१६) न होई पांगिला संसाराचे ठायीं । आणिक प्रवाहीं पाडूं नको ॥१॥
चित्त शुद्ध करि मन शुद्ध करी । वाचे हरि हरि जप सदा ॥२॥
या परतें साधन आन नाहीं दुजें । हेंचि केशवराजे सांगितलें ॥३॥
निर्मळा म्हणे चोखिया सुंजाणा । अनुभवीं खुणा मना तूंचि ॥४॥

१७) नाहीं मज आशा आणिक कोणाची । स्तुति मानवाची करूनी काय ॥१॥
काय हे देतील नाशिवंत सारे । यांचे या विचारें यांसी न पुरे ॥२॥
ऐंसें ज्याचें देणें कल्पांती न सरे । तेंचि एक बरें आम्हांलागीं ॥३॥
जो भक्तांचा विसावा वैकुंठनिवासी । तो पंढरीसी उभा विटें ॥४॥
निर्मळा म्हणे सुखाचा सागर । लावण्य आगर रूप ज्याचें ॥५॥

१८) परमार्थ साधावा बोलती या गोष्टी । पुरी न ये हातवटी कांही त्यांची ॥१॥
शुद्ध भक्तिभाव नामाचें चिंतन । हेंचि मुख्य कारण परमार्था ॥२॥
निंदा दोष सुति मान अपमान । वमनासमान लेखा आधीं ॥३॥
परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ । मानावा अढळ परमार्थीं ॥४॥
निर्मळा म्हणे हाचि परमार्थ । संतांचा सांगात दिननिशीं ॥५॥

१९) मज नामाची आवडी । संसार केला देशघडी ॥१॥
सांपडलें वर्म सोपें । विठ्ठल नाम मंत्र जपे ॥२॥
नाहीं आणिक साधन । सदां गाय नारायण ॥३॥
निर्मळा म्हणे देवा । छंद येवढा पुरवावा ॥४॥

२०)  रात्रंदिवस मन करी तळमळ । बहु हळ हळ वाटे जीवा ॥१॥
काय करूं आतां पाउलें न दिसती । पडिलीसे गुंती न सुटे गळे ॥२॥
बहु हा उबग आला संसाराचा । तोडा फांसा याचा मायबापा ॥३॥
निर्मळा म्हणे आतां दुजेपण । चोखियाची आण तुम्हां असे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP