आतां चित्रमीमांसेंत, संशयध्वनीचें उदाहरण देण्याच्या प्रसंगानें, अप्पय दीक्षितांनीं खालीलप्रमाणें लिहिलें आहे :---
“सुवर्णाप्रमाणें गौर अंग असलेल्या व साक्षात् लक्ष्मीप्रमाणें दिसणार्या एका सुंदर स्त्रीला पाहून, संशयांत पडलेले भगवान वरदराज आपल्या वक्ष:स्थलाकडे पाहूं लागले.”
ह्या ठिकाणीं. संदेहाचा, संशय म्हणून शब्दानें उल्लेख केला असला तरी, त्यावरून ह्या ठिकाणीं संदेहालंकार आहे असें म्हणतां येणार नाहीं. संदेहालंकार होण्याला कारण म्हणून, खालील अर्थाचें वावय ह्या ठिकणीं पाहिजे होतें :---
“माझ्या वक्ष:स्थलावर राहाणारी लक्ष्मी, तेथून खालीं उतरून माझ्यापुढें उभी तर राहिली नाहीं ना ?”
पण अशा रीतीचा संशयात्मक अर्थ (सांगणारें वाक्य ह्या ठिकाणीं नसल्यानें हा अर्थ) “वरदराजानें आपल्या वक्ष:स्थलाकडे पाहिलें.” या शब्दानें सूचित झाला आहे; म्हणून, ह्या ठिकाणीं संदेहालंकाराचा ध्वनि आहे.
“एक सुंदरी आरशांत आपल्या उपभोगाचीं चिन्हें पाहत होती; पण, त्यांत आपल्या प्रतिबिंबाबरोबर आपल्या पाठीमागें असलेल्या प्रियकराचें प्रतिबिंब तिनें पाहिलें, आणि मग, लाजेनें तिनें काय काय केलें, तें सांगता पुरवत नाही.” (कुमारसंभव ८।११)
ह्या श्लोकांत, (तिनें) काय काय केलें, असा सामान्य तर्हेचा अनुभाव सांगितला आहे; पण तो विशिष्ट तर्हेचा अनुभाव आहे याची प्रतीति होण्याकरतां येथें लज्ज शब्दाचा प्रयोग केला आहे. तरी पण, त्यावरून येथें उज्जा हा व्यभिचारी भाव वाच्य झाला आहे असें म्हणतां येणार नाहीं. कारण, त्या लज्जारूपी भावाची स्वत:च्या विभाव व अनुभावाच्या योगानें, शृंगाररसाला अनुकूल अशी अभिव्यक्ति झाली आहे; म्हणजेच ह्या श्लोकांत, लज्जा ह्या व्यभिचारी भावाचा ध्वनि आहे.”
अप्पय दीक्षितांचें हें म्हणणें, ज्यांना ध्वनीचें तत्त्व माहीत आहे अशा विद्वानांकडून उपहास होण्याला योग्य असेंच आहे. कसें तें पहा :---
वरील श्लोकांतील संशयाविष्ट (संशयापन्न) यांतील संशयपदानें एका पदार्थाविषयीं विरुद्ध असलेल्या नाना पदार्थांच्या संबंधीं होणारें (संशय) ज्ञान प्रत्यक्षपणें सांगितलें गेलें आहे. आतां ते विरुद्ध नाना पदार्थ तरी कोणते अशी, विशिष्ट प्रकारची आकांक्षा उत्पन्न झाली असतां, “ह्या वक्ष:स्थलावर असलेली लक्ष्मी तेथून खालीं उतरून माझ्यापुढें उभी आहे कीं काय ?” हा विरुद्ध नानार्थ, “स्वत:चें वक्षस्थळ पाहिलें” या वाच्यार्थानंतर होणार्या व्यंजनाव्यापारानें सूचित झाला आहे. आणि मग तो व्यंग्यार्थ, अभिधाशक्तीनें संशय या शब्दापासून होणार्या ज्ञानाचें विशेषण असणारा, विरुद्ध नाना पदार्थरूप जो सामान्य अर्थ, त्याच्याशीं अभिन्न होऊन शेवटपर्यंत राहतो. अशा रीतीनें, संशय हा सामान्य अर्थ अभिधेनें सांगितला असल्यामुळें, ‘वक्ष:स्थलावर उभी असलेली लक्ष्मी खालीं उतरून माझ्यापुढें उभी राहिली आहे कीं काय ?’ हा त्या सामान्य संशयाचा विशिष्ट भाग, ‘विरुद्ध नानार्थ असणें’ या सामान्य स्वरूपाच्या संशयानें आपल्या पोटांत घेतला आहे; अर्थात् येथें व्यंजना व्यापारानें सूचित होणारा जो विशिष्ट संशयाचा अर्थ, त्याचें शेवटीं वाच्यार्थरूप संशयामध्येंच पर्यवसान झालें आहे; आणि म्हणूनच व्यंजनाव्यापारानें ज्ञात होणारा विशिष्ट संशयार्थ, येथें वाच्यार्थाशीं अभिन्न होऊन राहिला आहे. असें असल्यामुळें त्या विशिष्ट व्य़ंजनागम्य अर्थाला ध्वन्यर्थ हें नांव देणें योग्य होणार नाहीं. कारण कीं, वाच्यवृत्तीनें ज्याला यत्किंचित् सुद्धां स्पर्श केला नाहीं अशा अर्थालाच ध्वन्यर्थ म्हणावें, असा ध्वनि - मार्गाच्या प्रवर्तकांनीं सिद्धांत सांगितला आहे. उदाहरणार्थ :---
ध्यन्यालोकाचे कर्तें आनंदवर्धनाचार्य आपल्या ग्रंथाच्या द्वितीय उद्योतांत खालीलप्रमाणें लिहितात :---
“शब्द व अर्थ यांच्या शक्तीनें (व्यंजनाव्यापारानें) खेचून आणलेला व्यंगार्थ, ज्या ठिकाणीं कवि स्तताच्या शब्दांनीं स्पष्ट करतो, तो ध्वन्यर्थ नसून त्याहून निराळा कोणता तरी अलंकार आहे असे समजावे”