनी बैसले एकांती । निर्मळा बोलती चोखियासी ॥३॥
बहु दिस झाले खंती वाटे मना ।  पंढरीचा राणा आठवत ॥४॥
गोडधड जिवासी ते कांहीं । कई हो डोई पायीं ठेवीन मी ॥५॥
निर्मळा म्हणे अहो देवराया । भेटी लवलाह्या देई मज ॥६॥

८) कृपेच्या सागरा परिसा विनवणी । मस्तक चरणीं असो माझा ॥१॥
बहुत प्रकार मज तें कळेना । घातली चरणा मिठी बळें ॥२॥
देह मन चित्त करी तळमळ । न चालेचि बळ काय करूं ॥३॥
न सुटे  संसार पडतसे मिठी । तेणें पडे तुटी तुम्हां सवें ॥४॥
निर्मळा म्हणे काय करूं आतां । तुम्ही तो परतें मोकलिलें ॥५॥

९) कां बा पंढरीराया मोकलिलें मज । नाठवेचि मज दुजें कांहीं ॥१॥
मज तंव असे पायांसवें चाड । आणिक कैवड कांही नेणें ॥२॥
चोखियासी सुख विश्रांति दिधली । माझी सांड केली दिसतसे ॥३॥
निर्मळा म्हणे तुम्ही तो सुंजाण । माझा भाग शीण कोण वारी ॥४॥

१०) कां हो पांडुरंगा मज मोकलिलें । पराधीन केलें जिणें माझें ॥१॥
किती हे जाचणी संसार घसणी । करिती दाटणी काम क्रोध ॥२॥
आशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ । लाविलासे चाळा येणे मज ॥३॥
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना । येऊं द्या करुणा देवराया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP