आतां लक्ष्य संदेहालंकाराचें उदाहरण असें :--- “मदनाची ही साम्राज्य लक्ष्मी आहे ? कां ही सौंदर्य - सृष्टीची अधिदेवता आहे ? अशी, सीतेकडे पहात असतां लोकांच्या मनाची स्थिति, त्या वेळीं, संदेहपूर्ण झाली.”
ह्या श्लोकांत एकामागून एक अशा दोन तर्हेच्या संदेहाच्या प्रकाराचा लोकांनी अवलंब केल्यामुळें, त्या स्थितीचें झोपाळ्याशीं साद्दश्य दाखविलें आहे; आणि म्हणूनच त्या झोपाळ्याच्या साद्दश्यावरून दोला या मुळांतील शब्दांतून लक्षणेनें संशय हा लक्ष्यार्थ निघाला आहे. (म्हणून येथें संदेहालंकार लक्ष्य आहे.)
आतां व्यंग्य संदेहालंकाराचें उदाहरण असे :--- “तीरावर तरूणीचें हास्ययुक्त मुख व पाण्यांत विकसित होत असलेलें कमळ, या दोहोंना पाहून पुष्परसावर लुब्ध झालेली बालभ्रमरांची पंक्ति, वेडी होऊन, आळीपाळीनें दोहोंकडे धावू लागली.”
ह्या ठिकाणी कमल हा संदेहाचा विषय आहे. व त्याच्याशीं अभेद संबंधानें संबद्ध असे भ्रमरासमोर असलेले दोन पदार्थ (कमल व मुख) हे त्या संशायाचे प्रकार म्ह० विषयी आहेत. त्याच्या योगानें, हें कमल कां हें मुख, असा भ्रमराच्या मनांत संशय उत्पन्न झाला; पण तो ह्या ठिकाणीं व्यंग्य आहे. यावर कुणी म्हणतील कीं, “कमलाशीं समोरील मुख या पदार्थाचा अभेद आहे, अशी भ्रमराच्या ठिकाणीं बुद्धि उत्पन्न झाली तरच ती बुद्धि भ्रमराच्या ठिकाणीं, कमलाकडे जाण्याच्या प्रवृत्तीचा उपाय होईल; व याच द्दष्टीनें कमलाशीं मुखाची वाटणारी जी अभेदबुद्धि तिचीच ह्या श्लोकांत अपेक्षा आहे. समोर असलेले कोणते तरी पदार्थ अभिन्न आहेत, असें वाटणें हें संदेहालंकार होण्याला निरुपयोगी आहे.”
पण हें म्हणणें बरोबर नाहीं. कारण ह्या ठिकाणीं कमलाशीं अभेद असल्याचें जें ज्ञान तेंच संशयालंकाराला कारण आहे; समोरच्या पदार्थाशीं कमलाचीं अभेदबुद्धि झाली काय, किंवा कमलाशीं त्या समोरिल पदार्थाची अभेदबुद्धि झाली काय; दोहोचा अर्थ एकच. ह्या दोहोंपैकीं कशानेंही संदेहालंकार होऊं शकतो. कारण हा समोर हा समोर दिसणारा पहिला पदार्थ कमल आहे, कां दुसरा पदार्थ कमल आहे. असा संशयाचा प्रकार असला की संदेहालंकार होऊं शकतो. वरील श्लोकांत संदेहालंकाराचा ध्वनी आहे.
“मदनाची, उल्लंधन करतां येणार नाहीं अशी ही आज्ञा आहे, का त्या मदनाच्या धनुष्याची ही नवी कांब आहे, का वनांत राहाणारी ही वनदेवता आहे, का ही मुनिकन्यका शकुंतला आहे ?”
या श्लोकांत संदेहाचा वाचक शब्द नसल्यामुळें ह्यांतील संशय व्यंग्य असणेंच योग्य आहे. तरी पण, (संदेहाचा) विषय जो सुंदर स्त्री तिचें, ह्या ठिकाणीं स्पष्ट वर्णन केलें असल्यामुळें, ह्यांतील संदेहाला संदेहध्वनि हें नांव देतां येणार नाहीं. पण ह्या श्लोकांत गुणीभूत - व्यंग्याचा एक प्रकार म्हणून संदेहाचा व्यवहार करता येईल. ह्या श्लोकांत असलेल्या संदेहालंकारांतील अनुगामी धर्म, प्रत्येक प्रकारांत, निराळा असा सांगितला आहे.